जुगार
अचलपूर तालुक्यातील तोंडगाव हे एक छोटेसे गाव. गाव साधे होते, लोक मेहनती होते आणि कष्टावर जगणारे होते. त्या गावात तंतरपाळे आडनावाचे एक कुटुंब राहत होते. त्या कुटुंबात छालीकराम तंतरपाळे नावाचा एक तरुण राहत होता. नुकतेच त्याचे लग्न झाले होते. संसाराची सुरुवात झाली होती, डोळ्यांत स्वप्नं होती, पण हातात काम नव्हते. गावात रोजगाराची साधने फार कमी होती. त्यामुळे घरात नेहमी पैशावरून वाद होत असत. गरिबी माणसाला फक्त आर्थिकदृष्ट्या नाही तर मानसिकदृष्ट्याही कमकुवत बनवते.
छालीकराम मेहनती होते, पण त्यांना लवकर पैसा कमविण्याची घाई होती. त्याच काळात गावात बावनपत्तीचा जुगार मोठ्या प्रमाणात चालत असे. रात्रीच्या अंधारात काही लोक एकत्र बसत आणि पैशांचे डाव रंगत. सुरुवातीला छालीकराम फक्त पाहत होते. पण हळूहळू त्यांच्या मनात एक विचार रुजू लागला —
“जे लोक दोन-तीन तासांत एवढे पैसे कमवतात, तेव्हा दिवसभर कष्ट करण्याची गरज काय?”
याच विचाराने त्यांच्या आयुष्याला चुकीच्या मार्गावर नेले.
जुगार खेळणाऱ्यांना नेहमी पोलिसांची भीती असायची. त्यांना सुरक्षित जागेची गरज होती. त्याच वेळी छालीकराम यांच्या डोक्यात एक कल्पना आली. त्यांनी स्वतःचे घर पैशाने जुगार खेळण्यासाठी देण्याचे ठरवले. त्यांना वाटले की, “आपण स्वतः खेळत नाही, फक्त जागा देतोय. यात काय चुकीचे आहे?”
दुसऱ्याच दिवसापासून त्यांच्या घरात जुगाराचे डाव रंगू लागले. सुरुवातीला सर्व काही व्यवस्थित चालले. घरात पैसे येऊ लागले. काही दिवसांतच आर्थिक परिस्थिती सुधारल्यासारखी वाटू लागली. घरात नवीन वस्तू आल्या. लोकही त्यांच्याकडे वेगळ्या नजरेने पाहू लागले.
पण जुगारातून येणारा पैसा हा शांततेचा नसतो; तो विनाशाची चाहूल घेऊनच येतो.
एका रात्री एक जुगारी खूप पैसे हरला. पैशासोबत त्याचा अहंकारही हरला होता. मनात राग निर्माण झाला. सूडाच्या भावनेतून त्याने पोलिसांना खबर दिली.
एक दिवस अचानक पोलिसांनी छालीकराम यांच्या घरावर धाड टाकली.
घरात चालणारा जुगार पकडला गेला. काही जुगारी आणि घरमालक म्हणून छालीकराम सुद्धा अडकले. त्या काळी पोलिसांची खूप दहशत होती. लोक अशिक्षित होते. कायद्याचे ज्ञान नव्हते. पोलिसांनी सांगितलेली प्रत्येक गोष्ट लोकांना खरी वाटत असे.
याच भीतीचा फायदा काही पोलीस घेत असत.
कोर्टात केस जाण्याआधीच आरोपींना मानसिक आणि आर्थिकदृष्ट्या तोडले जात असे. “मोठी शिक्षा होईल”, “फाशी होऊ शकते”, “जेलमध्ये टाकू” अशा धमक्या देऊन पैसे उकळले जात. छालीकराम घाबरले. त्यांनी घरातील सोनं-नाणं विकलं. शेत विकलं. घर गहाण ठेवलं. संसाराची एकेक वीट विकली जाऊ लागली.
शेवटी कोर्टात केस जिंकली खरी…
पण तोपर्यंत त्यांच्या हातात काहीच उरले नव्हते.
ज्या पैशासाठी त्यांनी जुगाराला आसरा दिला होता, त्याच पैशाने त्यांना रस्त्यावर आणले. गावात मान कमी झाला. लोक कुजबुजू लागले. घरातील सुख-शांती संपली. पत्नीच्या डोळ्यांत चिंता होती. संसार उद्ध्वस्त झाला होता.
त्या दिवशी छालीकराम यांना एक गोष्ट समजली —
“जुगारात जिंकणारा माणूस दिसतो, पण शेवटी हरतो मात्र संपूर्ण कुटुंब.”
जुगार हा फक्त पैशांचा खेळ नसतो. तो माणसाची विचारशक्ती हिरावून घेतो. सुरुवातीला तो सोपा पैसा वाटतो, पण हळूहळू तो घर, जमीन, नाती, प्रतिष्ठा आणि मनःशांती सर्व काही खाऊन टाकतो.
छालीकराम यांनी शेवटी तोंडगाव सोडण्याचा निर्णय घेतला. ज्या गावात त्यांनी संसाराची स्वप्नं पाहिली, त्याच गावातून त्यांना रिकाम्या हाताने निघावे लागले. ते कामाच्या शोधात भटकत चांदूर बाजार तालुक्यातील अब्दलपूर येथे आले. सासरच्या लोकांच्या आधाराने त्यांनी पुन्हा संसार उभा करण्याचा प्रयत्न सुरू केला.
त्यांची पत्नी चंद्रभागा खूप कष्टाळू आणि समजूतदार होती. तिने प्रत्येक संकटात नवऱ्याची साथ सोडली नाही. दोघांनी मेहनत करून पुन्हा छोटेसे घर बांधले. संसार पुन्हा सुरू झाला. त्यांना तीन अपत्ये झाली — बैनाबाई, हनुमंतराव आणि सुरेश.
छालीकराम आयुष्यभर एक गोष्ट विसरू शकले नाहीत —
“कष्टाने मिळालेला कोरडा भाकराचा तुकडा सुद्धा सुख देतो; पण जुगारातून आलेला पैसा शेवटी माणसाला रडवून जातो.”
ते पुढे गावातील तरुणांना नेहमी सांगत असत —
“जुगार सुरुवातीला खेळ वाटतो, पण शेवटी तो आयुष्याशी खेळतो.”
