पुनर्जन्म हा माझा
पुनर्जन्म हा माझा,
संघर्ष मागे मी सोडून आलो,
सातबारा कोरा झाला,
सर्व कर्ज मी फेडून आलो.
झिजलो आयुष्यभर,
ते मिळवण्यासाठी जे माझे नव्हते,
सुखाच्या छायेत थोडे विसावू द्या मला,
नुकतेच दुःख मी भोगून आलो.
भरून निघाल्या त्या जुन्या जखमा,
आठवत नाही ते झालेले वार,
संपली ती लढाई आता,
तलवार मी फेकून आलो.
पुसली जावी ओळख जुनी,
घेऊन आलो रूप नवे,
आता जन्म नव्या रूपाने,
ओळख जुनी मी त्यागून आलो.
घेतले असतील निर्णय चुकीचे काही
आहात झाले असतील जीवात्मे काही,
पडूनी त्यांच्या पायी,
क्षमा मागुनी मी आलो
हलके झाले मन माझे,
सर्व कर्ज मी फेडून आलो,
पुनर्जन्म हा माझा,
संघर्ष मागे मी सोडून आलो.
प्रविण ज्यो. तायडे
अमरावती
