Back to Book Details Report Reviews

मी जिंकलोय!

मी जिंकलोय!

एका बापाच्या विश्वासाची आणि मुलाच्या स्वप्नांची कहाणी

पावसाळ्याचे दिवस होते. आकाशात काळे ढग दाटून आले होते. संध्याकाळी अमरावतीहून एक बस नागपूरच्या दिशेने धावत होती. त्या बसमध्ये दोन प्रवासी शांतपणे बसले होते – एक तरुण मुलगा आणि त्याचे बाबा.

मुलाच्या चेहऱ्यावर थकवा होता, पण डोळ्यांत एक जिद्द होती. काही महिन्यांपूर्वी आर्मी भरतीत त्याला अपात्र ठरवण्यात आले होते. त्याच्यात काही शारीरिक कमतरता असल्याचे सांगण्यात आले होते. पण त्या दिवसापासून त्याने स्वतःला बदलण्याचा निर्धार केला होता.

नाकाचे ऑपरेशन झाले होते. शरीर अजूनही पूर्णपणे सावरले नव्हते. तरीही तो पुन्हा एकदा भरतीसाठी निघाला होता.

मनात त्याने एक निर्णय घेतला होता.

"जर यावेळी भरती झालो नाही, तर आयुष्यात पुन्हा कधी आर्मी भरती मारणार नाही."

रात्री ते नागपूरला पोहोचले. पैशांची तंगी होती. त्यामुळे त्यांनी हॉटेलमध्ये जाण्याऐवजी रेल्वे स्टेशनवर रात्र काढण्याचे ठरवले.

बाबांनी एक वर्तमानपत्र जमिनीवर अंथरले आणि स्वतः त्यावर झोपले. मुलाने खाली चादर टाकली. स्टेशनवर गार वारा वाहत होता. पावसाचे थेंब कधीमधी उडत होते.

बाबांना झोप लागत नव्हती.

ते अधूनमधून मुलाकडे पाहत होते.

"देवा, यावेळी माझ्या लेकराला यश दे," ते मनातच म्हणत होते.

पहाट झाली.

दोघांनी चहा घेतला आणि भरतीच्या मैदानाकडे निघाले.

गेटवर पोहोचल्यावर मुलाने कॉल लेटर दाखवले. सैनिकाने त्याला आत घेतले.

बाबा मात्र बाहेरच थांबले.

मुलगा आत गेला, पण त्याच्या नाकात प्रचंड वेदना होत होत्या. अधूनमधून नाकातून रक्त येत होते.

तरीही त्याची जिद्द कमी झाली नव्हती.

पहिली परीक्षा होती – रनिंग.

"रेडी... गो!"

शिट्टी वाजली आणि सर्व मुलं धावू लागली.

तोही धावत होता.

शरीरात ताकद नव्हती.

पाय दुखत होते.

श्वास फुलला होता.

तरीही त्याच्या मनात एकच आवाज घुमत होता –

"आज थांबायचं नाही."

काही क्षणांनी तो रनिंगमध्ये पास झाला.

पण रनिंग संपताच नाकातून रक्त वाहू लागले.

गेटबाहेर उभे असलेले बाबा ते सर्व पाहत होते.

त्यांच्या डोळ्यांत पाणी आले.

पण ते काहीच करू शकत नव्हते.

त्या क्षणी मुलगा एकटाच लढत होता.

आणि त्याला जाणवले –

स्वतःला स्वतःने दिलेली मदत हीच जगातील सर्वात मोठी मदत असते.

पुढील परीक्षा सुरू झाल्या.

एक-एक करत तो सर्व परीक्षा देत गेला.

ताप वाढत होता.

शरीर थकले होते.

पण मन अजून हरले नव्हते.

आता वेळ होती उंची, वजन आणि छाती मोजण्याची.

त्याचा नंबर आला.

डॉक्टरांनी उंची मोजली.

सर्व काही बरोबर होते.

आता छाती मोजायची होती.

डॉक्टरांनी टेप लावली.

पण त्याने घाईत आधीच छाती फुगवली.

त्याला नियम समजला नाही.

पुन्हा संधी दिली.

पुन्हा तीच चूक.

क्षणात त्याला अपात्र घोषित करण्यात आले.

त्याचे सर्व स्वप्न एका क्षणात कोसळले.

तो डोळ्यांत अश्रू घेऊन बाहेर निघाला.

गेटबाहेरून बाबांनी त्याला पाहिले.

त्यांना सर्व समजले.

ते धावतच आत आले.

मुलगा त्यांच्या मिठीत कोसळला.

"बाबा… माझी छाती कमी भरली…"

बाबांनी काहीच उत्तर दिले नाही.

त्यांनी फक्त त्याचा हात धरला आणि सरळ अधिकाऱ्यांकडे घेऊन गेले.

ते म्हणाले –

"क्या मेरे बेटे की छाती कम है? स्वतच्या छातीवर हात मारत म्हणाले क्या मेरी छाती कम है?"

त्यांच्या आवाजात विश्वास होता.

जिद्द होती.

आणि एका बापाचे प्रेम होते.

अधिकाऱ्यांनी पुन्हा परीक्षा घेण्याचे आदेश दिले.

मुलाने पुन्हा तीच चूक केली.

डॉक्टरांना राग आला.

त्यांनी मुलाच्या गालावर जोरदार झापड मारली.

हे बघून वडिलांच्या डोळयात पाणी आले.

त्याच क्षणी चमत्कार घडला आणि  डॉक्टर म्हणाले –

"बाबा, चिंता मत करो… मैंने आपके बेटे के पीठ पर मारा है, पेट पर नहीं… आप खुश होकर जाओ."

बाबांच्या चेहऱ्यावर हसू उमटले.

त्यांनी काहीच विचारले नाही.

ते शांतपणे बाहेर आले.

गेटजवळ उभा असलेला सैनिक विचारू लागला –

"बाबाजी, किसको मारा है?"

बाबा हसले.

आणि म्हणाले –

"मुझे नहीं मारा… मेरे बेटे की बदकिस्मती को मैंने मारा है… मैं जीत गया हूँ."

त्या क्षणी ते खरोखर जिंकले होते.

कारण त्यांनी आपल्या मुलाची हरलेली बाजी पुन्हा जिंकून दाखवली होती.

त्या दिवशी एक मुलगा आर्मीमध्ये भरती झाला.

पण त्याहीपेक्षा मोठी गोष्ट घडली…

त्या दिवशी एका बापाने आपल्या मुलाच्या भविष्याला नवी दिशा दिली होती.

आजही तो मुलगा जेव्हा त्या दिवसाची आठवण काढतो, तेव्हा त्याच्या डोळ्यांत अश्रू येतात.

कारण त्याला माहीत आहे –

जगात देव दिसत नाही, पण बापाच्या रूपाने तो आपल्यासोबत चालत असतो.


Happy father day 

— लेखक : प्रविण ज्यो. तायडे

Reviews


Your Rating

blank-star-rating

Left Menu