नाच गं घुमा ( Nach G Ghuma )
मॉल मधे गेले होते, तिला एका बारशाला जायचे होते , तर काही झबली-दुपटी वगैरे खरेदी करायची मैत्रिणीबरोबर होती. लहान मुलांच्या कपडे-सेक्शनला गेलो. ते चिमुकले कपडे तर मला इतके आवडले की बस्स ! काय ते डिझाइन्स , त्यावर भरतकाम -त्याची रंगसंगती .... मैत्रीण विचारत होती ,'' अगं , सांग ना कोणते घेऊ? ''
'' बाई गं , कित्ती गोड आहेत ना! मला तर सर्वच आवडले ! ''
'' हो का! मग घेऊन ठेवतेस का ? पुढे-मागे कामे येतीलच ना! मात्र किंमती पाहूनच घे हां!''
टोमणे मारायला पक्की आहे अगदी !एका आवडलेल्या झबल्याची मी किंमत पाहू लागले .... अरे बाप रे!! मी तर उडालेच. त्या टीचभर झबल्याची किंमत चक्क रु. ४९९ ? म्हणजे पाचशेच झाले की. उरलेल्या कपड्यांच्या कटपिसेस मधून तर केलेले दिसत होते . मी चक्क सेक्शनच्या दारापाशी जाऊन उभी राहिले. तिथे डोअरकीपरची खुर्ची रिकामी दिसली तर बसले त्यावर ! एसी मधे ही घाम फुटल्याची जाणीव होत होती. मी रुमालाने घाम पुसला आणि पर्समधून बाटली काढून पाणी प्याले. हा प्रकार पाहून एक सेल्सगर्ल आली आणि विचारू लागली ,
'' मैडम , एनि प्रोब्लेम ? आर यू अलोन ?''
तेव्हढ्यात खरेदी आटोपून मैत्रीण आली आणि आम्ही मॉलच्या बाहेर पडलो . परत येताना मी गप्प -गप्प आहे असे पाहून मैत्रिणीने विचारले ,'' का गं , काय झाले ? ख़रच काही त्रास होतोय का ?''
'' हो , या लूटमारीचा त्रास होतोय ''
" लूटमारी ?''
‘’ नाही तर काय ? एव्ह्ढेसे टीचभर झबले आणि किंमत किती तर पाचशे ! एव्हढ्यात तर आम्ही किती तरी वस्तु खरेदी करु !’’
‘’ मग शिवा ना तुम्ही तुमचे कपडे ! करा बचत ! कोणी नाही म्हटलेय का ?’’
मैत्रीणीचे टोमणे मला सहन झाले नाही .
‘’ हो,हो शिवेनच , उदयाच शिवणक्लास लावते बघ...’’
तर अशी सुरवात झाली माझ्या शिवणकलेची . शिकायचेच आहे तर पूर्ण डिप्लोमाच करावा या हेतूने मी भारतीय कलाकेन्द्र या सरकारी संस्थेत नाव नोंदवले. एका वर्षाचा डिप्लोमा होता, आणि अकरा ते तीन हे चार तास म्हणजे घरचे काम उरकायलाही सोपे होते आणि सचिन , माझा मुलगा चार वाजता येतो , तोवर मी घरी… वा वा किती छान जमले सर्वकाही ... हयांनी नाही म्हणायचा काही प्रश्नच नव्हता , तरी एकदा म्हणालेच …’ आता हे काय नवीनच वेड घेतले आहे ? ‘ मला खूप राग आला ,पण ऑफिसच्या घाईत काही बोलले नाही .
दुसर्या दिवशीपासून क्लास सुरू झाला. पहिले दोन-तीन दिवस जरा धावाधाव झाली, पण मी मग टाइमटेबलच करुन टाकले .
मी खुश होते . छान घडी बसली होती माझी . दोन महीने झाले होते . घरी प्रेक्टिस करायला पाहिजे आणि पुढे तर आपण घरच्यांचे कपड़े घरीच शिवणार आहोत तर मशीन तर पाहिजेच. पण शेखर आता हो म्हणतील का !दोन दिवस कसा विषय काढ़ायाचा त्यावर विचार करत होते. मग एकदम एक कल्पना सुचली . शेखर केव्हां स्वत:हून क्लासविषयी चौकशी करतात त्याची वाट पाहू लागले . ( मला का बरं लहान सचिनचे माझ्या मागे-मागे करणे आठवत होते कोण जाणे!) मग मीच एक कल्पना लढवली.
रात्री शेखर जेंव्हा त्यांचे काम करत बसले होते तेंव्हा मी पण क्लासमधे शिवत असलेल्या ब्लाउझच्या हाताची तुरपाई करत समोरच बसले . त्यांचे लक्ष माझाकड़े जावे म्हणून कुठे कात्रीच पाड , कुठे तीन-तीनदा ड्रावर उघडबंद करून काहीतरी शोधायाचा प्रयत्न कर , ते करताना आवाज़ कर असे उद्योग करू लागले. (मला का बर परत सचिनच्या वागण्याची आठवण होत होती !) शेवटी शेखरने विचारले एकदाचे .
‘’ काय चालले आहे सीमा , झोप ना आता , लवकर तुलाच उठायचे असते ना !’’
“ होय हो , पण घरी करायला दिलेले काम पूर्ण करायला नको का ! खरे तर दहा मिनीटांचेच काम ,पण हाताने करायचे म्हणजे .... ‘’
“ का ? क्लासमधे मशीन्स आहेत ना?’’
‘’ आहेत ना , पण मैडम म्हणतात ‘ माझ्यासमोर जमते तुम्हाला , पण स्वत; स्वतंत्रपणे करायचे जमले पाहिजे ,’ म्हणून घरी करायला देतात काही. ‘’ मी मुद्दाम जांभया देत म्हणाले.
‘’ आता ह्या बाबतीत मी काही मदत करतो असे पण म्हणता येत नाही. मुलांचे कसे अभ्यास किंवा प्रोजेक्ट वगैरे काही मागे पडले तर....’
मी मधेच त्याना थांबवत म्हटले ,’’ तुम्ही मला पण मदत करू शकता बर का !’’
शेखर एकदम हातातले काम थांबवून उठूनच उभे राहिले ,’’ काय? मी आता माझे काम सोडून शिंपी होऊ का ?’’
माझ्या नजरेसमोर एकदम चित्र आले की शेखर शिलाई मशीनवर काम करत आहेत .मला एकदम हसुच आले . ‘’ ‘’हसतेस काय? ‘’
‘’अहो,असं कसं म्हणेन मी ? माझ एव्हढच म्हणण आहे की ... तुम्ही मला जर.... ( मी हयांचा चेहरा निरखत बोलत होते .... परत एकदा लहान सचिनची वागण्याची..... मी मान झटकली , बोलणे पुढे रेटले ) एक मशीन घेउन दिली तर मला मदतच नाही का होणार ?’’
“ अच्छा .... म्हणजे यासाठी का बाईसाहेब जागत होत्या ? बर... बर . सध्या थांब थोड़ी , माझ्या मागे खूप काम आहे. हयातून एकदा पार पडलो की मग ... हां !’’
“ तुला चॉकलेट देईन हां... असं लहान मुलासारखे काय सांगता ? स्पष्ट नाही म्हणा ना .’’ माझा आवाज रडवेला झाला होता, ’’ काही स्त्रीमनाचा विचार ? मी मात्र तुम्ही कमावलेल्या पैशाची बचत करण्याचा विचार करतेय ... कधी बघितलत का रेडीमेड कपड़े किती महाग आहेत ते , तोंडाला येईल ती किंमत लावतात..... ‘’
“ अरे अरे , काय परिस्थिती ओढवली आहे ना आपल्यावर ! नवरा तुटपूंजा पगार आणतो , जमवावे लागते बाईला ! ‘’ शेखर मला चिडवत होते, ‘’ आणि काय गं लहान मुलांसारखे लागलीच रडणे काय ? ‘’
“ नाही , तुम्हीच मला नेहमी विचारता ना तुला काय गिफ्ट देऊ ते तूच सांगत जा म्हणून ....’’
‘’ अच्छा ... म्हणजे.... परवा तुझा वाढदिवस आहे नाही का ! ओके ,ओके ! डन ! घेऊ आपण मशीन ! पण वाढदिवस परवा नाही तर रविवारी साजरा करायचा. कबूल ? मी परवा टूरवर आहे , लक्षात आहे ना ?’’
‘’ ओके,ओके, डन ! ‘’ मी पण हसत शेखरची नक़्क़ल केली .
तर अशा रीतीने एकदाची मशीन घरात आली . माझे शिवणकाम जोरात सुरू झाले . बघता-बघता क्लासचे वर्ष संपले , परीक्षा झाली आणि मी डिप्लोमाहोल्डर झाले . आता घरातले कपडे शिवायचा श्री गणेशा करायचा तर सरावासाठी एक जुनी साडी काढली. त्याचे छान पडदे करायचे ठरवले.छान टाकाउतून टिकाऊ योजना राबवायची ठरवले. विचार केला की ड्रेस शिवायला फिटिंग जमायला हवे. आधी सोपे काम करुन शेखरकडून कौतुक करून घेऊ. शिवाय एकदा शिवणावर हात बसला की मी ड्रेसडिझायनिंग पण शिकेन. चार मुली हाताशी ठेवेन , रेडीमेड कपड्यांच्या कंपन्यांशी करार करेन ,माझी डिझाइन्स इतकी छान असतील की..... विचार करत-करत साडी फाडलीआणि चार सारखे तुकडे केले नेफ़ा शिवला, खालच्या बाजूला साड़ी चे काठ येतील असे पाहिले . चला आता खिड़कीला लावून टाकू, शेखर अन सचिनला आल्या-आल्या सरप्राइझ ! किती आश्चर्य वाटेल त्यांना – एका दिवसात इतके काम !! खिड़कीचा बार काढला आणि एक पडदा घालायला सुरवात केली . पण हे काय ... बार जाड़ आणि नेफ़ा बारीक ! हा बार तब्येतीने सुधारला म्हणायचा की नेफ़्याची तब्येत बिघडली ! बार इतका जाड़ कसा झाला ! मी स्वत:शी बडबडले ‘’अग या पावसाच्या ऋतुत फूगला तो, की शिवताना कापड आटले आणि नेफा सुकून गेला .... ‘’ मी मागे पाहिले तर कोणीच नाही . मीच माझ्याशी बोलले तर ! मी नेफ़ा उसवू लागले . शिवण इतकी पक्की बसली होती की सुईने निघेना , मग कात्री घेतली , काही भाग उसवला , काही ठिकाणी जरा-जरा फाटला . पूर्ण उसवून झाल्यावर पाहिले तर समुद्राच्या किनार्यासारखा साडीचा किनारा नागमोडी दिसत होता .आता मी पट्टी व पेंसिल घेऊन रेघ मारली आणि मग कात्रीने कापले. नंतर चांगले दोन इंच मोजून रेघ मारली आणि मग नेफ़ा शिवला. आता बार सहजपणे आत गेला. मग चारही पडद्यांचे नेफे उसवले ... काही सुईने , काही दाताने दोरा तोडून , मग कात्री ने किनारपट्टी एकसारखी करून , दोन-दोन इंच जागा ठेवून परत पडदे शिवले. खुर्चीवर चढून लावले . चढउतर करून थकून गेले. खाली उतरुन दारात जाऊन उभी राहिले आणि पडद्यांचे देखणे रूप पाहू लागले .... हाय .... हाय ... एकता में विविधता का विविधता में एकता ... काही समजेना ... खिड़की आणि पडदा उंचीच्या बाबतीत एकमेकांशी वैरभाव दाखवत होते.
तेव्हढ्यात आमचे चिरंजीव, (आईला चिडवण्यात वडिलांच्या पावलावर पाउल अगदी) उगवलेआणि म्हणाले ,
‘’वा वा आई, तू तर ‘टू इन वन’ केलेस !’’
मला समजेना , ‘’ काय? कसे काय ?’’
‘’ अग , हे बघ, आत सोफ्यावर बसलेल्या माणसाला सहज बाहेरचे पहाता यावे म्हणून ही फट ठेवली आहे , पडदा थोड़ा आखूड ठेवून आणि बाहेरच्या माणसाला मात्र आतले काही सहजी दिसनार नाही. आहे की नाही मस्त आयडिया ... टू इन वनची ....! ‘’ अन चिरंजीव फिदीफिदी हसू लागले.
‘’ गधड्या , हसतोस काय? शेखर यायच्या आत काढून घ्यायला मदत कर !’’ , परत खुर्चीवरून वरखाली कसरत करायचे जीवावर आले होते . पटापट पडदे काढून घेऊन माझ्या कपाटात बंद केले. माझी अशी कितीतरी गुपिते बिचारे माझे कपाट दडवते, त्याला मनापासून थैंक यू म्हटले.
दुसर्या दिवशी त्या पडद्यांचे उशीचे अभ्रे शिवायचे ठरवले. अभ्रे काय सोप्पे ! चार बाजू शिवल्या की झाले , तसाभरात होउन जातील. हो, आणि साड़ी अशी वाया जाऊ देणार नव्हते ना !मग टाकाउतून टिकाऊ कसे होणार ? दुपारी कामे आटोपल्यावर झोपेला निष्ठूर होत दूर ठेवत मशीन उघडली. एका पडद्यात दोन असे आठ पडदे बेतले , भराभर मशीन चालवू लागले . तसे माझे विचारही भरभर धावायाला लागले. परत तेच ड्रेस डिझाइन चे स्वप्न पाहू लागले ... ‘हाताखाली मुली, वाढती मागणी , वाढता पसारा , रिकामपणा सत्कारणी लावल्याचे कौतूक .... वगैरे,वगैरे ! झाssss ले बाई एकदाचे शेखर यायच्या आत ! पण कॉलेजातून आलेला सचिन दोनदा डोकावून गेला, समंजसपणे स्वैपाकघरात जाऊन जे दिसले ते खाल्लेले मी पाहिले . मनात म्हटले , जाऊ दे आज एकच तर दिवस , उदयापासून तो यायच्या आधीच आवरत जाऊ.
सरप्राइज़ म्हणून कव्हर्स घालायला घेतले आणि काय , एक अभ्रा एकदम मोठा ...ढीला ... आणि दुसर्यात उशीच शिरेना ! अरे देवा ... आता काय करू ! मग कालच्या सारखेच सर्व अभ्रे घेतले आणि कपाटात कोंबले. रडावेसे वाटत होते , बाथरूम मधे जाऊन तोंडावर पाणी मारले आणि हसरा चेहरा करुन बाहेर आले तर शेखर आलेले होते . काहीही चर्चा न होता दिवस पार पडला . अंथरुणावर पडून विचार करत होते की आता काय ! काय करायचं ! तेव्हढ्यात शेखरचा आवाज आला ,
“ सीमा , इथले पायपुसणे कुठे गेले ? ओले पाय घेऊन कुठे फिरायचे ?’’
“ अं .... , बहुतेक बाईने धुवायला घेतले असेल !’’
‘’ काय ? माझे पाय! “
‘’ माती ने खराब झाले असेल ना ?’’
‘’ काय ? माझे पाय ?’’
“ अहो , ओरडता काय एवढे ? दूसरे आणते ना !’’
‘’ काय? माझे पाय ?’’
“ काय सारखे-सारखे माझे काय, माझे काय चालवले आहे ? ‘’
‘’ अगबाई , माझे काय नाही, पाय ... पाय ‘’
‘’ हो, हो , पाय ... तुमचे , फारच स्वच्छता लागते जशी ! “
‘’ मी म्हणत होतो ... माझे पाय ...’’
‘’ अरेच्या ! परत तेच , तुमचे पाय काय ? काही होते आहे का पायांना? दुखताताहेत का ?’’
‘’ अगबाई , ओले झाले आहेत ना माझे पाय ....’’
‘’ मग पुसून यावे ना पायपुसण्याला ....’’
“ तेच तर कुठे नाही ना दिसत....’
‘’ तेच तर सांगत होते ना की बाईने धुवायला घेतले असेल ..... दूसरे आणते ....’’ बोलता –बोलता मला एकदम कल्पना सूचली... ठरले तर! ते अभ्रे फाडून पाउपुसणी करायची. कधी एकदा दूसरा दिवस उजाडतो आणि कधी शेखर ऑफिसला जातात असे झाले .
शेवटी एकदाचे मशीन उघडले , कपाटातून अभ्रे काढले , दोन-दोन अभ्रे एकावर एक ठेउन चारी कडा दुमडून भराभर मशीन मारली आणि मस्त चार पायपुसणी तयार केली . लगेच दोन्ही बेडरूमच्या दारात आणि बाथरूमपाशी घालून ठेवले . मलाच किती छान वाटले. मग लगेच मैत्रीणीला फोन केला. तिला सर्व हकीकत सांगितली तर म्हणते कशी ,
‘’ बार झालं बाई , एकाच साडीत तू किती प्रकार शिकलीस ना! एक्सपर्ट झालीस आता ! मी पण माझ्या जुन्या साड्या देते तुला. भरपूर शीव , मग मॉलमधे स्वस्ताने विक हां ! खूप खप होईल , शेखरच्या जोडीने कमांवशील !’’ मला समजेना , ही खरं बोलते का फिरकी घेतेय माझी ? जाऊ दे , पण तिने एक मार्ग सुचवाला आहे तो विचारात घेतला पाहिजे.
आता शेखर येतील, आले की आपला ‘टाकाउतून टिकाऊ’ कार्यक्रम सांगायाचा . त्यांना किती छान वाटेल , आनंद होईल की मशीन घेऊन दिली त्याचा किती योग्य आणि छान उपयोग केला आपल्या बायकोने !!
आता आपणही तयार होउन बसावे. बाथरूममधे जाऊन तोंड धूतले आणि बाहेर येताना काय झाले कोणास ठाऊक, धाड़कन समोरच्या ड्रेसिंग टेबलला धडकून जोरात आपटले .
शुद्ध आली तेंव्हा मी दवाखान्यातील ड्रेसिंग रूम मधे होते . सचिन शेखरला सुरवातीपासून सर्व काही सांगत होता , ‘’….. आणि बाबा त्याच पायपुसण्यात पाय अडकून ती जोरात आपटली, आवाज ऐकून मी धावलो तोपर्यंत ही बेशुद्ध पडली होती , मग लगेच तुम्हाला फोन केला .’’
‘’ ते एक बरे झाले. ‘’
‘’ डॉक्टर काय म्हणतात ? फार खोल ज़ख़म नाही ना ?’’
‘’ नाही , थोडक्यात बचावली. आजच घरी पण जाऊ आपण आणि हो घरी गेल्यावर आधी ती पायपुसणी केराच्या टोपलीत टाकून दे. उदयाच मॉलमधून नवीन छान पायपुसणी घेऊन येऊ.’’
‘’ आई गंssssss ! ‘’ माझ्या तोंडून आर्त स्वर ऐकून सचिन म्हणाला ,
‘’ आई , आलीस का शुद्धीवर ? फार दुखते आहे का गं ?’’
खरे तर मी माझ्या फजितीला ऐकून सुस्कारले होते , पण या दोघांचा झालेला समज ऐकून डोक्याला हात लावून म्हटले ,’’ हे काय झाले आहे ?’’
काही न बोलता शेखर म्हणाले ,’’ सचिन आईला घेऊन बाहेर ये. मी गाड़ी काढ़तो. ‘’
रात्री माझ्या स्वप्नात साड़ी ,पडदे ,अभ्रे ,पायपुसणी आणि माझी मैत्रीण , शेखर, सचिन फेर धरून हसत होते, मला म्हणत होते ...’ नाच गं घूमा ...’ मी म्हणत होते ....’ कशी मी नाचू !’’
---------------------------------------------------------------------माया महाजन ----9850566442 -------
