पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

आभास: समीक्षण

सकारात्मक कवितांचा संग्रह: आभास

© सुषमा ठाकूर

ऋचा दीपक कर्पे या युवा कवयित्री चा "आभास" हा कविता संग्रह हातात आला आणि चाळता चाळता त्यातच रमून गेले.
तीव्र कल्पनाशक्ती आणि त्या कल्पनांना बांधून ठेवणारे चपखल शब्द अशा सौंदर्याने नटलेली तिची कविता मला वाटली.

"दोन शब्द " मध्ये तिच्या आईच्या तिच्याविषयीच्या भावना व्यक्त करणाऱ्या पहिल्या आठ ओळी वाचल्या आणि मला लगेच ऋचा मधील निर्मितीक्षमतेचे हे सुरेख बीज कुठून आले हे लक्षांत आले.

पहिल्याच कवितेत ऋचा ने सांगितले आहे की तिला कविता कशी सुचते.
ही कविता मी वाचायला सुरुवात केली, वाचत गेले, सहज समजत गेली , सर्व गोष्टी डोळ्यांसमोर येत गेल्या, आणि शब्दांच्या अशा नादमय आवर्तनातच कविता संपूनही गेली.
ऋचा च्या जवळ जवळ सर्वच कविता अशाच साध्या, सोप्या, सरळ शब्दांतील नादमय वाटल्या.
"तुझा भास" ही कविताही अशीच सोप्या शब्दांत गुंफलेली, भावपूर्ण कलाकृती आहे. वाचता वाचता नकळतच तिच्या भावनांशी वाचक तादात्म्य पावतो आणि स्वतः च्या भावनांशी त्याचे नाते जोडतो आणि साम्य असतेच, त्यामुळे ती कविता मनात नकळत घर करते.
याच पद्धतीचा तिच्या "भास आभास","आभासी विश्व","नात्याला काही नाव नसावे" या सारख्या मनोहर पण अंतरात कळ उठविणाऱ्या कविता आहेत.
"तिला जगू द्या." "नात्याला काही नाव नसावे." सारख्या संवेदनशील, भावपूर्ण कविता व "स्त्री" सारख्या आदर्शवादी कविताही काळजात खळबळ माजविणाऱ्या आहेत.
"खरं प्रेम" ह्या ऋचाच्या कवितेत, कविता वाचल्यावर सर्वच पटत. मातीचा ओला गंध, हिरव्या पानाचा देठ, फुले, फुलपाखरे, वारा, आकाश, क्षितिज,मुसळधार पाऊस, नक्षत्रे, अंतराळ, अथांग सागर, लाटा, शंख शिंपले, वाळू आणि निसर्गातील अशा प्रत्येक गोष्टीवर अगदी तेवणाऱ्या निरांजनावर , देवळातील गाभाऱ्यावर सुद्धा आपले खरेखुरे प्रेम असते. हे ही कविता वाचल्यावर मनापासून पटते.
तिची "ग्लॅशियर" ही कविताही मला फार आवडली. एका वेगळ्याच पातळीवर घेऊन जाणारी ही कविता पुन्हा पुन्हा वाचावी इतकी सुंदर आहे.
"मला नको विचारू", "आठवणींची दारं", "पुन्हा","आठवणी " ह्या सारख्या प्रेमरसाने ओथंबलेल्या कविताही अतिशय भावपूर्ण, हळूवार व हृदयाच्या तारा झंकारणाऱ्या आहेत.
"अंतरीच्या भावफुला, "सदाफुली", "श्रावण", "मनाची दिवाळी" ह्या कविता नकळत शिकवून जातात की जीवन कसे जगावे. आणि कसा सर्व गोष्टींत आनंद मानावा.
"अंदमान " ही कविता वाचून असे वाटतही नाही की ऋचाने अंदमान न बघता ही कविता लिहिली आहे. इतक्या सुंदर रीतीने तिने ती प्रतिबिंबित केली आहे. "हो चिरायू, हो अमर " ही अशीच एक स्वातंत्र्याचे महत्व विशद करणारी सुंदर कविता.
आणि "काय गमावले काय कमावले" ही कविता तर कळस आहे. व जरी खूप काही गमावले असले तरी येणारे वर्ष खूप काही चांगले देईल हा आशावाद दर्शविणारी आहे. व त्यांतील शेवटच्या चार ओळी तर मनातील निराशा, दुःख घालवून पूर्ण सकारात्मकता देणाऱ्या आहेत.
तर अशा हलक्याफुलक्या शब्दफुलांतून आशावाद दर्शविणाऱ्या ह्या नादपूर्ण कविता अतिशय उचस्तरीय व विचार करायला प्रवृत्त करणाऱ्या आहेत. यात वादच नाही. ऋचा, पुस्तकांतील कविता अतिशय चांगल्या, भावपूर्ण व उच्च स्तरीय आहेत. पुन्हा पुन्हा वाचाव्यात इतक्या सुरेख आहेत.
तू हिंदीबरोबरच मराठीतही इतके सुंदर लिहिलेस ह्याबद्दल तुझे मन:पूर्वक अभिनंदन. व तुझ्या पुढील साहित्यिक वाटचालीसाठी तुला अनेक शुभेच्छा.

सुषमा ठाकूर.

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू