बनी
बनी....
"अलबेलाऽ सजन आयोऽऽ रे ..."
सायली स्वतःशीच गुणगुणत होती..इतक्यात दारावरची बेल वाजली.... सायलीने दार उघडले ... समोरच हातात गुलाबांचा गुच्छ घेवून संयम उभा....
पाणीदार डोळे, भाबडा स्वभाव, दिलखुलास हास्य असलेली सायली त्याची शाळेपासूनची
जिवलग मैत्रीण आणि संयम सुद्धा अत्यंत हुशार, आकर्षक व्यक्तिमत्त्व..
संयम तिच्याकडे पहात हसतच उभा होता...
"एवढी फुले..माझ्यासाठी ??"
सायली आनंदली...
"हो सायली....तुला लाल गुलाब आवडतात ना ...??"" संयम गालातल्या गालात हसला...
"किती गोड आहेत ही फुले ?? हा गुच्छ पाहून मला की नाही आमची मनी व तिची गोंडस अशी ५ पिल्ले आठवली..."
"फुले काय? पिल्ले काय??
काही कळले नाही मला ....!!"
संयम चक्क गोंधळला...
सायली त्याला समजावण्याच्या सुरात सांगू लागली....
"अरे...अंगणाच्या एका कोपऱ्यात मनीने पिलांना जन्म दिला होता...या फुलांसारखीच एकत्र बिलगून बसली होती तिला... पण का कुणास ठाऊक...? एक दिवस आपल्या ४ पिलाांना घेवून ती कुठेतरी निघूनच गेली..वाटेत थोडा वेळ विश्रांती घेवून पुढच्या प्रवासाला निघालेल्या यात्रेकरूंसारखी.."
मनी आणि तिच्या पिल्लांच्या आठवणीत गुंतून गेल्यासारखी सायली बोलू लागली...
"आणि पाचवे पिल्लू ? त्याचे काय झाले ??" संयमने विचारले....
इतक्यात "म्यॅव... म्यॅव...!!" मागून आवाज आला...
"हो गं बाई...!! तूच ती...!! बघ संयम...तुझ्या प्रश्नाचं उत्तर ... ही मनीची "बनी""... पाचवे पिल्लू... अशक्त असल्याने ते मागे राहिलं असावं बहुतेक... मी तिला घरात घेवून आले..मी तिला रोज छान खाऊ पिऊ घालते, मऊ मऊ गादी आहे आरामाला... ऐश आहे तिची एकंदर...!!"
"म्याव... म्याव...!!"
"बघ कसं अंग घासतंय पायाला.. !! वेडू रे वेडू...!! सतत लाड करून घ्यायला हवेत...!!"
सायलीने बनीला उचलून घेतले आणि त्याला पापा देऊन त्याच्याशी खेळू लागली...
सायलीच्या मांजर प्रेमाने संयम मनातल्या मनात खूप वैतागला... तरीही त्याने आपल्या चेहऱ्यावरून तसे काही दाखवले नाही...
"अरे वाह....!! बनी... मस्तच..!!"
संयमची औपचारिक प्रतिक्रिया... कारण आज त्याचा मूड काही औरच होता....
"बरं ऐक ना सायली...!!! काहीतरी महत्वाचे सांगायचे आहे तुला..अंगणात चल ना थोडा वेळ...!!."
"बरं चल.." असे म्हणून बनीला सोबत घेवूनच ती अंगणात गेली...
"शीssss...याला कश्याला घेतले आहे बरोबर ???" संयम मनातल्या मनात चरफडला.. आधीच टेन्शन आले आहे मला...!!" संयमच्या चेहऱ्यावर नाराजी स्पष्ट दिसत होती...
"ऐक ना गं सायली...!!"
"बोल ना....!!"
"त्या बनीला जरा बाजूला ठेव ना !! मी काहीतरी बोलत आहे... असं काय करतेस गं...??""
"कबाब मे हड्डी" बनलेल्या या बनीचा या क्षणी संयमला अत्यंत राग आला होता.. आजची संधी त्याला जाऊ द्यायची नव्हती.. खरं तर आज "प्रपोज डे " होता आणि तो आता सायलीला प्रपोज करणार होता...
"बरं बोल ..." सायली त्याच्याकडे वळली...
संयमने तिला द्यायला तो बुके उचलला तसा बुकेवरील प्लास्टिकचा चर्र..चर्र असा आवाज झाला... बनीने तो ऐकताच अचानक त्या बुकेवर झेप घेतली आणि संयमच्या हातून बुके खाली पडला... खाली पडलेल्या बुकेवर बनीने झडप घेतली आणि आपल्या पंज्यांनी बुकेतील फुलांच्या पाकळ्या विस्कटून टाकल्या... आणि गुरगुरत त्या फुलांना चावे घेऊ लागली. त्याच्यावर नाचून त्या सुंदर बुकेची अक्षरशः वाट लावून टाकली तिने...
"अगं ए...मूर्ख कुठली..!!" संयम ओरडला व त्याने बनीला एक हलकीशी चापट दिली...
या अचानक हल्ल्याने बनी घाबरली आणि "म्याव म्याव" ओरडत दूर पळाली...
"अरे, का मारलेस तिला ??"
"मग काय आरती ओवाळू ..??माझ्या बुकेची काय गत केलीय तिने पाहिलंस..?? सगळ्या प्लॅनवर पाणी फिरवलं.."
"कसला प्लॅन आणि काय झालं कुस्करला बुके तर ?? एवढीशी बनी... तिला मारलंस तू ?? किती दुष्ट आहेस रे... कुठे गेली असेल ती ??" सायली चिडली...
"मारलं काय म्हणतेस गं ?? एक हलकीशी चापट दिली झालं...!!..असेल ती इथेच कुठेतरी..!!""
"किती सहज बोलतोस रे?? माणुसकी विकली आहेस का ?? एवढासा जीव तो..!! तिला काही झालं तर ??" रडायलाच लागली सायली....
"तू जा बघू इथून...मला एक शब्द देखील बोलायचं नाही तुझ्याशी !! आणि तिला काही झालं ना तर बघ...तुला कधीच माफ करणार नाही मी...लक्ष्यात ठेव..."
फणकारतच सायली तिथून निघून गेली.
"गेलीस उडत... मला पण काही गरज नाही बोलायची...??" संयमही ताडताड निघून गेला....
तिरमिरत तो तिथून निघाला खरा; पण वायूवेगाने पडणारी त्याची पावले डोक्यात विचारांचे चक्र सुरू झाले तशी मंदावली...
"काय करतोय हे मी ? तिने मला निघून जा सांगितले...माझा अहंकार दुखावला आणि मी निघून आलो ?? हेच का माझे प्रेम ज्यासाठी एवढी तडफड केली ?? जी मुलगी मला इतके दिवस आवडते... तिच्याशिवाय मला चैन पडत नाही... किरकोळ गोष्टीसाठी तिच्याच फिलिंग मी दुखावल्या... बुके विस्कटल्याचा राग उगाचच त्या मुक्या प्राण्यावर मी काढला...
सायलीला तिच्या लाडक्या बनीपासून नकळत मी दूर केलं म्हणून ती मलाच दुरावली तर...?? बनीला काहीही
करून शोधायलाच हवी...
नाहीतर तुझी खैर नाही बच्चू...!!"
संयम स्वतःशीच पुटपुटला....
--------------
"संयम, कश्याला आलास इथे ?? सकाळी सकाळी संयमला दारात बघून सायली चिडली..
"हे माझ्या रडक्या वेडपट मैत्रिणीसाठी गिफ्ट..!!"
"नकोय मला...दुष्ट आहेस तू!!"
"अगं, बघ तर उघडून...!!"
इतक्यात बॉक्स मधून "म्यांव" असा अस्पष्ट आवाज आला....
सायलीने लगबगीत तो बॉक्स उघडला.... तशी तिची लाडकी बनी "म्यांव" करीत उडी मारून तिच्याकडे आली ..
"बनी, माझी बनी... माझी पिल्लूडी...कुठे गेली होतीस गं तू मला एकटीला सोडून ...??"
पटापट मुके घेत तिने बनीला छातीशी कवटाळलं.. आनंदाश्रूंनी तिचे डोळे पाझरू लागले..
"सायली, तुला माहितेय, मी तुला काल तो बुके देऊन प्रपोज करणार होतो..आणि झालं भलतच..!!"
"काय ??" सायलीचा विश्वासच बसेना..
"हो, पण त्या सोबतच कशी व्यक्त होशील; रागवशील, मैत्री तोडशील की माझ्या प्रेमाचा स्वीकार करशील.. की नाही.. कशाचीच खात्री नव्हती..तू ऐकूनच घेत नव्हतीस... अस्वस्थता, चिडचिड वाढत होती....त्यावर कहर म्हणजे...या तुझ्या बनीने मी एवढं प्रेमाने आणलेल्या बुकेची वाट लावली आणि प्रचंड राग आला.. मग काय..!! संयम ढासळला.. मूडचा कुस्करा झाला सगळा...."
"मग...??"
"मग काय, नंतर अक्कल ठिकाणावर आली माझी... माझा अहंकार, राग एवढा प्रिय मला की माझ्या प्रेमालाच मी दुखावले ?? तिची रडारड, चिडचिड साहजिकच होती ना ??"
"घाबरून तसाच मागे फिरलो... आसपास, रस्त्याच्या कडेला, झाडाझुडपांमध्ये अगदी गटारात सुद्धा...सगळीकडे शोधले..पण व्यर्थ...!! अचानक दूरवर कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज आला.. का कुणास ठाऊक पण पावले त्या दिशेने रेटली गेली .. जवळ जाऊन बघतो तर काय.. ३-४ कुत्र्यांनी बनीला घेरले होते.. बिचारी बनी... घाबरून अंग मोडून बसली होती... एकाएकी काहीतरी संचारल्या सारखा मी ओरडलो... दगड उचलून मारले त्यांना..तसे ते पळून गेले..मी झटकन बनीला उचललं आणि तिला घरी घेऊन आलो...मायेने कुरवाळले, दूध पाजलं, चादरीच्या बिछान्यावर झोपवली तिला.. किती निरागस वाटली ती...अगदी माझ्या सायली सारखीच ...!!"
"चल...काहीतरीच तुझं..!!." सायली लाजली..
"चला.. तुला तर तुझा हरवलेला व्हॅलेंटाईन मिळाला..माझं काय ?"
"सायली, Will you be my Valentine ?? माझं तुझ्यावर खूप खूप प्रेम आहे गं...मला आवडेल आयुष्यभर तुझे रुसवे फुगवे काढायला.. पण यापुढे मी तुला कधीच दुखावणार नाही.. तुला दुखावलं तर मलाच खूप त्रास होतो... तुला गमावल्याच्या नुसत्या विचारानेच माझा जीव कसा जळतो; हे मी काल अनुभवले आहे...मला तुला कधीही गमवायचे नाही .. त्यामुळे परत कधीही "मला सोडून निघून जा!" असे सांगू नकोस हं.. मी नाही तुझ्या शिवाय जगू शकणार"; हे सांगताना संयमचे डोळे पाणावले होते..
इकडे सायलीचा चेहरा गुलाबासारखा फुलला होता.. कुठेतरी तिच्या अंतर्मनातील सुप्त भावनांना जणू वाचा फुटली होती.... संयमशी असलेले निरामय नाते नुसती मैत्री नाही तर त्याहूनही अधिक अश्या निरागस, निर्भेळ, अतूट प्रेमाचे नाते आहे, याची तिलाही जाणीव झाली होती...
"बघू...विचार करेन..पण एक अट आहे हं..!! माझं हे व्हॅलेंटाईन पण असेल आपल्यामध्ये.. "कबाब मे हड्डी" म्हणून..!! चालेल ना ?? बघ.. विचार कर..."
"वेडी कुठली..!! ये इकडे..."
संयमने हसून सायलीला कुशीत घेतले... तसे सायलीने त्याच्या खांद्यावर डोके ठेवले..बनी आपली तिच्या इवल्याश्या लुकलुकत्या डोळ्यांनी दोघांकडे टकामका पाहत राहिली....
प्रितफुल (प्रित)...©️®️
