पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

आयुष्याचा डाव

" आयुष्याचा डाव "


लग्नगाठ जोडते कुटुंबाशी

नव्हे एकल्या पतीराजाशी

संस्कारमंत्र हा वेळोवेळी

मातेने फुंकला कानाशी ।

          

वलय गुंफले भलेपणाचे

स्वत्वाला लावून कड्या

नात्यांचे घरकूल टिकविण्या 

त्यागाच्या घातल्या पायघड्या ।


पती विनोदे मारी हाका

काकी, वहिनी, सुनबाई म्हणूनी

मुले सतत करी तक्रारी

केवळ आमुची का न जननी ?


अशी कशी मेणाची बाहुली

म्हणून मैत्रीणी करती कोपा

मग्न होऊनी विणत राहिले

कुशल सुगरणीचा खोपा ।


मात्र एकदा अनवधानाने

ओठांची शिवण उसवली

शतदा सोसल्या अवमानावर

एक अवज्ञा तांडव ठरली ।


शून्य निकालासाठी जणू

आयुष्याचा डाव मांडला

मातीचे कुल्ले गळून पडले

मूल्यवान मी काळ सांडला ।


अंतर्मन कानी कुजबुजले

उशीर झाला पण हो शहाणी

तडे भिंतीचे किती सांधशील

पूस पस्ताव्याचे पाणी ।


टाकीचे घाव सोसायाला

दगडाची देवी नाहीस तू

जिवंत कुडीच्या शिंपल्यातले

हाडामासाचे मौतिक तू ।


 © जया गाडगे, इंदूर

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू