Back to Book Details Report Reviews

मोह

त्या दिवशी सकाळपासूनच आकाश ढगांनी भरून आलं होतं. गावात एक विचित्र शांतता पसरली होती. ज्योतिबा काही कामानिमित्त बाहेरगावी गेला होता. घरात इंदू एकटीच होती. तिच्या पोटात वाढणारं बाळ दिवसेंदिवस मोठं होत होतं, त्यामुळे चालताना देखील तिला जपून पाऊल टाकावं लागत होतं.
घराची परिस्थिती बेताची होती. अंगणात बांधलेली गायच त्यांच्या संसाराचा आधार होती. तिच्या दुधावरच घर चालत होतं. त्या दिवशी घरात चाऱ्याचा एक काडीसुद्धा शिल्लक नव्हता. गाय सकाळपासून हंबरत होती. तिच्या डोळ्यांतली भूक इंदूला पाहवत नव्हती.
क्षणभर ती विचारात पडली.
“आज ते घरी असते तर मला जंगलात जावं लागलं नसतं…”

पण गरिबी माणसाला भावना नाही, तर जबाबदारी शिकवते.
इंदूने हातात विळा घेतला, डोक्यावर चुंबळ टाकली आणि सावकाश पावलं टाकत जंगलाच्या दिशेने निघाली. पोटात बाळ असल्यामुळे तिच्या प्रत्येक पावलात भीती होती, पण गाय उपाशी राहू नये ही काळजी त्या भीती पेक्षा मोठी होती.
जंगल तिच्यासाठी अनोळखी होतं. उंच झाडं, वाऱ्याने हलणारं गवत आणि पक्ष्यांचे आवाज… त्या सगळ्यात एक वेगळीच दहशत दडलेली होती. पण थोड्या वेळाने तिच्या नजरेस दाट हिरवं गवत दिसलं.
इतकं भरपूर गवत पाहून तिच्या चेहऱ्यावर आनंद उमटला. ती पटकन गवत कापू लागली. तिच्या मनात एकच विचार होता —
“आज भरपूर चारा घेऊन गेले तर गाय दोन दिवस तरी सुखाने खाईल.

”लोभ कोणताही असो — धनाचा, वस्तूंचा किंवा गरजेपेक्षा अधिक मिळवण्याचा,त्याचे परिणाम कधी ना कधी भोगावेच लागतात.
गवत कापण्याच्या नादात ती पुढे पुढे सरकत गेली. पण त्या हिरवाईखाली नियतीने एक सापळा लपवून ठेवला होता. तिथे एक जुनी विहीर होती. वर्षानुवर्षे बंद पडलेली. तिच्यावर इतकं गवत वाढलं होतं की ती पूर्णपणे झाकली गेली होती.
इंदूचं पाऊल पुढे पडलं… आणि अचानक तिच्या पायाखालची जमीन सरकली.
“आई गं…!” अशी किंकाळी देत ती थेट विहिरीत कोसळली.
काही क्षण तिला काहीच समजलं नाही. शरीराला मार लागला होता. पोटातलं बाळ सुरक्षित आहे ना, हा विचार तिच्या मनात वीजेसारखा चमकून गेला. वर पाहिलं तर फक्त छोटंसं आकाश दिसत होतं. आजूबाजूला काळोख आणि शांतता.
ती मदतीसाठी ओरडली, पण जंगलात तिचा आवाज ऐकायला कोणीच नव्हतं.
क्षणभर तिच्या डोळ्यांत अश्रू आले.
“देवा, माझ्या बाळाला काही होऊ देऊ नको…”
पण लगेचच तिने स्वतःला सावरलं. तिला माहीत होतं, आज जर स्वतःच प्रयत्न केले नाहीत, तर मदतीला कोणीही येणार नाही.
सुदैवाने तिच्या हातातला विळा तिच्याजवळच पडला होता. तिने विहिरीच्या भिंतीत विळा रोवला, माती पकडली आणि हळूहळू वर चढायला सुरुवात केली.
प्रत्येक क्षणी तिचा जीव धोक्यात होता. हात घसरत होते, पाय थरथरत होते, शरीर थकलं होतं; पण एका आईच्या मनातली जगण्याची ताकद खूप मोठी असते. ती स्वतःसाठी नाही, तर आपल्या पोटातल्या लेकरासाठी लढत होती.
बराच संघर्ष केल्यानंतर अखेर तिने विहिरीच्या कडेला हात टेकवला आणि स्वतःला बाहेर ओढून घेतलं.
बाहेर आल्यावर ती काही वेळ जमिनीवर बसून राहिली. तिच्या डोळ्यांत पाणी होतं, पण चेहऱ्यावर समाधान होतं.
थोड्या वेळाने तिने पुन्हा गवत बांधलं. कारण संकट कितीही मोठं असलं तरी गरिबाच्या आयुष्यात काम थांबत नाही.
त्या दिवशी इंदूने फक्त विहिरीतून बाहेर येण्याचा संघर्ष केला नव्हता, तर एका आईच्या ममतेने मृत्यूवर मात केली होती.
आणि त्या घटनेने एक गोष्ट कायमची शिकवली.

 संकट कितीही खोल असलं तरी जिद्द आणि धैर्य असेल, तर माणूस त्यातून बाहेर पडू शकतो.


प्रविण ज्यो. तायडे 

अमरावती 

Reviews


Your Rating

blank-star-rating

Left Menu