प्रशांत माझे पी झाले
प्रशांत माझे "पी" झाले.
माझ्यासाठी माझे प्रेम अलौकीक आहे.
कारण मी प्रशांतच्या प्रेमात पडली ती कल्पनेच्या विश्वात रमत. आणि त्यामुळे माझ्या प्रेमाला, या व्यवहारी जगातील देवाण घेवाणीच्या व्यवहाराने शिवले देखील नाही.
त्यांचे प्रेम कसे आहे, मला माहित नाही. मात्र माझे त्यांच्यावरील प्रेम निखळ व निस्वार्थी आहे. कारण व्यवहाराचे कोणतेही सोपस्कार न करता, कल्पनेत रमत रमतच मी त्यांच्या प्रेमात पडली. फक्त पडलीच नाही तर वयाची चाळीशी ओलांडून त्याच्या प्रेमात आकंठ बुडाली. आणि पहिल्याच भेटीत त्यांना मनापासून वरले.
खुप लांब खेळूनही हरलेली आयुष्याची पहिली पाळी, म्हणजे मनाला व जीवनाला आलेली मरगळ. पण जरी हरलो, तरी थकून,दमून कसे चालेल. म्हणून कर्तव्याचे गाठोडे डोक्यावर घेऊन चालत रहायचे, चालत रहायचे हा माझा दिनक्रम.
एक आई असण्याचा खुप मोठा फायदा असतो बरं का. आणि तो म्हणजे, हे आईपण वाट्टेल त्या प्रसंगात,जीवन जगण्याला नवी उर्मी देत असतात.
दुपारची वेळ होती. उन्हाळ्याचे दिवस. मी आॅफिसमधे बसली होती. निवांत वेळी मोबाइल म्हणजे करमणुकीचे यंत्र.
जनरली माझ्या मोबाईलचा डाटा मी आॅनलाइन असतानाच सुरू असतो.
त्याही दिवशी मोकळ्या वेळी मी आॅनलाइन होती. आणि
"बुध्द देवा तुझी ज्ञान गंगा". रिंगटोन वर सेट केलेले गाणे वाजले.
पण तो मोबाइल कॉल नव्हता. व ओळखीचा नंबरही नव्हता.
तो वाट्सपला आलेला विडीओ कॉल होता.
मी रिसीव. केला.
समोर जो व्यक्ती होता, मी त्याला ओळखत नव्हती. त्यामुळे मी काही बोलली नाही. परंतु ऑफिसमधले एक व्यक्ती माझ्यासोबत बोलले. त्यांना हसत उत्तर देत फोनवरील कॉल कट केला.
तर ही होती प्रशांतची व माझी सोशल मिडीयावरील पहिली भेट.
घर व गाव सोडून, मुलाला घेवून एका वर्षापासून बाहेर राहत होती. आणि १२ वी ची परिक्षा संपताच मुलगा ही आजी-आजोबाच्या गावी गेला.व पुढे उच्च शिक्षणाला बाहेर. त्यामुळे आॅफिसनंतरचा कालखंड म्हणजे माझ्यासाठी "दाहकुंड". विरहाच्या व वेदनांच्या वनव्यात होरपळत, अग्नीदाह सोसत असणारी मी घायाळ हरिणी. आणि अशा स्थितीत प्रशांत चे रोज सायंकाळी फोन करून माझ्याशी गप्पा मारत बसणे म्हणजे, पिंपळ वॄक्षाखालील तप्त उन्हातील गारव्याची मंद झुळूक.
दिवस पुढं सरकत होते. आमच्या गप्पा ही तासानं तास रंगत. आणि विषय!!! विषयांना तोटाच नाही. असा कोणता विषय नव्हता, ज्यावर आम्ही चर्चा करीत नव्हतो. समाजकारण काय, की राजकारण काय, विज्ञान काय की भुगोल काय, इतिहास काय की साहित्य काय. येवढेच काय, स्त्री पुरूषांच्या मैत्री पासून ते लैंगिक संबंधापर्यंतचे विषय आमच्या चर्चेत रंगत होते. आणि तेव्हाच 'लव अॅन्ड सेक्स' या पुस्तकाचा जन्म ही माझ्या डोक्यात झाला.
त्याच दरम्यान मी आजारी पडली. मला "टायफाइट" झाले.
ते आजार मी एकटिनेच काढले. आणि तेव्हा मला आयुष्यात एक पोकळी जाणवू लागली. खुप खालीपन, रिते रिते आयुष्य. मी अख्खा दिवस कल्पनांमधे रमून काढत होती. प्रशांत ची अवस्था काय होती, मला माहित नाही.
पण एक दिवस लेट नाइट पर्यंत आम्ही बोलत बसलो. प्रशांत ने प्रेमाविषयी असणाऱ्या त्यांच्या भावना व्यक्त केल्या. ते झोपी गेले, मात्र मी अस्वस्थ झाली. झोपेतही माझ्या कानांवर त्यांचा बेधुंद प्रेमाच्या कल्पनांचा संवाद पडत होता. मी झोपेत होती की जागे, मला कळत नव्हते, पण त्या अर्ध स्वप्नावस्थेत मी प्रशांत ला माझ्याजवळ अनुभवू लागली. फक्त जवळच नाही, तर त्यांच्या मिठीत स्वताला बघू लागली.
दुसऱ्या दिवशी डोळे खुलले, तर लज्जा भावाने ओथंबून गेली मी.
रात्रीच्या जागरणाने डोळ्यांवर गुंगी होती. मी कल्पनेच्या जगात वावरत होती की वास्तव्यात जगत होती, याचे मला भान नव्हते.
आणि अशात, माझ्या तब्बेतीच्या निमीत्ताने आमची ती पहिली भेट घडून आली. जेव्हा एकमेकांसमोर, एकमेकांचे मुख बघत बसलो होतो.
"तुझ्या दाताला माझ्यासारखी खिंड आहे. हे मी त्याच दिवशी बघीतले होते, जेव्हा विडीओ कॉलींग केले होते. तू हसत फोन कट केला तेव्हाच मला ते दिसले" प्रशांत माझा हात हातात घेत, दोघांच्या हातावरील रेषा बघू लागले.
"बघ, दोघांच्या हातातील रेषा ही एक सारख्या आहेत" त्यांचे असे दोघांमधील हे साम्य निरखून बघणे, अव्यक्त प्रेमाची ग्वाही होती.
सुरवातीपासूनच, भेटिमध्येही व भेटिनंतरही कधीच त्यांनी मला "आय लव यू" म्हणून प्रेमाची कबुली दिली वा घेतली नाही. तर भेटून गेल्यानंतर सुनावला तो डायरेक्ट फैसला. कारण शेवटी घेतलं होतं ते वकिलकीच शिक्षण.
"मी तुला विचारत नाही आहे, की तु लग्न करशील का? मी तुला सांगत आहे, की मला तुझ्याशी लग्न करायचे आहे." आणि त्या क्षणाला आम्ही "प्रेम" या अलौकिक नात्यात बांधले गेलो. व ते प्रशांत वरून माझे "पी" झाले.
आमची पहिली भेट झाली ती फक्त एकमेकांवर विश्वास ठेवून. काय करतो, किती कमावतो, घरची परिस्थिती कशी किंवा कशी दिसते,कशी आहे, काय आहे, असले प्रश्न आम्ही विचारलेच नव्हते.
आम्ही प्रेमाच्या धाग्यात बांधले गेलो ते भाव व भावनांच्या विश्वासू व्यवहाराने.
©® अस्मिता प्रशांत "पुष्पांजलि"
, साहित्यिक -संपादिका
भंडारा- 9921096867
