पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

काव्यकन्या

" काव्यकन्या "

फडताळ उघडता कवितांचे
दृष्टी आठवांनी गहिवरलेली,
पाहून त्यांच्या विविध मुद्रा
विस्मयाने होती बावरलेली ।

एक राज्ञीसम, दिवाळी अंकी
प्रथम पृष्ठावर विराजलेली,
एक साहित्य संमेलनातील
रसिकजनांनी वाखाणलेली ।

एक दुर्लक्षित राहिली म्हणूनी
फुरंगटून कोपऱ्यात बसलेली,
एक थबकली, अर्ध्या मार्गी
लिहिता- लिहिता फसलेली ।

एक भावना प्रवाही वाहता
आसवांनी अक्षरे मिटवलेली,
एक साभार परतीच्या घावाची
कट्यार काळजा पचवलेली ।

एक सुकल्या गुलाबाच्या
स्मृतीने अंकीत झालेली
एक पहिल्या प्रणयगीताची
चिंच जशी गाभुळलेली ।

एक कधीssची लिहिलेली
पिवळ्या पानी विसावलेली,
एक हसरी, दुसरी रडवेली
समान कळांनी प्रसवलेली ।

एक गुपित वदते, हसू नका
सहोदरा तव येऊ घातलेली,
गर्भी मम पुन्हा वाढत आहे
जरी केसात चांदी पिकलेली ।

© सौ. जया गाडगे, इंदूर.

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू