पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

बिघाड

‘बिघाड’   


फ्रिज बिघडला.

टीव्ही बंद.

वाय-फाय डाऊन.


शनिवारी सकाळपासून घरात अघोषित आणीबाणी जाहीर झाल्यासारखं वातावरण होतं.


"आता ह्यालाही काहीतरी झालं वाटतं!" – तो कपाळावर हात मारत फ्रिजकडे पाहत होता.


सहा वेळा प्लग काढून लावला.

टीव्हीचा रिमोटही चालेनासा झाला.

नेट कनेक्शन गायब.


सगळीकडे जणू "No Signal".


तो चिडून म्हणाला,

"हे घर आहे की संकटमोचक केंद्र? दर आठवड्याला काहीतरी बिघडतंय."


त्या आवाजावर ती स्वयंपाकघरातून बाहेर आली.

ओढणी खांद्यावर टाकत, केस मानेवरून बाजूला करत तिने विचारलं,

"काय झालं?"


"काय झालं? बघ ना, फ्रिज बंद, टीव्ही बंद, वाय-फाय नाही… म्हणजे मी इथे राहत आहे की तुटक वस्तूंमध्ये?"


ती थोडं हसली. त्या हसण्यात थोडी थकवा, थोडा मिश्कीलपणा आणि थोडी चीड लपलेली होती.

ती म्हणाली—


"तरी मी चालूच आहे ना… हेच पुरेसं नाही का?"


क्षणभर तो गोंधळला.

काही क्षणातच त्याच्या चेहऱ्यावर एका जाणीवेचा प्रकाश पडला.


त्या एका वाक्यानं तो आत कुठे तरी ढवळून निघाला.


फ्रिज बंद झाला, म्हणून त्याला गरम पाणी प्यावं लागलं...

टीव्ही बंद झाला, म्हणून क्रिकेटचं स्कोअर समजलं नाही...

नेट गेलं, म्हणून ऑफिसच्या मेल्स थांबल्या…


पण ती?

ती अजूनही सकाळी उठून उठून सगळं करत होती.

गरम चहा, पोळीभाजी, मुलांची तयारी, सासूबाईंची औषधं…

सगळं 'नॉर्मल' चालू.


ती बिघडत नाही? ती थकत नाही?


ते वाक्य तिच्या तोंडून खूप सहज आलं, पण त्याचा अर्थ खोल होता.


"तरी मी चालूच आहे ना… हेच पुरेसं नाही का?"


ते वाक्य त्याच्या काळजात जाऊन बसलं.जिच्यात बिघाड झाला तरी ती स्वतःलाच दुरुस्त करते,

ती कधी ‘डाऊन’ होते का विचारतो आपण?


ती तापातही उठते.

पाळीच्या दुखण्यातही काम करते.

मनात राग असला तरी चेहऱ्यावर हसू ठेवते.

सासूबाई टोचून बोलल्या तरी चुप राहते.


कारण हे घर तिचं आहे… ती ‘चालू’ ठेवते.


तो क्षण त्याला मागच्या कित्येक वर्षांचं स्मरण करून देऊन गेला.


काही वर्षांपूर्वी


तो नवीन नोकरीला लागला होता.

तिच्या हातचं डब्यातलं जेवण खाऊन सहकारी चाट पडायचे.

ती लग्नानंतर शहरात आली, नवीन माणसं, नवीन रस्ते, नवीन भाषा… पण एकही तक्रार नाही.

सगळं ती शिकत गेली.


रात्री उशीर झाला की डोळे लाल करून वाट पहायची.

त्याचं हसणं परत यावं म्हणून ती मुलांचं हसवणं, खेळणं, स्वतः थकलेली असूनही करत राहायची.


एकदा ती तापात होती… तरी सकाळी उठून स्वयंपाक केला.

तो म्हणाला होता, “आराम कर ना थोडा…”


ती म्हणाली होती, “तू कामावर जातोस, मी घरी राहते… आराम माझ्या वाट्याला नाहीच.”


---


आणि आत्ताच…


तो फ्रिज उघडून पाहतो, "कसं जमवायचं आता सगळं?"


पण त्याच क्षणी त्याच्या मनात चमकून गेलं—

“माझ्या आयुष्याचा तापमान बिघडत असताना… किती वेळा हिने 'फ्रिज'सारखं स्थिर राहून सगळं थंड केलंय!”


तो पुन्हा एकदा तिच्याकडे पाहतो.

ती पोळ्या लाटत आहे. डोळ्यांत थकवा आहे, पण हात स्थिर आहेत.


"कधी बिघडशील गं तू?" तो हळूच म्हणतो.


ती थांबते. थोडा वेळ शांत.

मग म्हणते—

"बिघडले होते… पण तुमच्यासाठी परत चालू केले स्वतःला!"


त्याच्या छातीत काहीतरी  धडधडतं.


दुपारी...


तो स्वतः स्वयंपाकघरात जातो.

मुलाला विचारतो, "तुला सॅंडविच खायचंय का?"


मुलगा म्हणतो, "पप्पा, तुम्ही बनवाल?"


तो म्हणतो, "हो, आई विश्रांती घेत आहे."


ती हसते, पण त्या हसण्यात प्रश्न असतो—

"उद्या काय? पुन्हा मीच चालू?"


तो म्हणतो,

"नाही. आता मीही चालू राहीन."


रात्री...


ती शांत झोपलेली असते.

तो तिच्या पायाशी चादर घालतो.

लपवून ठेवलेला गुलाब तिच्या उशाशी ठेवतो.


आणि स्वतः मोबाईलच्या नोट्समध्ये लिहितो—


"तू चालू होतीस… म्हणून घर चाललं.

पण उद्यापासून आपण दोघं चालू राहू… कारण आता समजलंय—

तू बिघडलीस तर मीही संपलो!"


या जगातली सगळी यंत्रं बंद पडल्यावर आपण त्यांच्या मेंटेनन्सकडे लक्ष देतो.

पण जी व्यक्ती रोज चालू आहे – आई, बहीण, पत्नी, सून, मुलगी… तिच्या चालू असण्यामागची किंमत ओळखतो का?


तिचा बिघाड टाळायचा असेल, तर अधूनमधून तिला थांबू द्या.

कारण ती जर एक दिवस खरंच "Shutdown" झाली,

तर घर चालणार नाही… फक्त 'जगणं' चालू राहील… पण त्यात 'जीव' नसेल.


घराच्या गृहिणीचं काम कधीच बंद पडत नाही, कारण ती चालू असते त्या अनंत प्रेमाच्या आणि जिव्हाळ्याच्या तारेवर, ज्याला कुणी कधीच ऑफलाईन करू शकत नाही.”

सौ तृप्ती देव


भिलाई छत्तीसगड 

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू