पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

मनाचे तळे


दुपारची वामकुक्षी आटोपून इंदू आजी उठल्या. त्यांनी खिडकीतून बाहेर नजर टाकली तेव्हा आभाळ भरून आलेलं दिसलं. पावसाळ्याचे दिवस हे, केव्हा पाऊस पडेल काही सांगता यायचे नाही असा  मनात त्या विचारच करत होत्या की त्यांना अंगणात टपोरे थेंब पडताना दिसले. आणि त्यांना बाहेर अंगणात  वाळत घातलेल्या कपड्यांची आठवण झाली. अग बाई, विसरलीच की कपडे आत घ्यायला, असे म्हणत त्या लगबगीने बाहेर जायला लागल्या. तशी त्यांच्या गुडघ्यात एकदम कळ आली. वाढत्या वयामुळे हल्ली ही  गुडघेदुखी  खूपच वाढलिये, डॉक्टरांनी दिलेले औषध पण संपत आलय.. मिलिंदला औषध आणायला सांगायला हवे असे स्वतः शीच पुटपुटत हळूहळू त्यांनी अंगणात येऊन दोरीवरचे कपडे काढले.

पावसाचे थेंब आता जरा जास्तच वाढले होते. घरात येईस्तोवर पावसाची रिमझिम चालू झाली होती. कपडे घड्या करता करता त्यांनी घड्याळात बघितले. साडे तीन वाजले होते. सियाची शाळेतून यायची वेळ झाली होती. त्यांनी गॅसवर दोघींसाठी चहाचे आधण ठेवले. "माझ्यासारखाच सियाला पण चहा खूप आवडतो. चहा बहाद्दर आहे पक्की...शेवटी आपल्या आजीवरच गेलीय  पुरती" असा विचार करत त्या स्वतः शीच हसल्या. "मीराला सियाचे चहा पिणे अजिबात आवडत नाही. पण मी तरी कुठे रोज देतेय तिला..थंडी पावसाचं थोडा आलं तुळशीचा चहाच तर  देते प्यायला कधीमधी. रोज रोज दुधाचा पण कंटाळा येतो पोरांना..जरा त्यांच्या मनाप्रमाणे घ्यावं ना कधीतरी, पण नाहीच पटत आजच्या पिढीला हे सर्व.. असो!"

आज तिच्या आवडीचे मस्त ऊपिट्ट बनवते. घरात पाऊल टाकता टाकता आधी पहिला प्रश्न हाच विचारणार, "आजी आज काय ग स्पेशल केलंय तू?" मीराला तर आवडतच नाही रोज असे नवनवीन पदार्थ करून खाऊ घातलेले तिला..म्हणते कशी, " फार लाडावून ठेवलंय तुम्ही सीयाला..एवढे लाड पुरविणे बरे नव्हे..माझ्याकडे इतका वेळ नसतो..आता एवढी मोठी झालीय तरी अजूनही तुम्ही नसला घरी की खाण्याच्या बाबतीत फार त्रास देते ती मला"..त्या पण मुद्दामच दुर्लक्ष करतात मिराच्या बोलण्यावर..जाऊ दे , तिला काहीही म्हणू दे, माझी  एकुलती एक लाडकी नात ती..तिच्यासाठी नाहीतर कुणासाठी करायचं आता..

आता बाहेर पाऊस पडतोय म्हणजे अर्धी भिजलेलीच असणारं पोर.. त्या ऑटो रिक्षातून घरापर्यंत येता येता पार भिजायला होतं बाई..शेवटी मुंबईचा पाऊस हा..कसा ही वेडावाकडा येतो. येऊ दे सियाला मगच गरम गरम करून खायला देते.

त्यांनी घड्याळाकडे पाहिलं पावणे चार झाले होते .एव्हाना सिया यायला हवी होती असे  म्हणत त्या दारापाशी गेल्या तर त्यांची लाडकी नात आपले दप्तर सांभाळत अर्धवट भिजलेली गेटमधून आत येताना दिसली.

तिला बघून इंदू आजी म्हणाली, "बाळा, रेनकोट कुठेय तुझा, सर्दी पडसे व्हायचे बघ असे भिजल्याने".."अग आजी वेळच नाही मिळाला घालायला, शाळेतून निघालो तेव्हा पाऊस नव्हताच आणि घरी येईपर्यंत पाऊस चांगलाच लागला. आता जरा भिजली आहे तर पूर्णच भिजते ग असे म्हणत ती परत अंगणात पळाली."

तिला पावसात चिंब भिजताना पाहून इंदू आजीला  स्वतः चेच बालपण  आठवले. अगदी माझ्यावर गेलीय सिया..तिला बघून माझेच बालपण आठवते मला. "सिया, पुरे झालं ते भिजणं आता ये ग घरात. आलं तुळस घालून मस्त चहा केलाय बघ तुझ्यासाठी"  सियाने लगेच येऊन कपडे बदलले, आजीने केलेले गरम गरम ऊपिट्ट खात आणि चहा पिता पिता सिया आणि आजीच्या गप्पा रंगल्या.

आजी, तू कधी अशी भिजलीस् का ग पावसात लहानपणी? तुला आवडायचे का असे भिजायला? माझी मैत्रीण गार्गी तर अजिबात भिजत नाही..म्हणते की मला नाही आवडत भिजणे..खरतर किती गंमत असते ना यात..सांग ना आजी तुला आवडतं का? तशी आजी तिला आपल्या बालपणीचे किस्से सांगू लागली.

अग आमच्या कोकणातला पाऊस तर विचारायलाच नको.  भरपूर पडायचा..सगळं कोकण हिरवकंच व्हायचं. तुला गंमत सांगू, मी पण अगदी तुझ्या सारखीच पाऊसवेडी होते. पाऊस आला की  आमच्या घरा बाहेरील रस्त्याचीच नदी व्हायची बघ..मग आम्ही मुलं कागदाच्या बोटी बनवून त्यात सोडत असे आणि चक्क त्या  पाण्यात डुंबत हात पाय हलवत पोहत असू.

मग ते चिखलाने भरलेले कपडे बघून माझी आई  खूप ओरडायची आणि म्हणायची, "अग काय हा वेडेपणा, अण्णा येतील बघ आत घरी..त्या आधी पटकन ये घरात." आमच्या अण्णा ना मुलींनी असे बाहेर खेळलेले मुळीच आवडायचे नाही.  "मुलीच्या जातीला हे असलं शोभत नाही..त्यापेक्षा जरा घरकामात लक्ष घालावे मुलींनी" असे त्यांचे म्हणणे असायचे. आमची आई मात्र अण्णा घरी नसताना आम्हा मुलींना खूप दंगा घालू द्यायची. सगळे खेळ खेळू द्यायची आणि म्हणायची, मला जे करता आले नाही  त्याला माझ्या मुलींनी नको मुकायला नाहीतर आयुष्यभर मनात ते सलत राहतं.

आईमुळे खूप भरभरुन जगले मी माझे बालपण..अगदी लग्न होई पर्यंत प्रत्येक पावसाळ्यात पहिल्या पावसात न चुकता भिजायचे आणि त्या गारव्याने माझे शरीर आणि मन दोन्हीही अगदी तृप्त व्हायचे. पावसाचं पाणी कसं तळ्यात साठतं ना अगदी तसाच  तो  आनंद मी माझ्या मनाच्या तळ्यात साठवायची. खरंच किती गोड आठवणी होत्या ग त्या..आता फक्त आठवणीच उरल्यात बघ. सिया, तेव्हा तुला भिजताना पाहून मलाही लहानपणीची मी आठवले.

ते ऐकून सीया आजीला म्हणाली, अग आजी, चल ना पावसात.. आपण दोघी मिळून तो आनंद परत आपल्या  मनाच्या तळ्यात साठवूया. चल अजूनही मस्त पाऊस पडतोय, अंगणात भिजून येऊ दोघी.  तेव्हा आजी हसून म्हणाली, "काहीतरीच काय ग बोलतेस सिया, आता काय वय राहिले का माझे पावसात भिजायचे, म्हातारीला खुळ लागलंय असे लोकं म्हणतील."

आजी जस्ट चील ह, कुणाला काय म्हणायचंय ते म्हणू दे. फिकीर नॉट..आणि खर तर लाईफ एन्जॉय करायला असं काही ठराविक वय नसतंच मुळी. तसेही आपण फक्त वयाने  वाढतो ना पण मन मात्र कायम तरुणच राहतं आपलं. तिने आजीचा हात आपल्या हाती घेत आजीला अंगणात आणले. रिमझिम बरसणाऱ्या पावसात आजी आणि नात भिजत होत्या.  आज परत एकदा आजीच्या मनाचं तळं आनंदाने ओथंबून वाहत होतं.

©प्रांजली लेले
फोटो साभार- गूगल

या कथेच्या प्रकाशनाचे आणि सादरीकरणाचे सर्व हक्क लेखिकेच्या स्वाधीन.
कथा आवडल्यास नावासकट पुढे शेअर करावी ही विनंती. आपला अभिप्राय खाली दिलेल्या कमेंट बॉक्स मध्ये लिहून नक्की कळवा. वाचायला आवडेल.
धन्यवाद.

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू