Back to Book Details Report Reviews

अक्षय

अक्षय आज खूप रडला होता…
कारण आज त्याच्या आयुष्याने पहिल्यांदाच त्याच्या पाठीवर थाप मारली होती.
पोलीस खात्यात त्याची निवड झाली होती.
हातात निवडीचं पत्र होतं, पण डोळ्यांसमोर मात्र संपूर्ण भूतकाळ उभा होता.
जणू प्रत्येक दुःख आज त्याच्या डोळ्यांतून अश्रू बनून बाहेर पडत होतं.
अक्षय फक्त तीन वर्षांचा होता, तेव्हा त्याच्या बाबांचं निधन झालं.
घरात अचानक अंधार पसरला.
आई तरुण होती… चेहऱ्यावर अजून तारुण्य होतं, पण कपाळावरचं कुंकू पुसलं गेलं होतं.
गावातल्या लोकांच्या नजरा, नातेवाईकांचे सल्ले, आणि भविष्याची चिंता…
आईच्या मनात रोज वादळ उठत होतं.
अखेरीस तिच्या आई-वडिलांनी तिचं दुसरं लग्न लावून दिलं.
त्यांनाही वाटलं, “मुलीचं आयुष्य अजून पडलंय.”
पण त्या नव्या संसाराने छोट्या अक्षयला स्वीकारलं नाही.
कारण एकच होतं —
“हा मुलगा राहिला तर उद्या संपत्तीत वाटा मागेल.”
आणि एका दिवशी, आईने डोळ्यांत पाणी आणून अक्षयला हॉस्टेलमध्ये सोडलं.
त्या दिवशी अक्षय तिचा हात घट्ट पकडून होता.
त्याला काही समजत नव्हतं, पण एवढं मात्र कळत होतं की —
“आई मला सोडून चालली आहे.”
आई दूर जात होती…
आणि अक्षय हॉस्टेलच्या गेटजवळ उभा राहून तिच्याकडे पाहत होता.
ती दिसेनाशी झाली, तरी तो बराच वेळ तिथेच उभा होता.
त्या दिवसापासून तो शांत झाला.
इतर मुलं आई-वडिलांशी फोनवर बोलायची, सुट्टीत घरी जायची.
पण अक्षय मात्र हॉस्टेलच्या खिडकीतून बाहेर बघत बसायचा.
रात्री कधी आईची आठवण आली की, तो चादरीत तोंड लपवून रडायचा.
त्याच्या रडण्याचा आवाज कुणालाच ऐकू जात नव्हता.
आई तिच्या नव्या संसारात जगत होती, पण नियतीला तेही मान्य नव्हतं.
तिला टीबी झाला.
आजाराने तिचं शरीर खंगत गेलं.
शेवटच्या दिवसांत ती फक्त एकच गोष्ट बोलायची —
“मला माझ्या लेकराला एकदा पाहायचं आहे…”
पण नियतीने ती भेटही होऊ दिली नाही.
आई गेली.
ही बातमी जेव्हा अक्षयला समजली, तेव्हा तो बराच वेळ काहीच बोलला नाही.
त्याच्या डोळ्यांत अश्रू नव्हते…
कारण दुःख इतकं मोठं होतं की, अश्रूंनाही वाट मिळत नव्हती.
त्या दिवसापासून अक्षय आतून पूर्ण तुटला.
आता त्याच्या आयुष्यात उरली होती फक्त त्याची आजी.
वृद्ध शरीर… थरथरणारे हात…
पण नातवासाठी तिच्या मनात अथांग माया होती.
ती त्याच्यासाठी भाकरी बनवायची, त्याच्या डोक्यावरून हात फिरवायची आणि म्हणायची 
“बाळा, घाबरू नको… मी आहे ना.”
अक्षयसाठी तीच आता आई होती.
शाळेतून आल्यावर तो सरळ आजीकडे जायचा.
तिच्या मांडीवर डोकं ठेवून शांत पडून राहायचा.
आजीच्या सुरकुतलेल्या हातात अशी माया होती की, त्याचं सगळं दुःख काही वेळासाठी विसरलं जायचं.
पण काळाला तेही पाहवलं नाही.
कोविडच्या काळात आजीलाही संसर्ग झाला.
अक्षय तिच्यासाठी धावत होता, औषधं आणत होता, देवाला प्रार्थना करत होता…
पण एक दिवस आजीही त्याला सोडून गेली.
त्या दिवशी अक्षय खरंच अनाथ झाला.
घरात आता शांतता होती.
ना आईचा आवाज…
ना आजीची माया…
फक्त एकटेपणा.
तरीही तो थांबला नाही.
तो दहावी पास झाला.
हॉस्टेलमध्ये आता त्याचं मन लागत नव्हतं.
म्हणून तो गावाकडे परत आला.
घरी फक्त मामा होता.
गरिबी होती.
स्वयंपाक करायला कोणी नव्हतं.
कधी उपाशी पोटी झोपावं लागायचं, तर कधी पाण्यावर दिवस काढावे लागायचे.
पण या दुःखाने त्याला कमकुवत केलं नाही…
उलट मजबूत बनवलं.
एक दिवस त्याने आरशात स्वतःकडे पाहिलं आणि मनाशी ठरवलं —
“आता आयुष्य बदलायचं.”
त्याने होमगार्डची नोकरी धरली.
कधी दिवसभर ड्युटी…
कधी बांधकामावर मजुरी…
कधी कुणाच्या शेतात काम…
मिळेल ते काम करून तो स्वतःला उभं करत होता.
रात्री थकलेलं शरीर घेऊन तो मैदानावर धावायचा.
पोलीस भरतीची तयारी करायचा.
अनेक वेळा तो अपयशी ठरला.
कधी धावण्यात कमी पडला…
कधी गुण कमी पडले…
कधी नशिबाने साथ दिली नाही.
लोक हसायचे.
“तुझ्याने नाही होणार…”
हे शब्द त्याच्या कानावर पडायचे.
पण त्याने हार मानली नाही.
रात्री एकटाच रडायचा…
आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा मैदानावर उतरायचा.
कारण त्याच्याकडे गमावण्यासारखं काहीच उरलं नव्हतं.
आणि एक दिवस…
त्याच्या आयुष्याचा सूर्य उगवला.
पोलीस भरतीचा निकाल लागला होता.
अक्षयचं नाव यादीत होतं.
तो बराच वेळ त्या कागदाकडे पाहत राहिला.
त्याचे हात थरथरत होते.
डोळ्यांतून अश्रू वाहत होते.
त्याला आई आठवली…
आजी आठवली…
त्याला वाटलं,
आज त्या दोघी असत्या तर किती आनंद झाला असता.
काही दिवसांनी ट्रेनिंग पूर्ण झालं.
तो दिवसही आला, ज्या दिवशी त्याने पहिल्यांदा पोलीस गणवेश अंगावर चढवला.
आरशासमोर उभा राहून तो स्वतःकडे पाहत होता.
लहानपणी हॉस्टेलच्या कोपऱ्यात रडणारा मुलगा…
आज खांद्यावर पोलीस खात्याची जबाबदारी घेऊन उभा होता.
त्याने हळूच टोपी डोक्यावर ठेवली.
डोळ्यांत पाणी आलं.
मनात शब्द उमटले 
“आई…
तुझा मुलगा आज पोलीस झाला…”
तो लगेच गावात गेला.
सर्वप्रथम तो आई आणि आजीच्या स्मशानाजवळ गेला.
मातीत हात ठेवून तो खूप वेळ रडत राहिला.
“आजी…
तू म्हणायचीस ना, माझा नातू मोठा माणूस होईल…
बघ, आज तुझा नातू पोलीस झाला…”
वारा शांत वाहत होता.
जणू आई आणि आजी दोघीही त्याच्या डोक्यावरून हात फिरवत होत्या.
त्या दिवशी अक्षय एकटा नव्हता…
कारण त्याच्या यशात त्याच्या आईचे अश्रू,
आजीची माया,
आणि त्याच्या संघर्षाची आग जिवंत होती.


प्रविण ज्यो तायडे 

अमरावती 

Reviews


Your Rating

blank-star-rating

Left Menu