मनाचा वेडेपणा
माझ्या मनाचा वेडेपणा...
जे माझं होतं कधीकाळी,
त्यावर आता माझा अधिकारच नाही,
हा कसला त्याग, हे कसलं समर्पण,
मला काही केल्या समजतच नाही...
असेल कदाचित माझ्या या
भाबड्या मनाचा हा वेडेपणा,
नसेल लिहिलं नशिबात माझ्या
तिचा होऊन राहणं भक्कम कणा,
पण नियतीचा हा खेळ थांबवणं
माझ्या हातात नाही,
अन् तिचा हा निष्ठूर निर्णय
माझ्या मनाला अजिबात मान्य नाही...
ती केवळ एक व्यक्ती नाही,
तर संपूर्ण जग आहे माझं,
त्या जगाच्या प्रत्येक कोपऱ्यावर,
तिच्या एका एका श्वासावर,
फक्त आणि फक्त नाव आहे माझं,
त्या श्वासांवरचा अधिकार सोडणं
मला कधीच जमणार नाही...
कसं सोडू हाथ तुझा,
कसं तोडू हे रेशमी बंध,
काहीच आता कळत नाही,
पण तुझा हा विरह, तुझा हा त्याग,
अन् हे सक्तीचं समर्पण,
माझ्या या वेड्या जीवाला,
नाही... अजिबात मान्य नाही!
@ नयना
