पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

अशी ती....

अशी ती....


     ती खुप सुंदर, सोज्वळ, चारचौघीत उठून दिसणारी अशीच होती. नाव तिचे तृप्ती. तिचा स्वभावही प्रेमळ तसेच मनमिळाऊ असाचं.तिच्या एकुणच सर्व चांगल्या गुणांमुळे ती सर्वांचीच आवडती होती.आईवडील शिक्षक असल्यामुळे शिस्तीचे धडे तिला घरातुनच मिळाले होते. ती आता आठवीत गेली होती. वयवर्ष जेमतेम तेरा असेल.

        तरुणपणात प्रवेश करत असल्यामुळे तिच्यात शारीरिक बदल व्हायला लागले. शारीरिक बदलांविषयी जास्त काही माहित नसल्यामुळे तिला त्या गोष्टींची भिती वाटायला लागली. त्याचा परिणाम म्हणून ती आता चिंतातुर, एकटी-एकटी राहू लागली. आनंदी, स्वच्छंदी राहणारी, मुक्तपणे वावरणारी तृप्ती आता काहीशा दडपणाखाली राहू लागली.शुन्यात नजर ठेवून एका जागी बसू लागली. 

         सुरुवातीचे काही दिवस कुणाच्याही काही लक्षात आले नाही. काही दिवस गेल्यानंतर मात्र ही बाब तिच्या आईच्या लक्षात आली. आईने लगेच योग्य वेळ हेरुन तिला यामागचे कारण विचारले व त्याचबरोबर तब्येत बरी नाही का? हेही विचारले. तृप्ती मात्र काहीही उत्तर न देता केवळ शांत राहिली. आईने तिचा तो रडवेला चेहरा पाहिला.आता मात्र तृप्तीची आईला तिच्या उत्तर न देण्यामागचे कारण समजले.एक स्री असल्यामुळे आई तृप्तीच्या वेदना न सांगता समजू शकली. आईने तृप्तीला आधार देत तुर्तास शांत राहण्याचा सल्ला दिला. संध्याकाळी तृप्तीचे वडील घरी आल्यानंतर आईने त्यांना सर्व हकीकत सांगितली.वडिलांनी मग तृप्तीच्या आईला दुसऱ्या दिवशी जवळच्या ओळखीच्या समुपदेशकाकडे सल्ला घेण्यासाठी जाण्यास सांगितले.

         ठरल्यानुसार मग तृप्तीची आई दुसऱ्या दिवशी त्या जवळच्या समुपदेशकाकडे आपल्या समस्येचे निरसन करण्यासाठी गेली. तिथे गेल्यावर आईने त्यांना आपल्या मुलीविषयीच्या सर्व समस्या सांगितल्या व त्यावर एक आई म्हणून मी काय करावे याविषयी मार्गदर्शन करण्याची विनंती केली.सगळे व्यवस्थित ऐकून घेतल्यानंतर समुपदेशकांना तृप्तीची खरी समस्या समजली होती. त्यांनी आता तृप्तीच्या आईला लवकरात लवकर तृप्तीला इकडे आणण्याची विनंती केली. दुसऱ्याचं दिवशी आई तृप्तीला घेऊन समुपदेशकांकडे गेली. तिथे गेल्यावर त्यांचा पाचचं मिनिटात नंबर आला. समुपदेशकांनी आता तृप्तीला प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. तृप्ती त्यांच्या एकाही प्रश्नाचे उत्तर देईना. ती घाबरलेल्या अवस्थेत केवळ एकटक बघत बसलेली होती. 

         समुपदेशकांनी  तिला बोलते करण्यासाठी आता आपले हातखंडे वापरले. अन् खरोखरच ती आता बोलू लागली, आपल्या समस्या सांगू लागली. समस्या सांगतासांगताचं रडू लागली. समुपदेशकांनी तिच्या आईच्या मदतीने तिला शांत केले व तारुण्यात येत असताना मुलीत होणाऱ्या सर्व शारीरिक बदलांविषयी सविस्तरपणे सांगितले. हे सर्व शारिरीक बदल नैसर्गिक असल्यामुळे त्यांना घाबरुन जाण्याचे काहीच कारण नाही हेही आवर्जून सांगितले.त्याचबरोबर आता काही छोटे-छोटे व्यायाम, प्राणायाम हेही सुरु करण्याविषयी समुपदेशकांनी तृप्तीला सुचवले.

        समुपदेशकांनी केलेल्या अचुक मार्गदर्शनामुळे व दिलेल्या सविस्तर माहितीमुळे तृप्ती आता नेहमीच्या चिंतेतुन बाहेर पडली होती.तिच्या मनातील संशयाचे ढग आता दूर झाले होते. तिचा चेहरा खरोखरच खुलला होता. तृप्ती चिंतामुक्त तसेच आनंदी झाल्यामुळे तिच्या आईच्या आनंदालाही पारावार राहिला नव्हता. अशा प्रकारे योग्य वेळेस योग्य ठिकाणी येऊन योग्य सल्ला घेतल्यामुळे तृप्तीसारख्या एका वयात येणाऱ्या मुलीच्या जीवनात अंधकार जाऊन प्रकाश पडला होता. समुपदेशकाच्या केंद्रातुन बाहेर निघताच तृप्ती व तिची आई दोघींनाही  समाधानाच्या एका नवीन आकाशाखाली आल्यासारखे वाटत होते.


तात्पर्य: कुठल्याही समस्येवर योग्य उपचार केल्यास समस्या नक्कीच सुटते.


©अतुल निंबा शिरुडे.

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू