पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

कंटाळा आलाय रे

कंटाळा आलाय रे


ए शरद, काही तरी आयडिया कर ना. किती कंटाळा आलाय घरी बसून. कधी संपणार हे घरबसेपण?


हो ना! पांच महीने झाले, कुठे बाहेर जायची सोयच राहिली नाही. कुठून आलाय साला हा कोरोना, सगळ्यांना घरात डांबून ठेवले आहे.


तू असतोस एका बेडरूम मध्ये, काम करत. मी काय करु रे एकटी एकटी. आपल्या लग्नाला अजून एक वर्ष सुद्धा झालेले नाहीये, काही कळतंय का तुला? तुला माझी घुसमट कळत नाही अगदी.


कळते ग. पण मी तरी काय करणार. हे ऑफिसवाले दिवस बघत नाहीत, रात्र बघत नाहीत, रविवार बघत नाहीत. कधीही मीटिंग लावतात. बाहेरची पार्टी असते, नाहीही म्हणता येत नाही. कायम मी आपला ऑन कॉल. बस झालं हे वर्क फ्रॉम होम. त्यापेक्षा ऑफिस होते तेच ठीक होते. रात्रीचे आठ नऊ वाजले तरी घरी येऊन शांतपणे जेवता तरी येत होते तुझ्या बरोबर!


खरंच रे! ए तुलाही वैताग येत असेल ना! मग, तेच तर म्हणते आहे मी! चल ना कुठे तरी बाहेर जाऊया. रोजच्या कंटाळ्याचाही कंटाळा यायला लागला आहे आता.


ए, सारखे सारखे कंटाळा कंटाळा करायचे नाही हं. आई म्हणायची कंटाळ्याचे नावही घेऊ नये. एकाने कंटाळा आला म्हटले की लगेच दुसऱ्यालाही कंटाळा वाटायला लगतो. एकाने जांभई दिली की लगेच दुसऱ्यालाही जांभई येत ना तसेच या  कंटाळ्याचे आहे. एकाला आला की लगेच दुसऱ्याला ही येतो!


पुरे हं पुरे! झालंय सांगून हे आधीही. तुला नेहेमी दुसऱ्यांचे कौतुकच जास्त असते नाही तरी.


आई म्हणजे काय दुसरी आहे का?


ते राहू दे, बाहेर जाऊ या ना कुठे तरी!


कुठे जाणार?


साताऱ्याला जाऊ या का! आईबाबांना आणि दादालाही भेटता येईल.


अग मागच्या लॉन्ग वीक एंडलाही आपण साताऱ्यालाच गेलो होतो.


पण तेव्हा दादा कुठे भेटला होता. तो फिरतीवर गेला होता. आता भेटेल. कोरोना मुळे घरीच आहे तो.


आठवतंय तुला, आपले ठरल्यानंतर तुझ्या घरी गेलो होतो, आई बाबांना सांगायला, ते.


आठवतंय ना. सारखी धाकधूक वाटत होती, बाबा नाही म्हणले तर काय होणार म्हणून!


तीन दिवस आपण थांबलो होतो. मस्त मजा आली होती मला. आमचे घर गिरगावतले. इथे मोठे वाडे , डोंगर, हिरवाई! छान वाटले होते. होणारा जावई म्हणून किती कौतुक झाले माझे!


मग काय! सातारा इज ग्रेट! सातारा पाहुणचार पण ग्रेट!


एकदाचा होकार मिळाला आणि मग आपण सेलिब्रेट करायला अजिंक्यताऱ्याला गेलो होतो!


हो ना! तुझ्या बाईकवर तुला बिनधास चिपकके बसायला मजा आली होती!


वर किती मस्त वारा होता! गारेगार! तुझे केस भुरुभुरु उडत होते!


हम तुम और गारठा!


ते ठीक आहे, चिपकके वगैरे, पण परत येताना त्या नादात बाइक स्किड झाली होती! लगेच समोर वळण!


पण त्यातही मजा होती!


नंतर हनिमूनला आपण कोडईला गेलो होतो तिथेही किती मस्त मजा आली होती ना!


रोज एक चक्कर कॉकरस वॉकला! क्रिस्टल घेतला होता तिथे, आठवतंय! किती माकडे होती ना!


हो. तू घाबरून मला मिठी मारायचीस.


ते सात दिवस कसे गेले कळलेच नाहीत.


आता जसा हलका हलका पाऊस अंगाला लागतोय ना या बाल्कनीत, तसाच हलकाहलका पाऊस सतत जाणवायचा तिथे!


हो पाऊस आणि गारवा! सतत! दुपारीसुद्धा!


चल आत जाऊया. तुला तब्बेत सांभाळायला हवी आता. सर्दी होऊन चालणार नाही.


हो. काळजी घ्यायला हवी. आधीच हा कोरोना पसरतोय आणि त्यात चौथा महिना लागलाय!


किती वाट पहायला लागते ना, येणाऱ्या बाळाची!


हं! चल आत.


अरुण गाडगीळ

२४ सप्टेंबर २०२०

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू