पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

एकलकोंड्या सदाशिव

एकटा जीव सदाशिव


सदाशिव तसा एकलकोंडाच लहानपणापासून. आपल्यातच रमणारा. पहिल्यापासूनच तो कोणावर अवलंबून नसायचा. घरातला सर्वात लहान, पण फार काही कौतुक वाट्याला आले नव्हते. दोन मोठ्या बहिणी होत्या. पण वयात चांगले बारा आणि चौदा वर्षांचे अंतर होते! शिवाय त्या दोघी पहिल्या आईच्या. सदाशिव दुसरीचा, सावत्र भाऊ! त्यामुळे भावंडांत दुरावा हा जन्मजात होता. सख्खी आईसुद्धा फारशी काही जवळची नव्हती. हा एकटा पडायचा. वडील फॉरीन सर्विसवाले. कधी हा देश तर कधी तो. भला मोठा सरकारी बंगला होता, नोकर होते. आई सेंट्रल स्कूल मधे शिक्षिका होती. तो बारा वर्षांचा होता तेव्हा त्याच्या दोन्ही बहिणी लग्न होऊन सासरी गेल्या आणि त्याला बहीणींची खोली मिळाली. सदाशिव शाळेतून घरी आला की त्या खोलीत तो एकटाच असायचा. बाबा घरी येत तेव्हा जरा वर्दळ असायची, पण ती मोजकेच दिवस. एरव्ही आई आणि सदाशिव दोघेच घरी असायचे.


सदाशिव मोठा झाला, चांगला शिकला सावरला. छान नोकरी मिळाली. मोठ्या कंपनीत सेल्स बघायचा. बाहेर बडबड करायला लागत असली तरी घरी आल्यावर मात्र घुम्यासारखा बसून राहायचा. आईशी मोजकेच बोलायचा. जेवतानाही पुस्तक समोर धरून जेवायचा. मग आईही टीव्ही चालू ठेवून जेवायची.


मध्यंतरीच्या काळात बाबा विमान अपघातात गेले. सरकार आणि विमान कंपनी पैशाची थप्पी देवून गेले, पण घराची घडी विस्कटली ती काही परत सारखी झाली नाही. क्वार्टर सोडायला लागले. सगळेच जीवन बदलले. आईला हा मोठाच धक्का होता. मुलगा हा असा, घुम्या. बोलायचे तरी कोणाशी. तिला शाळेत जावे असे वाटत नाहीसे झाले. तिने शाळेची नोकरी लवकर सोडली. घरी राहिली तरी तिचा जीव रमेना. सरकारी बंगला सोडल्यानंतर त्यांनी तीन बेड रूमचा फ्लॅट घेतला. बंगल्याच्या मानाने लहानच होता पण तरीही तिला त्या रिकाम्या खोल्या खायला उठायच्या.


सदाशिवला नोकरी लागल्यानंतर तिने त्याच्या लग्नाची खटपट सुरू केली. त्याला लग्न करायची अजिबात इच्छा नव्हती. पण शेवटी त्याने होकार दिला. नववधू घरी आली की त्याचा स्वभाव जरा मोकळा होईल अशी तिची अपेक्षा होती. पण ते तसे घडले नाही. एका घरात दोन ऐवजी तीन असमाधानी माणसे नांदायला लागली! आई, सदाशिव आणि उमा!


अशीच दोन वर्षे गेली. सदाशिवच्या उमेने ‘गुड न्यूज’ आपल्या सासूला लाजत लाजत सांगितली. तिने जेवायच्या टेबलावर ती बातमी सदाशिवला सांगितली. उमा सदाच्या चेहेऱ्यावरचे भाव बघत होती. त्याचा निर्विकार चेहेरा तिच्या उत्साहावर पाणी फिरवून गेला. एकलेपणाचा शाप भोगणारे ते कुटुंब दिवसरात्रीचा हिशोब मांडण्यात वेळ घालवू लागले.


दिवस भरले, उमा बाळंतपणा साठी अॅडमिट झाली खरी, पण ती काही परत घरात आली नाही. एकलकोंडे घर आता कानकोंडेही   झाले. सावत्र मुली परदेशात, सदा हा असा. बोलायचे तरी कोणाशी आणि काय? आईला डिप्रेशनचा दौरा सुरू झाला.


सदाशिवला आईकडे बघणे आणि नोकरी करणे जमत नव्हते. त्याची करियर सतत चढत्या आलेखावर होती. कंपनीचा देशातीलच नव्हे तर परदेशातील बाजारही त्याच्या खांद्यावर होता. त्याला त्याचे काम साधतही होते आणि आवडतही होते. खरे तर त्याला मनापासून आवडणारी एकमेव गोष्ट म्हणजे त्याचे करियर! पैसा धो धो बरसत होता. तो खर्च कसा करायचा हाच एक मोठा प्रश्न झाला होता! आईकडे बघण्यात फुकट घालवायला त्याच्याकडे वेळच नव्हता. त्याच्या दृष्टीने आई म्हणजे एक जबाबदारी होती. फक्त जबाबदारी, एक कर्तव्य! प्रेम, माया असल्या भावना त्याला लहानपणापासूनच माहीत नव्हत्या.


त्याने आईला असायलममधे ठेवायचा निर्णय घेतला. एकदा ठरल की अंमलबजावणी करण्यात त्याला वेळ लागत नसे. किंबहुना त्याच्या करियरच्या यशात त्याच्या ह्या गुणाचा मोठा भाग होता.


आता सदाशिव त्या घरात एकटाच उरला होता. पण त्याला त्याच्या एकटे असण्याची अडचण नव्हती. आता त्याचा प्रश्न घराचे मेंटनन्स कसे करायचे हा होता. आता त्याला घर चालवण्यासाठी एक एजन्सी शोधायची होती, अशी एजन्सी जी घरकाम, स्वैपाक, स्वच्छता, बिले भरणे वगैरे कामे व्यवस्थित करेल! पैशाचा प्रश्न तर नव्हताच, फक्त योग्य एजन्सी शोधायची होती. येत्या रविवारी त्याने इंटरव्ह्यू ठेवले होते. त्यानंतर त्याचे आयुष्य परत सरळ सुरू रहाणार होते!


अरुण गाडगीळ

११ सप्टेंबर २०२०.

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू