पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

पत्र

छोट्या मुलाचे गणपती बाप्पाला पत्रं


प्रिय प्रिय 

गणबती बप्पा, 

तुला खूप खूप नमस्कार


तू तुझ्या घरून निघालास का? मी तुझी खूप वाट बघत आहे. तू येणार म्हणून मी छान कादगाची फुलं करून ठेवली आहेत, तसंच आजोबांना दुर्वा नीट करायला, आजीला फुलांचे हार करायला पण मदत केली आहे. आईची तर कधीपासूनची तयारी सुरू आहे. स्वयंपाकघरातून छान छान लाडू, शंकरपाळी, मोदक याचे वास येत आहेत, पण आई मला कोणत्याही पदार्थाला हात लावू देत नाही. ती म्हणते, ‘‘आधी बाप्पाला नैवेद्य नी मग तुला.’’ तेव्हा मला तुझा जरा वाईट वाटते, पण तरी मी तुझी वाट बघत आहे. मी आईला विचारलं, ‘‘बाप्पा, येताना त्याची आई काही खाऊ देत नाही का?’’ तर आईने मलाच रागे भरले. 

आम्ही मात्र कुठेही जायला निघालो की, आई थैली भरून खाऊ घेते, किंवा दुसरे पाहुणे येताना पण खाऊ आणतात, मग तू येताना काहीच खाऊ आणत का नाहीस? दर वेळी तू पण तुझ्या आईकडून थोडासा खाऊ घेऊन ये. म्हणजे माझ्यातला खाऊ मला तुला द्यावा लागणार नाही. बरं ते असुदे. तू नाही आणलास तरी चालेल, मी माझ्यातला खाऊ तुला देईन, या छोट्याशा विषयावरून तू उगाच येणं रद्द करू नकोस. 

या वर्षभरात बाकीचे पाहुणे येणार असतील तर आई-बाबांचे प्रश्‍न असतात, तुमचे डोस झालेत का? कोव्हॅक्सीन का कोव्हिशील्ड म्हणून मी काल आजीला विचारले, 

‘‘बाप्पाचे डोस झालेत का?’’ तर तिनेच मला उपदेशाचे डोस पाजले. पण तुला म्हणून सांगतो, जर तुला नाक्यावर कोणी विचारलेच, डोस झालेत का? तर त्याचे काय उत्तर द्यायचे याचा विचार करून ठेव. तू येताना तुझा तुझा सॅनिटायझर घेऊन ये. तुझी सॅक ठेवण्यासाठी मी माझ्या कप्प्यात थोडीशी जागा रिकामी करून ठेवली आहे. 

बाकी सर्व भेट झाल्यावर बोलू. मी तुझी खूप वाट बघत आहे, तेव्हा आता लवकर लवकर निघ. 

तुझाच छोटा भक्त


सौ. शिल्पा पराग कुलकर्णी

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू