त्या पायऱ्या
"शाळेच्या पायऱ्यांवर उरलेली गोडी – बालपणाच्या आठवणींची ही हृदयस्पर्शी कथा"
बालपण, शाळा, आणि गोड आठवणी… ज्या पायऱ्यांवर आपण कधीकाळी धावत चढलो, आज त्या आठवणींच्या सावलीत विसावतो. ही गोष्ट आहे त्या सोनेरी दिवसांची – जिथे प्रत्येक कोपरा, प्रत्येक बाक, आणि प्रत्येक घंटा एक गोड आठवण घेऊन उभी असते. मनाला गारवा देणारी, भावनांनी ओतप्रोत भरलेली ही कथा नक्कीच तुमच्या मनात शाळेचा सुगंध जागवेल.
शाळेच्या आठवणी, बालपण, शाळेतील गोड क्षण, हे सगळं त्या काळाच्या चांगल्या गोष्टींचं प्रतिबिंब असतात. ते शब्द नेहमीच मनाला गारवा देतात, कारण ते आपल्या आयुष्यातील एक अशा टप्प्यावर घेऊन जातात, जेव्हा सर्व काही निरागस आणि सादगीने भरलेलं असतं. शाळेतील गोड मित्र, शिक्षिका-शिक्षकांचा कडकपणाही प्रेमाने भरलेला, आणि आपल्या लहानशा चुका; हे सर्व आठवणीत हरवून जातात आणि आपल्याला त्या क्षणांमध्ये जाऊन बघावं असं वाटत.
."चला जाऊ या आपण शाळेत..."
चला जाऊ या शाळेत आज — दप्तर नाही, पाटी नाही, कंपास नाही... हातात फक्त आठवणी आहेत. ना गणवेश, ना वह्या, पण मन मात्र जुन्या वर्गातल्या बाकावर जाऊन बसलंय. त्या फळ्यावर अजूनही आपली अक्षरं उमटलेली वाटतात. खिडकीतून येणारा सूर्यप्रकाश, वर्गातले खोडकर आवाज, आणि मधल्या सुट्टीचं उडालेलं डब्ब्याचं झिंगाट… सगळं पुन्हा एकदा अनुभवायचं आहे, फक्त डोळे मिटून.
"शाळेची घंटा वाजते… आणि मनात लपलेली ती गोड आठवण दरवाजातून बाहेर डोकावते…"
एका रविवार सकाळी, अचानक मनात आलं – का बरं आपण परत त्या जुन्या शाळेच्या रस्त्यावर जात नाही? तिथे अजूनही आपली पावलं उमटलेली असतील का? काही आठवणी अजून पायऱ्यांवर बसून वाट पाहत असतील का?
आणि मी चाललो. हातात कॅमेरा नव्हता. मोबाईलच्या कॅमेऱ्यात शाळेचं चित्र साठवावं असं वाटलंच नाही. कारण आठवणी डोळ्यांनी टिपायच्या असतात, फोटोंनी नाही.
शाळेच्या दाराशी पोहोचलो. मोठं गेट, जरा गंजलेलं. पण तशीच उभी, शिस्तीत. जणू मला म्हणते, “बरं, परत आलास का?”
हळूच आत शिरलो. आज शाळा बंद होती. शांतता होती, पण ती मृत नव्हती. ती जिवंत होती – कुंपणावर चढलेला जुना वेल अजूनही आमची दंगा करताना पाहिल्यासारखा हलत होता. फळ्यावर लिहिलेला "स्वच्छता मोहीम" चा भग्न संदेश अजूनही वाचता येत होता.
माझं लक्ष गेलं त्या जुन्या पायऱ्यांकडे… तिथेच बसलो, जिथे कधी बुटाचे चिखलदार ठसे, ओले पाय, टिफिनची वाट बघणारी मुलं, आणि “आज सुट्टी कधी?” म्हणणारे डोळे दिसायचे.
पायऱ्यांवर बसून नजर फिरवली. वर्ग क्रमांक तीन अजूनही तिथेच होता. तिथेच होती ती खिडकी, जिच्यातून आम्ही मैदानाकडे बघत अभ्यासाकडून लक्ष विचलित करत असू...
शाळेच्या प्रांगणात पाऊल टाकलं आणि जणू सगळं काही जिवंत झालं. त्या गेटमधून आत शिरताच डावीकडे शिक्षकांची स्टाफ रूम, उजवीकडे चौकीदाराची खोली आठवली. समोरच लटकणारी ती घंटा, तिचा आवाज अजूनही कानात घुमतोय असं वाटलं.
मुख्याध्यापिकाची रूम, पाण्याची जागा, डब्बा खायची निवडक जागा, आमची लाडकी लॅबोरेटरी आणि पुस्तकांची सुगंधीत शांतता असलेलं ग्रंथालय… सगळंच जणू मला ओळखून हसत होतं.
वर्गखोल्यांमध्ये कोपऱ्यात लावलेली अ, आ, इ, ई ची रंगीत पाटी… कधी आमचा अ वर्गातला गोंधळ, कधी गॅदरिंगसाठी केलेली तयारी, कधी संक्रांतीला एकत्र केलेलं तिळगूळ… हे सगळं डोळ्यांसमोरून सरकायला लागलं. कधी गृहपाठ नाही केला म्हणून शिक्षा म्हणून वर्गाच्या बाहेर उभं केलं गेलं, तेव्हा वाटलेली भीतीही आठवली… आणि हळूच हसू आलं.
जणू माझ्याशी शाळा बोलू लागली.
मन भूतकाळात हरवलं… आणि अचानक कानावर पुन्हा त्या परिचित सुरांचा नाद झाला —
“हे दीप आम्हा ज्ञानाचा…”
शाळेची प्रार्थना… ती रांगांची शिस्त, तो गोंगाट, आणि तरीही त्यात लपलेली एक शिस्तबद्ध गोडी — सगळं आठवत होतं.
तासाची घंटा वाजायच्या आधी, शाळेच्या प्रांगणात आम्ही रांगेत उभं राहायचो. प्रत्येकाचा गणवेष तपासला जायचा, नखं, बूट, केस — आणि कुणी चुकलं की मुख्याध्यापकांचा कटाक्ष!
मग सर्व शिक्षक एका रेषेत उभे राहायचे. एखादा हसरे सर, एखादी रागीट मॅडम, कोणी विशेष आवडता शिक्षक… आणि कोणी ‘फारच कडक’ वाटणारा! पण त्या सगळ्यांनीच आपल्या आयुष्यात अक्षरशः 'शिस्त' घडवली होती.
प्रार्थनेनंतर त्या हातातल्या डफलीचा ठेका, आणि “शांततेच्या वाटेवरती चालू या रे सख्या…” म्हणत आम्ही वर्गात जात होतो.
कोणी शेवटच्या बाकावर बसायचं बघत होतं, तर कोणी पहिल्या बाकावर फळ्याला तोंड लावून लिहायला सज्ज.
ते बारीकसारीक शिस्तीचे नियम… "बोलू नको", "पुस्तक सावरून ठेव", "दप्तर नीट ठेव"… त्या वेळी कंटाळवाणं वाटायचं, पण आता लक्षात येतं — त्या शाळेने केवळ अक्षरं शिकवली नाहीत, तर जगण्याची सवय शिस्तीचं बाळकडू, संस्कार त्या शाळेने केवळ अक्षरं शिकवली नाहीत, तर जगण्याचं शहाणपणही दिलं.
"शाळेतले टेबल, खुर्च्या, खडू आणि फळा… सगळं आज बोलत होतं. जणू बालपणीचे सारे क्षण त्या शांत वर्गात लपले होते. हसणं, रागावणं, शेजारच्याची वही फाडणं, आणि फळ्यावर पहिल्यांदा अक्षर काढायचा तो गोंधळ… सगळं जिवंत झालं होतं."
आठवली ती शाळेची ट्रिप… त्या दोन शब्दांतच कितीतरी धडधडीत आठवणी दडलेल्या असतात. ट्रिप जाहीर झाली, की वर्गात उत्सवच व्हायचा. ‘कोण कुणाच्या बाजूला बसेल’, ‘बॅगेत काय-काय न्यायचं’, ‘शिक्षिका साठी वेगळा डब्बा न्यायचं,‘पिकनिकला पोहचलो की आधी डोंगर चढायचा की खेळायचं?’—या गोंधळातच सगळी तयारी चालायची. चेंडू. दोरीवरच्या उड्या. अंताक्षरी.
"आईने "सकाळी लवकर उठून तयार केलेल्या पुरी भाजीचा डबाआणि डब्याचा सुगंध अजूनही दरवळतो आहे. गाडीत गाण्यांची महफिल रंगायची—कोणी "पप्पा केहते हैं…" म्हणायचं, तर कोणी "चंदा है तू, मेरा सूरज है तू…" गुणगुणायचं. कधीकधी शिक्षिकाही त्या तालात डुलायच्या.
ती "ट्रिप" म्हणजे केवळ प्रवास नव्हता—ती मैत्रीची, खोड्यांची आणि सगळ्यात महत्त्वाचं, शाळे
बरोबरचे शेवटचे क्षणजगून घेण्याची संधी असायची.
गाडी थांबताच सगळ्यांचे ओरडून बाहेर पडणे, एका क्षणात शिस्तभंग, आणि तरीही शिक्षकांचे सुस्कारे—"थांबा रे, हळूहळू उतरा!" पण कुणाचं ऐकायचं कोणाचं? प्रत्येकाला आपला ‘स्पॉट’ आधी पकडायचा असायचा. एखाद्याच्या डब्यातून सुगंध दरवळायचा, दुसऱ्याच्या पायात चपला हरवायच्या, आणि काहींचे टोप्या कुठे उडून जायच्या.
खेळ, धावपळ, गोंधळ, फोटोंसाठी पोज, आणि मग एकदम शांत झोपलेले चेहरे गाडीपरतीच्या प्रवासात दिसायचे. पण मन झोपलेलं नसायचं—ते त्या ट्रिपच्या आठवणीत गुंतलेलं असायचं. परत आल्यावर दुसऱ्या दिवशी शाळेत ‘काय मजा आली ना!’ या वाक्यावर चर्चा, किस्से, आणि नव्याने बांधलेली दोस्ती असायची.
त्या ट्रिपमध्ये बॅगेत न राहिलेलं एकच सामान असायचं—तो क्षण पुन्हा न मिळण्याची जाणीव.
मधली सुट्टी झाली की शाळेचा डबा खाण्याचा आनंद तो ही "वदनी कवल घेताना नाम घ्या श्रीहरीचे "श्लोक म्हणून म्हणताना चेहऱ्यावर गोड गंभीरता यायची. डोळे मिटून हात जोडायचे, पण मनात मात्र, समोरच्या डब्यात काय आहे याचं गणित सुरू व्हायचं!
डब्याच्या देवाण-घेवाणीत, मैत्री घट्ट व्हायची. एकाच्या डब्यातली बटाट्याची भाजी दुसऱ्याच्या डब्यातल्या पराठ्यांशी ‘मैत्र’ करत असायची. कधी भांडणंही व्हायची—"माझा शेवटचा गोळा तू का घेतला!" पण पुढच्या सुट्टीत परत सगळं विसरून एकमेकाच्या डब्यात घास वाढायचो.
त्या डब्याचं सुख कधी नव्हतं केवळ खाण्यात… त्यात होती चव – आपुलकीची, बालमैत्रीची, आणि देवाच्या नावाने सुरू झालेल्या त्या निरागस विश्वासाची.
सरस्वती(पूजन) पूजेचा तो दिवस आजही डोळ्यासमोर आहे…”
शाळेच्या त्या छोट्याशा रूममध्ये आम्ही एका दिवसासाठी “पूजेचं देवघर” उभं केलं होतं. शाळेतला फोटो. घरी बनवलेला फुलांचे हार.
भिंतींवर हातांनी रंगवलेली फुलं, झेंडूच्या माळा, आणि मधोमध बसवलेली सरस्वती माईची छोटीशी मूर्ती – किती श्रमाने, प्रेमाने सजवली होती ती! वर्गातला प्रत्येक विद्यार्थी आपली वाटचाल विसरून झाडू, रंग, कागद आणि झेंडू घेऊन डोळ्यांत चमक घेऊन काम करत होता. सगळीकडे सुगंध दरवळलेला असायचा – झेंडूचा आणि चिवड्याचा! हो… तो कच्चा चिवडा! बाई स्वतः आणायच्या, आणि प्रसाद म्हणून खडी साखरेचे दाने.आम्ही दोन-दोन वेळा रांगेत उभं राहायचो. प्रत्येक बोटाला लागलेला तीळ, ती साखरेची चव, आणि बाईंचं “परत उभं राहिलास का रे!” म्हणणं – त्या प्रसादामध्ये देवपणाचा भाग वाटायचा.
गॅदरिंगच्या दिवशीही तेच होतं. सगळ्यांच्या चेहऱ्यावर रंग, गालांवर ग्लिटर, आणि अंगात उत्साह. नाच, भाषणं, गाणी… नंतर सगळ्यांनी एका ओळीत बसून पत्रावळीवर जेवण केलं. वरण-भात, बटाट्याची भाजी, गुलाबजाम – आणि वर सगळ्यांच्या नजरा त्या एका एक्स्ट्रा गुलाबजामावर! एकत्र बसून जेवताना त्या पत्रावळीत जसं अन्न होतं, तसंच एक अदृश्य नातंही वाटलं जायचं… जे अजूनही मनाच्या पाटीत सुरक्षित आहे.
आनंद किती होता?
शाळेच्या गेटजवळची बसलेली.चिंच,बोरवली बाई नेहमीच असायची, हातात टोपली घेऊन. तिच्या टोपलीतल्या लालबुंद बोरांच्या गंधाने शाळेच्या तासांना थोडं विरंगुळा दिला. शाळेची घंटा वाजली की, मुलं धावत तिच्याकडे जाऊन तिच्या हातात पैसे टाकत, त्या टोपलीतून बोरं घेत असत. पण त्याहून मोठं आश्चर्य म्हणजे बोरवली बाईची हसरी आणि प्रेमळ नजर. त्या छोटे-छोटे बोरांचा स्वाद आणि त्या वेळी बोरवली बाईला दिलेलं हसू आमच्या शाळेच्या आठवणीत सुद्धा एक खास स्थान घेऊन जातं.
तिच्या बोरांची चव जणू जीवनाच्या सगळ्या गोड आठवणींसारखीच ताजं, स्वच्छ आणि निरागस होती. आणि तिच्या छोट्या गोड गोष्टींबद्दल आमचं मन अजूनही हळवं होतं. त्या बोरवलीला पाहून शाळेच्या दारात, शाळेच्या पायऱ्यांवरचं बालपण जणू गोड आठवणी जिवंत होतात.
शिक्षक वर्गात नाहीत याचा आनंद
वर्गात उत्सवासारखा असायचा.
कधी खिडकीतून बाहेर बघून स्वप्नं रंगायची,
तर कधी मित्राचं टिफिन चोरून खाण्यात मजा वाटायची.
मधल्या सुटीचा गोंगाट...
रिकामं तास, आज शिक्षिका आल्या नाहीत,
वर्गातल्या आवाजांचे ते स्वर... आजही आठवतात.
शिक्षकांच्या येण्याची पावलं जरी ऐकू आली,
तरी एकच हाक – "श्श्श! मॅडम आल्या!"
पण त्या थांबल्या नाहीत – म्हणून पुन्हा धम्माल सुरू!
.
"आजही डोळ्यांसमोर ते चित्र तरळतं… शाळेचा पांढरा गणवेश, ताठ उभे विद्यार्थी, चेहऱ्यावर देशभक्तीचा तेजस्वी अभिमान. मैदानात तिरंगा फडकतो, त्याच्या प्रत्येक रंगात एकतेचं प्रतीक झळकतं. राष्ट्रगीताचे सूर हवेत घुमतात, आणि त्या क्षणांचे स्वर अजूनही मनाच्या खोलवर गुंजतात… जणू बालपणातलं देशप्रेम आजही हृदयात धडकतं."
शाळेचा शिक्षक दिन,
शाळेतला सर्वात खास दिवस म्हणजे शिक्षक दिन.
५ सप्टेंबरची सकाळ खास वाटायची.
दप्तरात गुलाबाचं फुल, ग्रीटिंग कार्ड ठेवून शाळेत जायचं.
मुख्य गेटपासूनच सजावट असायची.
सगळ्या वर्गांमध्ये फुगे, रिबिनी, रंगांची उधळण असायची.
मोठ्या मुलांना शिक्षकांची भूमिका द्यायची.
सर-मैडमसारखं शिकवताना खूप मजा यायची.
खऱ्या शिक्षकांनाही त्यात आनंद वाटायचा.
शाळेच्या सभागृहात छोटा कार्यक्रम व्हायचा.
विद्यार्थ्यांनी नृत्य, गाणी, भाषणं सादर करायची.
शिक्षकांसाठी प्रेमाने कविता म्हटल्या जायच्या.
त्या दिवशी शिक्षकांचं विशेष स्वागत व्हायचं.
कधी त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रूही दिसायचे.
त्या दिवसाचं वेगळंच समाधान असायचं.
शाळा संपली, पण तो दिवस आजही मनात तसाच जपलेला आहे.
गुरु पौर्णिमा – शाळेचा नम्र दिवस.
गुरु पौर्णिमेला वर्ग सुशोभित व्हायचा. फुलांची आरास, फळ्यावर "गुरुर्ब्रह्मा..." चा श्लोक, आणि मुलांच्या ओठांवर कृतज्ञतेचे शब्द. आम्ही शिक्षकांच्या पाया पडायचो, तेव्हा त्यांच्याही डोळ्यांत अभिमान दिसायचा. कोण कविता म्हणायचं, कोण गाणं गाणार यावर आधीच चर्चा झालेली असायची. आणि शेवटी मिळणाऱ्या पेढ्याचा आनंद निराळाच! आजही त्या चरणावर नतमस्तक व्हावे. आणि त्या शाळेच्या मातीला स्पर्श करून कृतज्ञ व्यक्त करता यावी. हया या आठवणी आजही मनाला गारवा देतात.
दर महिन्याला नवी तयारी, नवीन उत्सव!
त्या दिवसांतले आवाज, उत्साह, शिक्षकांचे प्रोत्साहन, आणि मित्रांची साथ – आजही मनात घुमते.
वर्षाच्या शेवटी एक असा दिवस येतो... आपला वर्ग रिकामा होतो. आपली वही, आपले खोडरबर, टेबलावरच्या खूणा — सगळं मागे राहतं.
आपल्या जागांवर आता नवीन मुले बसतात, नव्या स्वप्नांनी भरलेले डोळे घेऊन. आपण पुढे जातो, पण त्या बाकावरच्या आठवणी मात्र तिथंच थांबतात — आपली वाट पाहत!
शाळेची परीक्षा संपली… आणि दहावीचा तो अखेरचा दिवस."
ते शेवटचं पान, शेवटचा पाढा, शेवटचा घंटानाद. वर्गाच्या भिंतीवरच्या आकडेमोडी आज जरा अधिक शांत वाटत होत्या, आणि बाकंही जणू काही आपल्यासाठीच रडत होती. शेवटचा डबा आम्ही पायऱ्यांवर उघडला – कुणीही काही खाल्लं नाही खरं तर, पण त्या ताटात आठवणी भरल्या होत्या. शेवटची चेष्टा केली, पण हसण्यातून डोळ्यांतलं पाणी ओघळू नये म्हणून सगळ्यांनी मान थोडी वाकवली.
त्या पायऱ्यांवर उभं राहून आम्ही ग्रुप फोटो काढला. कुणाच्या तरी मोबाईलचा सेल्फी मोड, कुणाच्या हातात खडूस बाईंची आठवण ठेवणारा स्केचपेन. फोटोत सगळे हसत होते… पण त्या हसऱ्या चेहऱ्यांमागे लपलेले अश्रूकोणालाच दिसले नाहीत.
त्या क्षणी कुणीच काही बोललं नाही… एकमेकांकडे पाहिलं, आणि फक्त डोळ्यांनी निरोप दिला. तिथून निघताना कोणी ‘बाय’ म्हणालं नाही, पण मनातल्या एका कोपऱ्यात सर्वांनी ‘पुन्हा भेटू’ असंच म्हटलं होतं.
शाळेचा शेवट, किती गोड होता, तरी मनाच्या गहिर्या कोपर्यात एक संकोच होता – हा थांबवलेला आणि निघालेला निरोप होता.
. त्या प्रत्येक क्षणाचा गारवा, त्या आठवणींचा गारवा… ज्या शाळेने आपल्याला आयुष्य शिकवलं, त्या शाळेच्या आठवणीचे गारवे सगळ्या शरीरात संचारले. आजही त्या पायऱ्यांवर बसून विचार करत असतो, "कदाचित पुढच्या वळणावर पुन्हा आपल्याला त्या शाळेची गोडी अनुभवता येईल."
शाळेच्या आठवणी... खरंच, किती गारवा देतात!"
कितीही लाखो-करोडो रुपये खर्च केले तरी त्या आठवणी विकत घेता येत नाहीत. त्या शाळेच्या जुन्या बाकावर बसून केलेली चेष्टामस्करी, मित्रांच्या खांद्यावर डोकं ठेवून रडलेले क्षण, शिक्षकांच्या प्रेमाने केलेली शिक्षा, डब्बा वाटताना तयार झालेली मैत्री… या सगळ्या आठवणी आज मनात बंदिस्त आहेत, पण त्यांचा गारवा मात्र अजूनही मनाला दरवेळी हसवून जातो.
"...शाळेच्या दारातून बाहेर पडलो तेव्हा, मागे वळून शेवटचं पाहिलं… जणू ती पायऱ्या, ते खोडलेले बाक, तो फळा आणि त्या वर्गखोल्या मला निरोप देत होत्या. डोळ्यांत नकळत धूसर झालं होतं… पण मनात एक गोष्ट स्पष्ट होती — बालपण गेलं असलं, तरी ते शाळेच्या प्रत्येक कोपऱ्यात अजूनही तसंच श्वास घेतंय. त्या आठवणींचा सुगंध अजूनही माझ्या श्वासात आहे… आणि कधीतरी पुन्हा, त्या पायऱ्यांवर बसायला मन ओढ घेत राहील… आयुष्यभर."
हया आठवणी म्हणजे आठवणी नसून, तेवढ्याच जिवंत ठेवलं गेलेलं एक विश्व आहे — जिथे काळ थांबतो, आणि मन परत त्या पायऱ्यांवर जाऊन बसतं."
तुमच्याही बालपणीच्या, शाळेच्या अशाच काही आठवणी असतील ना?
त्या आठवणी तुम्हाला आजही गारवा देतात का?
माझ्यासारखंच तुमचं मनही कधीमधी त्या पायऱ्यांकडे वळतं का?
कृपया तुमच्या आठवणी कमेंटमध्ये जरूर शेअर करा… कारण आठवणी शेअर केल्या की त्या अजूनच जिवंत होतात.
सौ तृप्ती देव
