पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

स्वप्न

नेहमीप्रमाणेच ह्या वेळीही मुलाकडच्या लोकांचा नकाराचा फोन आला. चला हे तर होणारच होते. मला नकार देणाऱ्यांच्या संख्येत अजून एकाची वाढ. असा विचार करुन नीमाने पुस्तकात डोकं घातलं.पण तिच्या आईच्या डोळ्यांना मात्र धारा लागल्या. "किती चांगला मुलगा होता ग तो सुधीर. शिकलेला, कमावता, हॅंडसम. स्वतःचे घर होते. मुलगा, आईवडील, त्याची बहीण सगळेच भले लोक होते ग . अजून काय हवय आपल्याला?  पण तुझी ही अट? सगळ्या चांगल्या मुलांना हातातून घालवते ग नीमा. इतकी हुशार, सुंदर, कर्तृत्ववान आहेस तू.  ही अट मागे घेतलीस ना तर महालात बसून राज्य करशील. पण नाही."

आईचे हे डायलॉग नीमाला पाठ झाले होते. प्रत्येक वेळी नकार आला की तिची ही टेप सुरु व्हायची. आणि आई जितक्या पोटतिडकीने बोलायची तितक्याच शांतपणे नीमा सगळं ऐकून घ्यायची.

पण आज आईच्या मनाला फारच लागलं होतं. " अगं मी तुझ्याशी बोलतेय. भिंतीशी नाही. मला फार त्रास होतो ग. आम्ही जन्मदातेच तुझ्या सुखाच्या आड येतोय हा विचार मला छळत रहातो. मलाही आणि ह्यांनाही. फक्त हे कधी बोलून दाखवत नाहीत." असं म्हणून आई अजूनच रडायला लागली.

मग मात्र नीमा उठली. "आई, ये बस." आईच्या हाताला धरुन तिने आईला  खुर्चीवर बसवलं. तिला आतून पाणी आणून दिलं.  " हे बघ आई. तुझ्या भावना, त्रागा, त्रास हे सगळं मला समजतं. पण आज ज्या मुलाने मला नकार दिला तो खरच चांगला होता असं वाटतं तुला? म्हणजे बाकी सगळ्या दृष्टीने तो असेलही चांगला. नव्हे होताच तो चांगला पण एक माणूस  म्हणून चांगला होता असं मनापासून वाटतं का तुला? आणि मला खरच सांग अशी काय जगावेगळी अट घातली ग मी? मी तुमची एकुलती एक मुलगी आहे तेव्हा मी आयुष्यभर माझ्या आईवडलांची जबाबदारी घेणार इतकच तर म्हंटले मी. लग्नानंतर दोघांच्या आईवडलांची समसमान काळजी घेऊ असं म्हंटले की ही तुझी सगळी चांगली असणारी मुलं मागे का हटतात? मी त्यांच्या आईवडलांना अंतर देऊ नये अशी अपेक्षा करणाऱ्या मुलांनाही माझे आईवडील मात्र नको असतात. आई मला माहित आहे तुला मुलगा व्हावा कारण तो तुला म्हातारपणात जपेल अशी माझ्या दोन्ही आज्यांची किती तीव्र इच्छा होती ते. आजीने माझ्यात आणि माझ्या चुलतभावांमधे केलेला फरक किंवा तुला आणि काकूला दिलेली वेगवेगळी वागणूक मला कळत नव्हती असं नाही. तू आणि बाबांनी मला भरभरून प्रेम दिलत. कधीच कशाची जाणीवही होऊ दिली नाहीत. पण जस जशी मोठी होत गेले तस तसे मुलगा नाही म्हणून तुम्हाला मारलेले टोमणे मला समजत गेले. आणि तेव्हापासूनच मी हे स्वप्न बघत आलेय की मी तुमची संपूर्ण जबाबदारी घेणार. मी म्हणणार नाही की मुलासारखी घेणार वगैरे कारण मुलगा / मुलगी ह्याने काहीच फरक पडत नाही. आपल्या आईवडलांची जबाबदारी घेणं ह्यात जेंडर मधे येतच कुठे? काही वावगं किंवा अतार्किक स्वप्न आहे का ग माझं? साधी सरळ गोष्ट आहे. सुदैवाने आपल्याकडे चांगला पैसा आहे. बाबांचे पेंशन आहे. तुमच्या तब्येती चांगल्या आहेत. पण देव न करो उद्या अशी काही वेळ आलीच तर मला सासरच्यांकडून कसलीही आडकाठी न येता तुम्हाला पूर्णपणे मदत करता यावी. माझ्या पगाराचा एक हिस्सा तुमच्यासाठी असावा एवढीच साधी अपेक्षा आहे. आणि तो हिस्सा येणाऱ्या गरजेची वाट न बघता आत्तापासूनच असावा. इतकच म्हणणे आहे माझे."

" अगं हो ते मला माहिती आहे. पण सगळे मुलाकडचे लोक आणि अगदी आपले नातेवाईक सुद्धा ह्या तुझ्या अटीचा इतका बाऊ करतात ना की नको वाटतात ह्या सगळ्या चर्चा. तुम्हाला कळत नाही का?  तुम्ही तिला समजावत का नाही? वगैरे" आई आता जरा शांत झाली होती.

" आई हे तेच नातेवाईक आहेत ना जे तुला एकतरी मुलगा हवा होता  म्हणणारे? तर मग तेव्हा जसं तू त्यांच्याकडे लक्ष दिले नाहीस तसेच आताही देऊ नकोस. आणि मुलाकडचे बाऊ करतात कारण त्यांच्यासाठी ही फक्त एक अट आहे पण माझ्यासाठी ते माझे स्वप्न आहे. अट आणि स्वप्न यातला फरक जेव्हा एखाद्या संवेदनशील मुलाला जाणवेल तेव्हा बघ तो माझ्या ह्या  स्वप्नामुळे तरी मला नक्कीच नकार देणार नाही. तेव्हा तू जास्त त्रास करुन घेऊ नको. आणि तुम्ही माझ्या सुखाच्या आड येताय असा विचार तर अजिबात करु नकोस. आत्तापर्यंत जसं प्रत्येक बाबतीत मला सपोर्ट केलास, माझ्यावर विश्वास ठेवलास तसाच ह्या बाबतीतही ठेव. आणि हो फक्त माझे हे स्वप्न मान्य करणारा कोणीही ऐरागैरा जावई नाही मिळणार हं तुला. तर सगळ्या बाबतीत चांगला आणि माझ्या स्वप्नाला स्विकारणारा जावई मिळेल. कारण मनापासून पाहिलेल्या स्वप्नांना पूर्ण करण्याची संधी देव प्रत्येकाला देतोच. तेव्हा त्याने माझीही गाठ वरुन आधीच नक्की बाधली असेल. तर तू फक्त खंबीर रहा कारण भगवान के घर मे देर है अंधेर नही" असे म्हणून नीमाने आईचा मूड परत जागेवर आणला.

मग असेच अजून ठीकाणं बघण्यात दोन आठवडे गेले आणि एका संध्याकाळी नीमाला एका अनोळखी नबर वरुन मेसेज आला. ' Hi.  मी सुधीर. दोन आठवड्यांपूर्वी आपण भेटलो होतो. मला जरा तुमच्याशी बोलायचे होते तर फोन केला तर चालेल का? '

खरं सांगायचं  तर नीमालाही सुधीर आवडला होता. त्यामुळे त्याचा मेसेज आल्यावर त्याला काय म्हणायचे आहे ते निदान ऐकून तरी घे असा तिच्या मनाने कौल दिल्यावर तिने त्याला 'ok' म्हणून रिप्लाय दिला. तो जणू काही तिच्या उत्तराची वाटच  बघत होता. त्याने लगेच कॉल केला.

" हलो मी सुधीर बोलतोय. सगळ्यात आधी थॅंक्यू व्हेरी मच. नकार कळवल्यानंतरही  तू मला तुझ्याशी बोलायची संधी दिलीस. मी सरळ मुद्द्यावरच येतो. मला नाही माहिती तुला मी कसा वाटलो किंवा आमच्या नकारानंतर तू माझ्याबद्दल आता काय विचार करत असशील किंवा मुळात तुला मी विचार करण्यासारखा तरी वाटलोय का ते. पण मला मात्र तू मनापासून आवडली होतीस आणि आहेस. तू सगळ्या बाबतीत मला हवी तशी सहचरणी आहेस पण खर सांगू का तू त्यादिवशी आपण बोलत असतांना तुला तुझ्या आईवडलांची संपूर्ण जबाबदारी घ्यायची तुझी इच्छा आहे म्हणजे तशी अटच आहे हे सांगितलेस. तेव्हा कदाचित ती अट माझ्याकडून व्यवस्थित रिसीव्ह नाही झाली. म्हणजे त्या अटीत खरतर  काहीच आक्षेप घेण्यासारखे नव्हते पण मला कुठेतरी ही मुलगी आताच अशी अट ठेवतेय तर पुढे जाऊन ही कितपत तडजोड करु शकेल किंवा माझ्या घरच्यांना किंमत देइल की नाही अशी शंका आली म्हणून मी नकार दिला. पण एवढ्या चांगल्या मुलीला मी ह्यासाठी नकार देतोय हे कळल्यावर माझ्या बहिणीने माझी चांगलीच शाळा घेतली. तिचेही दोन वर्षापूर्वीच लग्न झालय. आणि तिला तुझा लग्नाआधीच सासरच्यांना ही अट स्पष्टपणे सांगण्या मागचा हेतू व्यवस्थित समजला. तिचे म्हणणे आही की तू तुझ्या आईवडलांची एकुलती एक लेक आहेस त्यामुळे तुझा हा विचार अगदी रास्त आहे. आणि जेव्हा मीही ह्या दृष्टिकोनातून तुझ्या अटीकडे पाहिले तेव्हा मला ही ती अट योग्य वाटली. तर तुझी मनापासून क्षमा मागून मला माझा नकार होकारात बदलायचा आहे. तुझी ही अट मला आणि माझ्या घरच्यांना पूर्णपणे मान्य आहे. तेव्हा आता निर्णय तुझ्यावर आहे. तुला जर मी तुझ्यासाठी योग्य जोडीदार म्हणून वाटलो असेन तर माझी एकच विनंती आहे की मी आधी दिलेल्या नकारामुळे मला नाकारु नकोस. आधी मला तुझा हा विचार समजायला, पचायला वेळ लागला पण आता मी ठाम आहे. मी मान्य करतो मी घाईत तुला नकार कळवायला नको होता. चुकलचं जरा माझं. पण आता ते होऊन गेलय. आज माझ्या मनातलं सगळं तुला सांगितलय. आता तू तुझा निर्णय कळव. बाय. " नीमाला काही बोलायची संधी न देता त्याने फोन ठेवून दिला.

सुधीरचा हा मोनोलॉग ऐकून नीमा विचारात पडली. त्याचे मनापासूनचे खरे बोलणे तिला भावले आणि मग तिनेही होकार दिला. आईच्या डोळ्यात आज परत पाणी आले पण ते आनंदाने. मग यथावकाश योग्य मुहूर्तावर नीमा आणि सुधीरचे लग्न लागले आणि एका लेकीचे स्वप्न पूर्ण झाले.

© धनश्री दाबके

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू