पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

आईची साडी

अनुला लंडनला येऊन जेमतेम आठवडा झाला होता. कॉलेज सुरू व्हायला अजून चार पाच दिवस शिल्लक होते. या अनोळखी देशात आल्यावर प्रथम ती जरा भांबावलीच होती. पण कॅम्पसच्या प्रथेप्रमाणे इथे सीनिअर स्टुडंट्स नवीन स्टुडंट्सना सेटल होण्यात मदत करत. आणि तिच्या मदतीला एक इंडियन मुलगी बघून तिला खूप हायसे वाटले. तिचे नाव प्रिया अय्यर असे होते. अनुला जाणवले की, तुम्ही देशाबाहेर पडलात की तुमची भाषा विसरून सगळे फक्त इंडियन्स असता..तेच आपल्याच देशात आपण किती हा भेदभाव करतो पण बाहेर मात्र सगळे अगदी एकजुटीने राहतात.


प्रिया अय्यर अनुची सीनिअर होती. अनु नवीन म्हणून तिने तिला नीट गाईड केले. कॅम्पस पासून जवळच अंतरावर असलेल्या तिच्याच  फ्लॅट मध्ये अनु शिफ्ट झाली होती. सुदैवाने तिच्या इतर दोन रूममेट्स पण इंडियन होत्या. जागेची चिंता मिटल्याने अनु जरा रिलॅक्स होती. आता हळूहळू तिचे सामान तिने unpack करायला घेतले. आईने नाही नाही म्हणता लहान मोठे भरपूर सामान तिच्या बरोबर दिले होते. ती सुटकेस आता आवरताना नकळत आई बाबांच्या आठवणीने तिचे डोळे पाणावले. 


गेल्या दोन तिनं  महिन्यात सगळे कसे भरभर बदलले. अनुला उच्च शिक्षणासाठी स्कॉलरशिप मिळालेली पाहून आई बाबांचा ऊर अभिमानाने भरून आला होता. आमची अनु आहेच मोठी हुशार असे तिचे गुणगान जो भेटेल त्याच्याजवळ मोठ्या  उत्साहाने ते करत होते. जेमतेम दोन महिन्यातच तिला युनिव्हर्सिटीत जॉईन व्हायचे होते. त्यामुळे घरी तिच्या सामानाची जोरदार तयारी सुरू झाली.


तिकडे खूप थंडी असेल म्हणून गरम कपड्यांची खरेदी झाली. इथे मुंबईत तिला कधी स्वेटर घालायची पण सवय नव्हती. स्वतंत्र राहणार म्हणून छोटी छोटी किचनची  भांडी आईने तिच्यासाठी खास खरेदी केली. जसा देश तसा वेश या  युक्तीने तिने सगळे वेस्टर्न कपडे खरेदी केले . तेव्हा आईने आवर्जून  तिच्या एक दोन साड्या अनुला बरोबर न्यायला दिल्या.


ते बघून अनु म्हणाली, अग आई मी हे केव्हा वापरणार.. तशी आई म्हणाली, अग तिकडे पण cultural डे वगैरे असेलच की तेव्हा आपली अस्सल भारतीय वेशभूषा कर..आणि तूच हौशीने मला घ्यायला लावल्या होत्या ना या साड्या की तुला कधी कॉलेजच्या फंक्शनला पण वापरता येईल म्हणून..तुझ्या आवडत्या आहेत या, हे माहितीये मला..तेव्हा अनु म्हणाली, अग पण तू जेमतेम एकदोन वेळा घातल्या आहेस ..किती छान दिसतात तुला हे रंग आणि त्यावर मॅचींग सेट पण आहे ना तुझ्याकडे..तिकडे उगाच पडून राहतील माझ्याकडे..आई तिला प्रेमाने म्हणाली, असू दे ग पिलू, माझी आठवण म्हणून जवळ ठेव. अनुने त्याबरोबरच न चुकता तिची रोज पांघरायची आईची मऊ सुती साडी आवर्जून बरोबर घेतली.


आईला आठवले की, लहानपणी अनु कशी  तिची साडी नेसून द्यायला हट्ट करायची.  आणि मग घरभर त्या साडीत मिरवायची. रात्री अंगावर पांघरून  म्हणून ती आईची मऊ सुती साडीच घ्यायची. आईच्या जुन्या मऊ सुती साड्या तिला पांघरायला फार आवडायच्या. अजूनही तिची ही सवय गेली नव्हती. अनु जशी मोठी झाली तशी आईच्या साड्या आईपेक्षा तिलाच जास्त माहिती झाल्या होत्या. अमुक फंक्शन मध्ये आई तू ही साडी नेस आणि त्यावर अमका सेट घाल, बघ तु किती छान दिसतेस असे म्हणत ती आईची साडी पासून ते गळ्यातल्या सेट पर्यंत सगळी तयारी करायची. आता माझी अनु खूप दूर जाते आहे, मला हे सारे कोण सांगणार या विचाराने आईच्या डोळ्यात पाणी आले.

 

इकडे अनुला सुटकेस आवरताना  हे सारं परत आठवतं होत. आईने दिलेली प्रत्येक  वस्तू तिला आईची आठवण करून देत होती. आईची  साडी बघून नकळत तिचा कंठ दाटून आला. तिने अलगद ती साडी आपल्या हृदयाशी घट्ट धरली..आईपासून सातासमुद्रापार असूनही त्या साडीच्या स्पर्शात आईच्या मायेची ऊब ती अनुभवत होती. 


©प्रांजली लेले (०८-०१-२१)

छायाचित्र सौजन्य - गूगल


कशी वाटली तुम्हाला ही कथा? आवडल्यास नक्की लाईक आणि शेअर करा. तुमच्या कमेंट खाली दिलेल्या कमेंट बॉक्स मध्ये लिहून नक्की कळवा.

धन्यवाद

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू