पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

उमेदीचे जगणे

 

स्पर्धेसाठी

 

  

 लग्नाचे आमिष दाखवून स्वप्नीलने मनिषाशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले होते.तिने कधीही त्याला त्यासाठी नकार दिला नाही.तो म्हणेल तेव्हा ती आपलं शरीर त्याच्या स्वाधीन करत होती.पण लग्न न होताच असं लपूनछपून किती सुख घ्यायचं याची जाणीव तिला नुकतीच होऊ लागली होती.

 

          एक दिवस तिला झालेली जाणीव तिच्या ओठांवर आली.तिने स्वप्नीलला विचारलं,"स्वप्निल, आता आपण लग्न करायला हवं."


''हो ग,माझंही तेच मत आहे.पण माझी आर्थिक स्थिती बघतेस ना.एकदा का जॉब चांगला मिळाला की,लगेच लग्न करू."तो सौम्यपणे व्यक्त झाला.


 "आणि जॉब चांगला नाही मिळाला तर..."


  "सकारात्मक बोल ग."


  "अरे मी शंका विचारली.प्लिज रागावू नकोस."


"मी रागावतो का कधी तुझ्यावर?तू माझ्या        काळजाचा तुकडा आहेस.मी कशाला रागावू.?"


       असं म्हणत त्याने आपल्या बाहूंमध्ये तीला गच्च पकडले. ती सुटका करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत होती.पण सर्व व्यर्थ!

 

              स्वप्नील आज भलताच रंगात आला होता.नेहमीपेक्षा वेगळा भासत होता.त्यामुळे मनिषाने नेहमीप्रमाणे हसत हसत स्वतःला स्वाधीन केले.पण....पण अचानक तिला वांती आली.तत्क्षणी ती उठून बेसिनमध्ये गेली. पाठोपाठ स्वप्नीलही गेला.

 

                 त्याच रात्री तिला काहीतरी विपरीत घडल्याची शंका आली.म्हणून सकाळीच स्त्रीरोग तज्ज्ञांकडे जाऊन तपासणी केली.तपासणी रिपोर्ट  आला.तिचे काजवे चमकलेच.काही सुचेनासे झाले.

 

          मनिषा गर्भवती होती.ती कशीतरी स्वप्नीलसोबत घरी आली.



       "स्वप्नील काय करायचं आता?.लग्ना आधीच तू बाप होणार आहेस आणि मी आई.आता तरी लग्न करूया"

 

    .   "शक्य नाही ग.आपण अबोर्शन करूया.असे किती प्रसंग येतात कित्येकांच्या आयुष्यात?"



       "स्वप्नील असं कसं बोलतोस वेड्या? अरे आपल्या रक्तामांसाचा पिंड वाढतोय माझ्या पोटात. त्याला संपवण्याची भाषा करतोस?"


          "मग काय करायचं?..वाढवायचं?आणि सांभाळणार कोण ?सध्या आपली परिस्थिती नाही पोरांना सांभाळण्याची."


        ''अरे आहे त्यात करू ऍडजस्ट. तू नको काळजी करू."


      "म्हणायला सोपं असतं,ज्यांना पोरं आहेत त्यांना विचार."


      "म्हणजे? माझ्या पोटात वाढणार बाळ नष्ट करून टाकायचं, असं एकंदरीत तुझ्या वागण्यावरून वाटतंय."


    "अगदी करेक्ट"


    "मला  ते योग्य वाटत नाही.स्वप्नील, आपण देवू ना जन्म त्याला.प्लिज."


     स्वप्नील काही न बोलताच आपल्या लॅपटॉपवर काम करत राहिला.ती पुन्हा पुन्हा त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत होती. परंतु तो ऐकायला तयार नव्हता.

 

            त्या रात्री दोघांच्यात खूप शाब्दिक चकमक उडाली.दोघे एकमेकांना नको नको ते बोलले.आरोप प्रत्यारोप झाले.न खातापिताच अंथरुणात गेले.नेहमी समोर असणारी तोंड आज मात्र विरुद्ध दिशेला होती.दोघांनाही मागील सहा महिन्यांचा काळ चित्ररूपाने आठवत होता.

           स्वप्नील आपले बारावी शिक्षण करून कामाच्या शोधासाठी मुंबईत आला होता.त्याच्या काकांनी प्रेसमध्ये त्याला नोकरी पाहिली. जेमतेम दहा ते बारा हजार पगार.रुम भाड्याने घेऊन तो राहू लागला.

 

        याच प्रेसमध्ये मनिषाशी त्याची ओळख झाली. मनीषा एका पायाने अधू होती.पण दिसायला गोरीपान होती.तिचा बांधा सुडौल होता.बोलणे लाघवी होते.याच मनिषाच्या हळूहळू तो प्रेमात पडला.दोघांनी मनसोक्त आयुष्य जगण्याचा मार्ग धरला.थोडं सेटल झाल्यानंतर लग्न करु असे म्हणत जीवनाचा आनंद घेऊ लागले.

 

            मनिषाही कोकणातून मुंबईला कामानिमित्त आलेली मुलगी.हार्ड वर्क तिला जमत नसल्यामुळे वडिलांच्या मित्राने प्रेसमध्ये काउंटरवर तिला ठेवले होते.मॅनेजरपदाच्या खालची ती पोस्ट होती.पगार नवीन असल्याने पंधरा हजार होता.सुरुवातीला गावातील मैत्रिणीसोबत ती राहत असे.पण स्वप्नीलची प्रेमगाठ जुळल्याने ती वेगळी राहू लागली. तिच्या खोलीवर तो अधूनमधून यायचा,राहायचा.

 

            लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये किती रहायचं हा प्रश्न तिला सतावत होता. म्हणून लग्नाचा तगादा ती  स्वप्निलकडे लावत होती.पण आर्थिक स्थैर्य नाही या कारणास्तव तो चालढकल करत होता.

 

                त्याच्या वेळकाढू धोरणामुळे ती त्रस्त झाली होती. गर्भवती राहिल्याने ती अधिकच त्रस्त झाली होती.यावेळी स्वप्नील साथ देण्याऐवजी चालढकल आणि जबाबदारी ढकलतोय याची जाणीव तिला होवू लागली होती.तिला गर्भवती राहिल्यापासून नेहमी वाटायचं की, लग्नाच्या बेडीत अडकून पोटातल्या बाळाला जन्म द्यायचा. पण स्वप्नीलच्या नकारघंटेने ते शक्य होईल असं तिला वाटत नव्हतं.

 

              शेवटी एक दिवस अचानक स्वप्नीलचे वडील वारल्याने तो गावी आला ,तो परत मुंबईला फिरकलाच नाही.फोन क्रमांकही त्याने बदलला आणि संपर्क बंद झाला.तिने खूप प्रयत्न केला त्याच्याशी संपर्क साधण्याचा.पण काही उपयोग झाला नाही.

 

                 मनीषा पोटावर हात फिरवून रडायची.ज्याच्यावर विश्वास ठेवला,त्याने विश्वासघात करून पळ काढला होता.आता काय करायचं या विवंचनेत ती असायची.तिला बरेचजण सल्ले द्यायचे,'कोणी म्हणायचे पोलिसात तक्रार नोंदव,कोणी म्हणायचे गर्भपात कर,कोणी म्हणायचे, स्वप्नीलच्या घरी  बातचीत करून नेमकं त्याचं मत काय? समजावून घेऊ.'पण या सर्व सल्ल्याना ती झिडकारून देत असे.

 

         जीवनात सल्ले देणारे अनेक असतात पण वेळेला कोण उपयोगी नसतात याची जाणीव तिला होती.कोणत्याही भानगडीत न पडता पोटातील बाळाला जन्म देण्याचे मनोमन तिने पक्के केले.एक उमेद सोडून गेली होती,पण त्याच उमेदीने दुसरी उमेद पोटात सोडून जगण्याची उर्मी दिली होती.

 

   .           दरम्यान मधल्या काळात आपल्या घराकडच्या लोकांशी तिने सर्व हकीकत जेव्हा सांगितली तेव्हा त्यांच्या पायाखालची वाळूच सरकली.आपली मुलगी असं काही करेल यावर त्यांचा विश्वास नव्हता.आपल्याच मुलीने विश्वासाला छेद दिल्याची भावना त्यांच्या मनात खदखदत होती.तुझं तूच काय ते निस्तर , तू आमच्यासाठी कायमची मेलीस म्हणत पाठ फिरवली.त्यामुळे सद्यस्थितीत तिला कोणाचाच आधार नव्हता. तिचं कृत्य समाजमान्य नसल्याने चहूबाजूने टीकेची झोड उठत होती.बाळासाठी सर्व सहन करत होती.

 

              नऊ महिन्याच्या काळात स्वतःचं आयुष्य तिने संपवण्याचा प्रयत्न केला पण आतून आवाज येत असल्याचा तिला भास व्हायचा,"आई ,तुझ्यासोबत मलाही संपवत आहेस का ग.अगं, मला बाहेर तरी येऊदे तुझ्या पोटातून.मी आधी जग तरी बघतो,नंतर मार मला."



                या भासाने ती शुद्धीवर यायची.एकदा तर ठाण्याच्या रेल्वेस्टेशनवर सर्व गोष्टी सहन न झाल्याने तीने मनोमन जीव द्यायचा  ठरवलाच होता.मनाची तिने तयारी देखील केली.आणि बेधडक गेली रेल्वेसमोर....जीवन संपवायला....पण काही सेंकदात ती स्वतःहून माघारी नवी उमेद बाळगून परतली.परत तिने जीव देण्याची,आयुष्य संपवायची भाषा कधीच बोलली नाही.



               नऊ महिने नऊ दिवस लोकांच्या संशयित नजरेच्या टप्प्यात वावरून तिने आपल्या बाळाला जन्म दिला.ती बाळाला बघून मनोमन सुखावली.सहज नवउमेदीच्या मनात भावना येऊन गेल्या.तिने आपल्या भावना सोबतीला असणाऱ्या मैत्रिणीला बोलून दाखवल्या,"श्रेया,स्वप्नीलच्या नादी लागून गर्भपात केला असता तर ग?एवढं सुंदर बाळ गमावलं असतं ना ग." तिच्या नयनात अश्रू ओसंडून वाहू लागले होते.



    "हो ग,तू ठाम राहिलीस म्हणून आजचा सुवर्णदिन बघायला मिळाला."श्रेयाने उत्तर दिलं.



      "श्रेया,आता पुढील आयुष्यात माझं बाळ आणि मी.घडवणार त्याला मोठ्याजिद्दीने."



"नक्कीच मनीषा,ज्यावेळी माझी मदत लागेल तेव्हा नक्कीच साद घाल.मी कुठेही असले तरी धावत येईन."




"हो ग,तुझाच आधार आहे मला,बाकी आधारवड निखळले आहेत."



                तेवढ्यात मनिषाचा फोन खणाणला.कोणाचा फोन म्हणून तिने उचलला तर समोरून स्वप्नील बोलत होता."मनीषा,सॉरी हं..मधल्या काळात मी टेन्शनमध्ये असल्याने कॉल करू शकलो नाही.प्लिज,रागावू नको डार्लिंग."

 

              तिने अश्रूंच्या साक्षीने मोबाईल कट केला.पुन्हा त्याचा फोन आला.पुन्हा तिने कट केला.त्याने पुन्हा फोन केला.शेवटी श्रेयाच्या आग्रहास्तव तिने फोन उचलला.

 

  "स्वप्नील, मला बाळ झालंय. मुलगा झालाय मला.''ती फोनवर सांगू लागली.


''काय म्हणतेस,आपल्याला बाळ झालंय."


  ''आपल्याला नाही... मला"


  "अगं, माझं बाळ....माझ्या रक्ताचं बाळ...कुठे आहेस तू..कोणत्या हॉस्पिटलमध्ये... मी निघतोच आता..."



'स्वप्नील,काहीच गरज नाही.ज्यावेळी गरज होती,त्यावेळी दूर झालास.आणि आता..''


"नाही डार्लिंग."


"बस्स कर आता.तुला मी केव्हाच डिलिट केलंय माझ्या मेमरी कार्डमधून.सर्वस्व दिलं मी तुला रे ,पण तू...फक्त वेदनेचे हुंकार दिलेस."


"प्लिज,नकोस बोलुस असं. मला एकवेळ माफ कर."


"मी कोण तुझी माफ करायला?"विसर ते सगळं.तुझा मार्ग पत्कर तू वेगळा.माझा मार्ग मी केव्हाच पत्करलाय.""असे म्हणत तिने फोन कट केला आणि फोन कायमचा बंद केला.


        श्रेया सर्व शांतपणे ऐकत होती.


           आठ दिवसांनी मनिषाला डिशचार्ज देण्यात आला.ती रूमवर आली.रूमवर येताक्षणी तिच्या मनात विचारांचे काहूर माजले.बाळाचं पालनपोषण कसं करायचं?या प्रश्नाचे उत्तर ती शोधण्यात मग्न असायची.सकाळ संध्याकाळ बाळाचाच विचार करायची.

 

              बाळाचं अजून बारसं झालं नव्हतं.काही मैत्रिणींना बोलावून बारसं करायचं तिने ठरवले. तारीख ठरली.वार ठरला.

 

              अन् त्याच दिवशी स्वप्नील काही लोकांसह हजर झाला."मनीषा मला माफ कर.माझं चुकलं.तुझ्या शरीराचा मी चुकीच्या पद्धतीने वापर केला.माझ्याकडून गंभीर चूक झाली.माझ्या लक्षात आलीय चूक."तो व्याकुळतेने बोलत होता.


             तिने रूमच्या बाहेर पाहिलं.स्वप्नीलसोबत तिचे आई बाबा,काका,स्वप्नीलचे आई बाबा,काका, भाऊ व बहीण आले होते.सर्वांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले होते.


          सर्वांनी खोलीत प्रवेश केला.मनिषाच्या उमेदीचं कोडकौतुक करताना सर्वाना स्वतःच्या चुकांची जाणीव झाली होती.मनिषाने बाळाकडे बघत त्यांना माफ केलं आणि सर्वाना मिठी मारली. तेव्हा तिची आई बोलली,"पोरी,तू उमेद सोडली असतीस तर या गोजिऱ्या बाळाला आम्ही मुकलो असतो.आयुष्यात तारुण्य अनुभवताना चुका होतात.आपल्याच काय देवाच्याही होतात. चुकभुल दिली घेतली तर कोणाला संकटाचा सामना करावा लागणार नाही.समाज चुकांवर बोट ठेवतो म्हणून आपण आपल्याच माणसांना मदत करताना हात आखडते घेतो,लांब रहातो.त्यांन होतं काय, तर नाती दुरावतात.कधी क्षणिक तर कधी कायमची.खरं तर स्वप्नीलने आम्हाला समजावलं.आमचीही ही दुष्ट मानसिकता होती.पण आज त्याने आम्हाला इथवर आणलं.त्यालाही त्याची चूक समजली आहे.पोरी,आम्ही जावई म्हणून पसंद करतो त्याला.तू तुझा नवरा म्हणून चूक माफ करून स्वीकार कर."



                  सर्वजण सुन्न झाले होते.मनिषा स्वप्निलकडे एकटक पहात होती.वायुवेगाने त्याला घट्ट बिलगून छातीवर अलवार पंजाने फटके देत होती.जणू एकेक फटके देऊन त्याने केलेल्या चुकीला माफ करत होती.

 

 .          इतकेच नाही तर पुनश्च उमेदीचे जगणे दिले म्हणून!



       

 

      श्री.दिलीप शंकर चव्हाण

        रत्नागिरी




             





    

 

 

 


             

 

 

 

 

 

 

 

    

 

 

 

 


पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू