कोणीतरी असले पाहिजे
कधी कधी वाटते
कोणीतरी माझ्यावर,
प्रेम केले पाहिजे,
या आयुष्याच्या प्रवासात
कोणीतरी सहप्रवासी झाले पाहिजे.
किती जगावे एकट्याने आता येथे,
आता जगणे सार्थक झाले पाहिजे;
वळावी पाऊले आपोआप घराकडे,
वाट पाहणारे कोणीतरी असले पाहिजे.
सुखाच्या क्षणी हसणारे,
तर भेटतात अनेक,
दुःखाच्या क्षणी
हातात हात घेणारे असले पाहिजे;
न सांगताही ओळखावे
मन माझे,
शब्दांविना मन समजणारे
कोणीतरी असले पाहिजे.
थकलेल्या या मनाला
विसावा देणारा खांदा असावा,
त्या खांद्यावर डोके ठेवून,
मन मोकळे करता आले पाहिजे;
डोळ्यांत दाटलेले अश्रू
शब्दांविना जाणणारे,
मनातले दुःख अलगद पुसणारे
कोणीतरी असले पाहिजे.
जग जरी सारे दूर गेले तरी
आपले कोणीतरी असले पाहिजे,
“मी आहे ना...” असे हक्काने म्हणणारे
आयुष्यात असले पाहिजे;
वादळ कितीही आले तरी
हात कधी न सोडणारे,
शेवटच्या श्वासापर्यंत
सोबत चालणारे
कोणीतरी असले पाहिजे.
जीवनाचा काय भरवसा,
क्षणात होते काय,
आज आहे
ते उद्या असेलच असे नाही;
स्मृतीत सदैव प्रेमाने जपणारे,
आपण नसतानाही आपले म्हणणारे,
कोणीतरी असले पाहिजे.
प्रविण ज्यो. तायडे
अमरावती
