पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

सरळ वागणे किती कठिण

 

कोणताही सण समारंभ असो, सर्वांच्या आधी त्यासाठी सज्ज असणारी आजी, हल्ली अजिबात उत्साह दाखवत नाही. खरं तर ती चार-चौघात, ओळखीच्या माणसांत जाणे टाळू लागली आहे. तसेच एका कौटुंबिक समारंभाला पोचण्यापुर्वी तयार होतांना दोन्ही चिमुकल्यांनी आईला सांगितले “तू आधीच आम्हाला “असे वागावे आणि असे वागू नये” यासंबंधी यादी दे, नाही तर नंतर तुझे बोलणे खाण्याची आमची तयारी नाही.” किंवा एक पाउल पुढे गेलेली मुले सरळ “पार्टी आचार संहिता काय आहे?” हा प्रश्न विचारतात.

तिसरी आणि पहिली पीढी जेव्हां असले बदल आपल्या वागण्यात आणत असते, तेव्हां ती बाब गंभीर असावी. कारण या दोन्ही पक्षांसाठी सामाजिक रीत्या काहीही घेवाण देवाण करण्यामागे व्यावसायिक कारणे किंवा लाभ हानिचे गणित नाहीच. अर्थातच ते सामाजिक व्यवहारात सहज नाही, हा प्रकार दिसतो.

चार चौघात मिसळणे, सामाजिक रीत्या सक्रिय असणे, कोणाच्या घरी येणे जाणे, आपला पक्ष सांगणे आणि सर्वांचे विचार जाणून घेणे, हा खरं तर जीवनाचा एक सर्वसामान्य कार्यभाग आहे. याबद्दल क्वचितच कोणाला शिकवले गेले असेल, अर्थातच आधीच्या लहान मुलांना, “पाहुण्यांसमोर हट्ट करायचा नाही, नीट वागायचे बरं?” हे समुपदेशन मिळत असे. आणि ते पुरतही असे.

परंतु आजचे सामाजिक जीवन हे प्रदर्शनाचा पर्याय झाले असून वागण्या बोलण्यात एक उच्च आणि दिव्य प्रकारचा आभास निर्माण करण्यामागची धडपड सर्वत्र दिसून येते. व्यवस्थित दिसणे, नीटनेटकी पोषाक करणे आणि अलंकार किंवा तत्सम प्रकारांने शारीरिक भव्यता दाखवणे वेगळेच पण त्याची चुकीची आभा वागण्या बोलण्यात आणि व्यवहारात येता कामा नये.

वर सांगितलेल्या आजीला जेव्हां तिच्या असल्या वागण्याचे कारण विचारले, तेव्हां तिचे निरीक्षण होते कि ’हल्ली एक साधे ओळखीचे हास्य सुद्धा महाग झालेले आहे. ओळखीच्या मनुष्याला बघून बोलणे तर दूरच पण आधी कोण ओळख दाखवून हसतंय, यात म्हणे सर्वांचा अहंकार असतो. गरज असलेल्यानेच ओळख दाखवावी, हा प्रकार दिसतो. मग कसले आपलेपण आणि कसली नाती? निरागसता किंवा काही हेतु नसतांना जपलेली सक्खी, चुलत किंवा ओळखीची नाती तर शोधून सापडत नाही. असे असल्यावर सण समारंभात जाण्याचे दडपण येणारच. कोणी सरळ दिसतच नाही.’

कितीतरी मनस्ताप पचवलेले शब्द होते ते “कोणी सरळ दिसतच नाही.” सहजपणा हरवलाय. फोन न करता घरी जाउन धडकण्याचे दिवस गेले. मित्राच्या मुलाच्या तोंडून अभद्र भाषा ऎकल्यावर त्याला कोणाचीही पर्वा न करता शिक्षा करण्याचे धाडस दिसत नाही.

“आमच्यामुळे तुमच्या करियरचे पंख कापू नका” असे म्हणून एकटेपण सोसणारे आणि वैभवाच्या समुद्रात देखाव्याचे सोंग करणारे कितीतरी जोडपे समोर दिसतात. लहान मुलांना तथाकथित उच्चभ्रू प्रदर्शनीय संस्कारांचे पाढे शिकवत असतांना आपण लहानपणीचे आपल्या फ्रॉकवरील जांभळांचे डाग आणि धुळीने माखलेले हातपाय सोयीस्करपणे विसरतो.

सहजपणा, सरळपणा किंवा स्वाभाविकपणा, काहीही म्हटले तरी चालेल परंतु हे तत्व जीवनातून कमी होत चालले आहे. वृद्धजनांचे निरीक्षण आणि लहान मुलांचा प्रतिसाद, एकसारखा आहे. लहान मुले तर बिचारी अमुक आंटीला कशाप्रकारे आपला परिचय द्यायचे, कोणाला काय सांगायच, काय नाही बोलायचे, आई वडिल आपल्याबद्दल काही खोटे जरी सांगत असतील तरी स्वत:वर संयम ठेवायचे, कसे, काय व किती खायचे इत्यादि प्रकारातच इतके गुरफटून जातात, कि समोरच्या व्यक्तिशी उत्तम संवाद साधणे आणि नानाविध प्रकाराने आपले व्यक्तित्व फुलवणे, हा प्रकार स्वप्नवत वाटतो.

एखाद्याच्या घरी गेल्यावर एकदम आवडलेली वस्तू किंवा शोभिवंत प्रकार दिसल्यावर त्याचक्षणी आपण सकारात्मक प्रतिसाद देत नाही. वेळ बघून, शब्द निवडून, त्यांची मात्रा, सूत्र इत्यादि जमवून काहीतरी जुजबी बोलतो. कोणी यश मिळवल्यावर भरभरुन त्याच्या प्रयत्नांना दाद देणे, यापेक्षा त्याच्या आई किंवा अन्य व्यक्तिने त्यासाठी किती त्रास सोसला किंवा त्याच्या यशात आपला वाटा किती (बघ मी तुला आधीच सांगितले होते, तू माझं ऎकलं म्हणून हा दिवस दिसतोय इत्यादि प्रकार) हे बघण्यात जास्त ऊर्जा खर्ची होते. 

लग्नासारखा मंगलविधी असो किंवा मृत्यु सारखे दाहक सत्य, सरळ आणि सहज वागणे हा प्रकार कमीच दिसतो. लग्नात आपल्या प्रिय व्यक्तिच्या जीवनाचा मंगल प्रसंग आहे म्हणून आनंदी असणारे, घरच्यांना पैश्याची व्यवस्था विचारणारे, कसलीच वाट न बघता एखादी महत्वाची जवाबदारी उचलणारे आणि सर्वांच्या आनंदात मनापासून  आनंदी होणारे लोक हरवलेले वाटतात.

त्याच प्रकारे मृत्यु सारख्या प्रसंगी बोलवण्याची वाट न बघता पोचणारे, समय सूचकता दाखवून ती कठिण वेळ पार पाडणारे आणि कोणालाही कळणार नाही या रीतीने मदत करुन निभावून नेणारे लोक सुद्धा कथापात्रातच दिसतात.

आपण स्वत:च विचार केला, तर “तू किती छान आहेस” “मला तुझी खूप आठवण येते/येणार” “आम्हाला तुमची खूपच मदत झाली” “आम्हाला तुमच्यासाठी खूप आनंद होतोय” असले काही आणि कितीतरी वाक्य वागण्या बोलण्यात उपयोगात येण्याचा प्रकार कमी होत चालला आहे.

काही निवडक शब्द व्यासपीठावरुनच बरे वाटतात. परंतु आपण श्रोत्यांच्या ओळीत बसण्याची तयारी दाखवत नाही आणि मंचावरुन कट्ट्यावरचे प्रबन्ध करु बघतो.

या सर्वप्रकाराचे कारण शोधले तर अति भौतिकता, धनप्रधान विचारसरणी आणि वेळेचा अभाव... असले कितीतरी कारण समोर येतात. परंतु खरा प्रकार आहे तो असहज वागणे, क्लिष्ट विचार करणे आणि अस्वाभाविक जगणे.  प्रत्येक ठिकाणी नात्यांचे गणित मांडणे, मैत्रीत किंवा संबंधात अहंकाराचे रोप लावणे, काल्पनिक स्पर्धा करत प्रदर्शनाचा अतिरेक करणे हा आपला स्वभाव वाढत जातो आणि नकळत या व्यवहाराची साउली पडते पुढील पीढीवर.

सरळ, सहज आणि अपेक्षित स्वाभाविकतेने वागण्याचे सूत्र जीवनात असावे ही गरज सर्वांचीच आहे. हा प्रकार व्यवहारात आणला नाही तर पुढील काळातील चिमुकल्यांच्या नीतिकथा काहीशा असल्या असतील:

“दोन मुलांची खूप घट्ट मैत्री होती. कोणीही त्यांची मैत्री तोडू शकण्यात समर्थ नव्हते. मग एक राक्षस मनुष्य स्वरुपात येतो, तो त्या मुलांच्या मैत्रीला तोडण्याचा संकल्प घेतो. एका दिवशी ते दोघे मुलं काही गोष्टीवर वाद करत असतात. काही वेळानी दोघे एकमेकांची माफी मागतात आणि पुन्हा पुर्वीसारखे वागू लागतात. राक्षस हे बघतो. पुढच्या वेळी जेव्हां दोघे वाद घालत असतात, तेव्हां तो एका मुलाच्या कानात सांगतो “जो आधी माफी मागतो, तो हरतो आणि जो नंतर माफी मागतो, तो जिंकतो.” हीच गोष्ट तो दुसर्र्या मुलाच्या कानात सांगतो. त्यानंतर ते दोघेही मुलं कधीच एकमेकांची माफी मागत नाही आणि त्यांची मैत्री तुटते व राक्षस जिंकतो.”

खरंच, एकदा आरसा बघावा!!

 

अन्तरा करवडे

 

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू