परतीची वेळ
परतीची वेळ आली,
चार शब्द बोलून घे,
नंतर नको शंका कुठली,
असेल काही प्रश्न तुझे,
आजच सारे विचारून घे.
अती केली मी प्रेमाची,
नजरेत तुझ्या देखावा तो,
मनाची खोली न गाठली तू,
डोळ्यांत उतरून माझ्या,
मनात दडलेले प्रेम जाणून घे.
दिसले तुला माझे ऐबच नेहमी,
न दिसले कधीच स्नेह माझे;
कधी भासली जर माझी साथ,
त्या वळणावरून परत फिरून ये.
जपले तुला मनापासून,
तरी राहिल्या काही उणिवा;
माझ्या शब्दांआडचे मौन वाच,
माझ्या डोळ्यांतून मला जाणून घे.
उद्याची वाट वेगळी असेल,
कदाचित भेट होणार नाही;
आज उरले जे मनामध्ये,
ते मनमोकळे बोलून घे.
उद्या जर मी नसेन जवळ,
तर आठवणींना दोष नको;
जे दिले तुला मनापासून,
ते मनाच्या कोपऱ्यात साठवून घे.
परतीची वेळ आली आहे,
आता काही मागणे नाही;
फक्त एवढेच मनात आहे,
जाताना एकदा माझे होऊन घे.
प्रविण ज्यो. तायडे
अमरावती
