पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

आनंदाचे डोही

*आनंदाचे डोहीं*

'विठ्ठोबा रखुमाय..जय जय विठ्ठोब्बा रखुमाय' जयजयकारात वारकरी भगवी पताका खांद्यावर घेत वारीत सामील होतो. पूर्वी जेष्ठवडीला कोसळलेल्या हमखास पावसात पीकपेरणी करुन शेतकरी उसंत घेत. आषाढात पंढरीची वारी नित्यनिमेने करणारे वारकरी आणि कैक शेतकरी कष्टकरी वैष्णवजण आळंदी, देहु ते पंढरपूर पायी चालत जाऊन परिसर समाज आणि स्वःमने भक्तीरराने नादमय करतात.

परंतू या वेळेची वारी वेगळी आहे. जगभरात आणि महाराष्ट्रात कोविड साथीच्या पार्श्वभूमीवर लोकांना आणि वारकऱ्यांनाही एकत्र येता येणार नाही. वारी आणि वारकरी ही एक अष्टधा प्रकृती आहे. यावेळी मात्र वारी आणि वारकऱ्याची ताटातूट होणार आहे. परंतू विठु माऊली प्रत्येकाच हृदयस्थ दैवत आहे, म्हणून संतांचे उपदेशच वारकरी भक्ताला उभारी देतील.

खर पाहिल तर समर्थ रामदास स्वामींनी यात्रा जत्रा या संबधी सांगितलय...
बहु हिंडता सौख्य होणार नाही।
शिणावे परी नातुडे हीत कांही।
विचारे बरे अंतरा बोधवीजे।
मना सज्जना राघवी वस्ति कीजे ।।

वारीचे आपलेपण आज शक्य नाही तरीही, हा मोलाचा सल्ला देताना समर्थांनी अंतर्मुख होऊन श्रीराम सानिध्यात आत्मोन्नतीचा उपदेश केला आहे.

जणांच्याउध्दारा सगुण साकार विठ्ठलाची करुणा भाकित जगतगुरु संत तुकारामांनी एकांत सेवनाच मर्म सांगताना निर्गुण निराकाराची आळवणी करित सारा भार पांडुरंगावर टाकला.
न करावा संग l वाटे दुरवावें जग ll
सेवावा एकांत l वाटे न बोलावी मात ll
जन तन धन l वाटे लेखावें वमन ll
तुका म्हणे सत्ता l हातीं तुझ्या पंढरिनाथा ll

समर्थांना एकांत आवडे. पण साधकांना लोकसंग्रहाचा सोस पडे. चाफळचे राम मंदिर व अकरा मारुतींची स्थापना करणारे समर्थ स्वतः मात्र 'दास डोंगरी राहतो' असे सांगत निर्जन घळीत वास्तव करित.

अखंड एकांत सेवावा l अभ्यासची करीत जावा l
काळ सार्थकची करावा l जनासहित ll
दास डोंगरी राहतो l यात्रा देवाची पाहतो l
देव भक्तासवे जातो l ध्यान रूपें ll

मणुष्य मुलतः संचारी वृत्तीचा ! नवनवीन ठिकाणे किंवा तीच ठिकाणे अनेकदा भेट देताना येणारे नवनवीन अनुभव गाठीला बांधुन प्रापंचीक मनामधे विठ्ठल भक्तीचा उमाळा घेऊन कष्टप्रद पायवारी चालतो. संसार तापातील आसक्तीतून अंमळ चार दिवस दूर होताना 'ज्ञानोबा माऊली- तुकाराम' आणि 'जय जय रामकृष्ण हारी' विठ्ठलनामाचा टाळमृदुंगासोबत गजर करित संतमेळा आणि सामान्य वारकरी रममाण होऊन जातात. ज्ञानोबा माऊलीं सोबत डोळे भरुन विठु माऊलीला पाहतात.
बहुत सुकृतांची जोडी l
म्हणुनी विठ्ठल आवडी ll

सर्व सुखाचे आगरु l
बापरखुमादेवीवरु ll
'सर्व सुखाचे आगर' तीर्थक्षेत्र पंढरपूर हे जणू त्यांच्या जीवनाचे साध्य बनुन जाते.

इथ तुकाराम महाराज मात्र विठु-माऊली वेड्या भक्ताला काही सांगु इच्छितात.

तीर्थी धोंडा पाणी। देव रोकडा सज्जनी।
मिळालिया संतसंग। समर्पिता भले अंग।।
तीर्थी भाव फळे। तेथे आनाड तें वळे।।
तुका म्हणे पाप। गेले गेल्या कळे ताप।

तीर्थाच्या ठिकाणी जाताना भावभक्तीने हळुवार मनात अंतःकरण शुध्दतेची रूजवात होते आणि सज्जनतेचे आचरण ही देवदर्शनाची रोकडी प्रचिती आचरणात येण्यास उद्युक्त करते. संतसंग आणि सज्जन माणूस ही देवाचीच रुपे आहेत. आचार आणि वागणे त्याच सद् विचारांनी प्रेरितांचे आशिर्वाद मिळून आपले कल्याण व्हावे ही सदिच्छाच सुदृढ सद्वर्तनी माणुस तसच समाज घडवू शकतो.

तिर्थाच्या ठिकाणी भावार्थाचे फळ मिळते पण सज्जन सानिध्यात सदाचाराचे शिंपण होते.
तुकाराम महाराज म्हणतात- मनुष्याच्या ठिकाणचे पाप, कुविचार नाहीसे झाल्याची खून म्हणजे, त्याच्या मागचे त्रिविध ताप सहन करण्याच त्यास बळ मिळते.

प्रापंचिकाचे विविध सांसारीक तापाची संकटे झेलण्याचे दुष्टचक्र सुरूच असते. संताकडे ते सोसण्याची 'सहनसिध्दी' असते तर सामान्य भक्ताला 'सहनशक्ती' अंगी बाणवावी लागते. वारकरी संयमाची अनुभूती घेतो ती याच पंढरीच्या वारीत आणि ही शिदोरी वर्षभर राखून ठेवतो. विठ्ठल दर्शनाने त्याच्या दुःखावर जणू सदाचारी, सहनशक्तीचा आनंदी वज्रलेप चढतो.

चंद्रभागेच्या पारमार्थिक आणि सांस्कृतिक तीरावर दुथडी भरुन वहाणाऱ्या वाळवंटी घुटमळणारे मन आज तल्लीन होऊन म्हणत असेल...
विठ्ठल जळी स्थळी भरला l
रीता ठाव नाही उरला ll

'बा विठ्ठला' तु युगे अठ्ठावीस तिथेच वीटेवर उभा रहाणार आहेस मग चिंता कसली !

कैसा कृपाळु हें न कळसी देवा ।
न बोलसी सेवा घेसी माझी ॥१॥
काय ऐसें बळ आहे तुजपाशीं ।
पाहों हा रिघेसी कोणा आड ॥ध्रु.॥
पाडियेला ठायीं तुझा थारा मारा ।
अवघा दातारा लपसी तो ॥२॥
आतां तुह्मां आह्मां उरी तों चि बरें ।
काय हें उत्तरें वाढवूनि ॥३॥
तुका ह्मणे मज साहए झाले संत ।
ह्मणऊनि मात फावली हे ॥४॥

कृपाळु भगवंताला मानस पुजा स्विकारण्याची साद घालणारी आजची वारकरी पावले पुढील वर्षी विठ्ठल भेटीला आतुर होतील आणि पाय आपसूकच वारीला वळतील...

पाऊले चालती पंढरीची वाट,
सुखी संसाराची सोडुनिया गाठ...
प्रतिक्षा संपेल, अन्...
आषाढी एकादशीला वारकऱ्याचं सर्वांग संत तुकोबाचा अभंग गात असेल...
आनंदाचे डोहीं आनंद तरंग l
आनंदचि अंग आनंदाचें ll

इदं न मम
घनश्याम
१ जुन २०२०
आषाढी एकादशी


पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू