बंगल्यातील आजी
अबब! किती सुरेख व केवढा मोठा हा बंगला आहे
त्याच्या समोरची हरत-हेच्या फुलांनी बहरलेली बाग तर अप्रतिम आहे.
कोण रहात असेल बरं इथे! त्या चिमुरडीला जनाला हा प्रश्न नेहमी पडायचा. तिच्या शाळेच्या वाटेवरच हि बाग होती ना. ती रस्त्याने जाता येता बागेच निरीक्षण करायची.
लाल,गुलाबी,पिवळी,पांढरी फुले, सोनचाफा, बकुळ, प्राजक्त , मोगरा या फुलांचा सुवास श्वासात भरून घ्यायची.
थोडे दिवसांनी तिच्या लक्षात आलं की ,इथे
एक आजी रहातात. त्यांचे ते निटनेटके, टापटीप रहाणे
खानदानी वागणे, गोड , शांत आवाजातील नोकरमाणसांशी , आल्यागेल्याशी बोलणे तिला जनाला खुप खुप आवडायचे .
ति त्या बंगल्याजवळून जाताना थोडीशी रेंगाळतच जात असे .
जनाला आजी देखील नेहमी बघत असे.
गरीबीत वाढलेली स्वच्छ व निटनेटकी ,छान पोनी बांधलेली हि मुलगी आजीला भावुन गेली. पण तिच्याशी कधी बोलण्याची वेळ नव्हती आली…
असेच थोडे दिवस गेले व एके दिवशी जनाने आजीला हाक मारली . त्यांच्या बागेतील दोन जास्वंद फुले तिला हवी होती . थोड्याश्या नाराजीनेच आजीने जनाला दोन फुले दिले.
आजीला वाटे फुले झाडावरच राहिली तर खुप छान वाटते त्यांना डोलताना पाहुन . म्हणून तीने नाराजीनेच फुले तोडली जनासाठी.
पण आता हे रोजच घडू लागल. रोज सकाळी जना येई व फुले मागत असे . व आजी देत असे.
असे करता करता १५ दिवस झाले आणि अचानक जना फुले मागायला यायचीच बंद झाली .
आता मात्र आजीच तिची वाट बघु लागली.
आज येईल उद्या येईल असे करता करता एक आठवडा सरला . पण जना काही येईना.
आणि थोड्यादिवसांनी अचानक जना बागेजवळ उभी दिसली. तिला बघताच खर म्हणजे आजीला खुप आनंद झाला होता. पण थोडा तिचा रागही आला होता त्यांना. तरीही त्यांनी चार फुले जास्वंदीची तोडली व तिला द्यायला गेल्या. त्यावर जनाने हसुन सांगितले की, आज ती फुले न्यायला नाहीतर प्रसाद द्यायला आली आहे
जना आज खुप आनंदी दिसत होती.
आजी म्हणाली, कसला ग तुला एवढा आनंद झालाय.
कसला प्रसाद घेऊन आली आहेस .
तेव्हा जनाने आजीला सांगितलं, कि माझे बाबा खुप दिवस आजारी होते . त्यांचा ताप उतरत नव्हता म्हणून माझ्या आईने रोज दोन जास्वंद फुले गणपतीला वहायचा नेम केला होता.
थोडे दिवस फुले मिळाली पण नंतर फुले मिळेना झाली. तुमची बाग नेहमी फुललेली मी बघत होते . म्हणून मी आईला सांगुन तुमच्या बागेतली जास्वंदीची फुले नेत होते आईचा नेम पुर्ण करण्यासाठी..
आता माझे बाबा पुर्ण बरे झाले आहेत.
नेम पुर्ण झाला म्हणून आईने गणपतीला पेढे ठेवले होते तोच प्रसाद आईने तुमच्यासाठी पाठविला आहे.
आजीला हे सगळे ऐकुन खुप नवल वाटले .
आपण प्रथम नाराजीनेच का होईना पण जनालाफुले दिली याचे आजीला खुप बरे वाटले…..
जना आजीला सांगत होती- तिची आई नेहमी म्हणते की कोणाचे उपकार कधी फुकट घेऊ नयेत.
आधी बंगल्यावर जा आणि आजीला हे पेढे देऊन ये.
गरिबीतही स्वाभिमानाने जगणा-या व आपल्या मुलीला गरिबीतही चांगले संस्कार,चांगले विचार देणा-या या माऊलीचा आजीला खुप खुप अभिमान वाटला. घन्य त्या माऊलीची…
असे मनात म्हणत आजीने जनाला खाऊ व जनाच्या आईला साडी भेट दिली .
बंगल्यात तुम्ही मायलेकी कधीही येऊ शकता
असे तिला बजावले. बंगल्यातील नेाकर माणसांनाही या दोघींना लागेल ती मदत करण्यास सांगितले.
आज आपल्या बागेतली फुले खुषीत डोलत हसत आहेत असा त्यांना भास झाला. व आजी मनोमन सुखावली.
सौ शीतल राजन गांधी
महाड. रायगड
