पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

मला आवडलेले पुस्तक: स्वप्नाचिया देशी

अलिकडेच लेखक श्री नागेश सू. शेवाळकर यांनी लिहिलेली "स्वप्नाचिया देशी" ही कादंबरी माझ्या वाचनात आली. 

श्री नागेश शेवाळकर यांची ग्रंथसंपदा मोठी आहे. धार्मिक ग्रंथ, कादंबरी, कथासंग्रह, चरित्र, बालसाहित्य, विनोदी साहित्य अशा विविध साहित्य प्रकारातील हे त्यांचे ४१ वे पुस्तक आहे. अशीच साहित्य संपदा विविध ऑनलाइन साहित्य संस्थावरही प्रकाशित आहे. ज्यामध्ये मातृ भारती, इन्फोटेक, स्टोरी मिरर, शॉपिजेन, प्रतिलिपी, स्टोरी कॅबिनेट, इरा इत्यादी प्रमुख साहित्य संस्था आहेत. कु कु एफ एम या ऑडिओ संस्थेने शेवाळकर सरांच्या २५ कथा ऑडिओ स्वरूपात प्रकाशित केल्या आहेत. "रामायणातील अमृतकण" हा ग्रंथ शॉपिजेन डॉट इन या संस्थेने प्रकाशित केला असून ख्यातकीर्त नाट्य कलावंत श्री दीपक रेगे यांनी या संपूर्ण ग्रंथाचे त्यांच्या युट्युब वर अत्यंत सुंदर आवाजात अभिवाचन केले आहे. हिंदी प्रातिनिधिक कथासंग्रहातही त्यांच्या कथा आहेत. त्यांच्या मराठी आणि हिंदी भाषेतील कथा, कादंबरी यांना राज्य आणि राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत. 

 

हल्ली अनेक मुला मुलींना परदेशात जाऊन शिक्षण घेण्याची व तिथेच नोकरी करण्याची इच्छा असते. अनेक मुलांची इच्छाशक्ती जबरदस्त असते, घरची परिस्थितीही अनुकूल असते. त्यामुळे ही मुले परदेशात जाऊन शिकून नोकरीही करतात. पण सगळ्याच मुलांना हे शक्य होतं का? काही आर्थिक मागासलेलेही असतात. त्यांनाही इच्छाशक्ती असते, पण घरातील आर्थिक परिस्थितीचे पाठबळ त्यांना नसते. अशावेळी घरातलाच एखादा भाऊ किंवा बहीण आपल्या सुख सुविधांचा त्याग करून ज्याची परदेशात जाण्याची इच्छा आहे त्याला मदत करतो किंवा मदत करते. परदेशात जाऊन ही मुले सुखी असतात का? त्यांना आपल्या देशाची आठवण येते की नाही? आई-वडिलांची आठवण येते की नाही? आपले जे लोक तिकडे आहेत ते एकमेकांना मदत करतात का? या प्रश्नांची उत्तरे वाचक या कादंबरीत शोधू शकतात. 

 

अशाच एका साता समुद्रा पार दूरदेशी नोकरी करणाऱ्या ध्येयवेड्या युवकाची, अमरची ही विलक्षण कहाणी आहे. बालपणापासून परदेशात जाण्याचं स्वप्न पाहणाऱ्या एका गरीब शेतकरी कुटुंबातील अमर नावाच्या युवकाने अपार कष्ट करून आणि मेहनतीच्या जोरावर नोकरी मिळवून आपलं ध्येय साध्य केलं आहे. तो परदेशात राहत असला तरी त्याचे भारतात राहणाऱ्या आपल्या माणसांशी असलेले ऋणानुबंध घट्ट जुळलेले आहेत. स्वतःच्या कुटुंबाविषयी त्याला कमालीची ओढ आहे. ज्यावेळी त्याला घराची आठवण होते, कधी एकटेपणा वाटू लागतो त्या प्रत्येक आनंदाच्या आणि दुःखाच्या प्रसंगी आपला लाडका खेळाडू सचिन याच्याशी तो संवाद साधतो, तोही मनातल्या मनात! हा संवाद एकतर्फी असला तरी आपल्या नायकाला आनंद देणारा असतो! कुणाजवळ तरी मन मोकळे करणे आणि मन हलके करणे ही मानवी मनाची आवश्यक गरज आहे. परदेशात राहूनही अमर भारतीय संस्कार विसरलेला नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा आदर्श त्याच्या नसानसात भिनलेला आहे. या संस्कारात त्याच्या ताईचा वाटा मोठा आहे. वडिलांना असलेल्या बिडीचे व्यसन असो अथवा तिच्या शिक्षकांना असलेले तंबाखूचे व्यसन, ती कशी सोडवते तो प्रसंग मुळातूनच वाचण्यासारखा आहे. या कादंबरी मधील युवक अमर याची थोरली बहीण आसावरी स्वतःच्या डॉक्टर होण्याच्या स्वप्नाला तिलांजली देते आणि अमरच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहते. अर्थात अमरलाही आपल्या बहिणीने केलेल्या त्यागाची जाणीव असते. अमरच्या बहिणीचा त्याग पाहून वाचकांचे डोळे ओलावल्याशिवाय राहत नाहीत! या कादंबरीत अमर हे मुख्य पात्र असले तरी त्याचे मित्र अखिलेश, सुबोध, मोनिका, उर्वशी, विलास, संजीवनी आणि आकांक्षा अशी महत्त्वाची पात्रे कथेच्या ओघात येऊन जातात. यातील प्रत्येकाची एक कथा आहे आणि लेखक नागेश शेवाळकर यांनी फार सुंदर पद्धतीने ती कथा गुंफलेली आहे. आकांक्षा सारख्या मूळ भारतीय असलेल्या मुलीला आपल्या भारतीय संस्कृतीचे महत्त्व सांगताना तिला ऐकवलेले विचार खरोखरच चिंतनशील आहेत. परदेशी संस्कृतीत जन्मलेल्या परंतु मूळ भारतीय वंशाच्या असलेल्या आकांक्षाला नायक म्हणतो,

"हे सारे शौक करायचे असतील तर स्वतःला भारतीय म्हणऊन घेऊ नका. ती रम, ती व्हिस्की, ही सिगारेट हे शौक असतील; पण गरज आणि आवश्यकता मुळीच नाही. सामाजिक सभ्यतेसाठी हे सारे करायचे असेल तर ते चूक आहे. कारण अपेय पिऊन सार्वजनिक ठिकाणी, घरी धिंगाणा करणे ही सभ्यता नाही, तर तो तमाशा आहे तमाशा..."अमरची बहिण असावरी हिचा होणारा नवरा अभिलाष हा सुसंस्कृत आणि सुशिक्षित असा तरुण आहे. आसावरिशी लग्न करताना हुंड्याची अभिलाषा न धरणारा मुलगा जेव्हा अमरला म्हणतो "मी हुंडा घेणार नाही आणि तुलाही घेऊ देणार नाही."

 

खाताना कुठे थांबायचं हे ज्याला कळतं त्याचं आरोग्य अबाधित राहतं असं म्हणतात. तद्वतच तुम्ही परदेशात गेल्यावर तिथं किती काळ थांबायचं हेही कळायला हवं! अन्यथा तुमच्या एकट्यामुळे कुटुंबातील इतरांच्या आयुष्यावर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ज्या देशात आपण जन्माला येतो, लहानाचे मोठे होतो तिथली ओढही कायम असते. मात्र परदेशात गेल्यावर कदाचित तेथील भरमसाठ पैसा, स्टेटस, तसंच सामाजिक प्रतिष्ठा आणि मित्रमंडळी यांच्या मोहात कायमचे अडकण्याची भीतीही असते. आजची तरुण पिढी स्वप्न बघणारी असून, आपल्या स्वप्नपूर्तीसाठी प्रचंड कष्ट करण्याची त्यांची तयारी असते. या कादंबरीच्या माध्यमातून लेखक नागेश शेवाळकर यांनी परदेशात नोकरी करणाऱ्या तसेच तेथे स्थायिक झालेल्या भारतीय युवा वर्गाचे प्रश्न, मुलींचे शिक्षण आणि लग्न, हुंडा पद्धत, स्त्री पुरुष समानता, सामाजिक बांधिलकी, व्यसनमुक्ती, शेतकऱ्यांच्या समस्या इत्यादी संवेदनशील विषयांना वाचा फोडण्याचा प्रयत्न केला आहे. ही कादंबरी आपणास अनेक चांगल्या विचारांची आणि सकारात्मकतेची शिकवण देते. भाऊ बहिणीतील गोडवा, मैत्रीचे महत्त्व, कुटुंबातील एकमेकांविषयी प्रेम, जिव्हाळा, सामाजिक बांधिलकी, देशप्रेम आणि यश मिळवण्यासाठी करावी लागणारी अथक धडपड, कष्ट, केवळ स्वप्ने न पाहता ती प्रत्यक्षात उतरण्यासाठी करावे लागणारे प्रयत्न याचे महत्त्व विशद करते. देश प्रेमाची भावना, अंत:करण हेलावणारे अनेक प्रसंग, तसेच सहज सोपी, पण काळजाचा ठाव घेणारी प्रभावी भाषा शैली यामुळे ही कादंबरी अतिशय वाचनीय झाली आहे. कादंबरीचा शेवट आसावरी आणि अभिलाष यांच्या लग्नाने गोड होतो. तसेच अभिलाषच्या वडिलांनी परदेशात स्थायिक झालेल्या या तरुणांना आपल्या मातृभूमी विषयी केलेले प्रबोधन मोठे वाचनीय तर आहेच आणि ते प्रत्येक परदेशात जाणाऱ्या आणि परदेशात नोकरी करत असलेल्या भारतीय तरुणांना दिलेला संदेश विचार करायला लावणार आहे. ४२ प्रकरणातून ही कादंबरी फुलत जाते. कादंबरी वाचताना वाचकाला कुठेही कंटाळा जाणवत नाही. याचे सगळे श्रेय शेवाळकर सरांच्या शब्द सामर्थ्याला आणि प्रतिभेला द्यावे लागेल. कादंबरी आणि कादंबरीच्या प्रत्येक पात्राला त्यांनी योग्य न्याय दिला आहे. कादंबरीला दिलेले "स्वप्नाचिया देशी" हे नाव कादंबरीला अनुरूप असेच आहे. कादंबरीच्या शेवटी अभिलाष च्या वडिलांनी परदेशात नोकरी करत असलेल्या या भारतीय तरुणांना दिलेली सुंदर ऑफर ते स्वीकारतात का? ती ऑफर काय होती? हे जाणून घेण्यासाठी ही कादंबरी वाचकांनी नक्कीच वाचली पाहिजे. रसिक वाचक "स्वप्नाचिया देशी" या कादंबरीचे निश्चितच मनापासून स्वागत करतील याची खात्री वाटते. या पुस्तकासाठी चित्रकार श्री रमेश भारताल यांनी सुंदर मुखपृष्ठ तयार केले आहे. प्रस्तावना सिद्धहस्त लेखक श्री सुनील पांडे यांची आहे. लेखक श्री विनोद पंचभाई यांनी पाठराखण केली आहे.

 

पुस्तकासाठी संपर्क :

लेखक : श्री नागेश सू.शेवाळकर

दूरभाष : ९४२३१३९०७१

मूल्य : रू ४५०

प्रकाशक : शैलेंद्र कदम, दुर्वा एजन्सीज, पुणे

दूरभाष : ८६०५७०६७३०, ९८२२१९६८१५

 

पुस्तक परिचय कर्ता 

आणि आस्वादक :

जयंत शंकर कुलकर्णी, पुणे

९४२३५३४१५६

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू