पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

२७.०५.२०२०. लॉक डाऊन मधला एक विलक्षण दिवस

काल सकाळची गोष्ट. काल म्हणजे 26. 5. 2020. आता लॉक डाऊन चार मध्ये थोडं रिलॅक्सेशन मिळालं. काल सकाळी माझे वडील त्यांचे औषधं आणण्यासाठी त्यांच्या नेहमीच्या दुकानात गेले होते. आता येताना बाहेरची काम आटोपून घरी येतो त्यामुळे वेळ लागेल असं त्यांनी सांगितलं होतं. थोड्याच वेळात त्यांचा फोन आला, म्हणाले, “लवकर लवकर आंघोळी आटोपून गरम गरम ताजा स्वयंपाक तयार ठेवा, माझ्यासोबत एक जण जेवायला येणार आहेत आपल्याकडे”.


अरे असं लॉक डाऊन मध्ये कोण जेवायला येतय? बाबा तरी कसे जेवायला घेऊन येतायेत त्यांना… नक्कीच ती व्यक्ती समोर असणार म्हणून बाबांना काही बोलता आलं नाहीये बहुधा..असो… कुणी जेवायला येणार म्हटल्यावर रीतसर साग्रसंगीत स्वयंपाक असायलाच हवा. मी, आई आणि माझी भावजय रेणुका आम्ही तिघी स्वयंपाकाला लागलो. आता घरात होतं त्यातच छानसा स्वयंपाक केला आणि येणाऱ्या पाहुण्याची वाट पाहू लागलो. साधारण अकरा-साडेअकरा होत आले असतील. टेरेसवरून बाबांची गाडी येताना दिसली.


आले, आले बाबा ! बाबा आणि पाहुण्यांना आठव्या मजल्यावर यायला जेवढा वेळ लागला त्या वेळात आमच्या उत्सुकतेचा कस लागला होता. आम्ही दारातच उभे होतो. लिफ्टमधून बाबांसोबत नऊवार पातळ घातलेल्या, ठसठशीत कुंकू लावलेल्या, साधारण ऐंशीच्या घरात असलेल्या एक आजी आल्या होत्या. आम्हाला सगळ्यांना त्या आजीं चा चेहरा ओळखीचा वाटत नव्हता. पण त्या आम्हाला ओळखत असाव्यात. दारात येताच त्या म्हणाल्या ” नर्मदा परिक्रमा केलेली मुलगी कोण आहे तुमच्याकडे? तिला म्हणावं,माझी परिक्रमावासीयांची करतात तशी सेवा केलीस तर मी घरात येईन… येऊ का? करणार का माझी सेवा?” मी पुढे झाले आणि आनंदाने होकार दिला.


आजींना तिथेच बसायला खुर्ची दिली. आतून बादलीभर पाणी आणलं, आजींच्या पायावर पाणी घातलं, नमस्कार केला आणि आत बोलावलं. आम्ही काही बोलायच्या आतच आजी म्हणाल्या, “कधीचं मोहनच्या (माझे वडील) घरी जायचं होतं, म्हंटलं आज परिक्रमावासी पोरी कडून तिचे अनुभव ऐकूयात, परिक्रमावासीयांची कशी सेवा करतात तेही अनुभवूया, म्हणून आले गं! तू छान स्वयंपाक केलाच असशील, घरचा पुजापाठ झाला असेल तर घ्या बरं पानं… ए सुनबाई, या पुड्या देवघरात ठेव!” असं म्हणत आजींनी रेणुकाच्या हातात कागदाच्या पुड्या ठेवल्या. आम्ही जरी आजींना ओळखत नसलो तरी त्यांच्या नजरेत खूप आपुलकी आणि प्रेम दिसत होतं.


खरं तर आम्ही अचंबित होतो, आमच्यापैकी प्रत्येकालाच ह्या आजी नक्की कोण असा प्रश्न पडत होता. बाबांच्या ओळखीच्या आहेत असं आम्हाला वाटत होतं. मात्र तोही उलगडा थोड्यावेळात झाला. आजी आणि रेणुका समोरच्या खोलीत बसले असताना मी आई आणि बाबा स्वयंपाक घरात होतो तेव्हा मी बाबांना विचारलं, “बाबा या आजी कोण आहेत? बाबा सांगू लागले, खूप ओळखीचा चेहरा आहे पण मी यांना ओळखलं नाही अजून. मी औषधं घेत असताना त्या तिथेच दुकानात उभ्या होत्या. माझे औषधं घेऊन झाले तसं त्या मला म्हणाल्या, ” का रे मोहन तू इथे दिसत नाहीस? नवीन घरी गेला तर इकडे येणं सोडलं की काय… तुझी लेक आलीये म्हणे? नर्मदा परिक्रमा केलीय न तिनी? मला भेटायचंय तिला, तुझ्या घरीही यायचंय मला. तुला दुरून पाहिलं आणि ठरवलं आज याच्या बरोबर जायचंच याच्या घरी. तुझा नर्मदामैया वर विश्वास असेल तर मला घरात घे, नाही तर असू दे, मी जाते निघून… आता असं म्हटल्यानंतर बाबांना तिला घरी घेऊन आल्याशिवाय पर्याय नव्हता. खरंतर बाबांना काही सुचतच नव्हतं. नर्मदा मैया चं नाव घेणारी ही आजी, तिला कसं नाही म्हणू घरी यायला? आणि म्हणून गाडीत बसवून तिला घेऊन आलो…


म्हणजे बाबा पण तिला ओळखत नव्हते. पण ती अगदी नावासकट बाबांना आवाज देत होती.. असो.. घरी आलेली पाहुणी आहे, म्हातारी आहे जेवायचं म्हणतेय.. बघुयात पुढचं पुढे.. असं म्हणून आम्ही पानांची तयारी केली. छान व्यवस्थित जेवण झालं. आजींनी नं लाजता हवं-नको ते व्यवस्थित मागून घेतलं. माझ्या ओंकारला म्हणाल्या.. “तुझा तो बिस्किटा सारखा खाऊ पण वाढ मला!” गंमतच वाटली आजींची. त्या घरातल्या प्रत्येकाशी बोलत होत्या. माझ्या दोन्ही भावांकडून त्यांनी पावलं चेपून घेतली जेवणानंतर. “आता असं करा मला थोडा आराम करू द्या”.. आजींना एसी च्या खोलीत आरामासाठी जागा करून दिली तर म्हणाल्या “इथे नको, त्या बाजूच्या खोलीतला छोटा पलंग आहे त्यावर स्वच्छ चादर टाकून दे, कुलर सुरू कर तिथे आराम करेन मी” .. आणि हो, तू बैस इथे तुझे अनुभव सांगत, मला ऐकायचे सगळे तुझ्या तोंडून.


आता आम्ही सगळेच बाजूच्या खोलीत होतो. थोडे अनुभव सांगितल्यानंतर आजी आईला म्हणाल्या “आता तुम्ही सगळे आराम करा, तिला बसू देत अनुभव सांगत”. मग मी आणि आजी दोघीजणीच खोलीत होतो. मी एक एक अनुभव सांगत होते तश्या आजी “माझं लेकरू गं” असं म्हणत डोळे पुसायच्या. बघता-बघता दुपारच्या चहाची वेळ झाली.. “आजी चहा घेणार नं? “मी विचारलं.. “हो तर, कर मस्त काळा चहा परिक्रमेतला”. आम्ही सगळ्यांनीच आजीबरोबर परिक्रमेत असतो तसा काळा चहा घेतला.


आता दिवेलागणी. आजी स्वतः पुढे आल्या. त्यांनी दिवा लावला. “म्हणा गं पोरींनो तुम्हाला काय स्तोत्र म्हणायची असतील ती, हो पण आरती करताना सद्गुरूंची आणि नर्मदामय्याची आरती करा हो.. मी बसते जरा ध्यान लावून”. आजी तिथेच खाली मांडी घालून बसल्यात. आमची करुणात्रिपदी, राम रक्षा आधी करून झाल्यावर मग आम्ही नर्मदाष्टक म्हणायला सुरुवात केली.


नर्मदाष्टक, नर्मदेची आरती आणि सद्गुरु नानांची आरती आम्ही म्हणत होतो त्यावेळी आजींच्या चेहऱ्यात झालेला बदल विलक्षण होता. आजींची त्वचा तेजपुंज झाली होती. कपाळावरचा ठसठशीत कुंकू अधिकच ठसठशीत होऊन मळवट भरल्यासारखं दिसत होतं. डोक्यावरच्या पदरा खालचे पांढरे रूपेरी केस चक्क काळे झालेले होते. अंगावरच्या सुरकुत्या खूप कमी झाल्या होत्या. आतापर्यंत अजिबात लक्ष न वेधणा-या कानातल्या कुड्या लख्ख चमकत होत्या. आजी वयापेक्षा खूपच तरुण दिसू लागल्या होत्या. ध्यानस्थ बसलेल्या आजींच्या अंगातून सुसह्य ऊर्जेचे स्त्रोत बाहेर पडतात आहेत असं जाणवत होतं.एक हलकसं सोनेरी कवच जणू आजींच्या सर्वांगा भोवती आहे की काय असा भास होत होता. आमचं सगळं म्हणून झालं होतं आणि तरीही आम्ही सगळेच तिथेच आजींच्या समोर बसलेलो होतो. थोड्या वेळाने आजींनी डोळे उघडले. आम्हा प्रत्येकाच्या डोक्यावर मायेनी हात फिरवून भरभरून आशीर्वाद दिलेत.


“मला फक्त पेलाभर दूध द्या, मी रात्रीचं जेवत नाही” तुम्ही मात्र व्यवस्थित जेवून घ्या. तोवर मी खोलीत बसते जरा. मी बोलवेस्तोवर कोणी खोलीत येऊ नका” आता आजी एकट्याच खोलीत होत्या. बऱ्याच वेळानंतर म्हणजे जवळजवळ साडेनऊ दहाला त्यांनी आवाज दिला. म्हणाल्या “मला एक मऊ शाल पांघरायला दे, आता मला निवांत झोपू दे, खूप छान सेवा केली तुम्ही माझी. आता तशीच निवांत झोप घेते जरा, आणि हो ह्या मुलीला बसुदे माझ्या बाजूला अनुभव सांगत दुपार सारखं, बाकी तुम्ही आराम करा” मग मी आणि आजी पुन्हा खोलीत होतो. आजींनी डोक्यावर शाल घेतली होती मात्र त्या अनुभव ऐकत होत्या. अनुभव सांगता सांगता खूप वेळ निघून गेला होता. साधारण पहाटेचे तीन सव्वातीन झाले असतील. मला एखादी डुलकी आली असेल, तशा आजी म्हणाल्या ” बाळ थोडा आराम कर… तृप्त केलं बरं तुम्ही मला. खूप आनंद वाटतोय. तुम्हा सगळ्यांचं खूप खूप भलं होणारे बाळांनो. मी हक्काने येऊन गेली की नाही तुझ्याकडे, तू पण येत जा. जसं जमेल तसं आई-बाबांना घेऊन ये. भावांच्या नोकऱ्या आहेत कळतय मला, तरीही या म्हणावं एकदा माझ्या भेटीला.” आजी बोलत होत्या आणि मी आडवी झाले होते. माझा कधी डोळा लागला ते कळलच नाही.


जाग आली तो आजी तिथे नव्हत्याच. पण त्या काहीतरी बोलताहेत हे मी झोपेत सुद्धा टिपलं होतं. त्या म्हणत होत्या.. “येते बेटा मी आता, छान वाटलं, छान सेवा केली तुम्ही सगळ्यांनी माझी. तुमच्या सगळ्यांच्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ दे, तुमच्याकडून अशीच सेवा अखंडपणे घडू दे…येगं लवकर, वाट बघतेय मी..


मी घड्याळाकडे पाहिलं तो दुपारचे पाच वाजले होते. अरे हे काय? मी रात्री झोपलेले दुपारी पाच वाजता उठले? पण मग लक्षात आलं की मी माझ्या सासरी होते स्नेहनगर ला! माहेरी नव्हते! मला काही समजेना. मग कॅलेंडर मध्ये तारीख पाहिली तो तारीख होती 27 5 2020. मग हळूहळू सकाळपासून चा दिवस आठवू लागले. आज भाजी वांग्याची भाकरी जेवायला केली होती. थोड्याच वेळापूर्वी ऋतू शी (एक कवी मित्र) एका उपक्रमाबद्दल चर्चा झाली होती… म्हणजे जेवण झाल्यानंतर थोडावेळ मी आडवे झाले त्या काळात पडलेलं हे स्वप्न होतं तर? अगदी तासा-दीड तासांमध्ये किती किती म्हणून अनुभवलं होतं मी? काय संकेत असावा यामागे? कोण असाव्यात त्या आजी? पण काहीही का असेना.. त्या तृप्त होऊन गेल्यात आणि त्यांनी भरभरून आशीर्वाद ही दिलेत हेच महत्वाचं!..


सौ सुरुचि अग्निहोत्री नाईक.


पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू