पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

तिची साथ

                                      :-    तिची साथ   -:

 

  गायत्री जोशी कोल्हापूर  मधल्या एका पुजार्‍यांची मुलगी . घरची गरिबी पण अतिशय  सुसंस्कारीत  घराण्यात वाढलेली. वडील पुजारी ,भिक्षुकी करणारे असल्यामुळे घरात धार्मिक वातावरण. सोवळ ओवळ , पूजा पाठ, जप जाप्य ह्या गोष्टींचा लहानपणापासूनच मनावर पगडा. त्यामुळे गायत्री सोज्वळ , सालस आणि पापभीरू अशी मुलगी. पण अभ्यासात खुप हुशार त्यामुळे एम .एसी .  पर्यंत शिकली. साहजिकच तिला शिकलेला इंजिनिअर नवरा हवा होता. पाहायला सुरुवात केली आणि  पुण्यातल्या हेमंत दिवेकराचं स्थळ चालून आलं . मुलगा मेकॅनिकल इंजिनिअर . पत्रिका जुळली . पसंती झाली मग अगदी साध्या पद्धतीने, मोजक्या लोकांच्या उपस्थितित लग्न सोहळा पार पडला आणि  गायत्रीने  हेमंतची गृहलक्ष्मी म्हणून दिवेकरांच्या घरात प्रवेश केला. 

  दिवेकरांच्या घरात देवाची  पूजा अर्चा व्हायची. सण समारंभ साजरे व्हायचे पण संसारातील  धार्मिक कर्तव्याचा   एक भाग म्हणून. पण हे लोक देवभोळे असे नव्हते. एकदा सकाळी घरात देव पूजा झाली ,संध्याकाळी देवापुढे नंदादीप लावला की ह्यांचा देवाशी बाकी काही सबंध नसे. पण गायत्रीचे तसे नव्हते. प्रत्येक गोष्ट करताना देवाची भक्ती हा भाव तिच्या मनात असे. प्रत्येक ठिकाणी तो आपल्या बरोबर आहे. त्याचे आपल्या प्रत्येक कृती कडे लक्ष आहे. तो जे करतो ते आपल्या भल्यासाठीच  करीत असतो. त्यामुळे ती नेहमी आपल्या वडीलांच्या प्रमाणे मनात देवाचे नाव घेत प्रत्येक गोष्ट करत असे. कुठलीही कृती करताना तो आपल्याकडे पहात आहे या जाणि‍वेतून त्याला   आवडेल असं आपण वागलं पाहिजे अशी तिच्या मनाची धारणा होती. त्यामुळे ती सहसा कधी तिच्या सहवासातील लोकांना  दुखवत नसे.  लोकांच ऐकून घेत असे.  पटलं नाही तर सौम्य शब्दात नकार देत असे. किंवा अशा माणसांशी बोलणं टाळण्याचा प्रयत्न करीत असे.  त्यामुळे तिच्या आयुष्यात तसे वादविवादाचे प्रसंग कमी येत असत. पण हेमंतच तसं  नव्हत. तो जरी पूजा अर्चा करायचा तरी  देवाच वास्तव्य फक्त देवघरात!  बाकी कुठे त्याचा काही सबंध नाही.

   लग्ना नंतर दोन तीन महिन्यात हेमंतला  कंपनीत पुढचं प्रमोशन मिळालं.  गायत्री पटकन म्हणाली,

“देवाची कृपा म्हणून  तुम्हांला   प्रमोशन  मिळालं ! किती छान झालं.”  लगेच हेमंत म्हणाला,

“माझा  माझ्या बुद्धीवर आणि तंत्रज्ञानावर विश्वास आहे. हे माझ्या मेहनतीच फळ आहे.”  हेमंतला दुखवायचं नाही म्हणून मग ती पण म्हणाली ,  “ हे पण अगदी बरोबर आहे म्हणा.”

हेमंत म्हणाला,  “ तुझा पण पायगुण आहे .तुला ह्या बद्दल माझ्याकडून काय हवं ते माग.”

गायत्रीच्या सासूबाई पण हसत हसत म्हणाल्या, “ नवीन लग्न झालं आहे, नवरा खुश आहे तर घे लाड करून .”

हेमंतने गायत्रीला कानातल्या सोन्याच्या रिंग घेतल्या. गायत्रीने नम्रपणे हेमंतशी संवाद साधून कोल्हापूरला गेल्यावर महालक्ष्मीची  साडी आणि खणा नारळाने ओटी भरली. त्याच्या मनात असो वा  नसो तो गायत्रीला कधी दुखवत नसे. तिच्या श्रध्देच्या आड येत नसे.  गायत्री पण नवऱ्याकडून कधी वावग्या अपेक्षा ठेवत नव्हती .त्यामुळे संसारात विसंवादाचे प्रसंग खुप कमी येत होते. दोघांच्या मधले प्रेम फुलत होते. गायत्रीने केमेस्ट्री मध्ये   एम .एसी . केलेले होते. ती नोकरीच्या शोधात सुद्धा होती.  तिला एका केमिकल कंपनी मध्ये मुलाखतीसाठी बोलावणं आलं. सासूबाई रीतीप्रमाणे म्हणाल्या , “ देवाला नमस्कार करून जा हो.”  तिने देवाला नमस्कार केला आणि जाताना म्हणाली , “तो तर माझ्या बरोबर असतोच.” तिच्या ह्या बोलण्याने सगळ्यांनाच हसू आलं. नशीबाने मुलाखत चांगली झाली. आणि नंतर तिला नोकरीचा सुद्धा कॉल आला.  

नशीबाने हेमंतची कंपनी आणि गायत्रीची कंपनी एकाच मार्गावर होती. आणि वेळ सुध्दा सकाळी दहाची त्यामुळे हेमंत गायत्रीला सोडून पुढे आपल्या कंपनी मध्ये जात असे. हेमंतच्या मागे बाईकवर  बसून जात असताना पुण्याच्या रस्त्यावरची रहदारी पाहून तिला भीती वाटत राही.  हेमंतला या गोष्टीचा सराव होता त्यामुळे तो रहदारीतून बाईक चालवत असताना सुद्धा शांतपणे गायत्रीशी बोलत राही. पण तिचं लक्ष त्याकडे कमीच असे . रहदारीला घाबरत तिचा आपला मनातल्या मनात देवाचा जप सुरु असे. त्यामुळे ती कमी बोले. हेमंत तिला म्हणे, “ का ग तू अशी गप्प का बसते?  सर्व्हिसमुळे ऑफिसला जाण्या येण्याचा वेळ मिळतो  त्यातच तर आपल्या दोघांना बोलायला वेळ मिळतो. एकदा का घरी गेल की, तू  पाय धुवून स्वयंपाकघरात घुसतेस मग संध्याकाळचा सगळा वेळ घरातलं चहापाणी ,स्वयंपाक, जेवणखाण , दुसरे दिवशीची ऑफिसची तयारी यातच जात असतो. कधीतरी प्रेमाच्या गोष्टी बोलत जा.” मग तिने एक दिवस हेमंतला तिच्या मनातली रहदारीची भीती बोलून दाखवली. त्याला हसू आलं. तो म्हणाला,

“तू नकोस घाबरू! मी बरोबर चालवतो. आई पण अशीच माझी अति काळजी करते. तू बोलत रहा, मी आनंदाने बाईक चालवत जाईन.”  हळू हळू गायत्रीची भीती कमी झाली तशी बोलायला लागली .   

    हेमंत त्याच्या आई वडीलांचा एकुलता एक मुलगा , खुप उशिराने ,सगळ्या डॉक्टरांच्या दवाखान्याच्या पायऱ्या  झिजवून मग त्याच्या आईच्या अडतिसाव्या वर्षी त्यांना झालेला. त्यामुळे हेमंतच्या लग्नाची त्या अगदी आसुशीने वाट पहात होत्या. कारण त्यांना वरचेवर वयपरत्वे काम झेपत नव्हते. एकदा का सून घरात आली की संसाराच्या जबाबदारीतून थोडं मोकळं होता येईल ही अपेक्षा होती. हे सर्व गायत्रीला लग्ना नंतर दोन महिन्यात लक्षात आले होते. म्हणून संध्याकाळी घरी आल्यावर ती स्वयंपाकघराचा ताबा घेत असे. सूनेच्या  असं समजून घेऊन वागण्यावर हेमंतचे आई वडील खुश होते. संसारात  उशिरा जरी पाळणा हलला तरी पुढे सगळं चांगलं   झालं. मुलगा चांगला हुशार कर्तबगार  निघाला . सून पण चांगली मिळाली. 

काहीतरी सेव्हिंग झाल्या शिवाय मूल नको असं हेमंत आणि गायत्री दोघांनी ठरविलं होत. गायत्रीच्या घरची गरीब परिस्थिती मुळे तिला प्रत्येक गोष्टी मध्ये तडजोड करावी लागली होती. मोठ्या दोघी बहि‍णींचे जुने ड्रेस, चपला   वापरत ती  मोठी झाली. कॉलेज मध्ये गेल्यावर तिला नवे कपडे तरी मिळाले. तेही मोठ्या दोघी बहि‍णींची लग्न झाली होती. त्याच तिला नवीन ड्रेस घेऊन द्यायच्या.  पण इथेही तेच झालं , गायत्रीच्या सासू सासऱ्यांना  नातवंड लवकर घरात यावं असं वाटत होत. पण त्यांनी मुलाच्या  आणि सुनेच्या मागे त्याचा पाठपुरावा केला नाही.  “तुमचा संसार , तुम्ही तुमचा निर्णय घ्या. पण आम्हांला जसा उशीर झाला. वाट पहात बसावी लागली तसं होऊ देऊ नका.” असं शेवटी म्हणाले. त्यामुळे गायत्रीने नोकरीला दोन वर्ष होईपर्यंत मुलाचा विचार नाही केला.  हेमंतच आणि गायत्रीच ठरवल्या प्रमाणे सेव्हिंग झाल्यावर मग त्यांना मुल हवे असे वाटायला लागले. हेमंतचे आई बाबा सुद्धा सत्तरीच्या पुढे गेले होते. आता तरी नातवंड सौख्य मिळावं ही त्यांची  रास्त अपेक्षा होती.

    गायत्री हेमंतच्या संसारात प्रेम फुलत गेल होत. पण त्यांच्या संसार वेलीवर फुलाची कमी होती. दोघांनी शेवटी टेस्ट करून घेतल्या . रिपोर्ट नॉर्मल होते . मग तरी असे का हा प्रश्न होता. गायत्रीच्या मनात आलेच, ‘आपण देवीला शरण जात नाही म्हणून कदाचित ती आपली सत्व परीक्षा बघत असेल.’    एक दिवस गायत्री हेमंतला म्हणाली ,    “मी आता आई महालक्ष्मीला नवस बोलते.”  हेमंतचा विश्वास नव्हता  पण गायत्रीच्या मनात आहे तर तिला बोलू दे नवस म्हणून तो गप्प बसला. आणि लग्नानंतर पाच वर्षाने गायत्रीला दिवस गेले. मग मात्र डॉक्टरांनी तिला बेड रेस्ट सांगितली होती. ऑफिसची दगदग सहन झाली नसती म्हणून नाइलाजाने तिला नोकरी सोडावी लागली.  घरात कामाला चार बायका लावून गायत्रीच्या सासूबाई तिची काळजी घेत होत्या. चार महिन्या नंतर आई सुद्धा मदतीला आली. सगळ्यांनी कौतुकाने तिचे डोहाळे पुरवले. हौसेने डोहाळ जेवण  केले. नऊ महिन्या नंतर घरात छोट्या बाळाचे आगमन झाले. गायत्रीला मुलगा झाला. आणि त्याच्या जन्मा नंतर हेमंतला अजून पुढचे प्रमोशन मिळून तो कंपनी मध्ये व्यवस्थापक ह्या मोठ्या पदावर गेला. मग तर काय , मुलाचा पायगुण म्हणून हेमंतला  मुलाचे किती कौतुक करू आणि किती नाही असे होऊन गेले. मुलगा गुढीपाडव्याच्या दुसरे दिवशी जन्माला आला म्हणून त्याचे नाव ऋतुराज  असे ठेवले. ऋतुराजच्या  पाठोपाठ दोन वर्षांनी  गायत्रीला कन्या रत्न झाले. तिचे नाव त्यांनी ‘ ईश्वरी’ ठेवले.  हेमंतची ऑफिस मधली जबाबदारी वाढल्या मुळे त्याला ऑफिस मधून घरी यायला उशीर होत असे. पाठोपाठच्या दोन मुलांचे सगळे करण्यात  आणि घरातलं सुद्धा सगळं बघण्यात गायत्रीला आणि हेमंतला एकमेकांसाठी वेळ देण जमत नसे. गायत्रीच्या सासूबाईंना घरातली कामे जमत नव्हती तरी त्या त्यांना शक्य होईल ती मदत त्या करत रहायच्या. दोन्ही मुल पाठोपाठची असल्यामुळे ऋतुराजचा डायपर सुटण्या आधी ईश्वरीचा सुरु झाला होता. कामाला आठ तास बाई होती तरी उरलेल्या वेळात गायत्रीला सगळी काम पुरून उरायची. दोघांची मस्ती, खेळणं इकडे लक्ष देताना गायत्रीला स्वत:ला नीटनेटके राहणे सुद्धा जमत नसे. हेमंत चिडून बोले,

“ अशी काय गबाळ्या सारखी राहतेस? मुलांची आई आहेस की दाई? माझ्या बरोबर येताना तरी व्यवस्थित आवरत  जा.”  तिचा चेहरा पडला हे पाहून हेमंतचे बाबा म्हणाले,

“अरे आमच्या बोलण्याला मान देऊन तिने लगेचच दुसरा चान्स घेतला. तिची तारांबळ उडते. तू मुलाचं आवरायला कधीतरी मदत करत जा. म्हणजे तिला स्वत:च आवरता येईल. नाही तर कधीतरी मुलांना घरी ठेवून जात जा. एखाद्या दिवशी बाई तासभर जास्त थांबतील.”  बाबांचे बोलणे हेमंतने मनावर घेतले आणि मुलांचे कधी नव्हे ते आवरले आणि त्या दिवशी जवळपास तीन चार महिन्यांनी दोघे सारसबागेत जाऊन आले.     हेमंतच्या बाबांनी हट्ट धरला म्हणून त्यांच्या इच्छेखातर गायत्रीने  ईश्वरीचा पहिल्या वर्षाचा वाढदिवस मोठ्या उत्साहाने हॉल घेऊन साजरा केला. हेमंतला आवडले नव्हते. त्यामुळे वाढदिवसा नंतर तो आठवडाभर तिच्याशी बोलला नाही . पण त्यानंतर  दोन महिन्यातच हृदय विकाराने गायत्रीचे सासरे गेले.  मग मात्र गायत्रीने केले ते योग्य केले असे त्याला जाणवले.  ही बरोबर सगळ्या वेळा पाळते. बाबांच्या जाण्यानंतर गायत्री मनात म्हणायची, “ठीक आहे , निदान त्यांनी नातवंड तरी पाहिली.”  पाठोपाठच्या दोन मुलांच्या मुळे कधीतरी हेमंतची चिड चिड होई. तेव्हा ती हेमंतला म्हणायची,  “ जाऊ दे  हो , दोघ बरोबरीने  वाढतील. आणि ही थोडी  मोठी झाली की मी   त्यांना डे केअरला ठेवत जाईन मग मला  नोकरी करता येईल.  पहिले पाच वर्ष आपल्याला छान एकत्र दिवस घालवता आलेच की.”  

प्रत्येक गोष्टीतला गायत्रीचा सकारात्मक दृष्टीकोन पाहून हेमंतला कधी राग यायचा तर कधी वाटायचं ,  ‘आयुष्यातील प्रत्येक गोष्टी कडे  हिच्या प्रमाणे आपल्याला बघता आले पाहिजे म्हणजे आयुष्य सोपे होऊन जाते. हिला तर मुलांचा जास्त त्रास काढावा लागतो पण त्यांच्या बोबड्या बोलात,  त्यांच्या बाळलीलात ती रमून जाते. त्यांच्याशी बोबडे संवाद करत आयुष्यातला आनंद शोधत रहाते. तर मी तो गमावून टाकत असतो. बायको वाट्याला येत नाही म्हणून चिडचिड होते. आपलही चुकतच मुलाचं बालपण पुन्हा थोडच  आयुष्यात पहायला मिळणार आहे? माझा संतापी स्वभाव थोडा कमी व्हायला हवा.

  बघता बघता दिवस जात होते. ऋतुराज सात वर्षाचा झाला. तर ईश्वरी पाच वर्षाची झाली. दोघांच्या शाळा सुरु झाल्या. घराजवळच डे केअर सुरू झालं.  गायत्री  मुलांना शाळा सुटल्यावर डे केअरला ठेवू लागली . आणि नोकरीच्या दृष्टीने अभ्यास चालू केला. हेमंत म्हणायचा, “ तू नोकरी केली नाहीस तरी चालेल. माझा पगार तसा चांगला आहे. आईला पण बाबांची पेन्शन आहे.  पुण्या सारख्या ठिकाणी भर मध्य वस्तीत आपला टू बी.एच के चा  flat आहे . तशी आर्थिक परिस्थिती चांगली आहे.”  पण गायत्री म्हणायची,  “माझ्या शिक्षणाचा काय उपयोग? नोकरी करून तेवढाच हातभार लावता येईल संसाराला. मुलांचे शिक्षणाचे खर्च आता वाढत जाणार.”

  हेमंत कंपनीच काम पूर्णपणे झोकून देऊन करत होता.  त्यामुळे त्याची त्याच्या हाता खालच्या लोकांच्या कडून तशीच अपेक्षा असे. आणि त्यांनी ती पुरी केली नाही की तो त्यांच्यावर चिडत असे त्यांना वाटेल  ते बोलत असे. कधी कधी  पुढच्या भविष्यातल्या गोष्टीची पुसटशी कल्पना गायत्रीला येत असे पण ती बोलून दाखवत नसे . हेमंत  बद्दलच्या तक्रारी वाढत जाऊन त्या HR डिपार्टमेंट पर्यंत गेल्या. त्याला डायरेक्टर कमिटीच्या मिटिंग मध्ये बोलावणं आल आणि जाब विचारला गेला. तेव्हा त्याला तो अपमान सहन झाला नाही.  त्याने चिडून सरळ कंपनीचा राजीनामा दिला.  डायरेक्टर  लोकांनी त्याला पुढच्या प्रमोशनच अमिष दाखवलं तरी पण त्याने ते मान्य केल नाही. घरी आल्यावर त्याला वाटलं , कदाचित गायत्री म्हणेल, ‘असं का केल? सध्या आपल्यावर प्रपंचाची वाढती जबाबदारी आहे.”  पण तिने झाली गोष्ट खुप शांतपणे घेतली. म्हणाली,  “तुम्ही काळजी करू नका तुम्हांला आहे त्या पेक्षा चांगल्या पगाराची नोकरी मिळेल. मी पण बघतच आहे. मलापण दोन ठिकाणी इंटरव्ह्यूचे कॉल आले आहेत. आई आंबा बाईला जास्त चांगल काहीतरी करायचं असेल.” हेमंतच डोक गायत्रीच्या बोलण्याने शांत झालं. एक आठवडा त्याने शांतपणे घालवला. मग तो गायत्रीला म्हणाला,

 “ मी माझी स्वत:ची कंपनी काढायचा विचार करत आहे. तू नोकरी करून मला सपोर्ट करशील का? सगळं व्यवस्थित दोन तीन वर्षात मार्गी लागेल याचा मला आत्मविश्वास आहे.”

“ ठीक आहे तुम्ही जो निर्णय घ्याल तो मला मान्य असेल. तुमच्या कर्तृत्वावर माझा विश्वास आहे. मी तुम्हांला नक्की सपोर्ट करेन. आई अंबाबाई  पण आपल्या बरोबर असेलच.”  हेमंत मनात म्हणाला, हीच माझ्या बरोबर असणं खरं का  महालक्ष्मीच असणं? कधी कधी निरर्थक बोलत राहते. जाऊदे ! मला कधी विरोध तर करत नाही ना! सांभाळून घेते. संसार चांगला करते. तिच्याच शब्दात , “ माणसातले नेहमी चांगले गुण बघावे. तरच जग सुंदर भासेल. नाही तर प्रत्येक माणसातले दुर्गुण शोधले तर कुणाशीच आपले पटणार नाही. समाजात रहायचं तर समाजाला धरून नको का रहायला?” ही तर बायको आहे! इतर बायकांपेक्षा खूपच साथ देते संसारात!

   ह्या गडबडीत घरातल्या घरात मोजक्या लोकांना बोलावून ऋतुराजची मुंज गायत्रीने उरकून घेतली, कारण तिच्या बाबांनी ह्या नंतर चार वर्ष त्याला मुंज लाभत नाही म्हणून सांगीतलं होत. हेमंतचा आणि तिचा ह्यावरून वाद झाला. तो म्हणाला, “ एकुलता एक मुलगा त्याची अशी घाईने मुंज लावायची? काय तर बाबा म्हणतात म्हणून! नाही त्या गोष्टीत नाही ती शास्त्र आडवी आणत असतेस तू !” 

 “ ते काही वाईट सांगत आहेत का ?थोडं  शास्त्रा प्रमाणे वागलं म्हणून कुठ बिघडलं ? माझी अजून थांबायची तयारी नाही . माहित आहे सध्या तुम्हांला व्यवसायाचा ताण आहे. म्हणून १५-२० माणसात उरकून घेऊ. काही काही गोष्टी ह्या वेळच्या वेळी झाल्या पाहिजेत.”  एवढं बोलून तिने अबोला धरला. ही गोष्ट  पहिल्यांदा घडली. म्हणून मग हेमंतने नमते घेतले आणि ऋतुराजची मुंज उरकून टाकली. गायत्रीच्या बाबांनीच पौरोहित्य  केल.

  गायत्रीला महिनाभरात नवा जॉब मिळाला. हेमंतची स्वत:चा बिझनेस सुरु करण्यासाठी जागा बघणं, बँकेच लोन कुठ कमी व्याजावर मिळत आहे का ते शोधणं चालू होत. हेमंतने जो विचार केला  होता त्यापेक्षा सगळ्या गोष्टी त्याला कठीण वाटत होत्या. त्यातच गायत्रीची आई अचानक दोन तीन दिवसांच्या तापाच निमित्त होऊन गेली. गायत्रीची नोकरी नव्यानेच सुरू झाली होती. तिला रजा घेणं अजिबातच शक्य नव्हत, म्हणून हेमंतच कोल्हापूरला जाऊन सगळं दिवस पाणी उरकून आला. कोल्हापुरच त्याचं घर बंद करून  येताना गायत्रीच्या  वडीलांना बरोबर घेऊनच आला. गायत्रीचे वडील तसे हेमंतच्या आईपेक्षा वयाने दहा एक वर्षाने लहान आणि त्यांची तब्येतही सुदैवाने तशी चांगली होती. त्यामुळे सत्तरीचे बाबा घरात आल्यापासून हेमंत आणि गायत्रीला त्यांच्या ह्या  अडचणीच्या काळात मदतच होत होती.    तसे घरात नातवंडांच्या कडे लक्ष देत होते. घरातील काही बाहेरची कामे ड्रायव्हरला बरोबर घेऊन जाऊन करून यायचे. गायत्रीच्या मुलांबरोबर त्यांचा वेळही चांगला जात होता . बायकोच्या अचानक जाण्याच्या धक्क्यातून त्यांना सावरायला मदतच होत होती. ताई ताई म्हणत ते हेमंतच्या  आईशी सुध्दा मोकळेपणाने बोलत, त्यांना मदत करत रहायचे. त्यांचे देवपूजेचे काम त्यांनी आपण होऊन करायला सुरुवात केली. हेमंतच्या आई म्हणाल्या सुध्दा,  “ बाबा तुमच्या हातची पूजा आमच्या देवांना मिळायला लागली आणि त्याचं रूपच पालटून गेलं! नेहमीचे देव नवीन वस्त्रांनी फुलांनी सजून धजून  मोहक प्रसन्न दिसत आहेत.”  बाबाही हसून म्हणाले,

“ त्यांची इच्छा! म्हणून करवून घेतात. मी बापडा त्याचं करणारा कोण?”  बाबां रामायण, महाभारतातील कथा  नातवंडांना सांगत रहायचे, मुलांच्या बरोबर हेमंतच्या आई सुद्धा आवडीने ऐकत रहायच्या.  नेहमीप्रमाणे गायत्रीने आईचे जाणे सुध्दा सकारात्मक घेतले. आई जाण्याचे दु:ख आणि आपण शेवटच्या तिच्या दिवसाला हजर राहू शकलो नाही ह्याचे वाईट वाटत होते .पण आपली आई जर अंथरुणाला खिळून राहिली असती तर बाबांना जास्त त्रास झाला असता. कारण औषध उपचारासाठी कुठल्याही जावयाच्या कडे हात पसरणं त्यांना पसंत पडलं नसत. त्या गोष्टीचा त्यांना जास्त त्रास झाला असता. ह्या विचाराने तिने तिचे जाणे आई अंबाबाईने सोपे केले म्हणून देवीचे आभार मानले.

  हेमंतने नोकरी सोडल्या नंतर त्याच्या खटपटीला यश येऊन  त्याचा बिझनेस सुरू व्हायला चार महिन्याचा कालावधी गेला.  गायत्रीच्या बाबांनी मुहूर्त पाहून नवीन जागेची वास्तुशांत केली. सत्यनारायणाची पूजा केली आणि मोजक्या लोकांच्या उपस्थितीत हेमंतच्या नवीन बिझनेसची सुरुवात झाली.  त्याने टू व्हीलरच्या स्पेअरपार्ट  बनविण्याचा कारखाना टाकला होता. सुरुवातीला फक्त नवे दोन इंजिनिअर हाताशी घेतले होते. नवीन पार्टस बनवून ते कंपनीकडून टेस्ट होऊन approval येई पपर्यंत त्याच्या जीवात जीव नव्हता. शेवटी सगळं व्यवस्थित झाल. आणि दोन कंपनी कडून  त्याला मोठ्या ऑर्डर सुद्धा आल्या. तो आपला बिझनेस मोठा करण्यात दिवस रात्र कष्ट घेत होता.  दोन वर्षात त्याच्या कारखान्यात दोनचे आठ इंजिनिअर काम करू लागले. स्पेअरपार्टस  साठी लागणारे केमिकल्स , त्याचे कलर ह्याचे गायत्रीला ज्ञान होते. त्यामुळे तिने आपला जॉब सोडला आणि हेमंतला जॉईन झाली. ती कारखान्या मधल्या कामगारांशी आणि इंजिनिअर लोकांशी चांगला समन्वय साधून होती. त्यामुळे हेमंतच्या थोड्या चिडक्या स्वभावा कडे लोक दुर्लक्ष करायचे. आणि दोघांचा बिझनेस भरभराटीला येऊ लागला. त्याचं अजून एक युनिट वाढलं.

हेमंतने नवीन फोर BHK flat बुक केला.  हेमंताच्या आईला हेमंतच्या बाबांची आठवण झाली. “आज हे असते तर त्यांचा ऊर अभिमानाने भरून आला असता.”  गायत्रीच्या बाबांना सुद्धा आपल्या बायकोची आठवण झाली. “तिसरी मुलगी म्हणून थोडी नाराज असणारी गायत्रीची आई आपल्या मुलीचे यश पाहून आनंदून गेली असती.”  यशाच्या प्रत्येक टप्प्यावर गायत्री आठवणीने गडबडीत का होईना कोल्हापूरला जाऊन महालक्ष्मीची साडी खण, नारळाने ओटी भरून यायची.

  दिवस जात होते. हेमंतच्या आई सुद्धा वयाच्या ८५ व्या वर्षी हे जग सोडून गेल्या.  नव्या जागेत राहण्याचा योग काही त्यांच्या नशिबात नव्हता. हेमंत आणि गायत्रीला दोघांना वाटून गेल, त्या अजून काही दिवस रहावयास हव्या होत्या. पण प्रत्येक गोष्ट थोडीच आयुष्यात आपल्या मनासारखी  होत असते. देवाने जे दिले ते खुप दिले. त्याचे आभारच मानायला हवे. असे गायत्री हेमंतला समजावत राहिली. त्यांनी ऋतुराजची मुंज तरी पाहिली. काहींच्या नशिबात तेही सुख नसते.

  मुलाचं शिक्षण व्यवस्थित चालू होते. ऋतुराजला पुढे जाऊन बिझनेस करता यावा म्हणून हेमंत आणि गायत्रीने त्याला इंजिनिअर करायचे ठरविले. तो पण तसा अभ्यासात हुशार होता. त्याच्याही मनात तेच विचार घोळत होते. तर ईश्वरीला मार्केटिंग मध्ये M B A करायचे होते. ऋतुराज आता बारावीला गेला होता तर ईश्वरी दहावीला होती. मुलांची महत्वाची वर्ष म्हणून गायत्री ह्या वर्षात जरा घरात जास्त रहात होती. मुल घरात नसताना कारखान्यात जाऊन  यायची. मुलांना अभ्यासात मदत करायची. त्यांच्या वेळा पाळत रहायची.

  नवीन युनिटला उस्मान नावाचा नवीन इंजिनिअर गायत्रीने नियुक्त केला. त्याच्या कामातली शिस्त नेटकेपणा, कामसू वृत्ती  लक्षात येण्यासारखी  होती. कामाला रूजू झाल्या नंतर चार एक महिन्याने त्याचे रोजे सुरू झाले. त्याने गायत्रीला विनंती केली, “ मी कामावर सकाळी लवकर येत जाईन आणि लवकर दुपारी चार वाजता घरी जात जाईन.” गायत्रीने त्याची विनंतीवजा मागणी मान्य केली.  हेमंतने धुसफूस केली. म्हणाला,

“असं कुणाच्याही मनाप्रमाणे ऑफिसच टायमिंग बदलत राहिलीस तर लोक शेफारतील. आज एकाची मागणी मान्य केली तर उद्या दुसरा दुसरी मागणी घेऊन येईल. तू मला न विचारता हा निर्णय घ्यायला नको होता.”

“ अहो पण त्याचं कामपण विचारात घ्यायला नको का? आपण एका कुटुंबा प्रमाणे आपल्या सर्व युनिट मधल्या लोकांशी वागलो तर ते पण लक्षात ठेवतात. आणि कधी जास्त कमी काम झालं तर त्यांची तक्रार नसती. आपण आपल्या सणावाराला नाही का कारखान्याच कामकाज मागे पुढे करतो. काही सुट्ट्या जाहीर करतो. ती सवलत त्याला नको का ?”   मुलांना पण हल्ली कारखान्याच्या कामा बद्दल थोडी थोडी कल्पना येत होती. त्यांनी पण गायत्रीची बाजू उचलून धरली. मग हेमंत नाइलाजाने चरफडत गप्प बसला. 

ऋतुराजच बारावीच आणि ईश्वरीच  दहावीच वर्ष सुखरूपपणे पार पडलं ऋतुराजला बारावीला ९५ टक्के तर ईश्वरीला दहावीला ९१ टक्के मार्क मिळाले. हेमंतने आनंदाने सगळ्या ऑफिस मधल्या स्टाफला मिठाईचे पुडे वाटले. ऋतुराजला  सहजपणे त्याच्या CET च्या स्कोअर वर कॉम्प्यूटर इंजिनिअरिंगला प्रवेश मिळाला. ईश्वरीला सुद्धा चांगल्या कॉलेजला सायन्स साईडला प्रवेश मिळाला. वर्ष व्यवस्थित पार पडत असताना सगळ्या जगात करोनाची लाट आली. जगातले व्यवहार सगळे ठप्प होत होते. मार्केटिंग बंद झालं होत. गायत्री आणि हेमंतच्या कंपनीची अवस्था काही वेगळी नव्हती.  त्यांना नाईलाजाने कारखान्याच्या २५  टक्के कामगारांना ले ऑफ द्यावा लागला. दोन युनिट पैकी फक्त एक युनिट ते सुद्धा निम्म्या क्षमतेने चालू होते.  सगळ्यांचे पगार देण, सगळा खर्च भागवणं  मुश्कील झालं होत. तरी पहिले सात आठ  महिने कंपनीचा डोलारा कसाबसा दोघ जण पेलवत राहिले.  मग कामगारांना विश्वासात घेऊन परिस्थिती सुधारे पर्यंत पगार कपात सुरू केली. तो पगार देणे सुद्धा अवघड जात होते. गायत्री म्हणाली, “हेमंत आपल्या ह्या लोकांच्या कष्टावर आपण मोठे झालो. ह्यांना असे वाऱ्यावर सोडणे बरोबर नाही. आपणही ह्यांच्या प्रमाणे आपल्या राहणीमानात बदल करूया. आपल्याला नको हा मोठा flat ! आपण विकूया.” घरात सगळ्यांना गायत्रीचे विचार पटले. तेव्हा अखेर हेमंतने राहता फोर BHK flat विकला आणि जुन्या 2BHK मध्ये रहावयास गेले.   उस्मानही हे सर्व पहात होता. तो  गायत्रीला भेटायला आला. म्हणाला, “ माझ्या घरचं किराणा मालाच दुकान आहे. त्यामुळे आमचा धंदा सध्या तसा तेजीत आहे.  तेव्हा मी आपल्या कंपनीची परिस्थिती सुधारे पर्यंत पगार घेणार नाही. तुम्ही लोकांनी मला एवढं समजून घेतल मी पण तुम्हांला समजून घेईन. आपल्या ऑफिस स्टाफ पैकी कुणाला किराणा लागत असेल तर त्यांना कमी दराने मी देत जाईन.  दीदी तुम्ही तुमच्या महालक्ष्मीला गार्‍हाणं घाला ना ! काहीतरी मार्ग सापडेल.” 

हेमंत सुद्धा तिथेच होता. उस्मानचा समंजसपणा पाहून त्याला गायत्रीची निवड, तिचं स्टाफशी वागणं , त्यांना समजून घेणं किती बरोबर आहे हे लक्षात आलं . कुठल्याही परिस्थिती मधली तिची सकारात्मक भूमिका किती योग्य असते ते कळून चुकलं.  नंतर त्याने तिचं अभिनंदन केल. नंतर सुद्धा बरेच लोक भेटून गेले. त्यांनी सुद्धा कमी पगारात काम करण्याची कबुली दिली. वर्षभरात  सगळी परिस्थिती बऱ्याच अंशी नियंत्रणात आली.  त्याचं दरम्याने गायत्रीच्या बाबांना घशाचा कॅन्सर डिटेक्ट झाला. सारख्या हॉस्पिटलच्या वाऱ्या सुरू होत्या. ऑफिस स्टाफने ह्या काळात हेमंत आणि गायत्रीला खुप मदत केली. बाबांचं वयही जास्त झालं होत त्यामुळे त्यांनी किमो घेण्यास स्पष्ट नकार दिला. नळीने जेवण देण चालू होत त्यालाही त्यांनी नंतर विरोध सुरू केला आणि चार महिन्यांनी अखेर देह ठेवला. जायच्या आधी महिनाभर ते गायत्रीला म्हणाले,

“ पोरी माझ्या तिन्ही मुलींमध्ये तू मला सगळ्यात जास्त सुख दिलस. सगळ्यांशी ह्यापुढेही प्रेमाने वागत जा. तुझ सगळं चांगलच होईल. तुझ्या बहि‍णींना पण धरून रहा. त्यांनापण गरज पडेल तेव्हा आधार देत रहा. आपली संस्कृती जपत रहा. दिवस असेच राहणार नाहीत. परिस्थिती बदलेल.”  गायत्रीने बाबांचा हात हातात घेऊन त्यांना तसं वचन दिल होत. 

करोनाच्या वर्षा नंतर सगळ्या गोष्टींची व्यवस्थित काळजी घेत गायत्री आणि हेमंतने  पुन्हा मोठ्या उत्साहाने बऱ्याच लोकांना कामावर घेतले आणि त्यांचे बंद असलेले दुसरे युनिट सुरू केले. मुलांना आणि हेमंत गायत्रीला सुद्धा छोट्या flat मध्ये राहणे जड जात होते. तसेच ती जागा त्यांच्या कारखान्यापासून  दूर होती. मग शेवटी हेमंतने विचार करून एका तीस वर्ष जुन्या बिल्डींग मध्ये मोठा 4BHK flat पाहिला. त्याने पुढचा विचार केला. ही बिल्डींग दोन वर्षात रीडेव्हलप मेंटला जाईल आणि आपला फायदा होईल.    ते तिथे रहावयास गेले. त्याच  आठवड्यात खुप पाऊस झाला. कॉर्पोरेशनची लोक बिल्डींगची पाहणी करून धोक्याची सूचना देऊन गेले.  हेमंत म्हणत होता, “ गायत्री आता काय करायचं? अजून किती संकटातून आपल्याला जावं लागणार आहे?”  ती म्हणाली,

“ आपला इथं रहावयास येण्याचा निर्णय चुकला. आपण दुसरीकडे परत भाड्याने शिफ्ट होऊ या.”

हेमंत कारखान्यात  गेला. जाताना सांगून गेला. “मी लवकर परत येईन, एक जागा कळली आहे ती आपण पाहून येऊया.” हेमंत कारखान्यात गेला आणि काही वेळाने  ऋतुराज म्हणाला,

“आई आपण बाहेरच जेवायला जाऊ या. आणि बाबांना परस्पर तिथे बोलावून घेऊ या. आपल्याला लवकर शिफ्ट व्हायचं आहे तेव्हा इतर काम उरकून टाकू  या.” गायत्रीला ऋतुराजचे बोलणे पटले, नव्हे तिच्या मनात तसेच होते. सगळेजण बाहेर जेवायला गेले. आणि दहा मिनिटांनी ती बिल्डींग कोसळली. सगळ्यात प्रथम हेमंतला बातमी आली. तो कारखान्यात राउंड मारत होता.  त्याचं धाबं दणाणल  तो घाबरा घुबरा झाला. खुर्चीचा आधार घेत मटकन खाली बसला!  एवढंच म्हणाला, “माझ्या कुटूंबाच काय झालं?” तेवढ्यात त्याचा फोन वाजत होता. पण त्याचा घेण्याचा धीर होईना. तिथल्या लोकांना ही परिस्थिती लक्षात आली. एका कामगाराने फोन उचलला. ईश्वरी बोलत होती. “बाबा तुम्ही आमक्या हॉटेलमध्ये या आम्ही तिथे आहोत.” मोबाइल स्पीकरवर असल्यामुळे हेमंतने ते ऐकले. आणि त्याचा जीवात जीव आला. तो ईश्वरीशी बोलला.

“ आज तुझ्या आईच्या महालक्ष्मीने आपल्याला वाचवले. आपण सगळे घराच्या बाहेर आहोत. ती नेहमी म्हणत असते. “आई अंबाबाई आपल्या बरोबर आहे . सगळं ठीक होईल. तिने आज आपल्याला सुखरूप ठेवले.”

बिल्डींग मधले चार लोक दगावले. आठ नऊ लोकांना मातीच्या ढिगार्‍यातून सुरक्षितपणे बाहेर काढण्यात यश आले. बिल्डींग मधले चौदा संसार मातीच्या ढिगार्‍याखाली गाडले गेले. लोकांची दैन्यावस्था पाहून हेमंत गायत्रीला खूपच वाईट वाटले. बिल्डींग मधल्या इतर लोकांच्या मानाने   हेमंतच्या संसाराची इतकी नुकसानी झाली नव्हती. कारण त्यांचे बरेच सामान अजूनही त्यांच्या पहिल्या जागेत होते. त्यामुळे पुन्हा नव्याने जुन्या जागेत संसार सुरू करणे गायत्रीला फार कठीण गेले नाही.  बिल्डींग मधल्या इतर बिर्‍हाडांना सुद्धा दोघांनी मदत केली. त्यांना आपल्या कंपनी तर्फे प्रत्येकी एक लाख रुपयांची मदत केली . सगळ्या ऑफिस स्टाफने  गायत्रीला संसार उपयोगी दोन दिवसात आणून देण्यासाठी मदत केली. आणि पुन्हा गायत्रीची संसाराची गाडी रुळावर आली . ह्या सगळ्या गडबडीत ऋतुराज आणि ईश्वरीच्या  अभ्यासाचे बरेच दिवस वाया गेले. नव्याने अभ्यासाची पुस्तके आणावी लागली. नोट्स इतर मित्र मैत्रिणींच्या कडून घ्याव्या लागल्या. तरी मुलांनी गायत्री प्रमाणे शांतपणे सगळं घेतलं. करोना काळातील संकटातून बाहेर येत नाही तोवर हे संकट. खरं तर हेमंतच्या  स्वभावानुसार त्याची खुप चिडचिड झाली असती. पण तोही ह्यावेळी शांत होता. गायत्रीला नवलच वाटत होते. गायत्री म्हणाली सुद्धा,  “तुम्ही इतके शांत कसे काय?”  तेव्हा तो म्हणाला,

“ हया दोन वर्षात नव्याने नवीन संकटांना सामोर जात आहोत. पण प्रत्येक संकटातून सहीसलामत बाहेर पडत आहोत. लोकांची परिस्थिती आपल्यापेक्षा वाईट असते. तरी थोड्याश्या सुखात सुद्धा ते आंनद मानत राहतात. तूच बघ ना किती धीराने आणि धैर्याने सगळं शांतपणे हाताळत असते. मला कळून चुकले आहे. आपला दृष्टीकोन प्रत्येक परिस्थिती मध्ये महत्त्वाचा असतो. देव काहीतरी नेहमी चांगल करतच असतो. पण आपण ते मान्य  करायला हवे. प्रत्येक घडणाऱ्या प्रसंगाची दुसरी चांगली बाजू तपासायला पाहिजे. आज माझ कुटुंब माझ्या बरोबर आहे. जर त्या दिवशी तुम्ही घराबाहेर गेला नसता तर?  मी कल्पनाच करू शकत नाही. खरच तुझी महालक्ष्मी आपल्या बरोबर आहे. मला तुझ  म्हणण मान्य आहे. नियतीपुढे आपण आपला अहंकार  कवडीमोलाचा आहे. प्रत्येक गोष्टीतून धडा मिळत असतो पण हे मान्य करायला सुध्दा अहंकार बाजूला ठेवावा लागतो.”

“ तुम्ही कितीही  माझ्यावर चिडला तरी कधी माझ्या विरोधात गेला नाहीत. आणि आता तर शांत सुद्धा झाला आहात. हे सत्य मी नाकारू शकत नाही. ही आई  अंबाबाईची  कृपाच नाही का?”

आपली मोठी मुल आपल्या समोर उभी आहेत ह्याच भान सुद्धा हेमंतला नव्हत. तो गायत्रीला म्हणाला,

“ तुझी अनमोल साथ ही माझ्यावर झालेली पण अंबाबाईची कृपाच आहे.” म्हणत त्याने गायत्रीला मिठी मारली.
 

जयश्री  देशकुलकर्णी

Flat नं. -१०१ , K – बिल्डींग ,

हिल व्ह्यू  रेसिडन्सी ,  महात्मा सोसायटी जवळ

कोथरूड, पुणे -३८

मोबाइल – ९४२३५६९१९९

                 

 

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू