पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

मला आवडलेले पुस्तक-- ऐक ना (काव्यसंग्रह) -कवयित्री भैरवी देशपांडे

ऐक ना(काव्यसंग्रह)
-सखीचे मनगुज-

          जोवरी 'तो' सोबतीला 
          लेखणी हातात आहे 
          प्रेरणा 'तो' देव माझा 
          रोज मजला देत आहे
ही शब्दांजली वाहणाऱ्या कवयित्री भैरवी देशपांडे, यांचा ' ऐक ना ' हा काव्यसंग्रह! 
'ऐक ना',- जणू मनाला घातलेली साद!
प्रत्येक कविता वाचतांना ही साद मनाला स्पर्शून जाते. 
        लेखणीचा वरदहस्त लाभलेल्या भैरवीजी," तो देव देतो शब्द काही, माझे इथे काहीच नाही " अशा लीन होऊन, हे शब्दवैभव आपल्या ओंजळीत मुक्तहस्ताने उधळतात. या शब्दसंपत्तीने आपण भरून पावतो.
       भैरवीजी सांगतात, " व्यक्त होण्याची तीव्र असोशी माझ्या कवितेचे रूप घेते " ही व्यक्तता प्रत्येक कवितेतून आपल्या मनाला हाक देते.
काहीतरी सांगताना प्रत्येक कवितेतील ओळी, आपल्याशी बोलू लागतात. त्यांची लेखणी आपल्याशी संवाद साधते. ते शब्द, हृदयाशी धरीत असतांनाच वास्तवाशी आपली पकडही सोडू देत नाहीत. 
"अवास्तवाचे ओझे खांद्यावर अवजड,
भिंत काही उगाचच खचत नाही"
भैरवीजींचे हे सांगणे वाचणाऱ्याला अंतर्मुख करून जातात. क्षणभर सल उठते मनात! मनाचा कोपरा भावनांच्या अथांग प्रवाहात सचैल न्हाऊन निघतो… 
" मना ऐक ना, एक कर 
एकदा तरी पूर्ण समर्पित हो 
तृप्तीच्या अथांग सागरात "
मग कविता स्वतःच आपल्याला समजावू लागते. आपणही ऐकतो तिचं!...
ऐक ना, म्हणत कल्पनेच्या नव्या विश्वात आपल्याला ओढून नेते‌…
" लक्ष्मणा जमले तर पंख रेखाट 
एवढा बदल घडू दे 
एकदा तरी रामाच्या सीतेला 
स्वबळावर उडू दे.."
अरेच्चा! काय कल्पना आहे ना, लक्ष्मणरेषेवजी लक्ष्मणपंख रेखाटले असते तर?.. कल्पनेच्या विचारांचं गारुड मनावर घेऊन पुढे जात असतांनाच…
" निर्णयाची एवढी घाई कशाला? 
माणसाला दैव त्याचे नित्य हसते "
या ओळींपाशी आपल्याला थांबवते. आपण भानावर येतो. अरे! हो की- नशिबापेक्षा जास्त आणि नशिबापेक्षा कमी कधीच कुणाला मिळत नसतं. 
शब्दांची ही जादू आपल्याच मनाला बोलतं करते... 
" आज पुन्हा वाद घालू चल 
कालचे पुरवायचे नाही "
मग जगण्याचं हे सहजसुंदर भाष्य आपलं जगणं सोप्पं करून टाकते…
" पायथ्याची मी रे वीट 
हट्ट कळसाचा नसे "
अहा! काय पण सुंदर या ओळी!
अनुबंध उलगडताना व्यक्त होण्याची ही असोशी स्तिमित करते. आपल्याला मीपणा विसरायला लावते. 
सैरावैरा पळणाऱ्या मनाला….
" ए थांब ना, जरा हळू चल, 
थोडं सावकाशीनं जाऊ 
निघून जातील हे ही क्षण 
चल ना, थोडं जगून घेऊ "
असं म्हणत मनगुज साधते. हे असतं, आपल्या जिवाभावाच्या सखीचं मनगुज; जे भैरवीजींनी अगदी लीलया साधलंय. 
" मनालाही ऋतू असतात 
हिवाळे उन्हाळे पावसाळे 
वादळं दुष्काळ महापूर 
निभावून नेशील ना सगळे "
मनाच्या सागराला बांध घालायला सांगून ही कविता मनाच्या गाभाऱ्यात मग हळूच प्रवेश करते आणि आपली जागा अधोरेखित करते.

किती आणि कसे बोलावे या कवितांवर!
" वाटले, मौन होणे कठीण नाही 
बोलले तेच जे गाळणार होते "
बघा, द्विधा मनस्थितीही बरोबर हेरते ही कविता! आणि मग जगण्याचाही सोहळा साजरा करताना शब्द व्यक्त होतात…
" चुकला माझा होरा वय हे ओळखण्याचा 
खोल मनाशी शैशव जपले कळते आहे "
मुग्ध बालिकेसम आनंदाने बोलू लागते मन! प्रत्येक कवितेचा हात हाती घेऊन आपण बागडायला लागतो. जीवनगाण्याची मेलडी नादमय करते. जगणं सुरेल करते.
" बघितलंस, तुझा प्रत्येक शब्द 
माझ्या मनात असा लपलाय 
जीवनाच्या आनंदगाण्याचा 
सुरेल सूर मी असाच जपलाय…"
जिवलग सखीने हे हितगुज साधावं आणि अलगद 'या हृदयीचे त्या हृदयी' म्हणत आपल्याला भावगर्भित करून टाकावं. आपल्या शब्दवर्षावांनी ओलेचिंब करून टाकावं. ही अनुभूती घेत असतानाच, जगण्याचं छोटसं सारही शिकवते ही सखी…
" असे घडावे, आस एवढी 
हरपावे हे 'मीपण' कणभर 
हृदयामधल्या कृष्णासाठी
राधा होता यावे क्षणभर "
हे हितगूज मनात साठवून पुढे जातोच आपण; मात्र आठवांच्या वेलींवरून दवबिंदू ओघळतात जेव्हा…
" काय तू देशील किंमत वेदनेची 
ऐकले की दुःख झाले स्वस्त आहे "....या शब्दफुलांवर आपली नजर पडते.
मनाला घातलेला बांध विस्कटतो. सैरभैर मनाला शांत होण्याकरता मग लगेच धावून येतात या परागकेशरी ओळी….
" कर्मयोगी तू सांगून गेला 
निष्ठेने करणे कर्म 
फलप्राप्तीची नकोच आशा 
'गीता' जगण्याचे मर्म "
शांततेचा विसावा देणारी ही कविता; आपल्याला बांधून ठेवते या शब्दांशी!
" आनंद सारा आपुल्याच हाती 
जेव्हा मिळे ती स्थिर शांत वृत्ती "
अतीव समाधानाने मग हे मन, हे आनंदगाणे अनुभवते…

     अशा कितीतरी शब्दफुलांनी आपली ही ओंजळ; भैरवीजींच्या कवितांनी सुगंधित होते. या सुगंधाने मन मोहरतं. शांत होतं. जगणं सुवासित होतं.
     ही फुले वेचत असतांनाच, कधी काटेरी शब्दांनी मनाला अस्वस्थही करते ही कविता…
" तिच्या जिवंतपणाची त्यांनी शोभायात्रा काढली
पुन्हा आरती, धुपारती एक सतीमाय वाढली " 
किंवा 
" तिला ऐकू येते फक्त 
कर्तव्याची कोरडी साद 
कानावर तिच्या पडतो कुठे 
सर्जनाचा ब्रम्हनाद? "
अस्वस्थ होतं मन! भावनिक आंदोलनं निर्माण होतात. ही शब्दांची ताकद पेलून भैरवीजी आपले मन कलूषित होऊ देत नाहीत. तर लगेच हे कडू घोट हलकेच दूर सारून परत काव्याचा मधुर रस आपल्या पुढ्यात आणतात….
" कळलं रे 'लय' होणार हे सत्यच
चल! तोवर सोबतीनं जगून घेऊ 
देहाची तूच ना रे खरी शक्ती 
ये, तुझ्या नजरेनं जग बघून घेऊ "
हा आशावाद मनी जपतच, या काव्यप्रतिभेने मन अचंबित होतं. 
काव्य ओळींतून जपलेला नम्र भाव, कवयित्रीचं पारदर्शक व्यक्तिमत्व मनःपटलावर प्रतिबिंबित करतो…
" मी कसे हे पांग फेडू 
प्रश्न आहे बघ एवढा?
बांधतांना शब्दपूजा 
अर्पिला भाव केवडा "
 
      भैरवीजींची लेखणी पुढे पुढे सरकते; आणि आपण अधिकच गुंतत जातो, लगेच सावरतोही! मग कविता बोलू लागते आपल्याशी.
स्वतः कवयित्री हे दोघांतलं गुपित उलगडते आणि सांगू पाहते… 
" जोडत जातो तो हृदयांना 
त्याला कुठला पूल म्हणून मी? "

     संपूर्ण काव्यसंग्रह; त्यातल्या अशा या प्रत्येक कविता, ओळी, शब्द आपल्या मनावर अधिराज्य करतात. कधी डोळ्यांच्या कडा पाणावतात. अस्वस्थ करतात तर कधी फुलपाखरासमान स्वच्छंद सैर करवतात. मात्र कुठेही मनाला भरकटू देत नाही. तर मनाचा सहज ताबा घेतात आणि मनावर ताबा ठेवण्यासही शिकवतात.

      रसिकहो, साप्ताहिक जनमंगल च्या कार्यकारी संपादिका या नात्याने अनेकांच्या लेखणीला लिहितं करणाऱ्या; भैरवीजींनी ही गंधाळलेली काव्यसुमने वाचकांच्या हातात देऊन रसिकमन सुगंधित केलं आहे. 
ही प्रेमळ काव्य भेट म्हणजे एका गोड सखीने साधलेले मनगुज! हे मनगुज आपली ओंजळ समृद्ध करणारे, मन प्रफुल्लित करणारे असे आहे.
स्वतःलाच, 'ऐक ना' म्हणत कायम सोबत करणारे सख्य आहे.   

       भैरवीजींचे शब्दवैभव अधिकाधिक बहरत जावे आणि रसिक वाचकांना अनुभवसंपन्न, आशयघन शब्दफुले वेचता यावेत; हीच ईश्वरचरणी प्रार्थना आणि सदिच्छा...

_वीणा विजय रणदिवे ✍️

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू