पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

काही क्षण मोहरून टाकणारे

काही क्षण… मोहरून टाकणारे \



सगळं आकाश काळभोर झालं आणि ढगांचा मृदंग वाजू लागला. विजेची टाळ मधूनच पण दमदारपणे आपल्या अस्तीत्वाच्या खूणा लख्खपणे उमटवू लागली. वारा तर बेभान होऊन गाऊ लागला.त्याच्या लहरीप्रमाणे वाळू,पानं भिरभिरत स्वतःभवती गिरकी घेत आकाशात वरवर जाऊ लागले.



सगळ्या आकाशाला वाळूच्या कणांनी वेढून घेतलं.निळ्याभोर स्वच्छ आकाशावर काळ्या नभानी आक्रमण केलं,त्या काळ्या रंगावर वाळुची नक्षी काढल्या गेली.  ढगांचा गडगडाट   विजेचा लखलखाट...आणि  वा-याचा झंझावातशयांनी  सृष्टीला हादरवून सोडलं. वृक्षांनी आपलं अस्तीत्व अबाधित ठेवण्यासाठी खूप धडपड केली. जे बलवान होते ते टिकले, स्थीर उभे राहिले. मऊ दुबळे वृक्ष भुईसपाट झाले.



आपल्याच कुशीतून फोफावलेले वृक्ष आपल्याच अंगावर येऊन आदळल्याचं बघून अवनीला खूप दु:ख झालं. शेवटी आईचं मन आहे दुखावणारच. किती सांभाळून,जीव लावून या रोपांना अवनीनी स्वतःमध्ये रूजवलं. त्यांचं पालनपोषण केलं, त्यांनी बाळसं धरून जगाला आपलं गोंडस रूप दाखवेपर्यंत अवनीला कुठे विश्रांती मिळाली! सतत आपल्या इवल्याश्या रोपट्यांना भरभरून फोफावतांना ती बघत असायची. 


तिचा प्रियकर सूर्य छान आपल्या उन्हाच्या हातांनी रोपट्याला फुलवत असायचा. कुरवाळत असायचा. आपल्या तेजानी आपल्या बाळांना त्रास होणार नाही याची काळजी घ्यायचा. सुर्याचे सोन्यासारखे उन्हाचे हात रोपांना ऊब  द्यायचे. एक सळसळते संजीवन रोपांना मिळायचे. त्या रोपांचं हळुहळू फोफावणं बघून सुर्य मनातून खूप आनंदीत व्हायचा आणि हळूच अवनीकडे एक प्रेम कटाक्ष टाकायचा. त्याच्या त्या कटाक्षानी अवनी खूप लाजायची. तिची स्पंदनं इतकी वेगानी ऊसळायची की सगळी हिरवळ, गवत  सळसळ आवाज करत अवनीच्या आनंदाची, उत्तेजीत अवस्थेची पुष्टी करायचे.



या निरागस रोपांमुळे, नंतर त्यातून फोफावलेल्या वृक्षांमुळे, सूर्य आणि अवनीमधला प्रेम बंध घट्ट झाला.रोपांमध्ये कधी काही कमी आहे असं वाटलं तर अवनी तिच्याच कुशीत वाढणा-या इतर जीवजंतूंना या रोपट्यांना मदत करायला सांगायची. सतत काम काम आणि काम यातच अवनी गढून गेलेली असल्याने अश्या छोट्या वृक्षांनी उन्मळून पडणं हा तिच्यासाठी मोठाच धक्का होता. जो पचवणं तिला कठीणच जाणार.



खरंतर अवनीने भुकंपासारखे भयंकर धक्के पचवले होते. तिच्या शरीरावर मैलोनमैल मोठ्या भेगा पाडून तिच्या अंगावर निवांत जगणा-या  मनुष्याचे, प्राण्यांचे, पक्ष्यांचे  या भूकंपाने भयंकर हाल केले होते. तरीही अवनी शांत होती. तिच्या अंतरंगात बेभान नृत्य करणाऱ्या ज्वालामुखीने हे केल्यामुळे \"आपलेच दात आणि आपलेच ओठ\" असं म्हणून तिला गप्प बसावं लागलं.काही महिने, वर्षं लागलेत त्या भेगा बुजायला. भुकंपामध्येपण अशीच छोटी छोटी झाडं उन्मळून पडली तेव्हाही अवनी खूप रडली. दु:खाचे कढ आतल्या आत जिरवत शांत राहिली.तिचं असं मनातल्या मनात घुसमटणं सूर्याला बघवलं नाही पण तो तरी काय करणार! 



सूर्याचं आणि अवनीचं नातं खूप रेशमासारखं मऊ असलं तरी कैक योजने अंतर दोघांमध्ये होतं. प्रेमाच्या या रेशीम बंधाला दोघंही एकमेकांपासून लांब राहूनच हळुवार पणे जोपासत होते. सूर्याचं व्यक्तीमत्व मुळात दाहकच असल्याने कधीकधी त्यांचं तेज सहन न झाल्याने लहान रोपं आणि झाडं कोमेजून गेली तर अवनीचा जीव खालीवर होतो. त्यावेळीही आपल्या दाहकतेनी पाण्याचं रूपांतर वाफेमध्ये करून सूर्य हलक्याश्या पावसाच्या सरी पाठवतो. त्या सरींमध्ये नाहून निघाल्यामुळे सगळी रोपं आणि झाडं उत्साहीत होतात. त्यांच्या पानांवर एकदम तजेला येतो. पानांची सळसळही मंजूळ भासायला लागते.हे बघून अवनी खूष होते. ती हळूच आपल्या प्रियकराकडे बघून स्मितहास्य करते. तिच्या हसण्यानी सगळी हिरवळ मखमली साज वाटू लागतो. तिच्या हसण्यानी हिरव्या शालूवर किती वेगवेगळ्या रंगांच्या फुलांची बुट्टेदार नक्षी उमटते. हे सगळं बघून सुर्याला आपण  पावसाच्या अत्तरदाणीनी केलेल्या  सुवासिक फवा-याचं सार्थक झालं असं वाटू लागतं. 



सूर्याची आणि अवनीची प्रेमकहाणी जगावेगळीच आहे. सूर्यासारखा तेजस्वी आणि  स्वभावाने दाहक सूर्य अवनीच्या शांत स्वभावाकडे आकर्षीत झाला हे किती नवल आहे! अवनी मात्र जन्मत:चं शांत स्वभावाची. छक्केपंजे तिला आवडत नाही आणि अवगतही नाही. ती सरळ सरळ सूर्याची दाहकता अंगावर घेते त्यात चटका बसला तरी शांत असते कारण ते चटकदार असलं तरी त्या ऊन ऊन हातांच्या स्पर्शातून अवनीच्या छोट्या रोपांना प्राणवायू मिळतो.



ही तिची गोड लडीवाळ बाळं उन्हाचे स्पर्श झेलत मजेत डुलत असतात. ते बघून अवनी फार आनंदीत होते. शेवटी ती एक आईचं आहे नं. आईचं हृदय असंच कोमल असतं आपल्या बाळांसाठी. बाळाला त्रास होतोय असं दिसलं तर मग तिच्या मनात चाललेली घालमेल कधी टोकाला जाते कळत नाही आणि एका ज्वालामुखीचा स्फोट होऊन सगळं जनजीवन विस्कळित होतं. हे झालं तरी अवनीलाच खूप त्रास झेलावा लागतो.



या त्रासाला ती सहज तोंड देते. आपल्या अंगावर पडलेल्या चिरा आणि त्यातून वाहणारा लाव्हा रस कितीही जीवाची तगमग झाली तरी त्याचे चटके सहन करते. शेवटी ती आई आहे. आई अशीच असते. म्हणून तर शेतक-याचा जीव आहे अवनीवर  अर्थात जमीनीवर. तोही किती काळजी घेतो. जमीनीच्या कुशीत पेरलेले बियाणं  खूप छान रूजावं यासाठी जमीनीमध्ये  बी पेरण्याआधी मशागत करतो. बी पेरल्यानंतर हळुहळू ठिबक सिंचन करतो. वरुणराजानी मेहेरबानी केली की मग काही विचारुच नका. 



पाऊस...असा  भन्नाट कोसळायला लागतो…! मग तो…      



धरतीच्या कणा -कणात मुरू लागतो    

भावनांची सुंदर गुंफण करू लागतो.      

रसरसलेल्या मनानी बरसू लागतो,      

हरित गाणी खुशीत गुणगुणू लागतो.     

हसत-हसतच तो म्हणतोय, 

आज सृजनात्मक कार्य करतोय|      



सृजनस्पर्शानी त्यांच्या धरती ही हुरळली लाजतच ती गर्भरेशमी वस्त्र ल्यायली. वा! किती मनोहारी दृश्य बघायला मिळतं. सूर्यदेव तर फारच प्रसन्न होतो. त्याची प्रेयसी  आपल्या कुशीत बीज रूजवताना इतकी गोड आणि प्रसन्न दिसू लागली की सूर्य देवालाही त्या पावसाच्या सरीतून मध्येच आपल्या उन्हाचे कोवळे कवडसे तिच्या शरीरावरून अलगद फिरविण्याचा मोह झाला नाही तरच नवल.


किती छान रूपात अवनी सजते, नटते आणि आपल्या कुशीतून हळूहळू बाहेर पडणा-या लुसलुशीत कोंबाकडे अनिमीष नजरेनी बघत बसते.  दरवर्षी या ऋतूत ती असच बघत असते. एक आई आपल्या बाळाकडे अशीच अनिमीष नजरेनी बघते. का? याचं उत्तर आहे ती एक आई आहे म्हणून. आईची किती रूपं आठवावी तेवढी थोडीच आहेत. प्रत्येक रूपात ती आईच असते. सूर्याची अभीसारिका असते तेव्हाही मनातून ती आईच असते. कारण मातृत्व हे स्त्री मध्ये जन्मत: असतं. 


पृथ्वीही एक स्त्रीच आहे. म्हणून तर एवढ्या वेगवेगळ्या प्रकारच्या स्वभावाच्या रोपांना, झाडांना, वृक्षांना सहज समजून घेते. पशू,पक्षी, मनुष्य तिच्या लडीवाळ रोपांच्या, झाडांच्या, वृक्षांच्या जीवावरच तर जगतात. अवनीची बाळही तिच्याच सारखी शांत आणि शहाणी आहेत. आपलं सगळं जीवन सृष्टीतील इतर जीवांसाठी उपयोगात आणतात. या  आईबद्दल आणखी खूप काही मनात आलं.                  



'वात्सल्याचं  देखणं रुप म्हणजेच ही आई, 

देवाचा पवित्र अंश म्हणजेच रे ही आई. 

पावित्र्याला  जपणारं मंदीर म्हणजे आई, 

अग्नीहोत्र घेऊन आयुष्य जगणारी हीआई. 

मुलाचं मूलपण सांभाळणारी मायाळू ही आई, 

मुलातल्या कुरूपतेत सौंदर्य बघणारी ही आई. 

मुलाचा तोल सांभाळायला धडपडणारी आई,

खचलेल्या मुलाला सदा  मायेची ऊब देणारी आई. 

त्याच्या संवेदनांना सात्त्विक शब्द देणारी ही आई, 

त्याच्या पराजयात स्वत:चा पराभव बघणारी आई. 

ती कधीच कुणी असू शकत नाही फक्त असते आई, इतरांसाठी असली कुणीही जरी ; तरी मुलांसाठी असते आई. 


असते फक्त आई.......आई. 


किती तेज:पूंज रूप आहे आईचं ! परमेश्वराने तिला असंच घडवलं. म्हणून कोणत्याही क्षणी ती कुठल्याही भूमिकेत असली तरी तिचा गाभा मातृत्वाचाच  असतो. मातृत्वाचं गाणं ती कधीही, कोणत्याही क्षणी विसरूच शकत नाही. सृजनात्मक कार्याची केवढी मोठी जबाबदारी त्या परमेश्वराने स्त्रीला दिली आहे. तिच्या मातृत्वाचा पान्हा जो तिच्या मातृत्वाचं महत्व जाणतो त्या सगळ्यांना मिळतो. ती तिचं वात्सल्य, तिचं प्रेम, तिची माया सगळं आपल्या बाळावर उधळून देत असते. 


म्हणून तर बळीराजा तिची अस्मिता जपतो. तिच्या  ऋणाचा मान ठेवतो. ती जर क्रोधीत झाली तर काय संकट येऊ शकतं हे बळीराजा जाणून आहे. आईचं ऋण कधीच फिटत नसतं. कितीही जन्म घेतले तरी आपल्यामध्ये आईचं ऋण फेडण्याची क्षमता परमेश्वर कधीच देत नाही. तिच्या द्वारे तो सगळ्या जीवांना एका रेशमी साखळीत बांधून ठेवत असतो. 


"आई\" कुंभाराची भूमिका तिच्यात असणा-या शेवटल्या श्सासापर्यंत निभावते."


"ती ऊतत नाही,मातत नाही आणि घेतला वसा टाकत नाही.\"


अवनी असो किंवा हाडामासाची आई असो आहे त्या जगनियंत्याचं रूप. त्याला  एकावेळी इतक्या आपल्या संततीच्या पाठीशी उभं राहणं शक्य नसतं म्हणून त्याने आई नावाची 'वृत्ती'  निर्माण केली. ही मातृत्वाची वृत्ती पुरूषातही असू शकते. याचं ऊत्तम उदाहरण म्हणजे शेतात आपल्या हिरव्या हातांनी कष्ट करणारा शेतकरी. त्याच्यात मातृत्व आहे म्हणूनच जपतो जमीनीला आणि तिच्या कुशीतून हळूवारपणे डोकावणा-या कोवळ्या लुसलुशीत रोपांना.



"आई ही असे ग कुंभार,

देई  ओल्या मातीस आकार.

बरबटले कधी  हात तिचे जरी 

तरी सदा हसू असे चेहे-यावरी. 

बघ ती श्वास फुंके क्षणोक्षणी,

ओल्या कोवळ्या या छोट्या मुर्तीत.

लगबग चालू असे ग तिची 

भारी सत्व सारेच ओताया या जीवात.

तिचं बबड,असे बाई लाडोबा भारी

तिला नव्हे जगास पडे बाई.... \"भारी.\" 


आई ही एक वृत्ती आहे. ती वृत्ती पुरूष, स्त्री असा भेदभाव करत नाही.  मातृत्वाची आसही स्त्रीत्वाच्या हळूवार लयीशी जुळते. पुरूषांची लय जरा दणकट, मर्दानी असते. 



प्रत्येक नियमाला अपवाद असतो तसाच इथेही आहे. मातृत्वाची लय स्वतःमध्ये घुमवणारे काही पुरूषही आढळतात. स्त्री आणि पुरुष दोघांमध्येही मातृत्व असतं. स्वत:च्या कुशीतून बाळाला जन्म देत असल्याने स्त्रीच्या मनात हे मातृत्व काकणभर जास्त असतं एवढंच.


पावसात भिजलेल्या अवनीला बघताच हेच मनात येतं...\" 


थेंब टपोरे...                             


थेंब टपोरे अंगणात या आले,

भान नयनांचे घेऊनी ग गेले.


काळ्या नभाची सोडूनिया साथ,

आवेगानी धरतीच्या कुशीत शिरले.


पावसाची ओटी धरेने घेतली,

तृषार्त होती ती आता तृप्त झाली. 


थेंब टपोरे अंगणात आले 

धरेचे भान हिराऊनी नेले.\" 


खरच या अवनीचं म्हणजेच धरेचं म्हणजेच पृथ्वीचं टपो-या थेंबांनी  भान हरपून जाते. असे हे मनोहारी रूप आईचं. मग ती अवनी असो वा स्त्री...किंवा पुरूषांच्या मनात लपलेलं मातृत्व. या मातृत्वाला कोटी कोटी प्रणाम.-


-----------------------------------------------------

##  मीनाक्षी वैद्य

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू