पावसा एक विचारु का
(तळखंड या पुस्तकातून घेतलेली कविता)
पावसा, एक विचारू का?
रिमझिम पडणाऱ्या सरी, तुला एक विचारू का,
मातीवरती पडण्यापूर्वी, चिंब मला करशील का?
गावी माझा सखा एकटाच, उदास आहे,
मीही उदास तुझ्याविना, तू जाऊन त्याला सांगशील का?
साथ सुटली, वेगळ्या झाल्या वाटा,
त्याच वाटेवर उभा राहून, माझी वाट पाहशील का?
आभाळ यावे दाटून, चित्कारावा पाऊस,
न टाळावा मोह दोघांना—
येथे मला आणि तेथे त्याला,
एकाच सरीत भिजवशील का?
थेंब तुझा अंगावर पडता, आठवण त्याची यावी,
गार वाऱ्याच्या झुळुकीसोबत, त्याची चाहूल यावी;
दूर असला तरी त्याच्या मनात, माझी आठवण जागवशील का,
माझ्या जिवलग मित्राला सांग, पुन्हा एकदा भेटशील का?
जुन्या आठवणींच्या वाटेवर, पुन्हा त्याला नेशील का,
हसत-खेळत घालवलेले क्षण, त्याच्या मनी जागवशील का;
कितीही दूर गेलो आपण, मनात अंतर राहू नये,
एकदा तरी माझ्या मित्राला, माझ्याजवळ घेऊन येशील का?
पावसा, एक विचारु का?
गावी माझा सखा एकटाच, उदास आहे,
मीही उदास तुझ्याविना, तू जाऊन त्याला सांगशील का?
(माझा जिवलग मित्र देवानंद विश्वनाथ मोहोड याला समर्पित)
प्रविण ज्यो. तायडे
अमरावती
