पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

तमाच्या तळाशी दिवे लागले

       तमाच्या तळाशी दिवे लागले

  लोकलमध्ये पहिल्यांदाच बसायला ऐसपैस जागा मिळाली. सकाळी दहाची वेळ. यावेळी पनवेलकडे जाणा-या लोकलनां विशेष गर्दी नसते. लोकल निघाली आणि माझी नजर अनाहुतपणे समोरच्या बाकाकडे गेली. तिथे एक मुलगा आणि एक मुलगी   कोणत्यातरी गहन विषयांवर चर्चा करण्यात गुंग होते. दोघेही

छान देखणे . त्यांच्या चेह-याकडे नजर गेली,तशी कमालीची दचकले मी. डोळ्यांच्या पार खाचा झालेल्या. कुठून आले असतील ते? कुठे चालले असतील?

कोणी बरोबर सोबतीला नाही त्यांच्या. मनात अनेक प्रश्नांची मालिका. आत्ता कोठे  माझी नजर त्यानी

बाजूला ठेवलेल्या पांढ-या काठीकडे गेली.

दोघेही प्रसन्न आपल्या विश्वात दंग. माझे मन मललाही नकळत त्यांच्या संभाषणाचा

कानोसा घेत होते. त्याना कुठेतरी इंटरव्हयूला जायचे होते. त्याविषयी त्यांची चर्चा चालली होती. दोघे त्याविषयी एकमेकांना काही सांगत होते.   

          यांना कसे कळेल यांच स्टेशन आल्यावर? कसे उतरतील? विचारावं का त्याना? माझ्या मनात प्रश्नांचा गोंधळ  .तेवढ्यात ते उठले. सराईतपणे काठीचा आधार घेत दाराशी चालत गेले. वाशी स्टेशन आलं आणि ते उतरून गेले. माझ्या तोंडाचा आ पसरलेला. खूप वेळ मी अस्वस्थ . नंतर विसर पडला मला

या घटनेचा.

         हे वर्ष पु. ल. देशपांडे, ग. दि. माडगूळकर .आणि सुधीर फडके यांच्या

जन्मशताब्दीचे वर्ष. त्या निमित्त्य स्वरतिर्थ

कार्यक्रमाचे आयोजन केलेलं आणि हा कार्यक्रम ऐकण्यासाठी मी गेले. एकापेक्षा

एक सादर झालेली सरस गाणी, कार्यक्रमाचे उत्कृष्ट  संयोजन आणि दुधात साखर म्हणजे कधीच न विसरता येणारे निवेदिकेचे लाजबाब निवेदन!

उत्कृष्ट भावमधुर शब्दात तिने प्रत्येक गाण्याचे केलेले रसग्रहण आणि प्रेक्षकांशी

साधलेला संवाद. मी तर मंत्रमुग्ध होऊन

ऐकत राहिले.'अनघा मोडक'  या नावाने जादू केली. कार्यक्रम संपल्यावर मी आयोजकाना म्हंटले,मला अनघाला भेटायचे आहे. तिचं अभिनंदन करायचे आहे. तसे ते म्हणाले, जरूर भेटा. खूप गुणी  आहे.पण नेत्रहीन आहे ती. ' मला धक्काच बसला.तिला प्रत्यक्षात भेटल्यावर

तर तिच्या वागण्यात इतकी सहजता होती की जाणवल नाही ती नेत्रहीन असल्याचं .

जाणवला तो प्रचंड आत्मविश्वास.

        नंतर कुणाकडून तिची माहिती कळली.तिचा व्हिडिओ   ऐकला. अनघा पुणे युनिव्हर्सिटीत एम्. ए. ला मेरिटमध्ये

येते आणि पि.एच्.डी साठी मुंबईत येते आणि  डेंग्यूसरख्या आजाराने त्रस्त होते ,फक्त तिनच दिवसात डोकं जड झाल्याचे निमित्त होऊन तिची दृष्टी जाते ती न येण्यासाठी. डॉक्टरांचे सगळे उपाय थकतात आणि एक दिवस तिला कळून चुकतं, आपण आता दृष्टिहीन झालो आहोत.  पण ती कोलमडली नाही. याचे श्रेय ती आपल्या गुरूला,नातेवाईकांना,आईवडिलांना देते.

        लहानपणी बटरस्काॅचचे आईस्क्रीम मिळणार म्हणून सात-आठ वर्षाची छोटी अनघा वकृत्व स्पर्धेत भाग घेते.तिचा पाचवा क्रमांक येतो. ती नाराज होऊन घरी येते, तेंव्हा तिच्या आईवडिलांनी तिच्यासाठी  खूप आईसक्रीम आणलेलं असतं.ती आश्चर्यचकित होऊन त्याना विचारते,',मी तर पाचवी आले आणि मला इतकं आईसक्रीम?' तेंव्हा ते तिला सांगतात,'अग,तू पहिली नाही आलीस म्हणून काय झालं? पाचवी आलीस पन्नास स्पर्धकात. म्हणजे ४५ स्पर्धकांना हरवलंस की.जिंकण्यासाठी फक्त चारच तर टप्पे होते.यातूनच सकारात्मक विचारांच बळ मला मिळालं असं ती म्हणते.आईवडिलांनी

तिला सांगितलं,'हरणे हा अनुभव आहे आणि जिंकण हा अंतिम आनंद.,'. या संकटात तो अनुभव कामी आला. सगळ्यांनीच तिला फक्त सहानुभूती दाखवली नाही तर ती या संकटाच्या काळात हसती खेळती कशी राहिल ते पाहिले. सगळेच नातेवाईक तिचे पाठिराखे झाले.पण तिने त्याच्या कुबड्या केल्या नाहीत. फक्त जरूरीपुरती मदत घेतली आणि स्वयंसिध्दा झाली.

       तिच्या ठिकाणी तिचे गुरू हे तिचे प्रेरणास्थान होते. तिला अंधत्व आल्यावर जेंव्हा प्रथमच तिला ते भेटायला आले, तेंव्हा त्यांनी तिला सांगितलं,"आपण मेडिटेशन करताना डोळे मिटून घेतो.आता ही तुझी मेडिटेशन आहे असंच समजं. लक्षात घे,तुझे डोळे अंध झालेत, पण दृष्टी नाही गेली.घाबरू नकोस. इतके दिवस बाहेर बघत होतीस,आता नजर आत वळव.ती दृष्टी तुला साथ देईल. तुझ्या वेदनेची टोके आत वळली की, संवेदना  जागृत होईल. आणि एकदा का दृष्टी बदलली की,सगळी सृष्टीच बदलून जाईल.

        तिन ते मानलं . हे तस सोपं मूळीच नव्हतं. पण अपार जिद्दीनं,मेहनतीनं तिनं ते आव्हान स्वीकारलं.पि.एच्.डी राहिली. संधी हुकली, पण मग अनेक संधीचे दरवाजे तिच्यासाठी खुले झाले. रेडिओवर निवेदिका,सभेतून भाषणे, असा वेगळ्या क्षेत्रातून तिचा प्रवास सुरू झाला. ह्रदयनाथ मंगेशकरांची तिने सलग अडीचतास मुलाखत घेतली.टाळ्यांच्या प्रचंड कडकडाटात तिचा आत्मविश्वास तिला परत मिळाला..तिने मागे वळून पाहिलेच नाही.आता तिचा प्रवास  सलग,अथक.

     पायातून काटा निघाल्यावर,तो रूतला होता त्याचे दुःख आपण विसरतो. आणि चालायला लगतो.अनघाचेही तसेच झाले . अनघा म्हणते,'दुःखालाही चिमटीत धरता येते.त्याचे फुलपाखरु करता येते.माझे रंग हरवले पण भान नाही हरवले. प्रत्येक गोष्ट मी

नव्याने न्याहाळायला शिकले.' हे ऐकलं आणि प्रसिध्द गोमंतकिय कवी शंकर रामाणी  यांच्या कवितेच्या ओळी आठवल्या,

,"तमाच्या तळाशी दिवे लागले."

                        रेखा मिरजकर खारघर

                               नवी मुंबई

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू