पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

विधीलिखीत

 

मे महिन्यातील रखरखीत दुपार, अंदाजे दुपारचे चार वाजले असावेत. रत्नागिरीतील आपल्या रमणीय फार्महाऊसवर  अँडव्होकेट सावंत  नारायण धारपांची भयकारी कादंबरी वाचत निवांतपणे पहुडले होते. कादंबरीचा चित्तथरारक शेवट जवळ आला होता. अँडव्होकेट सावंतांच्या अंगावर भितीने अक्षरशः काटा आला होता. 

     तेवढ्यात बाजारात गेलेला त्यांचा ड्रायव्हर हसन अक्षरशः ओरडतच गेटमधून आत शिरला. कादंबरीत तल्लीन झालेले सावंत साहेब त्याच्या ओरडण्याने दचकलेच. हसन  धापा टाकत त्यांच्या पायावर कोसळलाच. 

    हसन खुपच घाबरला होता. " साहेब मला तो दिसला. तो मुंबईच्या दिशेने हात करत होता. साहेब मला गेलच पाहिजे." 

सावंत साहेबांनी प्रथम त्याला स्टूलावर असलेल्या पाण्याच्या बाटलीतील थंडगार पाणी प्यायला सांगितले. हसन जरा शांत झाला. 

  नंतर हसन ने जे सांगितले ते थोडेसे चमत्कारिक होते. त्याच्या म्हणण्यानुसार त्याला बाजारातील घड्याळ चौकात एक काळे कपडे घातलेली भयानक व्यक्ती दिसली. ती व्यक्ती हसनकडे बघुन विचित्र हसत होती आणि सातत्याने मुंबईच्या दिशेने हात दाखवून काहीतरी इशारा करत होती. 

  हसन खुपच अंधश्रद्धाळू होता. त्याची वयोवृद्ध आई सायन हाॅस्पिटल मध्ये अ‍ॅडमिट होती. आणि त्याची पक्की खात्री झाली होती की हा काहीतरी अपशकुन आहे. आणि त्याच्या आईच्या जीवाला काहीतरी धोका असल्याचा ईशारा त्या अज्ञात व्यक्तीने त्याला दिला होता आणि म्हणूनच तो घाबरला होता. 

   "साहेब प्लीज मला आपली गाडी द्या. मला रात्री पर्यंत मुंबईला पोहोचलच पाहिजे. मी आई जवळ थांबतो आणि उद्या माझ्या मित्राला गाडी घेऊन परत पाठवतो" हसन काकुळतीला आला होता. त्याचा चेहरा बघवत नव्हता.                            कितीही झाले तरी हसन सावंत साहेबांचा जुना विश्वासू माणूस होता. त्यांनी हसनच्या खांद्यावर थोपटले, त्याला धीर दिला आणि जवळ थोडेसे पैसे देऊन गाडीची चावी दिली. गाडी नीट चालवायला सांगून त्याला निरोप देऊन ते पुन्हा कादंबरीकडे वळले. पुढच्या वीस मिनिटात त्यांनी कादंबरीचे राहिलेले प्रकरण संपवले आणि थोडीशी झोप काढावी या हेतूने ते निद्रादेवीची आराधना करू लागले. 

पण त्यांना झोप येईना. राहून राहून त्यांना हसनने सांगितलेल्या बाजारातील त्या अज्ञात गुढ व्यक्तीची आठवण येऊ लागली. शेवटी त्या व्यक्तीला शोधून काढून हसनला घाबरवण्याचा जाब विचारावा या हेतूने ते बाजाराकडे निघाले. 

   बाजार तसा जवळच होता. बाजारात पोहोचायला त्यांना जेमतेम दहा मिनिटे लागली. घड्याळ चौकातील भल्यामोठ्या घड्याळाखाली 'तो' उभा होता. पहाताक्षणीच कोणालाही भिती वाटावी असेच त्याचे रूप होते. ताडमाड उंची, काळा पोशाख आणि प्रेतवत चेहरा. आपले लालभडक डोळे सावंताकडे रोखून पिवळेजर्द दात दाखवत तो भेसूर हसत होता. 

बाजारातील कोणाचेही त्याच्याकडे लक्ष नव्हते. एक सायकलस्वार तर त्याच्यातून आरपार गेला? सावंतांना विचित्र जाणिव होत होती. ते मनातून हादरले होते. 

  धीर एकवटून ते त्या व्यक्तीच्या जवळ गेले आणि विचारले 'सकाळी हसनला तुच भेटला होतास ना?' त्या व्यक्तीने होकारार्थी मुंडी हलवली. आणि सांगितले "मी जगात सगळ्यानांच भेटत असतो. मग त्यांची इच्छा असो कि नसो."

"पण तू हसनला का घाबरवलंस"? 

"मी घाबरवलं नाही काही, मला फक्त आश्चर्य वाटले", 

"कसल आश्चर्य"? सावंत उद्गारले 

" माझी आणि हसनची भेट आज रात्री 10.30 वाजता चेंबूरला ठरलेली असताना तो दुपारी 4.00 वाजेपर्यत रत्नागिरीत कसा? " याचेच मला आश्चर्य वाटत होते. 

म्हणूनच मी मुंबईच्या दिशेने हात दाखवत होतो. 

 " पण तो सायकलस्वार तूझ्यातून आरपार कसा गेला"? सावंत पार हादरले होते. 

"कारण मी सर्वांनाच दिसतो, पण कधी दिसणार ती वेळ ठरलेली असते. त्या वेळेच्या अगोदर कोणीही मला पाहू शकत नाही."

अँड. सावंत दचकलेच. 

"पण तू माझ्याकडे पाहून येवढे भेसूर हास्य का करत होतास"? 

तो पुन्हा एकदा क्रूर हसला." ते वेलकम स्माइल होते मित्रा. आपली गाठभेट आत्ता 5.00 वाजता इथेच या घड्याळाखाली ठरलेली आहे".

त्याने आपले हात आलिंगनासाठी पसरले. सावंतांना त्याचा बर्फासारखा थंडगार स्पर्श स्पष्ट जाणवला. घड्याळात 5 चे ठोके पडत होते. 

दुसर्‍या दिवशीच्या वर्तमानपत्रात ठळक बातमी होती, 

मुंबईचे प्रख्यात वकील अँडव्होकेट दिनेश सावंत यांचा रत्नागिरीच्या घड्याळ चौकात ह्दय विकाराच्या धक्क्याने अकस्मात मृत्यू आणि त्यांच्या ड्रायव्हरचा चेंबूर येथे भीषण अपघातात मृत्यू. 

             अँडव्होकेट सावंत खडबडून जागे झाले. त्यांची पत्नी त्यांना चहा प्यायला उठवत होती. सावंतांना कादंबरी वाचताना झोप लागली होती. हसन बागेत झाडांना पाणी घालत होता.

    © नितीन मनोहर प्रधान

        रोहा रायगड

     20 आँक्टोबर 2020

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू