कर्माच्या फेराला नाकारता आलं नाही
मिळालं असतं मलाही ते स्थान,
पण वाकड पाऊल टाकता आलं नाही.
दुःख व्हावं कुणाला म्हणून
कधीच तसं वागता आलं नाही.
पाप-पुण्याचं फारसं काही
माहित नव्हतं मला,
पण कर्माच्या फेराला
कधीच नाकारता आलं नाही.
सत्याच्या वाटेवर चालत राहिलो,
कितीही काटे आले तरी;
संपून गेलं जीवन माझं,
पण सत्याला अंतर देता आलं नाही.
स्वतःचं नुकसान झालं तरी
कुणाचं जगणं उद्ध्वस्त करता आलं नाही;
हरलो जरी या जगाच्या खेळात,
पण माणुसकीला हरवता आलं नाही.
मिळाली आपुलकीची पावती
मी संकटात असताना;
प्रामाणिक होता संघर्ष, जीवनाशी माझा,
म्हणून मृत्यूलाही मला नेता आलं नाही.
दुःख व्हावं कुणाला म्हणून
कधीच तसं वागता आलं नाही.
प्रविण ज्यो. तायडे
अमरावती
