पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

स्मृतिचित्रे

माझा पारीजातकी प्रवास


पारिजातकाचं आयुष्य लाभलं तरी चलेल पण लयलूट करायची ती सुगंधाचीच!"


पारिजातकाचं आयुष्य?...पारिजातक म्हटलं की पहिल्यांदा तनामनातून दाटून येतो तो तर सुगंध! मी तरी आजवर याच्याकडेच पाहत आले..आयुष्याच्याही बाबतीत तेच, अग माझं आयुष्य असो वा पारिजातकाचं..मी सुगंधच माळला मनभर..आयुष्यावर नजर टाकलीच नाही..पारिजातकाच्याही अन माझ्याही..


तसं पारिजातकाचं आणि गुलमोहराचं माझ्या अयुष्यात महत्वाचं स्थान आहे. ही दोन्ही झाडं मला अगदी लहानपनापासून मोहवून घेतात. का कोण जाणे पण त्यांच्यातील ते भरभरून फ़ुलून येणं आणि तो भगवा रंग माझ्या मनाला नेहमीच माझेच वाट्त आलेले आहेत.


माझ्या लहानपणी घरी पारिजातकाचं झाड होत.त्याची भगव्या दिठीची फ़ुलं मी लहानपणी हातावर घासून घेत असे, हाताला  भगवा रंग लागावा म्हणून...तो भगवा रंग तर टिकत नसे फ़ारसा मात्र पारिजातकाचा मनमोहक गंध माझ्या हाताला बराच काळ बिलगून राहात असे आणि मनात तर कायमच रेंगाळत असतो...त्या म्हणजे अगदी बाल वयापासून माझी अन पारिजातकाची जीवलग मैत्री आहे.


टोपलं टोपलं पारिजातकाची फ़ुलं  तुळशी वृंदावनाभोवताली गडद पांढरा भगवा सडा घालायची त्यावेळी कितितरी वेळ नुसतं बघत राहावसं वाटायचं त्या अंथरलेल्या सड्याकडे...कितीतरी फ़ुलं वाटायची माझी आजी येणा-या जाणा-यांना..तरी हा परिजात अखंड्च असायचा..अक्षय...


माझं बालपण त्या पारिजातकाबरोबर मोहरत गेलय...खरंतर पारिजातकाची फ़ुलं सहसा कुणी केसात का लावत नाही कळत नाही..मी मात्र रोज पारिजातकाचा गजरा लावत असे..तो ही केसांपेक्षा लांब लचक..नाकापर्यंत येईल एवढा..मग तो सुवास घेत बसायचं दिवसभर...गजरा लावला की छान दिसते असं वाटणारं ३-४ वर्षांच वय ते...असच गंधमय होत गेलं...


बालवय सरत गेलं मात्र प्राजक्त कायमच राहिला..केसातली फ़ुलं ओंजळीत आली..मैत्रीणीच्या गप्पात आता प्राजक्त वावरू लागला..आम्ही मैत्रीणी आणि पारिजाताच्या झाडाखालची आमची गप्पा गुपितं.. अशीही साथ दिलिये प्राजक्ताने मला..जणु माझा सखाच तो...बोरं संत्री पेरूंची गोड गोड गुपितं त्यलाही माहित होतीच माझी...


हा काळ देखिल सरला...आता वयात आला प्राजक्त..ओंजळीतून पुस्तकाच्या पानात लपू लागला..कवितांमधे रमू लागला..स्वप्नात वावरू लागला आणि शब्दातही रुजू लागला..


रुजण्यावरून कळली प्राजक्ताची ऋजुता, त्याचा कोमल निस्वार्थ स्वभाव..अन मग अनेकांच्या लिखाणातला प्राजक्त वाचायला मिळाला..तेव्हा समजलं...हा तर अनेंकांचा सखा सोबती...माझ्यासार्ख्याच अनेक मनांना जपणारा...


हे जेव्हा समजलं तेव्हा प्राजक्त केवळ सखा राहिला नाही... माझ्यासाठी तो एक आदर्श ही झाला...


मग वपुंचा प्राजक्त जरा समजला..


ते म्हणतात,


"पारिजातकाचं आयुष्य लाभलं तरी चलेल पण लयलूट करायची ती सुगंधाचीच!"


पारिजातकाचं भरभरून देणं मला का आवडतं ते तेव्हा समजलं...इतक्या अनेक लोकांचं भान हरपणारं हे प्राजक्ताचं फ़ुल खरतर किती भाग्यवान!.. किती निशब्द्तेने जपतं ते इतरांची मन...अगदी फ़ुलताना उमलतं कसं ते फ़ुल हे सुद्धा समजत नाही...पण आयुष्य किती? तर केवळ काही तास...


या काही तासाच्या आयुष्यात देखिल परोपकाराची परिसीमा असते या पारिजातकाची... खरं सांगू?..मलाही आवडतं असं भरभरून यायला...मनापासून आनंद झाल्यावर कसं गहिवरून येतं अन आनंदाश्रू  झरू लागतात...तस्सा...तसा भरभरून येतो हा....


मलाही आवडेल तसच भरभरून यायला...मलाही आवडतं तसच कुणाच्या आनंदाचं कारण व्हायला...माझ्या पारिजातकासारखं....


इथे वपुंचा प्राजक्त माझा होतो....


मग येतो चंगोंचा प्राजक्त..श्रावणातला...ते लिहितात,


"श्रावणातला प्राजक्त


पहाटेला बहरून


दिवसभर


...विरक्त.."


चंगो इथे माझं आणि प्राजक्ताचं नातं अजूनच उच्च कोटीचं करतात...आतापर्यंत मला प्राजक्ताचं देणं माहित होतं...आता त्याच्या साध्वी वृत्तीचा स्पर्श मला होऊ लागतो..


प्राजक्त केवळ देत नाही तर आनंद देणं आणि आनंद देत राहणं हेच जणुकाही जीवनाचं ध्येय आहे त्याच्या आणि ते निस्वार्थ पणे करत राहावं असं मला हा प्राजक्त सांगून जातो..


लहानपणी भगवा रंग हातावर लागावा म्हणून चिरड्लेलं ते प्रत्येक फ़ुल आठवतं मला..अन समजतं तो भगवा रंग मला का आवडायचा...


त्या वयात मी तो हातावर लावाचा प्रयत्न करायचे खरे.. पण तो हातावर न लागता त्या रंगानं माझं मन , आत्मा असा रंगून गेला हे आज जाणवलं मला...


आता भगवी आणि श्वेतवस्त्र ल्यालेला हा प्राजक्त माझ्यासाठी गुरुवर्य तपस्वीच आहे...


मात्र त्याचं प्रत्येक रूप आजही माझ्या मनात रुजलेलं आहे...


असा आहे माझा पारिजातकी प्रवास!!


सौ. सुरुचि अग्निहोत्री नाईक


पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू