पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

मुक्त

मुक्त (रसग्रहण)

अपराध काय माझा भांबावले कशाला
वाटेतल्या रिपूंना कुरवाळले कशाला

नव्हते कधीच माझे ते दूर ठेविले मी
कळले जरी मला हे मी  त्रासले कशाला

वेडातल्या स्मृतींना केव्हाच दूर केले
आता उगा उजाळी पाणावले कशाला

डोळ्यातल्या छबीला पुसलेच मी जरीही
आता फिरोनी दुःखा कुरवाळले कशाला

अंधार जात आहे वाटेतल्या उजेडी
मुक्तीतल्या मनाला मी बांधले कशाला

          नवोदित गझलकारा सौ. राधिकाताई भांडारकर यांची *मुक्त* ही अगदी छोटीशी परंतु अर्थमय गझल नुकतीच माझ्या वाचनात आली आणि माझे मन विचारमग्न झाले.
          आयुष्यात अशा काही घटना घडतात की बर्‍याचदा असे वाटते  नको त्यांची आठवण!वर्तमानात आनंदाने जगण्यासाठी तो भूतकाळ पूर्णतया विसरून जावा. परंतु कितीही प्रयत्न केला तरी त्या घटना विस्मरणात जाऊ शकत नाहीत.आपण मनात काहीतरी योजतो पण घडते भलतेच,मग तो आपला अपराध असतो का?
काही चांगले काम करीत असताना वाटेत अनेक विघ्नसंतोषी लोक भेटतात. ते शत्रूवतच आहेत,पण खरोखरीच त्यांची तमा आपण बाळगावी का?
मुक्त या गझलेत कवयित्रीला असेच काहीसे वाटत आहे.
गझलेच्या मतल्यातच त्या वाचकांना सांगतात,

*अपराध काय माझा भांबावले कशाला*
*वाटेतल्या रिपूंना कुरवाळले कशाला*

माझ्या हातून काहीच अपराध घडला नसताना मी इतकी का बरे भांबावून गेले आहे?माझ्या मनात विकल्प का यावेत? असे असताना माझ्या वाटेत येणार्‍या शत्रूंची मी का बरे अशी मनधरणी करते आहे,विनवण्या करते आहे?
मनात काहीतरी जाज्वल्य इच्छा बाळगावी आणि ती अपूर्णच रहावी. परंतु एखादी इच्छा मनात धरणे हा काही अपराध नाही असे कवयित्रीला सांगायचे आहे का?

*नव्हते  कधीच माझे तेृ दूर* *ठेविले मी*
*कळले जरी मला हे मी* *त्रासले कशाला*

ती गोष्ट माझी नाहीच मुळी हे मी जाणून होते आणि म्हणूनच त्य मी दूरच ठेवली.पण मग मला कसला त्रास होत आहे?हा शेर वाचताना माझ्या सहज मनात आले की कवयित्रीचे एकतर्फी प्रेम होते का कुणावर? ते मिळणार नाही याची खात्री झाल्यावर त्यांनी त्या व्यक्तीपासून स्वतःस दूर केले असावे परंतु मनातून त्याच्या विषयीच्या भावना संपुष्टात येत नाहीत.

*वेडातल्या स्मृतींना केव्हाच दूर केले*
*आता उगा उजाळी पाणावले कशाला*

हा  पुढचा शेर वरील विचाराला पुष्टी देणाराच वाटतो.

Teen age ज्याला म्हणतात, त्या वयात अर्धवट ज्ञान असते,तारूण्यात पदार्पण करताना प्रेमभावना जागृत झाल्यासारखे वाटते,प्रेमाचा अर्थही धड कळलेला नसतो
अशा त्या वेडाच्या भरात काहीतरी अघटीत घडू शकते.राधिकाताईंना असेच काहीसे सांगायचे असावे की त्या
वेडाच्या भरातल्या आठवणी मी केव्हाच पुसून टाकल्या आहेत तरीसुध्दा आज उगीचच त्या  स्मरून माझे डोळे का बरे पाणावत आहेत?

*डोळ्यातल्या छबीला पुसलेच मी जरीही*
आता फिरोनी दुःखा कुरवाळले कशाला*

कवयित्रीच्या मनात नक्कीच कोणा विषयी प्रेमभावना असावी.त्या व्यक्तीची छबी त्यांच्या डोळ्यात कायमच साठवलेली आहे असे वाटते. परंतु असफल प्रेमाची आता कशाला आठवण म्हणून त्यांनी ती छबी पुसून टाकलेली आहे. परंतु मनाच्या एका कोपर्‍यात कुठेतरी ते दुःख,तो सल रुतून बसलेला आहे. त्या दुःखाला मी आता का कुरवाळते असा प्रश्न त्या त्यांच्या मनाला विचारतात.

*अंधार जात आहे वाटेतल्या उजेडी*
*मुक्तीतल्या मनाला मी बांधले कशाला*

जीवनातील मागील वाटांवरचा अंधार नष्ट होऊन माझ्या पुढच्या वाटा आता अगदी स्वच्छ प्रकाशमान आहेत. माझे मन आता भूतकाळातून अगदी मुक्त झाले आहे, असे असताना मी पुन्हा त्याच जुन्या आठवणीत त्यांना का बरे जखडून ठेवावे?

संपूर्ण गझलेचा मागोवा घेतल्यानंतर असे म्हणावेसे वाटते की कवयित्रीने जीवनाचा लांबवर प्रवास केलेला आहे आणि त्या प्रवासाच्या वाटेवर त्यांच्या काही मनस्वी इच्छा अपूर्ण राहिल्या आहेत, असफल झाल्या आहेत. मग ती त्यांची प्रीत भावना असेल, किंवा एखाद्या उज्वल यशाची शंभर टक्के खात्री असूनसुद्धा
यश पदरात पडले नसेल आणि तो सल मनाला सतत टोचणी देत असेल.
आता या गत गोष्टी मनातून कायमच्या काढून टाकायच्या आणि वर्तमान आयुष्यात सर्व बंधनांपासून
मुक्त व्हावयाचे,स्वच्छंदपणे जगायचे असा कवयित्रीचा निच्छय आहे.तरीसुद्धा जुन्या स्मृती पुसल्या जात नाहीत आणि मन बेचैन होते.
अशा बेचैन मनस्थितीत ही गझल साकार झाली आहे असा माझा अंदाज आहे.
शृंगारिक भावनेच्या या गझलेला कारुण्याची झालर आहे. उदासीनता आहे.
साधारणपणे गझल म्हटली की ती उदासीनतेकडेच झुकलेली असते.म्हणूनच गझल ऐकताना ती शांतवेळी,दिव्यांच्या अंधुक प्रकाशात निवांत बसले की अंतःकरणाचा ठाव घेते.
राधिकाताईंची ही गझल मला त्याच प्रकारात बसणारी वाटते.
आनंदकंद वृत्तातील ही गझल नियमात चपखल बांधलेली आहे,शेरातील खयालात सहजता आहे.उला व सानी यातील राबता स्पष्ट आहे.
मी राधिकाताईंना उत्तरोत्तर उज्वल यशासाठी शुभेच्छा देते.

*अरूणा मुल्हेरकर*
२४/०३/२०२४






पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू