लाइक शेयर एंड सब्सक्राइब
हास्य रस
“ सजना है मुझे सजना के लिये, जरा अपनी लटे सवार लू “ हे गाण गात आमच्या राणी साहेबाचा घर आवरण्याचा कार्यक्रम सुरू होता.
झाडू मारता मारता डांस स्टेप्स ची प्रैक्टिस आणि सोबतीला चेहऱ्याचे विचित्र हावभाव ह्यात नक्की कुठलेही काम व्यवस्थित होत नव्हते.पण हे काम तसं पण तिच्यासाठी सेकेंडरी होते. आपण एक दिवस एकदम फेमस होणार, तेव्हा पर्यंत या लोकांकडे काम करून त्याना उपकृत करतोय ह्याच भावनेने राणी सरकार रोज पाट्या टाकत असत.
“वहिनी तुमचा इंस्टा अकाउंट आहे का? मी खूप शोधला तुम्हाला इंस्टा वर पण तुम्ही काही भेटल्या नाही. कोणत्या नावाने आहे हो” आमची राणी सोफा झटकत झटकत विचारत होती
“ मी म्हटल नाहीग बाई. मला त्याची काही गरज नाही पडत. आणि तू काय करते ग इंस्टा वर?”
“काय ताई, तुम्ही इंस्टा वर नाही? बर मग निदान यूट्यूब वर आहे का अकाउंट?आणि फेसबुक?माणसाने कस अपडेट राहील पाहिजे. रोज नव्या नव्या रील्स वीडियो बघून माणूस अपडेट राहत बघा. किती माहिती मिळते.तुम्ही हुकमाची राणी चॅनल नाही पहिला का इंस्टा वर ? आपले २००० फॉलोअर आहे बर का. आणि तो गुलाबी साडी आणि लाली लाल लाल वाल्या वीडियो ला तर १०००० लाईक्स मिळाले.” राणी माझ्याकडे तुच्छतेचा कटाक्ष टाकून म्हणाली.
त्या रील्स बनवून काय मिळत ग “
“ ताई, बघाच तुम्ही एक दिवस मी पण फेमस होणार. इंस्टा स्टार हुकमाची राणी!” समोरच्या आरशात बघत डोळे फिरवत राणी म्हणाली
“ इकडे याच तुम्ही. आता तुम्हाला कस सगळं समजावून सांगाव लागत बघा. जग किती पुढे जातय. आणि तुम्ही अजून तिथेच. कस होणार ताई तुमचं? “ राणी सरकारानी आता मला “साक्षर “ करण्याचा विडा उचलला होता. आता समग्र प्रबोधन झाल्याशिवाय माझी सुटका नव्हती.
“ अग मी रिल्स बघते पण बनवत नाही”
“ काय ताई, तुम्ही कुठल्या जमान्यात वावरताय? आता त्या दिवशी नाही का सगळ्या सोसाइटी च्या बायका खाली हळदीकुंकवाला आल्या होत्या. तेव्हा नाही का त्या खाली वीडियो बनवत होत्या”
“ हो ग. मला ते काही जमलं नाही. एक तर नाचण्याची बोंब आणि त्यातून ते ओठ हालवत करायचे हावभाव मला जमेना. मग मी बाजूला जाऊन बसले बघ.”
“ हा ना तरीच त्या स्वाती ताई वाल्या रील मधे तुम्ही नव्हता. मी काय म्हणते माणूस हा कायम विद्यार्थी असतो. जलमभर शिकत राहतो. मी दुपारी येऊन शिकवू का तुम्हाला? जमेल हळूहळू तुम्हाला पण “ इति राणी सरकार
२ मिनिट माझ्यासमोर मोबाईल समोर साडीचा पदर फडकवत, आपल्या स्थूल देहाचा भर सांभाळत , मुरकणारी आणि लिपसिंक करणारी माझी तुंदीलतनू मूर्ती आली आणि समोर प्रेक्षक म्हणून बघणारे आणि पोट धरून हसणारे नवरा आणि मूले दिसले आणि मी घाबरून नको नको ओरडले.
“ असंच असत बघा ताई तुमचं. किती मज्जा येते रील बनवायला.तुमच्या शेजारच्या बायका बघा कसे स्टेटस अपडेट करतात, वीडियो बनवतात. पण तुम्ही नसता त्यात. लई वाईट वाटत मला. सगळ्या माझ्या मैत्रिणी पण म्हणतात की तुझ्या बाई साहेब अपडेटेड नाहीत.आता मी ठरवलंय तुम्हाला इंस्टा अकाउंट उघडून देते बघा “
आज राणीसरकार मला अपडेट करूनच सोडणार अस दिसत होते
“ बर बर आता कामाला तर लाग. आपण नंतर बघू काय ते “
राणी नाईलाजाने भांडी घासायला वळली.
नकळत मी माझा मोर्चा इंस्टाग्राम कडे वळवला.
काही उपयोगाचे असले तरी काही वीडियो म्हणजे अगदी डोक्याला ताप देणारे असतात.
एक जाडा सा चाळीशीतला पोट सुटलेला माणूस कृष्णाचा ड्रेस घालून तोंडाला लोणी लावून कॅमेर्यासमोर नाचत बोलतो “मैया मोरी मै नाही माखन खायो “ खाली कमेंट येते “हे प्रभू उसकी छाती पे बाण मारो”😃😃
आता पर्यंत टूथपेस्ट चा उपयोग केवळ दात घासण्यासाठी अशी माझी समजूत ह्या इंस्टा च्या रिल्स नी अगदी धुळीला मिळवली. पायापासून चेहऱ्यापर्यंत सार काही चकाचक करायला ती वापरतात हे इंस्टा नी सांगितल. तीच गत बेकिंग सोडा, कॉफी टमाटर, लिंबू, बेसन अशा वाण सामानाची. केस सरळ करायचे तांदूळ वापर, कोरियन ग्लो हवाय तांदूळ वापर. आता सगळं वाण सामान शरीरावर खर्च केल तर पोटात काय ढकलायचं कंदमुळे?
त्यात AI तर अजून च कमाल करत. त्यांनी सगळ्या निर्जीव वस्तूना प्राण दान देऊन टाकलाय. दिवाळीत सगळा फराळ सजीव होऊन रैंप वॉक करत होता. खोबरेल तेल मधूनच किंचाळत येत “ मै नारियल तेल हू रे” खोकल्यासाठी अदरक येऊन सांगत” मै अद्रक हू रे, मुझे शहद मे डाल कर खाओ.” इंस्टा डॉक्टर आणि होम मेड रेमेडीज चा तर नुसता सुळसुळाट झालाय.
कुठलाही गाण फेमस झाल की लगोलग त्यावर रील्स बनवायची चढाओढ लागते. ना शोभणारे कपडे आणि भयंकर अंगविक्षेप करून त्यांची हौस फिटते पण आमचं काय राव?
लाइक सब्सक्राइब आणि शेयर च्या ह्या जमान्यात मनोरंजनाच्या नावाखाली चाललेल्या माकडचाळ्यांनी उरात धडकीच भरते.
पूर्वी जरा बर होते. प्रत्येकजण आपापली भूमिका इमाने इतबारे निभावत असे. सण वार, व्रत वैकल्य सारी सारी नीटपणे आपापल्या दिवशी यायची आणि निभावली जायची. पूजा पाठ,सुग्रास भोजन, आरास, तयारी सार काही व्हायचं की निमूटपणे.पण हे लाइक सब्सक्राइब आणि शेयर आलं आणि पुरता गोंधळ झाला.
प्रत्येक सणाची एक आपापली तिथी असते तो सण त्या त्या दिवशी साजरा करावा की नाही पण advance सेलेब्रेशन चा सुळसुळाट झालाय.
हैप्पी दिवाळी इन एडवांस, हैप्पी होळी इन advance, हैप्पी न्यू ईयर इन एडवांस, हैप्पी दसरा इन एडवांस अस सगळं सगळं अगदी एडवांस मधे दारापर्यंत येऊन पोचत.नशीब अजून जयंती पुण्यतिथी एडवांस मधे नाही येत.अजून दिवाळी ची साफसफाई बाकी आहे, फराळाचं बाकी आहे पण लोकांनी पाठवलेलं हैप्पी दिवाळी इन एडवांस पाहून आपण आळशी असल्याचा फील येतो. साफसफाई, शॉपिंग, फराळ सार तर अजून बाकीच असत माझं आणि इकडे हैप्पी हैप्पी सुरू होऊन जातं.खरतर आपला नियोजन परफेक्ट असतं पण एडवांस घाबरवून सोडत.
एकदा हातात मोबाईल घेऊन बसलं की ब्रह्मानंदी टाळी लागतेच आणि घड्याळातली पलपल कुमारी सुसाट वेगाने पळते आणि घरातील काम माझी वाट बघत राहतात.
परवा एका लग्नाला गेलो होतो, तिथे मूळ लग्नाचे विधी जरा बाजूला पडले होते आणि फोटोग्राफर ने शो हायजॅक केला होता. सजलेले वधूवर त्या क्षणाच पावित्र्य अनुभवायच्या आधीच फोटोग्राफर पोज़ सुचवत होता. तरुणाई ही फोटो सेशन मध्ये बिझी आणि बायका ही कलर कोड फॉलो करत रील्स बनवण्यात व्यस्त. अगदी जवळचे नातेवाईक आणि आई बाप सोडल्यास बहुतेक लोकाना उदरभरण ( ते महत्वाचे) आणि रील्स फोटो मधे जास्त इंटरेस्ट. प्री वेडिंग शूट, संगीत मेहंदी वधू वराची एंट्री सारे काही जणू सूरज बडजात्या चा सिनेमा. साधा सरळ सोपे काहीच नाही सगळं काही चकचकीत आणि डोळ्याचं पारण फेडणार.प्रत्येक इवेंट चा लुक ठरलेला आणि तो जोपासण्यासाठी किती पण वेळ लागला तरी चालेल कारण नंतर फोटो / रील अपलोड करून किती लाइक कमेंट येतात ते ठरवणार ना कसं दिसतोय आपण. माहीत नाही कसं आपल्या आई ला बाबाचा एक प्रेमळ कटाक्ष, कौतुकाची नजर पुरेशी असायची छान दिसतेस सांगणारी. आज कुठे गेले,काय खाल्ल, कुणाला भेटले सार सार पल पल ला अपडेट करणार. काही सो कॉल्ड रील स्टार तर आपला अख्खा दिवसाचा रूटीन शेयर करतात समस्त जगाला. अग बाई काही तरी खाजगी शिल्लक ठेवशील का स्वतःपाशी असं ओरडून सांगाव वाटतं अशा वेळी.
“ ताई झालं बघा सगळं काम. चला बनवूया का वीडियो? मी शिकवते तुम्हाला. तसं तसं करा. “ राणी सरकार बोलल्या तशी मी तंद्रीतून जागी झाले
मी म्हटलं “ बाई ग, मला आपली अशीच राहू दे अशीच. मला हे सगळं जमेल अस नाही वाटत. मी तुझेच रिल्स बघेन.”
नाक मुरडत राणी सरकार निघून गेल्या.
पाचव्या मिनिटाला राणी ने नवी रील पाठवली होती मला जी तिने माझ्याच घरी बनवली होती.आणि पुढचा तिचा एक यूट्यूब वीडियो आणि सोबत एक मेसेज
“ ताई, प्लीज़ लाइक शेयर एंड सब्सक्राइब “
