प्रबोधनाचे थेंब
नेहा ही घराची आधारस्तंभासारखी होती—जबाबदारीने झगडणारी, पण स्वतःसाठी थांबण्यास कधीच वेळ न काढणारी." कामाच्या गडबडीत, ऑफिस, घर आणि नोकरीच्या तणावात तिच्या आयुष्यात एक गोष्ट नेहमीच हरवत गेली होती— स्वतःचं मन. तिच्या जीवनात कधी तरी एक पॉज असावा, असं तिला वाटत होतं, पण ती तो वेळ काढतच नव्हती. तिचं लक्ष सतत कामांमध्ये, इमेल्समध्ये, मीटिंग्जमध्ये आणि डिजिटल चॅलेंजेसमध्ये असायचं. परंतु आज, तिच्या आयुष्यात काहीतरी बदलणार होतं.
"आजी, कुठे चाललीस तू?" म्हणजे आज परत तुझी स्वारी कुठे.? आजी तुमचा कट्टा आज कुठे एकत्र होणार?
"आज प्रवचन आहे ग मंदिरात. ते ऐकायला चालले आहे," आजी ने हसत उत्तर दिलं. तिच्या चेहऱ्यावरचं शांततेचं तेज नेहाला आवडलं. खूप साधी होती, आणि तिच्या आयुष्यात कधीच अनाठायी धावपळ नव्हती — प्रत्येक क्षण ती मनापासून जगायची.
तिला कोणतंही साधं, रोजचं काम देखील कुठेतरी शांती आणि धैर्य देउन जातं. खूप वैचारिक होती.
"तू येतेस का माझ्याबरोबर?" आजीने हळुवारपणे विचारलं.
नेहा मनातल्या मनात विचार करत होती. आजीची परिष्कृत साधेपणाची आणि शांततेची हवा नेहाला कधीच समजली नव्हती. "नाही गं, आज नाही जमणार. खूप काम आहे," ती हलक्या आवाजात म्हणाली.
आजी खूप वेळ काही बोलली नाही, पण ती हसत म्हणाली, "अगं, एकदा येऊन बघ, "मनाला गारवा मिळतो."
नेहानीं खूप विचार केला . आजीची साधी, सुंदर आणि शांत भाषा तिला साद घालू लागली. तिच्या मनातल्या गडबड आणि तणावाची जागा आजीच्या बोलण्यातलं शांततेनं घेतली. काहीतरी आलं. आजीला सोबत घेऊन जाणं, एक वेळ मिळवून तिच्या सोबत थोडा वेळ घालवणं, कदाचित यावेळी तेच योग्य असावं.
"ठीक आहे, येते तुझ्याबरोबर," नेहाने नकार देण्याऐवजी एक ठरवलेलं निर्णय घेतला.
दोघी मंदिराच्या दिशेने निघाल्या. "गडबडीत हरवलेली नेहा आज एका क्षणासाठी तरी स्वतःच्या मनाशी थांबली होती—शांततेच्या सावलीत."
मंदिराच्या वातावरणात वेगळाच गंध होता, हवा थोडी वेगळी होती, जणू प्रत्येक श्वास एक नवा जीवन देत होता. गडबड कधीच इथे न दिसणारी! पाऊल टाकताना काळजाला आराम मिळावा, असं एक वेगळंच दृश्य तयार झालं होतं.
नेहा मंदिराच्या गेटवर पोहोचली सगळ्यां आजीच्या मैत्रिणी भेटल्या शांता आजी, नेत्रा काकू,रमा,विमला आजी . आणि लगेच म्हणाले नेहा कशी ग!आज? प्रबोधन एकाला आली का?
नेहा ने कोणतेच उत्तर दिला नाही. आजीला सोडायला आली आहे का? हो मग बस थोडावेळ.
नेहा त्यांचे मन राखण्यासाठी हो म्हणाली बाजूचे एका बाकावर हातात मोबाईल पाहत प्रबोधन ऐकण्याचा प्रयत्न करत होती . पण तिच्या हातातला मोबाईल केव्हा बंद झाला तिलाच कळलं नाही 50 मिनिटाचा प्रबोधन झालं.
आणि प्रबोधन संपलं आजी काकू सगळेजण परत जायला निघाले पण मी त्या बाकावर अजून बसले होते शब्द ऐकून संपले होते, पण मनात ते अजून ही ऐकायला येत होते.
आधी मोबाईलमध्ये डोकं खुपसलेली मी, आता स्वतःच्या अंतर्मनात हरवून बसले होते.
त्या प्रवचनात काय वेगळं होतं?
साधीच वाक्यं होती… पण त्या वाक्यांनी मनात खोलवर घर केलं.
“जीवन थांबत नाही… पण आपण मात्र थांबतो – रागात, दु:खात, अपयशात.
पण थोडं थांबून बघा – सगळं परत चालायला लागतं…”
माझ्या कानात तेच वाक्य पुन्हा पुन्हा घुमत होतं.
कॉलेजमध्ये झालेले अपयश, प्रेमात आलेली तुटलेली नाळ, आईबाबांचे वाढते अंतर…
हे सगळं मी रोज मनात पुन्हा पुन्हा वाजवत होते, पण आज या गेटपाशी काही वेगळंच झालं होतं.
“आयुष्यावर रागावू नका. तो एक गुरु आहे – दर वेळी शिकवण देतो…”
हा आवाज ऐकताना नकळत डोळे पाणावले.
शेजारच्या एका आजीनी पाणी दिलं. मी घुटमळलेल्या स्वरात हसून ‘धन्यवाद’ म्हटलं.
त्या वेळेस जाणवलं – कधीकधी जीवनाचं खरं प्रबोधन एक वाक्य नसतं, एक अनुभव असतो.
ते अनुभव मी या ५० मिनिटांत घेतले होते – अनाहूतपणे.
आज मी काहीच अपेक्षा न ठेवता आलो होते, पण इथून जाताना काहीतरी माझ्या मनात शांत झालं होतं.
तो गोंधळ, ती अडचण, तो कोलाहल – सगळं थोडं मागे सरलं होतं.
माझ्या बाजूला अजूनही मोबाईल शांत पडून होता – पहिल्यांदा तो नाही, मी संवादात होती
आजी परत यायच्या आधी मी एक मोठा श्वास घेतला…
आणि मनात विचार केला – "माझं प्रबोधन आज मला मिळालं…"
"आज जग फार वेगाने धावतंय...
माणसं धावत आहेत… कोणी पैशामागे, कोणी प्रसिद्धीच्या मागे, कोणी एकटेपण झाकण्यासाठी गर्दीत मिसळायला,
पण या सगळ्या गडबडीत एक गोष्ट हरवत चाललीय – मन:शांती.
आपल्याला वाटतंय, आयुष्य म्हणजे भरधाव एक्स्प्रेस ट्रेन.
स्टॉपावर थांबलो, की मागे पडलो. पण कोण सांगणार, की थोडं थांबणं म्हणजे हरवणं नसतं, तर सापडणं असतं.
आजची पिढी झपाट्याने पुढं जात आहे.
टेक्नॉलॉजीचा स्फोट झाला, पण संवेदनांचा आवाज मंद झाला.
इन्स्टाग्रामवर सुंदर फिल्टर्स आहेत, पण चेहऱ्यावर हास्याचं नैसर्गिक तेज कमी पडलंय.
व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये हजारोंचे संदेश आहेत, पण खऱ्या माणसाशी डोळ्यात डोळे घालून बोलणं लोप पावतंय.
आपण इतकं कनेक्टेड झालोय की, खरंतर डिस्कनेक्ट झालोय… स्वतःपासून, आपल्या माणसांपासून.
कधी विचार करा –
गेल्या वेळेस तुम्ही आई-बाबांशी फोन न बघता किती वेळ बोललात?
कधी शेवटचं तुम्ही सकाळी उठून सूर्योदय पाहिला?
कधी शेवटचं स्वतःशी गप्पा मारल्या?
आपण मोबाईलचं बॅटरी चार्ज करतो, पण मनाचा ‘चार्जिंग पॉइंट’ शोधायचा विसरतो.
मनाला हवं असतं – एक शांत संध्याकाळ, एका लांबलेल्या चहाचा कप, कोणाच्या प्रेमळ मिठीत हरवलेली थोडी वेळ,
पण आपण त्याऐवजी निवडतो – नोटिफिकेशन, स्क्रोलिंग, स्टोरीज, आणि सततची तुलना.
तुलना – ही आजच्या पिढीची सगळ्यात मोठी समस्या.
कोणाचं लग्न lavish? कोणची गाडी luxury? कोणाला किती फॉलोअर्स आहेत?
असं करत करत आपण आपली खास गोष्ट विसरतो – आपल्यासारखा कोणीच नाही!
तुमच्या हास्याचा, तुमच्या विचारांचा, तुमच्या अस्तित्वाचा duplicate नाही!
मग का हे सततचं तुलनांचं दडपण?
आणि या सगळ्याच्या गडबडीत – आयुष्य निसटतंय.
लहान लहान क्षण – आईचं हसणं, आजीचं कुशीत घेतलेलं अंगण, वडिलांचा खंबीर आधार, मित्राचं गुपित सांगणं –
हे सगळं आपण ‘नंतर’ करत बसतो,
आणि मग ‘नंतर’ कधीच येत नाही.
आयुष्य बँकेसारखं नाही की, ‘balance’ राहतो.
ते झरं आहे – वाहतं, वाहून जातं.
म्हणून जपा प्रत्येक क्षण.
जपा माणसं.
जपा भावना.
जर खरंच मोठं व्हायचं असेल, तर आधी मन मोठं करा.
दुसऱ्याचा आदर करा, स्वतःवर प्रेम करा, आणि कुणाच्या ‘सक्सेस’ला पाहून स्वतःचा ‘फेलियर’ ठरवू नका.
"मोठं व्हा… पण माणूस राहा."
पैसा कमवा, पण शांत झोपेसाठी मन कमवा.
गाडी घ्या, बंगला घ्या, पण माणसंही जोडा.
आणि हो… मनातला देव विसरू नका.
कारण आयुष्याचं अंतिम सत्य हेच आहे –
"गेलो म्हणजे गेलो… मोबाइल नाही सोबत येणार,
पण तुमचं हसवलेलं, प्रेम दिलेलं, आणि मन जिंकलंय का – तेच आठवलं जाणार."
म्हणूनच सांगतो…
थोडं थांबा.
श्वास घ्या.
डोळे मिटा.
आणि स्वतःला विचारा –
“मी खरंच ‘जगतो’य का, की फक्त ‘राहतो’य?”
जगणं म्हणजे धावणं नाही.
जगणं म्हणजे थोडा वेळ शांततेत बसणं.
माणसांना समजून घेणं.
आपण चुकीचे असू शकतो, हे मान्य करणं.
दुसऱ्याचा हात पकडून, “मी आहे” असं सांगणं.
हेच तर खरं प्रगल्भ आयुष्य.
म्हणून… या धावपळीच्या जमान्यात,
जो थोडा थांबतो, तोच खरं ‘जगत’ असतो
आयुष्य म्हणजे परीक्षा आहे, हो… पण उत्तरपत्रिकेसारखं नाही की, एक चुकीचं उत्तर दिलं की संपलं.
आयुष्य आपल्याला सतत नवीन प्रश्न विचारतं, आणि नवीन उत्तरं शोधायची संधीही देतं.
तेव्हाच तर सांगतो – निराश होऊ नका.
आजच्या पिढीमध्ये आत्महत्येच्या बातम्या वाढत चालल्या आहेत.
एक नातं तुटलं, एक अपयश आलं, एखादी नोकरी गेली, मार्क्स कमी पडले… आणि मग मन असं तुटून जातं की वाटतं, ‘बस, आता नाही झेपणार...’
पण हे क्षणिक असतं.
जीवे घेतलं, की प्रॉब्लेम संपत नाही – शेवटच्या क्षणी समजलेली उत्तरं लिहायची संधीही जात असते.
कधी कधी जीवन थोडं थांबायला सांगतं, पुन्हा चालायला, पुन्हा उभं राहायला.
कोणतीही चूक इतकी मोठी नसते की तुमचं संपूर्ण आयुष्य खराब करेल.
आणि कोणतंही अपयश अंतिम नसतं – जोपर्यंत तुम्ही स्वतःला संपवत नाहीत.
त्याऐवजी जरा थांबा… आईला घट्ट मिठी मारा, बाबांशी बोलून टाका, एखाद्या मित्राला फोन लावा, रडून घ्या… पण जगा.
कारण तुम्ही जगलात, तर अजून संधी आहेत.
तुम्ही श्वास घेतलात, तर अजून आशा आहे.
तुमचं आयुष्य, कुणाचं तरी आशेचं कारण असू शकतं."
."आयुष्य चुकत-शिकत पुढे जाण्याचं नाव आहे, एक चूक ही संधी असते नव्याने सुरुवात करण्याची."
...नेहा अजूनही त्या बाकावर शांत बसलेली होती. डोळ्यांतून ओघळलेलं एक पाणी थेट तिच्या ओठांवर आलं… आणि तेवढ्यात आजी जवळ आल्या.
"का ग, कसा वाटला प्रबोधन?"
आजीने प्रेमाने विचारलं.
नेहा थोडा वेळ शांत होती… मग म्हणाली,
"आजी... माझ्या मनाला गारवा मिळाला.
खूप दिवसांनी आतमध्ये काहीसं हललं... मनाची बंद खिडकी उघडली गेल्यासारखं वाटलं… आणि आत एक शांत प्रकाश उतरला.
असं वाटलं, की आपण थोडं थांबलं पाहिजे, स्वतःशी बोललं पाहिजे…"
"म्हणजे तुला आवडलं?"
आजीच्या डोळ्यात वेगळीच चमक होती.
"फक्त आवडलं नाही ग आजी, वाटलं की… माझ्यासारख्या कितीतरी मुली, मुलं… रोज कशात तरी हरवलेली असतात. कुणाच्या तरी बोलण्याने, एका साध्याशा वाक्याने त्यांचं आयुष्य वळू शकतं."
नेहा उठून उभी राहिली.
मोबाईल तसाच पर्समध्ये ठेवला होता – पहिल्यांदा ती स्वतःशी जोडली गेल्यासारखी वाटत होती.
प्रवचनातलं एक वाक्य तिच्या मनात वाऱ्यासारखं फिरत होता "निराशा ही शेवट नाही, ती फक्त एक वळण आहे… पुढे आशेचा रस्ता अजून विस्तारलेला आहे."
नेहाने आजीचा हात हातात घेतला.
"आज मी तुला सोडायला आले होते, पण खरं सांगू… तू मला सावरण्यासाठी इथं आणलं."
दोघींनी एकमेकांकडे पाहिलं. हसल्या. आणि मग शांतपणे गेटच्या बाहेर पडल्या…
त्या दिवशी नेहाचं जीवन बदललं नव्हतं – पण तिचं दृष्टीकोन मात्र बदलला होता.
कधी कधी, आयुष्याचं उत्तर सापडतं.नव्हतं. पण आज अनेक उत्तर सापडली मंदिराच्या बाकावर बसून.
"आजी, आत्महत्या हा विषय किती गंभीर… पण त्या वक्त्यानं इतक्या सहजतेनं, साधेपणानं, आणि तरीही मनाला भिडेल अशा पद्धतीनं मांडला… खरंच, त्या प्रबोधनाने डोळे उघडले."'जग तू… कारण तुझ्या आयुष्याला अजून अर्थ आहे.'"
“मी गेलो तर काय बदलेल?”
होय, तुमचं दुःख संपेल – पण ज्या लोकांनी तुमच्यावर प्रेम केलं, त्यांचं दुःख कधीच संपणार नाही.
तुमचं आयुष्य, कितीही कठीण असलं, ते ‘शून्य’ नाही…
त्यात अजूनही काही गाणं आहे, काही स्वप्नं आहेत, काही अर्धवट ओळखी, काही न संपलेले संवाद आहेत. शेवट
स्वतःवरचं प्रेम हे आत्महत्येवरचं सर्वात मोठं औषध
आजी म्हणाली, हो! नेहा,त्या प्रबोधनात खूपच विचार मांडले गेले.प्रबोधनाची खरी खरी ताकद तिच्या विचारांमध्ये आहे.
प्रबोधन म्हणजे एक नवा उभारा— एक सुसंस्कृत दृष्टिकोन, एक शांतीची छाया आणि एक नवा उत्साह.
त्यांचं सांगणं 'तुम्ही एकटे नाही, तुम्ही अनेकांच्या हृदयात असता.' ते खूप हृदयस्पर्शी होतं. मनुष्य जितका आंतरिकरित्या आपले विचार, दु:ख, कष्ट वाचतो, तितकं त्याच्या समोर एक नवीन जग उभं राहिलं पाहिजे."
नेहा विचार करत होती आणि बोलत ही होती, "आजी, किती सुंदर आहे ना. जीवनात संघर्ष, अडचणी असतात, पण त्यातही समाधान मिळवता येतं. असं वाटतं की आपल्याला एक नवा मार्ग सापडला आहे."
आजी गालातल्या गालात गोड हसली.आणि आपल्या हाताने नेहाला गोंजारलं, "बरोबर आहे मुली, जीवनाच्या प्रत्येक वळणावर खूप काही शिकता येतं. जरी अंधार असला, तरी प्रकाश नक्कीच आहे. आणि त्यासाठी आपल्या मनात एक सकारात्मक विचार ठेवायला हवा."
"प्रबोधनाचा प्रत्येक स्वर, हा अंतर्मनाच्या अंधारात एक आशेचा दिवा पेटवतो – आणि त्याच्या प्रकाशात मनाला गारवा लाभतो."
"या प्रबोधनाचा गारवा फक्त वृद्धांच्या मनाला नाही, तर आजच्या तणावग्रस्त तरुण पिढीला मार्गदर्शन करणारा दीप बनावा, हीच खरी गरज आहे."
नेहा आणि आजी घरी परतल्या. , पण.नेहा अजूनही प्रबोधनाच्या विचारांत गुंतलेली होती. अधिकच गप्प होती. मोबाईल बाजूला ठेवून ती खिडकीपाशी जाऊन बसली.
नेहा:
"आजी… असं वाटतंय की आजच्या प्रबोधनाचे शब्द अजूनही कानात घुमत आहेत. ते बोलणं संपलं, पण त्याचा अर्थ अजून चालू आहे."
आजी (हसत):
"खरंय बाळा. हेच तर खरे प्रबोधन… जे तिथे संपत नाही, मनात रुतून राहतं. आपण घरात आलो, पण विचार मात्र आत खोलवर उतरलेत."
नेहा:
"त्या एका वाक्याने मी हादरले, आजी – ‘निराशेच्या क्षणी जी व्यक्ती आत्महत्या करते, ती स्वतःच्या दुःखाशी नाही तर संधींपर्यंत पोहोचण्याच्या इच्छेवर हरलेली असते!’"
आजी:
"आणि म्हणूनच हे प्रबोधन गरजेचं आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात असा क्षण येतो… पण जर त्याक्षणी कुणीतरी एक आशेचा शब्द सांगितला, तर संपूर्ण आयुष्य बदलू शकतं."
नेहा:
"माझ्या एका मैत्रिणीने नुकताच निराशेमुळे कॉलेज सोडलं, आजी. मी तिच्याशी आजच बोलणार आहे. कदाचित तिच्या आयुष्यात हे प्रबोधन पोचेल."
आजी हळूत हसत म्हणाली :
"बाळा, हेच तर खऱ्या प्रबोधनाचं यश! स्वतःच्या मनाला गारवा देऊन, दुसऱ्याच्या जीवनातही तो" गारवा" पसरवणं."
आजी खरं सांगू का बोल
नेहा (डोळे पाणावलेले):
… ऋतू कोणताही असो, पण हे प्रबोधन मनाला गारवा देऊन गेलं आज. रोजच्या धावपळीत, मी स्वतःलाच विसरले होते. आज जेव्हा त्या प्रबोधनकारांनी म्हटलं ना ‘जग तू… कारण तुझ्या आयुष्याला अजून अर्थ आहे’ — तेव्हा एक क्षणभर अंगावर शहारा आला."
आजी थोड चेहऱ्यावर गांभीर्य आणून,
"हो… कारण आजची पिढी गोंधळलेली आहे, पण चुकलेली नाही. त्यांना फक्त शब्दांचा गारवा हवा आहे… आणि तो गारवा अशा प्रबोधनांतून मिळतो."
आणि प्रबोधनच आनंदी आयुष्य जगायला शिकवतो.
नेहा खिडकीतून पाहत राहिली. बाहेरची झुळूक अंगावर आली, पण आतल्या विचारांची हवा अधिक गार वाटली.
" प्रबोधनाचे थेंब "प्रत्येक कानात, प्रत्येक मनात हे थेंब पोहोचले पाहिजेत — जेणेकरून कुणी निराश होणार नाही, कुणी थांबणार नाही, आणि कोणालाही एकट वाटणार नाही."
"सौ तृप्ती देव
