पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

किस्से एका प्रवासाचे

किस्से एका प्रवासाचे   
तुम्हाला सर्वांना एक टीप देतो रिजर्वेशन शिवाय रेल्वेच्या जनरल डब्यात प्रवास करू नका. मरणाची गर्दी असते. हो, मी पुण्यावरून कुर्डूवाडी ला जात होतो फक्त तीन तासाचा प्रवास कशाला पाहिजे रिजर्वेशन. घुसायचं जनरल डब्यात, काय होतय त्यात? ह्या अॅटीट्यूड ने मी जनरल डब्याचं तिकीट घेऊन, रेल्वेची प्लॅटफॉर्म वर वाट पाहत उभा होतो. जनरल डब्याने जायचं आणखी आणि महत्त्वाचं कारण म्हणजे मागच्या वेळी याच उद्यान एक्सप्रेस मध्ये रिजर्वेशन च्या डब्यात जनरल चे तिकीट घेऊन गेलो होतो, तर चांगलाच दंड लागला होता. म्हणून ह्या वेळी जनरल मधून च जाऊ असं ठरवलं होतं.
        जिथे जनरल डबा येतो तिथे जाऊन मी उभा राहिलो. रेल्वे यायला तसा अजून वेळ होता म्हणून मी भेळ घेतली. रेल्वे स्टेशन वरचे काही पदार्थ वेगळेच असतात आणि ते पदार्थ तिथेच खाण्यात मजा येते. आता ही भेळ मिळते सगळीकडे पण स्टेशन वर खायची मजाच वेगळी. मी प्लॅटफॉर्म वर उभा होतो तेव्हा तिथे काहीच गर्दी नव्हती. अगदी आरामात प्रवास होईल असं वाटत होतं. मस्तपैकी गाण्याची एक लिस्टच काढली होती जी जाताना मी ऐकणार होतो. भेळ खात खात मी प्लॅटफॉर्म वर चक्कर मारत होतो तेव्हा मला आमच्या गावातली माझ्या घराजवळ राहणारी एक ताई एका मुलाबरोबर गप्पा मारताना दिसली तिने मला बघून न बघितल्यासारख केल पण मला मात्र एक चमचमीत बातमी मिळाली होती. मी लगेच माझा गल्ली मधल्या मित्राला फोन केला आणि हे संगितले, त्याने पण त्यावर आश्चर्य व्यक्त केले आणि ” मला माहीत होतं रे “ असं ठरलेलं वाक्य बोलून दाखवलं. बोलता बोलता भेळ संपली तेवढ्यात रेल्वेची घोषणा झाली. ठरलेल्या प्लॅटफॉर्म वर येईल ती रेल्वे कसली मी २ नंबर प्लॅटफॉर्म वर आणि ती आली ६ नंबरच्या प्लॅटफॉर्म वर.. २ नंबरची सगळी गर्दी आता मिळेल त्या रस्त्याने ६ व्या प्लॅटफॉर्म वर जात होती.

       मी जे करू नये म्हणतात ते केले, रुळावरून क्रॉस करत मी ६ व्या प्लॅटफॉर्म वर पोहचलो.तेव्हा माझ्यासारखच एकजण रुळावरून येत क्रॉस करत होता त्याच्याकडे एवढे सामान होते की त्याला ते सगळं घेऊन वर चढता येत न्हवत तेव्हा त्याला मी हात दिला आणि वर खेचले त्याने माझे आभार मानले तो त्याच्या डब्याकडे गेला आणि मी माझ्या डब्याकडे    आता मात्र जनरल डब्यासाठी गर्दी झाली होती आणि जशी जशी रेल्वे प्लॅटफॉर्म वर आली तशी तशी गर्दी अजुनच वाढू लागली मी जरा धास्तावलोच.

   गाडी आली आली म्हणता म्हणता एवढी गर्दी झाली की डब्यात चढता येईल का नाही असं वाटू लागलं. कसा बसा स्वतःला आणि पाठीवरच्या बॅगला सावरत मी त्या जनरल डब्यात घुसलो, घुसलो नाहीच ढकलला गेलो..  नशीब माझे की माझ्याकडे सामान कमी होतं नाहीतर मी त्या गर्दी मध्ये चढण्याच धाडस केलच नसतं अचानक गर्दी वाढली होती माणसं एकमेकांना ढकलत धडपडत ओरडत सामान सांभाळत कसेबसे आत आले मी तर आत मध्ये असा ढकललो गेलो होतो की माझं सामान माझ्याबरोबर आहे की नाही हे सुद्धा कळत नव्हते.  माझे पाय रेल्वेला लागतच नव्हते. कोणाच्या पायावर मी उभा होतो काय माहीत ? आणि असा वेळेस सुद्धा एक बाई भांडू  लागली आता एवढ्या गर्दीत धक्का लागणं स्वाभाविक आहे ना तरी ती बाई कोणाचं एक ऐकत न्हवती शेवटी तिच्याबरोबर असणार्‍या एकाने तिला शांत केले आणि पुढे घेऊन गेला.   एवढी धक्काबुक्की झाली म्हणून सांगू त्यात गाडी पाच मिनिटात हलली सुद्धा मी ज्या दरवाज्यातून चढलो होतो तिथून मी धक्के खात खात पुढच्या दरवाज्या पर्यंत येऊन थांबलो होतो. मी, माझी चप्पल आणि माझी बॅग आम्ही तिघे एकत्र होतो हेच खूप होतं माझ्यासाठी..

    पण माझ्या शर्ट ची दोन बटणं मात्र मला सोडून गेली होती. मी किती निधड्या छातीचा आहे हे सर्वांना मी दाखवत होतो, मला हे कळताच मी माझ्या खांद्यावरची बॅग पुढच्या बाजूला घेतली आणि त्या गर्दीत मी स्वच्छतागृहाच्या बाजूला कसाबसा येऊन थांबलो होतो.

   रेल्वे जशी चालू झाली तसं तसं रेल्वे मध्ये गर्दी अॅडजस्ट झाली. मी जिथे उभा होतो तिथे माझ्या बाजूला एक दारुडा उभा होता. रिजर्वेशन न काढता प्रवास करण्याचा मला पश्चाताप होत होता. दारूच्या वासाने सगळ्याच प्रवाशांना त्रास होत होता.तो दारुडा बेसिन च्या बाजूला दरवाजाच्या आधारे उभा होता कोणीतरी दरवाज्याला धक्का लागला आणि  त्या दारुड्याचा तोल गेला आणि तो खाली पडला तिथे फ्लोअर वर बसलेले सगळे पटकन उठले. आम्ही त्याला पकडून दरवाजाजवळ बसवले.  तो दारुडा दरवाजाजवळ टेकून झोपला होता. खरतर त्याच्यामुळे २ माणसाची जागा अडत होती, म्हणजे फ्लोअर वर खाली बसायची.

   त्याला बघून विचार आला की काय करत असेल हा ? कुठून चढला असेल तो रेल्वे मध्ये ? कुठे जायचे असेल ह्याला? फॅमिली असेल का ह्याला ? त्याला पाहून खरच दया येत होती.  तो माझ्या अगदी पाया जवळ बसला होता आता माझे पाय सुद्धा दुखू लागले होते.

    थोड्या वेळाने माझा फोन वाजला. असल्या गर्दीत फोन वाजला की जरा त्रासच होतो मोठ्या कष्टाने मी फोन खिशातून बाहेर काढला बघतो तर, कस्टमर केअर शांतीत मी फोन कट केला. फोन परत ठेवत होतो तेवढ्यात आईचा कॉल फोन उचलून मी किती व्यवस्थित आहे हे तिला सांगितलं अगदी बसायला जागा मिळाली आहे, काळजी करू नको असं म्हणून मी फोन ठेवला.

     फोन ठेवतच माझ्या बाजूला उभा असलेला इसम माझ्यापेक्षा २-४ वर्षानी मोठा असेल तो म्हणाला, ‘मी ही असच करतो’ त्यावर मी म्हणालो, ‘हो ना.. कशाला घरच्यांना त्रास आपला, उगाच काळजी करतात आपली’ मग आमची थोडीफार ओळख झाली गर्दीला नाव ठेवण्यापासून ते शिक्षण घर आणि तो पडलेला दारुडा ह्यावर सविस्तर चर्चा झाली.  मला पण कोणीतरी बोलायला आहे ह्याचं एक समाधान मिळालं. पुणे ते  कुर्डूवाडी मध्ये एकाच स्टेशनवर गाडी थांबते ते म्हणजे दौंड. तो इसम दौंड ला उतरला चांगल्या गोष्टी जास्त काळ टिकत नाही हेच खर..!!

     गर्दी काय कमी झाली नाही उलट थोडी वाढलीच.  आता हे सगळं कमी होतं की काय दौंडला २ किन्नर माझ्यासमोर येऊन उभे राहिले. तुम्ही कितीही बेधडक असलात तरी त्यांना बघून का कोणास ठाऊक भीतीच वाटते.

    त्यांनी आल्या आल्या पहिला तर दरवाज्यातून त्या दारुड्याला चक्क बाहेर टाकले. मी हे सगळं पाहून खूप अस्वस्थ झालो. अजून २ ते २.३० तासाचा प्रवास बाकी होता. एकवेळ तो दारुडा परवडला असता पण आता ‘हे’ माझा जीवच वरखाली होत होता त्यांना पाहून. त्यात शर्ट ची बटणं तुटलेली ते आता रेल्वेच्या दरवाज्यात बसले होते रेल्वे चालू झाली. उगाच त्या जनरल डब्याच्या नादी लागलो असं झालं होतं.

    दौंड ला गर्दी कमी होईल असा अंदाज वाटत होता पण लांब पल्ल्याची गाडी होती म्हणून गर्दी काहीच कमी झाली नाही. मी आजूबाजूला उभ्या असलेल्या लोकांकडे पाहत होतो. त्यातले बहुतेक बसलेले सगळे दक्षिणेकडील च होते. सगळे तामिळ तेलगू किंवा कन्नड बोलत असावेत मी असच त्या सगळ्यांचं निरीक्षण करत बसलो. त्यांनी त्यांचं एक बस्तान च रेल्वे मध्ये मांडलं होतं. कोणी बाळासाठी झोळी बांधली होती कोणी खिडकीत कपडे वाळवले होते कोणी दोन  सीटच्या मध्ये झोपला होता तर कोणी तंबाखू मळत होतं इथे प्रत्येकाची काहीना काही तरी स्टोरी होती, हे मात्र खरं. तेवढ्यात तिथे टीसी आला,  एवढ्या गर्दीत तो कोणाचे तिकीट चेक करणार होता काय माहीत तो आला तसा निघून गेला. त्याने कोणाचेच तिकीट चेक केले नाही. माझा पाय एका किन्नर ला लागत होता, मी बराच वेळ अवघडलेल्या अवस्थेत उभा होतो. तेवढ्यात तो मला म्हणाला “अरे बस की खाली पाय दुखत असतील.” मी नको नको म्हणत होतो तेवढ्यात त्यांनी माझ्यासाठी जागा केली आणि खरच पाय दुखत होते म्हणून नाइलाजाने मी ही बसलो.  सुरूवातीला तर शांतता होती पण त्यांच्याकडे बघून मला त्यांचाबद्दल जरा उत्सुकताच वाटायची देवानेच त्यांना सगळ्यांपेक्षा वेगळं का केल असावं असं वाटायचं  मला थोडा वेळ झाला नंतर  मग तर त्यांनी माझ्याबरोबर गप्पा मारायलाच सुरुवात केली.  त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची मी हो आणि नाही मध्ये उत्तर देत होतो. मग त्यांनी विचारले कुठे उतरणार आहेस मी म्हणालो कुर्डुवाडी मग ते म्हणाले, ‘पंढरपूर जवळच असतं ना कुर्डुवाडी?’ मी ‘हो’ म्हणालो..मग त्यांनी मला पांडुरंगाची गोष्ट सांगितली की तो विटेवर का उभा आहे. मला हे माहीत न्हवते त्यांनी पांडुरंगाची गोष्ट सांगताना पुंडरीक महाराजचे नाव घेतले आणि मला सुद्धा आई वडिलांची सेवा कर म्हणून संगितले मी हे सगळं ऐकून थक्कच झालो आणि एवढं सांगून  त्यांनी पांडुरंगाची २ ३ गाणी म्हटली. दरवेळेस पैसे मागायला येतात; हे ते नाहीयेत हे माझ्या लक्ष्यात आलं. ते अगदी नॉर्मल माणसाप्रमाणे गप्पा मारत होते. हळू हळू माझी भीती देखील कमी झाली, आम्ही खरोखर गप्पा मारू लागलो. त्यांनी मी पुण्यात काय करतो? काय शिकतो? आई वडील? अशी सगळी चौकशी केली.

  त्यांना नेमके काय प्रश्न विचाराचे हेच मला माहीत नव्हत. मग मी ही त्यांना नॉर्मल प्रश्न विचारले कुठे जाणार ? कुठून आले ? वगैरे वगैरे. ते काही कारणासाठी बेळगाव ला जाणार होते त्यांची फॅमिली वगेरे आहे असं ते म्हणाले. मग एक तिसरा किन्नर, आमच्या डब्यात आला.. पैसे मागायला.. मी भीतीपोटी त्यांना पैसे देऊन टाकायचो, पण ह्यावेळेस मी जसे पैसे काढले तसे त्या दोघांनी त्याला संगितले “छोड रे अपना बच्चा है..!!

 विठ्ठालाच्या गावचा आहे हयाच्याकडून नको घेऊ” आणि खरच त्याने माझ्याकडून पैसे नाही घेतले. ह्यावर त्यातला एकजण मला म्हणाला, “हे असं टाळ्या वाजवून पैसे मागणं चुकीचचं आहे पण आमच्यावर वेळ येते आम्हाला कोणी काम देत नाही, ना कोणी मान देत नाही, काय करणार? मग आम्हीतरी.” असं म्हणून ते पुन्हा काहीतरी गाणी म्हणू लागले.

   कुर्डुवाडी आता १५ मिनिटावर होती  मी विचार करू लागलो, “काय प्रवास केला यार प्लॅटफॉर्म वर दिसलेली गावातली ताई, प्लॅटफॉर्म वर यायला मदत केलेला तो माणूस   ती तुटलेली बटणं, ती गर्दी, तो दारुडा, तो इसम, हे दोघे किन्नर, कोणी विश्वास ठेवणार नाही असा होता हा प्रवास आणि हा एक गोष्ट मात्र कळली की  तो दारुडा, ते इसम आणि हे किन्नर सुद्धा माणसच असतात फक्त प्रत्येजण आपआपल्या वाटच जगणं जगत असतो.”  

    कुर्डुवाडी येताच मी उतरलो. आणि का कोणास ठाऊक पण मनात आलं की त्या दोघांना चहा द्यावा आणि समोरच चहावाला होता, त्या दोघांना मी चहा दिला त्यांनीही तो आनंदाने स्वीकारला आणि  मला भरभरून आशीर्वाद दिले त्यांचे आशीर्वाद चांगले असतात. असं माझी आई नेहमी मला  म्हणायची आजचा असा हा अविस्मरणीय प्रवास आठवत आणि माझा बटन तुटलेला शर्ट सावरत सावरत स्टेशनवरून निघालेल्या त्या गाडीला बघत मी ही घराकडे निघालो.           

-     वैभव पारेख.

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू