पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

संत मुक्ताबाईचा मंगळवार

मी असेन दहा अकरा वर्षाचा. सन १९६५ची आठवण आज आपणास सांगत आहे.माझं शालेय शिक्षण खेडेगावातच झालं.शाळा  घरापासुन अंदाजित ५ कि.मी. अंतर पायीच जावे लागत असे.

श्रावण महिना म्हणजे आनंदाचा, प्रसन्नतेचा महिना. सगळी कडे कसे हिरवेगार.रिमझिम पाऊस.आणि संपुर्ण महिना मळ्यातील मध्यवर्ती ठिकाणी रात्री ७.३० ते ९ वाजेपर्यंत भजनाचा कार्यक्रम होई. प्रत्येक घरातील एक व्यक्ती भजनासाठी उपस्थित राहणे बंधनकारक होते. त्यावेळी जेमतेम ४० घरे असतील  मळ्यामध्ये.भजनासाठी भक्तिभावाने सगळे हजर राहत.लहानपणापासुन आई,वडील, शेजारी यांच्या धार्मीक संस्कारामुळे आमच्यात सुध्दा ते गुण उतरु लागले होते.प्रत्येक व्यक्तिबद्दल स्नेह आपुलकी वाटायची.देवाबद्दल तर नितांत आदर वाटायचा. त्या श्रध्देपोटी दर मंगळवारी सकाळी लवकर उठुन अंघोळ करायचो.सुमारे दिड किलोमीटर वर बागवान नावाच्या व्यक्तीच्या घरासमोर सुंदर असे पारिजातकाच्या झाडाची पांढरी शुभ्र फुले पाण्याने भरलेल्या तांब्यात टाकुन आम्ही मळ्यातील समवयस्क मुलं मुक्ताबाई मंदिराकडे चालत निघे.चालण्याशिवाय दुसरा पर्यायच नव्हता.पण त्या चालण्यात मुक्तामातेला भेटण्याची श्रध्दा, आस होती.व उज्वल भविष्यासाठी देवीच्या शुभाशिर्वादाची मनिषा होती.

साधारण ३ कि.मी. अंतरावर असणारे मुक्तामातेचे मंदिर आजच्या सारखे मोठे नव्हते. एकदम साधेसुदे छोटसे फक्त गाभारा असलेले पण त्या ठिकाणी जाताक्षणीच मन प्रसन्न होई .अंगात उर्जा संचारी.व मनोकामना पुरी होणार याची प्रचिती येई.देवीच्या सेवेसाठी गुलाब बाबा म्हणुन एक गुरव काम पहात असे. देवीला मनोभावे नमस्कार करुन ,मंदिराला प्रदिक्षणा घालुन,पारिजातकामुळे सुगंधित झालेले तांब्यातील पाणी देवीच्या चरणावर वाहुन ते तिर्थ प्यायल्यावर मन तृप्त होई.खुप काही मिळाल्यासारखे वाटे. प्रसन्न मनाने तेवढ्याच जोमाने,आनंदाने आम्ही घरी येवुन शाळेत जायची तयारी करीत असु.

खरोखरच बालपणातील देवावरचा विश्वास,त्यावरिल श्रध्दा आज मोठेपणी कुठेतरी हरवल्यासारखी वाटते. देव,देवता त्याच आहेत.त्यांची वास्तवाची  जागा तीच आहे.बदललो ते आम्ही.देवीने दिलेल्या कृपाशिर्वादाने जन्मभूमी सोडुन उपजिविकेसाठी अन्य ठिकाणी स्थिरस्थावर झालो.आर्थिक सुबत्ता आली.सुखाचा संसार दिला. आर्थिक सुबत्तेमुळे आम्ही  देव, देवीची मंदिरं प्रशस्त, रेखीव व सुंदर केले.देवांचे दागदागीने सोन्याचे ,कपडे भरजरी झाले.प्रत्येक जण आपल्या परीने देवीचे ऋण फेडण्याचा प्रयत्न करीत आहे.मोठ्या रकमेच्या देणग्या देवु लागलो. उत्सव भव्यदिव्य स्वरुपात होऊ लागले. पैशाचा खेळ सुरु झाला.मंदिराची उंची वाढली पण आमच्या मनाची उंची खुजी होऊ लागली.श्रध्देने,प्रेमाने,विश्वासाने बांधलेली माणसं स्वार्थासाठी संकुचीत वृत्तीची होऊ लागली.श्रध्देला बाजारी स्वरुप येवु लागले. नाती दुरावत चालली.मग आठवते ते बालपण.प्रत्येक व्यक्तिबद्दल असलेल प्रेम.मळ्यातील सर्व माणस एकमेकाशी गुण्यागोविंदाने वागताना च्या आठवणी.मळा कसा एकजीव होता.

पण आज बाप लेकात विचार विनिमय नाही.भाऊ भावाला विचारत नाही.चुलत चुलत नात्यांचा तर काही विचारच नाही.घरावरुन भांडण,वाटेवरुन भांडण,पाण्यावरुन भांडण,शेताच्या बांधावरुन भांडण फक्त स्वार्थ. कुठे शिकलो हे आम्ही?शिक्षणाने हे शिकवले काय आम्हाला?

माणुस माणुसकी विसरला. मला वाटते त्याला कारण देवावरचा विश्वास उडाला म्हणा,देवाची भीती वाटेनाशी झाली म्हणा.किंवा देवाला मोठी देणगी देवुन खुष केले की आपण कसेही वागलो तरी चालते असा भ्रम म्हणा. आजच्या युगात फक्त लालची वृत्ती ने धुमाकुळ घातला आहे .

पण आजही देव ही शक्ती आहे हे मानावेच लागेल.तो देव माणसात,व्यवहारात,वागण्यात पहा.सगळे काही ठिक होईल.

 

 

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू