Back to Book Details Report Reviews

वादळापूर्वीची रात्र



"आज रमेश मुंदडा मारवाडी शेताचे पैसे मागायला येणार आहे."

पहाटेच्या शांततेला चिरत तिचा काळजीने भरलेला आवाज घरभर घुमला. त्या एका वाक्याने घरातील वातावरण बदलून गेले. जणू काही अदृश्य संकटाने घराच्या उंबरठ्यावर पाऊल ठेवले होते.

चुलीपुढे बसलेली ती स्त्री काळजीत बुडाली होती. अंगणात नेहमीप्रमाणे गडबड नव्हती. मुलांचे खेळणे नव्हते. घरातील प्रत्येक चेहरा चिंतेने भरला होता.

ओसरीवर महाराज बसले होते. त्यांच्या नजरा दूर कुठेतरी खिळल्या होत्या. मनात विचारांचे वादळ घोंगावत होते.

"काय करायचं आता?" तिने पुन्हा विचारले.

महाराजांनी दीर्घ श्वास घेतला.

"कुठून आणू पैसे?"

त्यांच्या आवाजात असहाय्यता होती.

कधीकाळी त्यांच्याकडे आशेचा आधार असलेली चौदा एकर जमीन होती. ती जमीन त्यांनी रमेश मुंदडा नावाच्या मारवाड्याकडून विकत घेतली होती. व्यवहार असा होता की पैसे हप्त्याने द्यायचे आणि संपूर्ण रक्कम भरल्यावर खरेदीखत करायचे.

सुरुवातीला सर्व काही सुरळीत चालले होते.

महाराज रात्रंदिवस राबत होते. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा—कोणत्याही ऋतूची पर्वा न करता ते जमिनीशी नाळ जोडून जगत होते.

पण नियतीची इच्छा वेगळी होती.

सलग दोन वर्षे पावसाने पाठ फिरवली.

पहिल्या वर्षी पीक अर्धवट आले.

दुसऱ्या वर्षी तर उगवलेली रोपेही जगू शकली नाहीत.

शेतातील हिरवाई नाहीशी झाली. जमिनीवर तडे गेले. बैलांच्या डोळ्यांतही थकवा दिसू लागला.

पीक आले नाही म्हणजे पैसा आला नाही.

पैसा आला नाही म्हणजे कर्ज वाढले.

आणि आता रमेश मुंदडाचे पैसे थकले होते.

त्या रात्री गावभर एकच चर्चा होती.

"उद्या महाराज आणि मारवाड्यात सामना होणार."

लोकांना उत्सुकता होती. काहींना काळजी होती. काहींना तमाशा पाहायचा होता.

रात्री उशिरा मारवाड्याने महाराजांना बोलावून घेतले.

गावाच्या चौकात फिकट दिव्यांच्या उजेडात तो बसला होता.

त्याच्या चेहऱ्यावर नेहमीचा रुबाब होता.

महाराज त्याच्यासमोर जाऊन उभे राहिले.

"महाराज, पैसे आणले का?" त्याने थेट प्रश्न केला.

महाराजांनी हात जोडले.

"या वर्षी पीक आलं नाही. पुढच्या वर्षी तुमचे पैसे देतो."

मारवाडीच्या चेहऱ्यावर उपहास दिसला.

"आता मला पूर्ण पैसे पाहिजेत. नाहीतर उद्या शेत माझ्या ताब्यात असेल."

त्या शब्दांनी वातावरण तापले.

महाराजांच्या डोळ्यांत संताप उतरला.

"मी दरवर्षी तुला पैसे दिले आहेत."

"ते लागवणीचे होते. खरेदीचे नव्हते."

त्या उत्तराने त्यांचा संताप अनावर झाला.

वाद वाढत गेला.

शब्दांच्या तलवारी उपसल्या गेल्या.

शेवटी दोघेही मृत्यूच्या धमक्यांपर्यंत पोहोचले.

"माझ्या जिवंतपणी शेतात पाऊल ठेवून दाखव."

महाराजांचा आवाज संपूर्ण चौकात घुमला.

त्या रात्री दोघेही आपापल्या घरी परतले.

पण झोप मात्र कोणालाच लागली नाही.

घरात चूल पेटली नव्हती.

भूक होती, पण चिंता अधिक मोठी होती.

संपूर्ण रात्र तिचे डोळे उघडे होते.

महाराजही जागे होते.

सकाळी काय होणार, हा प्रश्न दोघांनाही सतावत होता.

पहाट अजून पूर्ण उजाडली नव्हती.

आकाशात काळे ढग जमले होते.

रात्रभर पडलेल्या पावसामुळे मातीचा सुगंध दरवळत होता.

पेरणीसाठी योग्य अशी वेळ होती.

पण त्या दिवशी कुणालाही शेतीची चिंता नव्हती.

संपूर्ण गावाचे लक्ष एका शेताकडे लागले होते.

पहाटेपासून लोक शेताच्या दिशेने निघू लागले.

कुणी पायी, कुणी सायकलवर, तर कुणी बैलगाडीतून.

जणू काही एखादी मोठी जत्रा भरली होती.

शेतात पोहोचल्यावर महाराज मधोमध जाऊन उभे राहिले.

त्यांच्या हातात धारदार फरसा होता.

चेहऱ्यावर प्रचंड निर्धार होता.

वेळ पुढे सरकत होती.

अचानक दूरवर धुळीचा लोट उठला.

मारवाडीची माणसे येत होती.

बैल, नांगर, बियाण्याची पोती आणि काही गडी.

त्यांनी शेतात प्रवेश केला.

एका गड्याने बैलांना हाक दिली.

नांगर पुढे सरकला.

आणि तेवढ्यात

"थांबा!"

महाराजांचा आवाज आकाश फाडणाऱ्या विजेसारखा घुमला.

संपूर्ण परिसर स्तब्ध झाला.

फरसा हातात घेऊन ते पुढे सरसावले.

"माझ्या जिवंतपणी या शेतात एक दाणाही पडणार नाही."

क्षणात वातावरण तणावाने भरून गेले.

गावकऱ्यांचे हृदय धडधडू लागले.

आज रक्त सांडणार, अशी सर्वांनाच खात्री वाटू लागली.

पण त्याच क्षणी गर्दीतून ती पुढे आली.

ती धावत आली आणि दोघांच्या मध्ये उभी राहिली.

एका बाजूला संतापाने पेटलेले महाराज.

दुसऱ्या बाजूला मारवाडीची माणसे.

आणि मध्ये उभी होती संसारासाठी झगडणारी एक आई.

"कोणीही पुढे येणार नाही."

तिचा आवाज ठाम होता.

क्षणभर महाराज तिच्याकडे पाहत राहिले.

फरसाची मूठ सैल झाली.

तिने पुन्हा सांगितले

"आज रक्त सांडलं तर हरणार आपणच."

त्या एका वाक्याने परिस्थिती बदलली.

मारवाडीची माणसे मागे सरकली.

पेरणी थांबली.

मारवाड्याला निरोप गेला

आणि काही वेळाने मारवाड्याचा निरोप आला

"ताईंना यावली शहीदला बोलावलं आहे."

त्या दिवशी एक स्त्री फक्त भांडण थांबवून गेली नव्हती.

तिने दोन कुटुंबांचा विनाश रोखला होता.

परंतु तिच्या संघर्षाची खरी परीक्षा अजून बाकी होती...


त्या दिवशी संध्याकाळी घरात चूल पेटली होती, पण कोणाच्याही मनात समाधान नव्हते. शेतावरील संकट काही काळासाठी टळले होते; मात्र ते पूर्णपणे संपले नव्हते.

रात्री भाकरी ताटात वाढली गेली, पण प्रत्येक घास जणू काळजीने भरलेला होता. महाराज शांत बसले होते. त्यांच्या मनात विचारांचे वादळ उसळत होते. अंगणात फेरफटका मारताना ते वारंवार आकाशाकडे पाहत होते.

तिची अवस्था देखील वेगळी नव्हती.

मारवाड्याने यावली शहीद येथे बोलावले होते. 

का बोलावले असेल? कोणता निर्णय घेणार असेल? पुन्हा काही नवीन अट घालणार असेल का?

प्रश्न अनेक होते, पण उत्तर एकही नव्हते.

त्या रात्री घरातील सर्वजण झोपले. मात्र तिच्या आणि महाराजांच्या डोळ्यांत झोप नव्हती. कधी कधी संकट इतके मोठे असते की रात्र संपते, पण विचार संपत नाहीत.

पहाटे कोंबड्याने बांग दिली.

तिने उठून चूल पेटवली. देवासमोर दिवा लावला. हात जोडून काही क्षण डोळे मिटले.

ती प्रार्थना करत होती की देवाशी भांडत होती, हे तिलाही कळत नव्हते.

महाराज घराच्या ओसरीवर बसले होते.

आज ते तिच्यासोबत जाणार नव्हते.

घर, जनावरे आणि शेत यांची जबाबदारी त्यांच्यावर होती.

तिने निघताना त्यांच्या डोळ्यांत पाहिले.

त्या नजरेत हजारो शब्द होते.

चिंता होती.

विश्वास होता.

आणि एकमेकांसाठीची निःशब्द ताकद होती.

यावली शहीद गाव त्यांच्या गावापासून सहा कोस अंतरावर होते.

आजच्या काळात ते अंतर काहीच वाटणार नाही; पण त्या काळात पायी चालणे हाच एकमेव पर्याय होता.

त्यात रस्ता जंगलातून जात होता.

सकाळचे आकाश काळ्या ढगांनी भरले होते.

वारा सुटला होता.

झाडांच्या फांद्या सळसळत होत्या.

अधूनमधून पावसाचे थेंब अंगावर पडत होते.

मात्र तिच्या चालण्यात कुठेही थकवा नव्हता.

ती झपाझप पावले टाकत पुढे जात होती.

तिच्या मागे तिची मुले चालत होती.

कधी धावत, कधी थांबत, कधी दम खात.

पण ती थांबत नव्हती.

कारण आज ती केवळ आई नव्हती.

ती आपल्या संसाराच्या अस्तित्वासाठी लढणारी योद्धा होती.

रस्त्यात मुलांना भूक लागली.

तहान लागली.

पण घरी खाण्यासाठी काही नव्हतेच.

भूक त्यांच्या आयुष्याचा भाग बनली होती.

काही तासांच्या प्रवासानंतर दूरवर यावली शहीद गावाची वेश दिसू लागली.

तिने एक दीर्घ श्वास घेतला.

जणू ती एखाद्या रणभूमीवर पोहोचली होती.

रमेश मुंदडाचा वाडा गावाच्या मध्यभागी होता.

मोठा दरवाजा.

उंच भिंती.

प्रशस्त अंगण.

गावातील इतर घरांच्या तुलनेत तो एखाद्या किल्ल्यासारखा वाटत होता.

ती मुलांना घेऊन अंगणात पोहोचली.

गडीमाणसाने आत जाऊन निरोप दिला.

"वाघोलीहून ताई आल्या आहेत."

काही वेळाने त्यांना आत बोलावण्यात आले.

मोठ्या दिवाणखान्यात रमेश मुंदडा बसला होता.

त्याच्या समोर मऊ गादी, उशा आणि पितळी तंबाखूची डबी ठेवलेली होती.

ती आत आली.

मुलं तिच्या मागे उभी राहिली.

क्षणभर संपूर्ण खोलीत शांतता पसरली.

कालपर्यंत एकमेकांना धमक्या देणारे लोक आज समोरासमोर बसले होते.

रमेश मुंदडाlने तिच्याकडे पाहिले.

आणि अपेक्षेपेक्षा पूर्णपणे वेगळा प्रश्न विचारला.

"ताई, जेवण केलं का?"

त्या प्रश्नाने ती काही क्षण स्तब्ध झाली.

तिच्या डोळ्यांत अश्रू दाटले.

मात्र तिचा आवाज ठाम होता.

"आमच्या तोंडचा घास हिसकावून घेता आणि आता विचारता जेवली का?"

त्या शब्दांनी दिवाणखान्यातील वातावरण बदलले.

सगळे शांत झाले.

ती पुढे म्हणाली,

"मला तुमच्या घरची भाकर नको. मला माझ्या शेतातल्या घामाची भाकर हवी आहे. माझ्या लेकरांच्या तोंडचा घास वाचवण्यासाठी मी इथे आले आहे."

क्षणभर रमेश मुंदडा निःशब्द बसून राहिला.

पहिल्यांदाच त्याची नजर तिच्यावरून सरकून त्या मुलांवर स्थिरावली.

फाटके कपडे.

अनवाणी पाय.

उपाशीपोटी थकलेले चेहरे.

त्याला पहिल्यांदाच त्यांच्या गरिबीचे खरे रूप दिसले.

कदाचित त्याच्या मनातील कठोरपणाला पहिला तडा त्या क्षणी गेला.

त्याने गडीला हाक मारली.

"अरे, आधी या पोरांना जेवायला वाढ."

तिने ताबडतोब विरोध केला.

"नको. आम्ही जेवणार नाही."

पण मुलांच्या चेहऱ्याकडे पाहून तिचे शब्द कमकुवत पडले.

गडीने ताटे मांडली.

भाकरी, आमटी, भाजी आणि गोड पदार्थ वाढण्यात आला.

कित्येक दिवसांनी मुलांसमोर एवढे भरगच्च अन्न आले होते.

सुरुवातीला त्यांना संकोच वाटला.

पण भुकेने संकोचावर विजय मिळवला.

ते शांतपणे जेवू लागले.

ती मात्र बाजूला बसून त्यांच्याकडे पाहत होती.

तिच्या डोळ्यांत अश्रू होते.

कारण आईला आपल्या मुलांची भूक सर्वांत जास्त समजत असते.

त्या दिवशी तिच्या मनाला सर्वांत मोठी वेदना मुलांच्या उपाशीपणानेच दिली होती.

जेवण संपले.

पुन्हा शांतता पसरली.

आता खऱ्या निर्णयाची वेळ आली होती.

रमेश मुंदडा काही क्षण विचारात पडला.

मग तो हळूहळू बोलू लागला.

"ताई, काल जे झालं ते वाईट झालं."

ती काही बोलली नाही.

"पण आज मी एक गोष्ट पाहिली आहे."

त्याचा आवाज आता मवाळ झाला होता.

"तू फक्त शेतासाठी लढत नाहीस. तू तुझ्या संसारासाठी लढते आहेस."

तो काही क्षण थांबला.

आणि मग म्हणाला—

"तू माझी बहीण आहेस."

त्या शब्दांनी दिवाणखान्यातील वातावरणच बदलून गेले.

तिला स्वतःच्या कानांवर विश्वास बसत नव्हता.

रमेश मुंदडा पुढे म्हणाला,

"जा. शेत पेर. दोन वर्षांनी उरलेले पैसे दे."

क्षणभर वेळ थांबल्यासारखा वाटला.

तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले.

ते पराभवाचे नव्हते.

ते विजयाचे होते.

एका आईच्या जिद्दीचा विजय.

एका स्त्रीच्या धैर्याचा विजय.

आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे एका कुटुंबाच्या अस्तित्वाचा विजय.

यावली शहीदहून परतताना तिच्या मनावरील ओझे हलके झाले होते. अनेक दिवसांनी तिच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होते. मुलांच्या चेहऱ्यावरही आनंद होता. त्यांच्या छोट्या मनाला एवढेच समजत होते की संकट टळले आहे आणि आता त्यांचे शेत त्यांच्याकडेच राहणार आहे.

गावाच्या वेशीवर पोहोचताच काही गावकरी त्यांच्या भोवती जमले.

"काय झालं ताई?"

"मारवाडी काय म्हणाला?"

सगळ्यांच्या चेहऱ्यावर उत्सुकता होती.

तिने थोडक्यात सर्व सांगितले.

क्षणभर गावकरी स्तब्ध झाले.

ज्या रमेश मुंदडाला लोक कठोर सावकार म्हणून ओळखत होते, त्याने एवढा मोठेपणा दाखवला यावर अनेकांचा विश्वास बसत नव्हता.

घरी पोहोचल्यावर तिने महाराजांना सर्व हकिगत सांगितली.

संपूर्ण गोष्ट ऐकल्यानंतर महाराज काही क्षण शांत बसून राहिले.

त्यांच्या डोळ्यांत पाणी आले.

ते आयुष्यात फार कमी वेळा रडले होते.

पण त्या दिवशी त्यांच्या डोळ्यांतून वाहणारे अश्रू पराभवाचे नव्हते.

ते कृतज्ञतेचे होते.

त्या रात्री अनेक दिवसांनी घरात निवांत झोप लागली.

दुसऱ्याच दिवशी शेतात पेरणी सुरू झाली.

रान पुन्हा जिवंत झाले.

बैलांच्या गळ्यातील घंटा वाजू लागल्या.

नांगर माती चिरू लागला.

महाराज पहाटेपासून संध्याकाळपर्यंत शेतात राबत होते.

त्यांच्या प्रत्येक घामाच्या थेंबात आशा होती.

त्या वर्षी पावसानेही साथ दिली.

वेळेवर ढग आले.

पाऊस वेळेवर पडला.

बियाण्यांनी अंकुर धरले.

काही दिवसांतच रान हिरवेगार झाले.

शेतात उभे राहून महाराज दूरवर पसरलेल्या हिरवाईकडे पाहत असत.

कित्येक दिवसांनी त्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसू लागले होते.

घरातही बदल जाणवत होता.

धान्याचे कोठार हळूहळू भरू लागले.

चुलीवर रोज स्वयंपाक होऊ लागला.

मुलांच्या चेहऱ्यावरची उपासमारी कमी होऊ लागली.

जुन्या फाटक्या कपड्यांच्या जागी नवीन कपडे आले.

गेल्या काही वर्षांत प्रथमच त्या कुटुंबाला वाटू लागले की संकटाचे दिवस मागे पडत आहेत.

काळ पुढे सरकत गेला.

एक वर्ष गेले.

दुसरे वर्षही सरले.

पिके चांगली येत होती.

कर्ज फेडले जात होते.

घरातील परिस्थिती हळूहळू सुधारत होती.

अखेर तो दिवस उजाडला ज्याची महाराज अनेक वर्षे वाट पाहत होते.

रमेश मुंदडाचे सर्व पैसे फेडण्यात आले.

कागदपत्रे तयार झाली.

पण नियतीच्या पुढे काही चालत नाहीं ज्या जमिनीसाठी मृत्यूशी झुंज दिली ती जमीन सीलिंग कायद्यात अटकली 

त्या जमिनीचा वाटप भूमीहीन लोकांना होणार होता 

सरकारने जमिनीचा वाटप केला 

महाराजांना त्यातील तीन एकर जमीन मिळाली 

तीन एकर जमीन कायमस्वरूपी त्यांच्या नावावर आली.

त्या दिवशी महाराज एकटेच शेतावर गेले.

शेताच्या बांधावर उभे राहून त्यांनी मातीची मूठ उचलली.

ती कपाळाला लावली.

त्यांच्या डोळ्यांत अभिमान होता.

ज्या जमिनीसाठी त्यांनी मृत्यूची धमकी स्वीकारली होती, ती जमीन आता त्यांच्या नावावर झाली होता 

जमिनीसाठीचा संघर्ष संपला होता.


प्रविण ज्यो.तायडे

अमरावती 

8830103626


Reviews


Your Rating

blank-star-rating

Left Menu