Back to Book Details Report Reviews

अर्ध्या वाटेवर साथ सोडू नको

तुटलेल्या या हृदयाला, पुन्हा तडा जाऊ देऊ नको,
जपलंय तुला जीवापाड, आता दूर जाऊ नको.
मी कधीचाच हरलेलो, आस जिंकण्याची देऊ नको,
आग लागली घराला, दुरून फुंकर घालू नको.

तुझ्या आठवणींनी माझा, प्रत्येक क्षण सजला होता,
तुझ्या एका हसण्यातच, माझा संसार वसला होता.
स्वप्नांच्या या घराची, राख रांगोळी करू नको,
फुललेल्या या नात्याला, विरहाची आग देऊ नको.

मी तुझाच राहिलो, तू माझीच राहावी,
मनातली ही प्रीत, अखेरपर्यंत वाहावी.
नात्याच्या या धाग्याला, गाठ कधी पडू देऊ नको,
जुळलेल्या या मनांना, वेदना पुन्हा देऊ नको.

तू दूर गेलीस तर, श्वासही परका होईल,
हसणाऱ्या या चेहऱ्यावर, दुःख पुन्हा येईल.
माझ्या नशिबाला अशी, शिक्षा देऊ नको,
जिवंतपणी मरण्याची, मला सजा देऊ नको.

जन्मोजन्मीची माझी, एवढीच मागणी आहे,
तुझ्या सोबतीत जगण्याची, मनाची ही आस आहे.
नशिबाने दूर केलं तरी, मनाने दूर जाऊ नको,
माझ्या प्रेमाला परकं करून, स्वतःपासून दूर जाऊ नको.

तुटलं जर हे नातं, पुन्हा जोडता येणार नाही,
मनातली ही जखम, सहज भरता येणार नाही.
म्हणूनच म्हणतो प्रिये, मला असा दगा देऊ नको,
अर्ध्या वाटेवर माझी, साथ कधी सोडू नको.

जपलंय तुला जीवापाड, मनापासून हृदयात,
तुझ्याविना काहीच उरणार नाही, या माझ्या जीवनात.
शेवटच्या श्वासापर्यंत, माझी साथ सोडू नको,
तुझ्याविना एकटा मी, घरटे माझे तोडू नको.

जपलय तुला जिवापाड, 

आता दूर जाऊ नको.

अर्ध्या वाटेवर, साथ सोडू नको.

प्रविण ज्यो. तायडे

अमरावती 

Reviews


Your Rating

blank-star-rating

Left Menu