शरशय्येवरील भीष्म
शब्दाघात गहन असोत,
त्यांतून विश्वासरुधिर वाहू दे;
व्यर्थ नको खड्गास जागवू,
तो म्यानांतच सुप्त राहू दे.
ज्ञात आहे मला,हे घाव कुणाचे,
मम कर्मांचे आणि मौनाचे!
धर्म झाला की अधर्म
निश्चित कळेना,
रणभूमीवर पतित हे पुत्र,
सांग केशवा कोणाचे?
नको फुंकर घालू
मिथ्या सांत्वनाची, माधवा,
ही व्यथा मम हृदयांतच वहू दे;
शरशय्येवर निजलो,
मृत्यूची प्रतीक्षा करीत,
मम वेदना मम मौनांतच
विलीन होऊ दे!
प्रविण ज्यो. तायडे
अमरावती
