अजूनही तृष्णा
अजूनही तृष्णा
सांडलेले क्षण रम्य घरात त्या
दरवळ कोपऱ्यातून अजून आहे
ओढ अजून त्या हिरव्या क्षणांची
श्वासास माझ्या तृष्णा अजून आहे
खुणावते ते मज अंगण अजूनी
हाक लाडाची आईची येते
टाकून भातुकली हातातली
मी आईच्या कुशीत शिरते
थोर दोन बहिणी माझ्या
पेड वेणीचे वळून देती
काम माझ्या वाटणीचे ते
नकळत आईस करून टाकती
हाक आजीची जगन्नाथ म्हणूनी
ऐकताच मी धावत जाई
हात कौतुकाचा पाठीवर फिरता
गोळी श्रीखंडाची वसूल होई
सख्या बरोबरीच्या वाड्या मधल्या
गूज गोष्टी माझ्या अजूनी कानी
नागपंचमीची फेर फुगडी
तृष्णा अजून ती हळव्या मनी
भास करिती मज अजून सोबत
गंधाळलेली माती खुणावते
पुन्हा पुन्हा बोलवत मजला
सांजेला या का तृष्णा वाढवते
जयश्री देशकुलकर्णी
कोथरूड, पुणे-३८
