भुताचे गावं
तळखंड,
आज तळखंड हे नाव फक्त आठवणीत उरलं आहे.
पण एकेकाळी ते गाव निसर्गाच्या कुशीत विसावलेलं स्वर्गासारखं होतं.
गावाभोवती हिरवीगार शेती होती. पावसाळ्यात तर संपूर्ण परिसर जणू हिरव्या शालीत गुंडाळला जायचा. गावाशेजारून वाहणारी छोटी नदी उन्हाळ्यातही पूर्ण आटत नसे.
संध्याकाळी गुरं परत यायची. मंदिरातील घंटा वाजायची. चुली पेटायच्या. स्त्रिया अंगणात रांगोळ्या काढायच्या.
गावात मारोतीचं सुंदर मंदिर होतं. ते गावाचं हृदय होतं.
गावात कुणबी पाटील आणि महार समाज मोठ्या गुण्यागोविंदाने राहत होता. कुणाच्या घरात दुःख असलं तर सगळं गाव धावून जायचं.
पण…
एका चुकीने सगळं संपलं.
गावातील मोरे पाटील देवभक्त माणूस होता. पण त्याचा काळ्या शक्तींवरही विश्वास होता. त्याची ओळख एका तांत्रिकाशी झाली.
तो तांत्रिक दूर जंगलात राहून “मशान जागृत” करण्याची विद्या शिकून आला होता.
श्मशानातील मृत आत्म्यांना जागृत करून त्यांच्याकडून काम करून घेणे, ही त्याची विद्या होती.
एके रात्री पाटलाने त्याला गावात बोलावलं.
तांत्रिकाच्या मनात अहंकार होता. स्वतःच्या शक्तीची परीक्षा घ्यायची होती.
अमावस्येची रात्र होती.
आकाश काळ्या ढगांनी भरलं होतं.
श्मशानात मोठी पूजा मांडली गेली.
मंत्रोच्चार सुरू झाले.
रात्र जसजशी गडद होत गेली तसं वातावरण बदलू लागलं.
वारं थंड झालं.
श्मशानातील वडाची झाडं हलू लागली.
अचानक…
जमिनी खालून विचित्र आवाज येऊ लागले.
तांत्रिकाने डोळे उघडले.
आणि त्याच्या चेहऱ्यावर भय आणि आनंद एकाच वेळी उमटलं.
मृत आत्मे जागृत झाले होते.
सुरुवातीला तांत्रिक आनंदी झाला.
पण काही क्षणातच त्याच्या लक्षात आलं, त्याने फार मोठी चूक केली आहे.
जागृत झालेले आत्मे त्याच्या समोर उभे राहिले.
काहींच्या अंगावर माती होती.
काहींचे डोळे नव्हते.
काहींच्या मान वाकड्या होत्या.
आणि त्यांनी एकच प्रश्न विचारला.
“काम सांग...”
तांत्रिक गोंधळला.
त्याने याचा विचारच केला नव्हता.
भुतांना काम दिलं नाही तर ती त्याच्यावर तुटून पडतील हे त्याला माहित होतं.
घामाने त्याचं शरीर भिजलं.
त्याला हेही जाणवलं,त्याला आत्म्यांना पुन्हा शांत करण्याची विद्या येत नाही.
त्या रात्री तो जीव वाचवून गावातून पळून गेला.
आणि तळखंड गावावर संकट कोसळलं.
आता त्या आत्म्यांवर कोणाचाही ताबा राहिला नव्हता.
रात्री विचित्र घटना घडू लागल्या.
बायका जात्यावर दळत बसल्या असताना अचानक कोणीतरी मागून येऊन हातभार लावायचं.
घरातली कामं व्हायची.
पण कोणी बोलत नसे.
फक्त शांतपणे काम करून निघून जायचं.
लोकांना संशय येऊ लागला.
एके रात्री एका बाईने धैर्य करून मागे पाहिलं.
आणि तिच्या तोंडून किंकाळी फुटली.
कारण…
त्या स्त्रीचे पाय उलटे होते.
त्या दिवसापासून गावात भीतीचं साम्राज्य सुरू झालं.
लहान मुलं रात्री रडू लागली.
गुरं अस्वस्थ झाली.
कुत्री रात्री ओरडू लागली.
गावातील लोक आजारी पडू लागले.
शेती बंद झाली.
उपासमारी सुरू झाली.
आणि मृत्यू गावात फिरू लागला.
एके दिवशी मारोती मंदिरामागच्या विहिरीत गावातील एक माणूस मृत अवस्थेत सापडला.
त्या घटनेने गाव हादरलं.
लोक आता खात्रीने म्हणू लागले.
“गावावर भुतांचा शाप आहे.”
गावात सभा भरली.
शेवटी निर्णय झाला.दुसरा, अधिक शक्तिशाली तांत्रिक आणायचा.
दोन दिवसांनी एक मोठा तांत्रिक गावात आला.
उंच शरीर.
काळी वस्त्रं.
लाल डोळे.
गळ्यात कवट्यांची माळ.
लहान मुलं त्याला पाहून रडू लागली.
तो गावभर फिरला.
श्मशान पाहिलं.
आणि त्याच्या चेहऱ्यावरील आत्मविश्वास क्षणभर ढासळला.
कारण श्मशानाखाली एकही मृतदेह शिल्लक नव्हता.
सगळे गायब झाले होते.
तरीही तो हसला.
श्मशानाकडे पाहत मोठ्याने म्हणाला..
“आज खाऊन पिऊन घ्या… उद्या तुम्हाला मुक्ती देणार आहे.”
त्या शब्दांनी गावकऱ्यांच्या अंगावर काटा आला.
अमावस्या होती.
गाव शांत होतं.
पण प्रत्येक घरात भीती जागी होती.
तांत्रिकाने काळे वस्त्र घातले.
पूजेचं सामान घेतलं.
आणि श्मशानाकडे निघाला.
तेवढ्यात एक काळी मांजर रडत त्याच्या रस्त्यातून गेली.
तो अपशकुन होता.
तांत्रिक थांबला.
त्याने मंत्र म्हटले.
क्षणात मांजर खाली कोसळली.
आता रात्र अधिक भयाण झाली होती.
घुबडांचे आवाज…
वाऱ्याचा सणसणाट…
रातकिड्यांचा कर्कश आवाज…
दूर चमकणाऱ्या विजा…
तांत्रिक पुढे जात होता.
पण दोन तास उलटले तरी तो त्याच जागी फिरत होता.
तो “चकव्याच्या” फेऱ्यात अडकला होता...
अचानक त्याला मागून आवाज येऊ लागले.
किंकाळ्या…
रडणे…
हाडं तुटल्यासारखे आवाज…
त्याच्या गुरूंचे शब्द कानात घुमू लागले —
“या विद्येत चुकीला माफी नाही…”
तांत्रिक घाबरला.
त्याचा आत्मविश्वास तुटू लागला.
अचानक मुसळधार पाऊस सुरू झाला.
पूजेचं साहित्य वाहून गेलं.
दिवा विझला.
सगळं संपलं.
तांत्रिक जीव वाचवण्यासाठी अंधारात पळू लागला...
सकाळ झाली.
गावकरी तांत्रिकाची वाट पाहत होते.
तेवढ्यात एक तरुण धावत आला.
“तांत्रिक बाबा सापडले…”
क्षणभर आशा निर्माण झाली.
पण पुढचे शब्द ऐकून सगळे गोठले.
“तांत्रिक बाबाने वडाच्या झाडाला फाशी घेतली आहे…”
श्मशानात तांत्रिकाचा मृतदेह लटकत होता.
त्या दिवसानंतर गाव रिकामं होऊ लागलं.
लोक गाव सोडून गेले.
चुली विझल्या.
देवळात घंटा थांबली.
आणि…
तळखंड नावाचं गाव इतिहासात हरवलं.
आजही तळखंडच्या भग्न अवशेषांमध्ये वारा हुंदके देतो.
मारोतीचं मंदिर अजून उभं आहे.
पण अमावस्येच्या रात्री तिथे कोणी जात नाही.
कारण…
लोक म्हणतात ,
आजही तिथे उलट्या पावलांचे आवाज ऐकू येतात…
प्रवीण ज्यो. तायडे.
अमरावती
