पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

साधारण शेतकरी भाग १

साधारण शेतकरी

शेती, शेतकरी, कृषी उत्पादन, संभाव्य नैसर्गिक नुकसान, शेतमालाचा भाव आणि शेतकऱ्यांना मिळणारा दाम ही एक साखळी आहे.

मी या विषयातला काही तज्ञ नाही, पण लहाणपणापासून जे अनुभवलय त्यातून जे काही उमजलय ते...आढावा...

प्रातःकाळी पहाटेच कोंबडा बांग द्यायचा.."कुक्कूच्च् क्क्कू" ! दोन्ही हात जोडून कपाळाला लावत "पांडूरग विठ्ठला" असा देवाचा आठव करीत शेतकरी कारभारीन लगबगीने उठत असे. कोंबड्याचा खुराडा उघडून कोंबड्या फडफड करीत हुंदडायला मोकळ्या होत. कारभारीन एका बाजूला पाणी तापविण्यासाठी बंबात जाळ घाली. अंगणात सडा मार्जन करून स्नान करी. दारात ठिपकेदार रांगोळी करुन देवपुजा व तुळशी प्रदक्षिणा होई. सुर्यदेवाच दर्शन घेऊन माऊली चुल पेटवून घरधन्याचा चहाकडे वळत असे. घरधनी गोठ्यातील गाई बैलांकडे चारापाणी देऊन ऊजाडलेल्या दिवसाला शेतीकामाला जुंपून घेई.

एका दशका पूर्वी म्हणजे साधारण सत्तरीच्या दशकापर्यंत शेतकरी पारंपारिक धान्याच उत्पादन घेत असे. गावरान ज्वारी, खपली गहू, कांदा, भुईमुग, करडई, कपाशी म्हणजे कापुस, हरभरा, तुर, मुग, मटकी थोड्याप्रमाणात ऊस असे गावरान वाण पेरले जात. शेतकऱ्यांकडे पुरेस पशूधन असे. गोठ्यात दावाणीला खिल्लारी बैल, देशी गाई, म्हैसी, शेळ्या असे पशूपालन असे. त्यामुळे घरटी मोठा ऊकिरडा असे. सेंद्रिय आणि शेणखतावर शेती पिकवली जायची. साधारण शेतकऱ्यांकडे जिरायती व विहिर बागायती मिळून साधारण पन्नास एकर क्षेत्र असायच. पारंपारिक वाणाच्या बी-बियाणाचे होणारे कृषी उत्पादनाचे प्रमाण कमी होते. म्हणजे एकरी पाच ते सात पोती ज्वारी होत असे. तेच कमी अधिक प्रमाणात इतर धान्याच असे.

निसर्ग चांगली साथ देत असे. शेतीसाठी अत्यावश्यक हमखास पडणारा पाऊस आणि थंडी यामूळे कुटुंबाची अन्नधान्याची वार्षिक गरज भागवून फार थोडे धान्य बाजारात आडत्याकडे विकले जाई. शेतकऱ्याकडे पूरेसा पैसा खुळखूळत असे. सणसुदाची खरेदी आणि लग्न-समारंभ वगैरे खर्चाची तोंडमिळवणी होत असे.

कुटुंब नियोजन नसल्याने तेव्हा किमान पाच मुल असत. मोठ्या कुटुंबामूळे जास्त राबणारे हात पण खाणारी तोंडेही जास्त असा साधा सरळ मामला होता. १९७२ चा दुष्काळ पडला आणि शेतीची समीकरणं बदलली. सरकारी पातळीवर जनजागृती होऊन जास्त उत्पादन देणारे संकरीत अथवा परदेशी वाण पेरले जाऊ लागले. म्हणजे जिथ एकरी पाच-सात पोती गावरान धान्य होत असे तिथं पंधरा-वीस पोती संकरीत धान्याच उत्पन्न मिळू लागल.

साठ-सत्तरीच्या दशकापर्यंत नांगर आदी पारंपारिक औत-अवजारे आणि बैलानी चालवलेली मोट हे सिंचनच प्रमुख साधन होत. याच सिंचनासाठी पुढे किर्लोस्कर कंपनींच डिझेल इंजिन आणि पंप वापरला जाऊ लागला आणि इथच शेतीची व्यवसायिक गणितं बदलू लागली. जास्त उत्पन्नासाठी लांबच्या अथवा भौगोलिक अडचणीच्या शेतमळ्यासाठी जमीनीखालून पाईपलाईन संकल्पना रुजू लागली.

बैल गाई पशूधनाची शेती स्वयंपूर्ण होती. पूढे इंजिन-पंप, पाईपलाईन, कीटकनाशके, औषधे फवारण्याचे हातपंप अशी तांत्रिक उपकरणे, संकरित बी-बियाणे, युरिया, सुफला, असेंद्रिय खते अत्यावश्यक झाली आणि शेती परावलंबी झाली. इंजिन चालविण्याचा डिझेलचा, दुरुस्ती देखभालीचा नियमित खर्च होऊ लागला. इथच एक मेख होती. शेतीच उत्पन्न सहामहिने वर्षाने मिळे पण या खर्चासाठी नियमित खेळते भांडवल लागे. खर्चाची तोडमिळवणी होईना. उत्पन्न वाढत असताना खेळत्या भांडवलाची चणचण भासू लागली. अन् पाच-सहा भावामधील एखाद्या भावाला मुंबई-पुण्याकडे एखाद्या छोट्या मोठ्या नोकरीसाठी गाव सोडावा लागला.

क्रमशः भाग १
घनश्याम
२२ जुलै २०२०

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू