पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

सहचर्य



" अरे, फक्त मी म्हणते म्हणून नाही पण त्या सोफ्याचा तरी विचार कर जरा आणि टीव्ही समोरचे प्रस्थान हलव....आणि .. अजून एक ..जागचे उठून आरशातही बघ स्वतःला ... होमलेस लोकांसारखा दिसतोयस" 


" अरेच्च्या..चोवीस तास होममधे आहे मी आणि तुला मी होमलेस असल्यासारखा दिसतोय?"


" हो.. होमलेस तर वाटतोच आहेस पण होप्सही लेस झाल्यासारख्या वाटतायत."


" अग मग काय करु? तीन महिने झालेत मला घरी बसून. कुठेही काही पुढे सरकत नाहीये आणि अजून किती दिवस असेच काढायचेत तेही समजत नाहीये. मग होप्स लेसच होणार ना?"


" होईल रे सगळं ठीक. इतकी वर्ष धावलास ना... आता जरा चिल मार"


" अगं .. बायको..  सध्या सगळं सेविंग्जवर चाललय.. ही परिस्थिती अशीच राहिली तर काय होईल ते तुझ्या लक्षात येतय ना? चिल काय मार?" 


" माहितीये रे मला.. पण हे वर्षच सेविंगचे आहे.. येणाऱ्या वर्षांमधे परत कमावण्यासाठी आपला जीव वाचवायचा काळ आहे हा. जाईल हाही."


ह्याच्यावर बोलण्यासारखे काही नव्हतेच त्याच्याकडे... चरफडतच तो उठून आंघोळीला जायला उठला तेवढ्यात मोबाईलवर बॅंक अकाउंटमधे पैसे क्रेडिट झाल्याचा मेसेज आला. त्याला कळेना हे कसले पैसे जमा झालेत.. दोघांचा जॉईंट अकाउंट असल्याने त्याने विचारले " हे मधेच कसले पैसे आलेत ग.. कसली कॅशबॅक स्कीम बीम होती का?"


" नाही रे.. किती आहे अमाउंट?"

 

" फारशी नाही.. xxxx च आहेत.. पण सध्याच्या घडीला तेही महत्त्वाचे आहेत." 


" बघ आहेत ना महत्त्वाचे? मला जरा टेंशनच आलं होतं तुला न विचारता अकाउंट नंबर देतांना."


" म्हणजे ?"


" अरे.. तुझे CA आहेत ना.. देसाई काका.. त्यांच्या मिसेस भेटल्या होत्या गेल्या महिन्यात मला बाजारात ... सध्या त्यांना स्वतःलाच भाजी आणायला यावं लागतय ना त्यामुळे.. त्या म्हणाल्या काकांची असिस्टंट सध्या काही अडचणीमुळे घरुनही काम करु शकत नाहीये त्यामुळे त्यांच्यावर फार लोड येतय. आधीच बाहेर टेंशन आहे त्यात कामाच्या ताणामुळे ह्यांची तब्येत बिघडेल की काय ह्याची काळजी वाटतेय.. तर तुझी कोणी मैत्रीण वगैरे असेल तर सांग.. तेव्हा मी सांगते म्हणून निघाले. पण घरी आल्यावर विचार केला आपणच का प्रयत्न करु नये.. तसं मी CA अर्धवट सोडलं असलं तरी माझी  accounts मधली गती चांगली आहे. मग काकूंना विचारलं मीच करु का ट्राय.. माझ्याकडे अनुभव नाही पण काकांनी शिकवलं तर करु शकेन मी त्यांना असिस्ट.. मग मागच्या आठवड्यात काकांनी काही क्लायंट्सच्या फाईल्स पाठवल्या आणि माझ्या कामाचा  श्रीगणेशा झाला. मी पैशाबद्दल काहीच बोलले नव्हते पण आता मंथ एंड आहे म्हणून परवाच त्यांनी माझ्याकडे अकाउंट नंबर मागितला होता."


" अरे वाह.. झकास...बायको तू तो छुपी रुस्तुम निकली."


" बघ .. इतके दिवस फक्त आउटगोइंग सुरु होतं ना आता इनकमिंगही सुरु झाले.. फार नसले तरी तेवढीच मदत.. आता बघ बाकीची बंद दारेही उघडतील. तेव्हा होप्सना लेस होऊ देउ नकोस... जा आता आंघोळ करुन घे..आज खीर करते मी" 


खरंच कीती रंगांच्या छटा आहेत हिच्या सहचर्याला.. मला नाही जमणार कुठे नोकरी वगैरे करायला म्हणून मागे राहाणाऱ्या हीने वेळ बदलताच पुढचं पाऊल टाकलं सुद्धा.. इतर वेळी साधे मटकीला मोड नाही आले म्हणून काळजी कारणारी ही आता मला साथ द्यायला हिमतीने अकाउंटिंगही करायला लागली... तेही अगदी सहजपणे.. मी दुखावला जाऊ नये ह्याची काळजी घेत.. हॅट्स ऑफ टू यु बायको.. परिस्थितीशी जुळवून घेण्याच्या तुम्हा बायकांच्या कौशल्याला काही तोडच नाही.. बघ आत्त्ता जातो आणि चकाचक होऊन येतो म्हणजे होमलेसही नाही आणि होप्सही लेस नाहीत असा विचार करुन तो आंघोळीला निघाला.


©® धनश्री दाबके

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू