पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

मी वनवासी...

मी वनवासी....एक परीक्षण


थोर समाज सेविका पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांचे

" मी वनवासी" हे आत्मचरित्र नुकतेच वाचून संपवले.

हातात घेतल्यावर खाली ठेवू न वाटणारे हे पुस्तक.आवर्जून सर्वांनी वाचावे आणि त्यांना आणखी जास्त समजून घेणे आवश्यक आहे असे वाटले.


“मी वनवासी” हे पुस्तक म्हणजे एका स्त्रीच्या संघर्षाची, जिद्दीची आणि माणुसकीच्या प्रवासाची खरी कहाणी आहे. सिंधुताई सपकाळ यांनी स्वतःच्या आयुष्यातील अत्यंत कठीण प्रसंगांवर मात करून समाजासाठी कसे जगावे याचे प्रेरणादायी उदाहरण या पुस्तकातून दिले आहे.

एक साधारण स्त्री ,गरीब घरातील,चार इयत्ता शिकलेली आणि अतिशय सोशिक अशी स्त्री समाजात कशा पद्धतीने राहून जनतेसाठी लढा देते हे दिसून येते. या पुस्तकात त्यांच्या आयुष्यातील संघर्षमय प्रवासाचे वर्णन आहे. लहान वयातच लग्न, अत्याचार, घराबाहेर काढणे, उपासमार — अशा अनेक संकटांना त्यांनी तोंड दिले.

पण त्यांनी हार मानली नाही. उलट त्या अनाथ मुलांसाठी आई बनल्या. हजारो मुलांना आश्रय देऊन त्यांचे जीवन घडवले. अनाथ मुलांची आई होणे आणि त्यांची आयुष्यभर काळजी घेऊन त्यांना मार्गस्थ करणे हे निश्चितच सोपी गोष्ट नाही..पण अनाथ मुलांना त्यांनी कसे सांभाळले किंवा कशा प्रकारे त्यांचे संगोपन केले या बद्दल या आत्मचरित्रात काही जास्त उल्लेख आलेला दिसला नाही....


अमरावती येथील चिखलदरा येथील आदिवासी लोकांना मदत म्हणून त्यांच्यात एक होऊन राहणे,त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्या मंत्रालयात थेट भिडून सोडवणे हे येऱ्या गबाळ्याचे काम नाही.

त्या बरेच वर्ष तिथे राहून ,त्यांच्यातील एक होऊन समाजाप्रती स्वतःला वाहून घेऊन कार्य केले.


सिंधुताईंना ममता ही एकच कन्या होती हा माझा गैर समज होता. त्या आधी तीन मुले त्यांना झाली होती. ममता ही चौथे अपत्य हे मला नवीन होते.

बहिणाबाईंची गाणी त्यांच्या तोंडपाठ तर होतीच. शिवाय त्या स्वतःही परिस्थितीनुरूप सहजगत्या गाणी तयार करून म्हणत होत्या.त्याच बरोबर गदिमांच्या कवितेच्या ओळी पण त्यांना मुखोदगत होत्या हे जाणवले.

कविता आणि गाणी यांचे त्यांचे जाहीर कार्यक्रम होत असत....ते ही देश विदेशात ही.

समाजकार्य करताना एकदा त्यांच्यावर दुर्धर प्रसंग ओढवला होता..कोर्ट केस झाली होती.अशा वेळी त्यांचा उदो उदो करणारे , पण अचानक कसे वासे फिरतात तसे फिरतात , हे बघून वाईट वाटले...

"खोबरं तिकडं चांगभलं.." ही समाजाची रीतच आहे म्हणा.

मनुष्यजात ही अशीच असते का हा प्रश्न आपल्या समोर उभा राहतोच.


प्रचंड हाल अपेष्टा सहन करून समाजात मानाने उभी राहणारी, एक सर्वसाधारण महिला समाजात किती उच्च स्थानी आपल्या स्वकर्तृत्वाने उभी राहते..

साधी रहाणी आणि उच्च विचारसरणी...हे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे सिंधुताई सपकाळ होय.

त्यांच्या एकेक कविता वाचताना त्यांच्या सत्य परिस्थितीची झलक आपल्याला त्यांच्या या आत्म चरित्रातून वाचायला मिळते.


सिंधुताईंची भाषा अतिशय साधी, सरळ आणि मनाला भिडणारी आहे. वाचताना असे वाटते की त्या आपल्याशी थेट बोलत आहेत. त्यांच्या अनुभवांचे वर्णन इतके जिवंत आहे की वाचक भावनिक होतो.

माझ्या मनाला भावलेले हे एक पुस्तक....

मी वनवासी....


“मी वनवासी” हे पुस्तक प्रत्येकाने वाचावे असे आहे. हे फक्त एक आत्मचरित्र नाही, तर जीवनात कितीही संकटे आली तरी धैर्याने पुढे कसे जायचे याचा मार्ग दाखवणारे पुस्तक आहे.

हे पुस्तक वाचल्यानंतर मनात सकारात्मकता आणि इतरांसाठी काहीतरी करण्याची भावना निर्माण होते हे नक्की.


याआधी नसीमा हुरुजूक यांचे ही पुस्तक वाचून मन हेलावून गेले होते असेच.


जरूर वाचावे असे हे पुस्तक...आत्मचरित्र...

मी वनवासी....


.....................................................................


©पल्लवी उमेश 

जयसिंगपूर.

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू